'माणसाचं जीवन हे अज्ञात असतं. जसं जसं त्याला ज्ञान प्राप्त होतं. तसं तसं जीवन हे ज्ञात होतं. अज्ञात जीवन ज्ञात करण्यासाठी 'पुस्तक' हे एक जीवनदायी माध्यम आहे.
परवा सहज पुस्तक वाचत असता बेंजामिन फ्रँकलिन यांनी हळूच माझ्या कानात सांगितलं. 'मेल्यानंतर भरपूर झोपायचं आहे. आता तरी जागा रहा..!'
त्यापासूनच मी खडबडून 'आतून' जागा झालो.
दररोज जीवन जगत असताना पोटापाण्याच्या प्रश्नाचे उत्तर सोडवत असताना कधी कधी शारीरिक कष्टातून एखादी शारीरिक पातळीवर डूलकी लागते. मग अशी डूलकी लागली असता.आणखी थोडी हळुवारपणे झोपेतून जागे करण्याची वेळ येते, म्हणतात. मनाच्या नियंत्रणाखाली शरीराचे अवयव असतात.म्हणूनच आतुन जीवंपणा यावा लागतो..मग असा जीवंतपणा सोबत घेवून अविरतपणे प्रवास करणारे वेगळे पुस्तक जे आपल्या DNA-RNA यांनाही आपल्यासोबत घेऊन जात असते.असे पुस्तक भेटले की आपण मग कायमचेच जागेपणीचे आयुष्य जगतो.
अशाच 'जीवंत' पुस्तकाचा जीवनपट आपण उलगडून पाहणार आहोत.
पुस्तकाचे नाव आहे.'अभिनव जलनायक' मेनका प्रकाशनाचे २३७ पृष्ठसंख्या असणारे हे पुस्तक " सतीश खाडे यांनी लिहिलेले आहे.
" फार वर्षापुर्वी एका मासिकात पुस्तक व प्रस्तावनेबाबत 'वेगळे' असे वाचावयास मिळाले.
'लंकेचा राम,अयोध्येचा रावण' या पुस्तकाची प्रस्तावना १५० पानांची आहे.तर मुळ विषय ४० ते ५० पानांचा आहे.( यामध्ये काही बदल असु शकतो..) आता ज्या पुस्तकाबद्दल मी लिहित आहे.ते पुस्तकसुध्दा वेगळ्या धाटणीचे आहे.या पुस्तकावर मी ३४ पाने लिहिली आहेत.
स्वतःचा स्वतंत्र मी शोध घेत असतो.
कोणतेही कुंपण नसणारे जीवन मी जगतो.व त्यावर माझी श्रध्दा आहे.
'निसर्गाची नवलाई' या नावाचा त्यांचा पॉडकास्ट आहे. यामध्ये पशु,पक्षी, प्राणी यांची संवेदना भावभावना याबद्दल आतापर्यंत अकरा भाग मी श्रवण केलेले आहेत. हे भाग श्रवण करत असताना निसर्गच संपूर्णपणे आपल्या भावभावनेसोबत आपल्याशी प्रेमाने बोलतो आहे असेच मला वाटते. जणू संवेदनशील मनाने संवेदनशील मनाला घातलेली ती साद आहे.
पुस्तकाची सुरुवातच मोकळ्या व प्रामाणिक मनानं झाली आहे.
'आटलेल्या, तसेच प्रदूषित झालेल्या जलस्त्रोतांमुळे पृथ्वीवरून कायमस्वरूपी नष्ट झालेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या सर्व प्रजातींना अपराधी मनाने अर्पण..!
एका गोष्टीनुसार एका तरुणाने सॉक्रेटिसला विचारले,त्याला शहाणपण,ज्ञान कसे मिळेल.
'माझ्यासोबत ये', सॉक्रेटिस उत्तरला व त्याने त्या तरुणाला नदीजवळ नेले. दोघेही नदीत उतरले व आतल्या दिशेने चालू लागले. जेव्हा पाणी गळ्यापाशी आले तेव्हा अचानक सॉक्रेटिसने त्या तरुणाचे डोके पाण्यात दाबून धरले. तो तरुण श्वास घेण्यासाठी धडपडू लागला. काही क्षणानंतर सॉक्रेटिसने त्याला सोडून दिले.
पाण्याबाहेर पडल्यावर जेव्हा तो तरुण पूर्वस्थितीला आला तेव्हा सॉक्रेटिसने त्याला विचारले," जेव्हा तुझे डोके पाण्याखाली होते तेव्हा तुला सगळ्यात जास्त काय हवे होते?"
"मला श्वास घ्यायला हवा हवी होती." तरुण उत्तरला.
सावकाश मान हलवत सॉक्रेटिस म्हणाला, "बरोबर..! पाण्यात बुडत असताना तुला जितक्या तीव्रतेने हवेची गरज होती तितक्यात तीव्रतेने तुला जेव्हा शहाणपण व ज्ञानाचा ध्यास लागेल तेव्हाच ते तुला मिळेल."
या कथेची वारंवार आठवण आली.
तज्ञता समर्पित भाव या दोन्हीचा संगम ज्यांच्या ठाई आहे. अशा चरित्र नायकांचा जीवनपट ( ज्यांच्या कार्याबद्दल मला नाविन्यपूर्ण ज्ञान मिळाले.) या पुस्तकात आहे.
डॉ.प्रमोद मोघे 'ऐंशी' की तैशी करणारा वैज्ञानिक ... पर्यावरण म्हणजे काय? निसर्गात जे सहज आणि नियमित घडते ते पर्यावरण ! आणि प्रदूषण म्हणजे काय? निसर्गातील किंवा पर्यावरणातील कोणतीही ढवळाढवळ म्हणजे प्रदूषण ! इतका सरळ साधा मूलभूत विचार मी आज पर्यंत कधीच वाचलेला नाही
तलावातले पाणी वापरण्यापूर्वी शुद्ध करतो म्हणजे काय काय करतो? तुरटी फिरवून गाळ बाजूला करतो. चुना टाकतो. मग त्यात क्लोरीन सोडतो. आता तुरटी म्हणजे अल्युमिनियम सल्फेट. त्यात आले अल्युमिनियमचे सल्फेटशी संयोग.सल्फ्युरिक ॲसिडची प्रक्रिया,
अल्युमिनियम आणि सल्फर निसर्गातूनच खाणीतून मिळणार. निसर्गातून मिळणाऱ्या कुठल्यातरी दोन संयुगाच्या प्रक्रियेत सल्फ्युरिक ॲसिड तयार होणार त्यानंतर चुन्यासाठी उकरा खाणी..आणि क्लोरीन मिळवण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर मर्क्युरीची प्रक्रिया करा. त्यातून तयार होतात क्लोरीन आणि पाऱ्यांची संयुगे.त्या पारामुळे पुन्हा जमिनीचे प्रदूषण इतके कमीत कमी प्रदूषण.इतका कमीत कमी प्रदूषणाचा खेळ आपल्याला शुद्ध पाणी मिळवण्यासाठी करावा लागतो हे पहिल्यांदाच मी वाचून हादरलो.
संपुर्ण हादरा पुढेच आहे. क्लोरीन व पाण्यातील इतर घटकांचा संयोग होऊन 'कॅन्सर' होणारी सहा प्रकारची संयुगे तयार होतात. हो त्याने अनेकांना कॅन्सर होतो. युरोप अमेरिकेने चाळीस वर्षांपूर्वी हे क्लोरीन वापरणे बंद केले. ( त्यांच्या या सत्य स्विकारण्याच्या मोठ्या मनाचा आपण सन्मानपूर्वक सन्मान केला पाहिजे.) 'तुरटी' मुळे विस्मरण इत्यादी परिणाम दिसले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल असं सांगतो.
पण हे नवीन उपयुक्त ज्ञान सांगत असताना. एक खंतही त्यांनी सांगितलेली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्याच्या निर्देश शुद्ध पाण्यासाठी विविध ४० कसोट्या सांगितल्या आहेत.त्यापैकी भारतातील कुठल्याही शहरांमध्ये यातील निम्म्याही कसोट्या तपासल्या जात नाहीत. तर दोष दूर करणे दूरच.जास्तीत जास्त २० कसोट्यातून पार झालेले पाणी मिळते तेच आपण शुद्ध समजतो शिवाय त्यात क्लोरीन आहेच.
डॉ. मोघे सरांनी १९९० ते २००२ पर्यंत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी फक्त आणि फक्त पाण्यावरच काम केले.पूर्ण वेळ पाणी ! त्यातही ९०% वेळा सांडपाणी !!
त्यांनी देशांतर्गत तेहतीस व आंतरराष्ट्रीय सात पेटंट मिळवली आहेत, एकूण ४० पेटंट. एक पेटंट घ्यायची असेल तर काय काय करावे लागते, हे कळलं तर डोकं गरगरत. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष पुस्तकांमध्ये हा पेटंटचा प्रवास वाचावा. एवढं सगळं करूनही पेटंट मिळालेला आनंद फक्त सात वर्षे टिकतो. नंतर त्याचे स्वामित्व समाजाकडे ! येथे पेटंट खुले होते. यासाठी भरमसाठ पैसा वेळ द्यावा लागतो. त्यासोबत संशोधन आणि अभ्यास आहेच.
हे वाचत असताना मला 'प्रवास' या पुस्तकातील एक प्रसंग आठवला.
" राईट बंधूंना आपण जरी विमानाचे संशोधक मानत असलो तरी ते स्वतः मात्र तसं मानत नव्हते. विशेषतः विमानाचा शोध आपण स्वतःच लावला असा त्यांनी कधी दावाच केला नाही. त्यांनी १९०६ साली जे पेटंट घेतलं त्यातुनही आपल्याला हे जाणवतं." उडणाऱ्या यंत्रामध्ये आपण काही नवीन उपकरणं तयार केली आहेत.आणि त्यात काही सुधारणा केल्या आहेत अशा आशयाचं त्यांच पेटंट होतं. त्यांच्या पेटंटच शीर्षक होतं : न्यू अँड युजफुल इम्प्रुव्हमेंट्स इन फ्लाइंग मशिन्स..!
हे सगळं विचार करायला लावणारं आहे.
झाडांना देई पाण्यापुरते पाणी हे प्रकरण विजय जोगळेकर यांच्या कार्याबद्दल तळमळीने सांगते.
'साडेसात अश्वशक्तीचा पंप २४ तासात जेवढे पाणी उपसतो, तेवढेच पाणी एकरभर फळ बागेला वर्षभरासाठी आवश्यक असते व झाडाला जास्तीत जास्त किती फळे लागू शकतात, हे जोगळेकर लगेच सांगू शकतात. तुम्हाला एक-दीड महिना फळ अगोदर यायला हवे किंवा उशीर यायला हवे, तर त्याप्रमाणे आपण करूया असे जोगळेकर सहज सांगतात. ही जादू करायला ते शिकले आहेत.४५० मिलिमीटर पाऊस खरं तर पुरेसा आहे. आणि हे कृतीने सिद्ध करणाऱ्या शेती, शेतकरी, दारिद्र्य, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, लोकाभिमुख उत्तर शोधण्याची तयारी, केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रसिद्धीपासून लांब राहणे, ज्ञानयोग व कर्मयोगाची साधना करत साधे जीवन जगणे समजून घेण्यासाठी हे वाचलेच पाहिजे.
...तर कोणत्याही झाडाचा एक प्रोग्राम असतो. संगणकाच्या प्रोग्राम सारखा तो बीजापासून सुरू होऊन मूळ खोडाद्वारे प्रवास करत फळापर्यंत येऊन पोहोचतो, तो त्यांनी समजून घेतला, अनुभवला आहे.
जगात वनस्पतीच्या चार लाख प्रकारच्या प्रजाती आहेत. त्या सगळ्यांचे घटक सारखेच आहेत. त्या सर्व कशापासून बनल्या आहेत,तर ७५%पाणी,२४% हायड्रोकार्बन आणि एक टक्का मिनरल्स. त्यातला प्रत्येक घटक महत्त्वाचा, त्याच्या वाढीसाठी हे सर्व घटक हवेतच ! एका घटकाच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या घटकाचा उपयोग होतो. विविध प्रक्रिया या प्रत्येक घटकांचा स्वतःचे एक रोल असतो.असं हे मानवी जीवनातील विश्लेषण मनाचा ठाव घेणारे आहे. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झालेल्या नवीन गोष्टी या ठिकाणी अविश्वसनीयरीत्या वाचावयास मिळतील. ही माहिती खरोखरच पुढील पिढीचा वारसा सांगणारी आहे. आणि एवढे महान काम करूनही,नम्रता मात्र हिमालया एवढी ते म्हणतात,'अरे, मी काहीही विशेष केलं नाही. मी जे केले तो फक्त रहस्यभेद! अद्भुततेचा भेद!
Dismistryfication !! हे सगळं निसर्गात चालतच होतं लाख वर्षांपासून. त्याची उकल मी केली फक्त. अरे, माणसाची आजवरची सगळी प्रगती त्यामुळेच तर झाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा शोध, विविध अप्लिकेशन हे रहस्य भेद याचाच परिणाम आहे. सर्व निसर्गात आहेच अस्तित्वात.माणसाला ते रहस्य गवसले. त्याचा त्याने परत वेगळ्या पद्धतीने वापर करून घेतला, की तो शोध किंवा तंत्रज्ञान ठरते. मी अगदी तेच केले, विशेष काही नाही. खरंच या ठिकाणी 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !!
उसातले पाणी फिरवते चक्र बी.बी.ठोंबरे प्रकरणात उद्योजकातील दोन तीन प्रमुख गुणांचा उल्लेख वाचावयास मिळतो. पहिला म्हणजे विश्वासार्ह नेतृत्व गुण.. दुसरा म्हणजे, व्यावसायिकतेचा अर्थ.. नफ्यासाठी व्यवसाय तेवढेच नाही तर सर्व घटकांचे परस्परावलंबित मान्य करणे व त्यांच्या हिताचे निर्णय घेणे. तिसरे म्हणजे नवनिर्माणाची आस व ध्यास..
ठोंबरे साहेब म्हणजे कल्पकतेचे भांडार त्यांनी सांगितलेले नवनिर्माणचे तीन प्रकार
पहिला प्रकार म्हणजे एखादी कल्पना घेऊन सतत यासाठी प्रयोग करणे, दुसरा प्रकार म्हणजे गरजेपुरती किंवा अपरिहार्यतेपोटी करावे लागणारे नवनिर्माण आणि तिसरे म्हणजे अपघाताने होणारे नवनिर्माण ( उदाहरणार्थ पेनिसिलीन ) रांजणीतील नॅचरल शुगर कारखाना हे त्याचे जिवंत उदाहरण.
सर्वात पहिल्यांदा कच्ची साखर ब्राझील वरून आणली. कच्ची साखर पिवळसर असते आणि दाणेही बारीक असतात. ती पक्की करायची म्हणजे काय तर दाणे मोठे व पांढरीशुभ्र साखर तयार करायची. त्यासाठी कच्च्या साखरेवर सल्फर डायऑक्साइडची प्रक्रिया करायची. आता यासाठी परदेशातील कारखाने खास मशिनरीचा वापर करतात. त्यांची किंमतही भरपूर आहे. पण ठोंबरे साहेब व त्यांच्या कारखान्याच्या इंजिनियरनी मिळून एक नवीन प्रक्रिया विकसित केली. उसाचा रस त्यापासून पाक आणि पाकापासून साखर अशा तीन टप्प्यात कारखान्यात साखर बनते. आता या प्रक्रियेतील यंत्रात एक विशिष्ट डिझाईन केलेले भांड बसवलं आणि कच्ची साखर पक्की होऊ लागली. अगदी नगण्य किमतीचं सुधारित भांड वापरून. त्यानंतर त्यांनी पुढच्या काही वर्षात सल्फर- डायऑक्साइडची प्रक्रिया टाळणार यंत्रणाही तयार केली. त्यामुळे साखरेतील गंधकाचे प्रमाण खूप कमी झाले आणि त्यामुळे साखरेतील दोषही खूप कमी झाला.
साखर कारखान्यातून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या मानांकनानुसार जास्तीत जास्त चारशे लिटर प्रति टन इतके सांडपाणी सोडण्यास परवानगी असताना नॅचरल शुगर कारखान्यातून फक्त ५० ते ७० लिटर प्रति टन इतकेच सांडपाणी बाहेर जाते. उसाच्या रसाच्या पाण्यापासून झालेल्या वाफेच्या दबावातून टर्बाईन्स फिरवून मोठ्या प्रमाणात विद्युती बनवली जाते, मगच त्या वाफेचे पाण्यात रूपांतर केले जाते. म्हणजे वाफेचा दुहेरी उपयोग सुरू झाला. आता लागणारे पाणी साखर कारखान्यातूनच मिळते आणि डिस्टलरीच्या सांडपाण्यातून पुन्हा पाण्याची पुनर्निर्मिती सुरू झाली, त्यात त्यावर वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून वर्षाला या प्लांटमधून पन्नास हजार घनमीटर बायोगॅस आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड तयार केला जातो. या बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करून पुन्हा त्यातून वाफेद्वारे विद्युत निर्मिती होते.
कार्बन-डाय- ऑक्साइडचे कॉम्प्रेशन करून सॉफ्टड्रिंक बनविणाऱ्या कारखान्यांना तो विकला जातो. हे सर्व करताना ट्रीटमेंट झाल्यामुळे पूर्ण शुद्ध पाणी बाहेर पडते. ते परत परत वापरले जाते. सगळ्यात परमोच्च बिंदू म्हणजे डिस्टिलरीतून झिरो प्रदुषण आहे. कारण बायोगॅस वापरल्यामुळे इतर कुठल्याही प्रकारचे इंधन जळत नाही, त्यामुळे धूर नाही त्यामुळे हवेचे प्रदूषण नाही आणि शेवटी शुद्ध पाणी म्हणून बाहेर पडते, म्हणजेच पाण्याचेही प्रदूषण नाही.
अशीही पाणी पुनर्निर्मितीची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला मार्गदर्शक व प्रेरक ठरली. आज मितीला जवळ जवळ सर्वच कारखान्यात ही राबवली जाते.
या कार्याला घरातूनच बसल्या जागेवरून सलाम ठोकला.
हे नाविन्यपूर्ण उपक्रम, वैज्ञानिक प्रयोग व प्रयोगकर्ते यांचे 'जरा हटके' जीवनगौरव चरित्र वाचत असता.एका नोंदीने लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
'गन्स,जर्म्स ॲण्ड स्टील' जेरेड डायमंड ( अनुवाद- सविता दामले ) जे मानव जातीचा १३ हजार वर्षाचा संक्षिप्त इतिहास सांगते.
गरज ही शोधाची जननी बनण्यापेक्षा शोध हाच गरजेचा पिता ठरतो..!
जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, कारण ब्रिटिश कोळसा खाणीत भरलेले पाणी बाहेर काढण्याची समस्या त्याला सोडवायची होती. जेम्स वॅटन खाणीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला खरा, परंतु लवकरच त्याचा वापर कापड गिरण्यांना ऊर्जा देण्यासाठी होऊ लागला. नंतर रेल्वे इंजिन आणि बोटीच्या इंजिनासाठी अधिक नफ्यावर त्याचा वापर होऊ लागला.
जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध तेव्हा चहाच्या किटलीच्या तोंडातून बाहेर येणारी वाफ पाहून त्याला प्रेरणा मिळाली होती. या तथाकथितदंतकथेमागचं सत्य हे आहे की वॅटला आपल्या वाफेच्या इंजिनाची कल्पना थॉमस न्यूकॉमेननं बनवलेल्या वाफेच्या इंजिनाच्या मॉडेलमध्ये दुरुस्ती करताना मिळाली होती. ते इंजिन न्यूकॉमेनने ५७ वर्षापूर्वी शोधलं होतं आणि वॅटचं दुरुस्ती काम अवतरेपर्यंत तशी शंभराहून अधिक इंजिनं इंग्लंडमध्ये बनली.सुद्धा होती.
न्यूकॉमेननंही थॉमस सॅव्हरी या इंग्रज व्यक्तीने १६९८ साली स्वामित्वहक्क घेतलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे आपलं इंजिन बनवलं होतं, तर सॅव्हरीने आपलं इंजिन डेनिस पॅपिन या फ्रेंच माणसानं १६८० साली डिझाईन केलेल्या परंतु प्रत्यक्षात न बनलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे बनवलं होतं. त्या फ्रेंच माणसानंही डच शास्त्रज्ञ ख्रिस्टियन हायगेन्स आणि अन्य लोकांच्या मूळ कल्पनेवरून डिझाइन केलं होतं.वॅटनं न्यूकॉमेनच्या इंजिनात ( स्वतंत्र स्टिम कंडेन्सर आणि डबल ॲक्टिंग सिलिंडर बसवून ) भरीव सुधारणा केली.
... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.
विजय कृष्णात गायकवाड