कोपर्निकसच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी आणखी एका खगोलवैज्ञानिकाचा प्रवेश झाला.तो म्हणजे टायको ब्राहे.डेन्मार्कचा राजा फ्रेड्रिक याच्या मदतीने टायकोने संशोधनास सुरुवात केली. कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध करणारा हा एक खगोलविंद,सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते असे सांगणाऱ्या कोपर्निकसकडे त्यावेळेस पुरावा नव्हता.पुराव्याशिवाय केलेले विधान हे गृहितकच मानले पाहिजे.ते सत्य म्हणता येणार नाही असे विज्ञान सांगते.
त्यामुळे ओसियांडरने कोपर्निकसच्या पुस्तकामध्ये केलेल्या प्रस्तावनेतील विधान आक्षेपार्ह म्हणता येणार नाही.
परंतु तसे मत असण्यामागची भूमिका चुकीची आहे.पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला धार्मिक विचारवंतांनी पुरस्कृत करून प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती.धर्मामध्ये जे सांगितलेले आहे त्याला विरोध करणे योग्य नाही ही भूमिका व्यवहार्य नाही.किंबहुना ती समाजाला घातकही आहे.
टायको ब्राहेने कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध धार्मिक दृष्टिकोनातून केलेला नव्हता तर तो स्वतः केलेल्या निरीक्षणावर आधारित होता. आकाशनिरीक्षणासाठी एक परिपूर्ण वेधशाळा त्याने डेन्मार्कमधील यूरानिबोर्ग येथे वसवली होती.
११ नोव्हें.१५७२ साली शर्मिष्ठा तारकासमूहातून झालेल्या तारकास्फोटाच्या त्याने केलेल्या नोंदी आजही खगोल अभ्यासकांना उपयुक्त ठरत आहेत.त्या तारका स्फोटाला 'टायकोचा सुपरनोव्हा' असे संबोधले जाते.
टायकोच्या मताप्रमाणे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना स्पष्ट दिसत असताना,सूर्य स्थिर आहे हे कोपर्निकस कशाच्या आधाराने म्हणू शकतो ? कोपर्निकसच खरे तर चुकीचा आहे हे ठरविण्यासाठी त्याने ग्रह ताऱ्यांच्या असंख्य नोंदी ठेवल्या.त्या निरीक्षणावरून गणिताच्या मांडणीतून'एक दिवस कोपर्निकसला खोटा ठरवेन' हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. गणिताच्या मांडणीसाठी त्याने जोहानस केप्लरला मदतनीस म्हणून घेतले.नवतारा, धूमकेतू,वेधसाधने इ. विषयावर टायकोने विपुल लेखन केले असून त्याचे
समग्र लिखाण १५ खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे.
निरीक्षणसामग्री आणि टायकोचा अनुभव याचा फायदा होईल या उद्देशाने केप्लरने तऱ्हेवाईक आणि भांडखोरवृत्तीच्या टायको बरोबर जुळवून घेत आपले संशोधनाचे काम सुरु ठेवले.
वर्षभरात टायकोचे निधन झाले.पण मृत्यूसमयी केप्लरकडून आश्वासन घेतले की निरीक्षण करून कोपर्निकसला एक दिवस चूक ठरवेनच.
१ डिसेंबर २०२२ लेखामधील पुढील भाग..