टायको ब्राहेने कोपर्निकसचा सिद्धांत चूक ठरवण्यासाठी मदतनीस म्हणून घेतलेल्या केप्लरने मात्र कोपर्निकसचीच बाजू घेतल्याचे त्याच्या निरीक्षणावरून दिसते.
कोपर्निकसचा सिद्धांत पूर्वापार चालत आलेल्या टॉलेमीच्या सिद्धांतापेक्षा नक्कीच सोपा आणि सुटसुटीत आहे याची प्रचिती केप्लरला येत होती.
कोणत्याही तऱ्हेचे लौकिक सुख लाभलेले नसताना,सतत निरीक्षण,सत्यज्ञानावरती श्रद्धा या त्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याने खगोलविज्ञानात मोलाची भर घातलेली आहे.केप्लरची कल्पनाशक्ती विलक्षण होती.ग्रहांच्या गतीचे नियम त्याने शोधून काढले.
त्याच्या पहिल्या नियमाप्रमाणे ग्रह सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकृती कक्षेत फिरतात आणि सूर्य त्या कक्षेच्या नाभीस्थानी असतो.दुसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांची गती ही त्यांच्या कक्षेत वेगवेगळी असते किंवा ग्रह समान काळात समान क्षेत्रफळ पार करतात. ग्रहाला स्थान १ पासून २ पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढ्याच कालावधीत तो स्थान ३ पासून ४ पर्यंत जातो.त्यामुळे ग्रह ज्यावेळेस सूर्याजवळ असेल त्यावेळेस त्याचा वेग जास्त असतो.हे दोनही नियम त्याने १६०१ मध्ये शोधून काढले.१६१८ मध्ये त्याने शोधून काढलेला तिसरा नियम ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर आणि ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी यांच्यातील संबंधावर आधारित आहे.
तिसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराचा वर्ग आणि त्यांच्या प्रदक्षिणाकाळाचा घन हे नेहमी प्रमाणात असतात.याच केप्लरच्या नियमांमुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची सिद्धता तपासून पाहता आली.पृथ्वीवर राहून दुसऱ्या ग्रहांच्या कक्षेबद्दलचे नियम केवळ निरीक्षणावरून शोधून काढण्यासाठीची केप्लरची कल्पनाशक्ती आणि शोधकता किती प्रगल्भ असेल याची कल्पना येते.
३ डिसेंबर २०२२ मधील लेखाचा पुढचा भाग..