* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भारताच्या प्राचीन कला- १

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

भारताच्या प्राचीन कला- १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारताच्या प्राचीन कला- १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३/२/२३

भारताच्या प्राचीन कला- १

जगाच्या पाठीवर कुठलीही संस्कृती जर टिकून रहायची असेल तर ती परिपूर्ण असणे आवश्यक आहे.परिपूर्ण याचा अर्थ,त्या संस्कृतीनं सर्वांगानं मानवी मनाचा विचार करायला हवा. समाजमनाचा विचार करायला हवा.आणि या कसोट्यांवर आपली भारतीय संस्कृती पुरेपूर उतरते.म्हणूनच फाळणी- नंतर पाकिस्तानचा राष्ट्रकवी झालेल्या इकबालने म्हटलं होतं


यूनान,मिस्र,रोमा,सब मिट गये जहाँ से ... ! 

कुछ बात हैं की हस्ती मिटती नहीं हमारी..!!


ही 'हस्ती' म्हणजे आपली परिपूर्ण जीवनपद्धती. जगण्याच्या सर्वच आघाड्यांवर आपण पुढे होतो. फार, फार पुढे होतो.... जाता जाता एक लहानसं उदाहरण देतो -


सन १९९४ मधे मी सर्वप्रथम अमेरिकेला गेलो. त्यापूर्वी जपान आणि युरोप बऱ्यापैकी फिरलो असल्याने अमेरिकेचं तसं फार कौतुक नव्हतं. पण तरीही अमेरिकेतल्या अनेक गोष्टी अंगावर येतच होत्या.माझी तिथली व्यवस्था बघणारा माणूस सुदैवानं भारतीय होता.बंगाली बाबू. त्यामुळे तो मला अमेरिकेतलं प्रत्येक अप्रूप दाखवत होता.तो मला 'ड्राईव्ह-इन'ची गंमत दाखवायला लागला- की,बघ,अमेरिकेत कसं सर्वदूर ड्राईव्ह-इनची सोय असते.मेक डोनाल्डमधे गाडीत बसल्या बसल्याच पैसे द्यायचे आणि गाडीत बसल्या बसल्याच आपलं खाण्याचं पॅकेटही घ्यायचं.ड्राईव्ह-इन एटीएम सुद्धा त्याने दाखवले.


मी थोडा फार तरी नक्कीच इम्प्रेस झालो होतो.

पुढे पाच / सहा वर्षांनी रायगडावर गेलो. त्या विस्तीर्ण पसरलेल्या होळीच्या माळावर ते पुरुषभर उंचीचे,एका रांगेत बसवलेले चबुतरे बघितले अन् त्या गाईडला विचारलं, 'हे काय रे बाबा..? असे उंच चबुतरे कशाला?' अगदी सहज स्वरात तो गाईड म्हणतो,"हा बाजार आहे. अहो,त्या काळी घोडेस्वार बाजार-हाट करायला आले की घोडे कुठं ठेवतील ? म्हणून


घोड्यावर बसूनच बाजार-हाट करायची सोय महाराजांनी केली होती.... खरं सांगतो,अंगावर सर्रकन काटा उभा राहिला..! कोण मॉडर्न ?


साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या रयतेसाठी, सैनिकांसाठी 'ड्राईव्ह-इन' बाजाराचे निर्माण करणारा आमचा शिवाजी राजा मॉडर्न,की गेल्या पन्नास- साठ वर्षांत ड्राईव्ह-इनची कसरत केलेले हे अमेरिकन्स मॉडर्न ?


पण हे फार पुढचं उदाहरण झालं.आपण भारतीय पूर्वीपासूनच पुढारलेले होतो.आपल्या समग्र जीवनशैलीसह आपण पुढारलेले होतो. ज्ञान-विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या बरोबरच आपल्या देशात कला,संगीत हे विषय निर्माण झाले,प्रगत झाले अन् पुढे कालांतराने प्रगल्भ झाले. कलेला एक निश्चित स्वरूप देण्याचं काम भारतानं केलंय.


अगदी आपली गायन/ वादन परंपराच घेऊ.ही खूप प्राचीन आहे.देवी सरस्वती ही प्राचीन देवता मानली जाते.तिच्या हातात वीणा दिसते.नवव्या शतकात शृंगेरीत बांधलेलं शारदाम्बा देवीचं मंदिर म्हणजेच सरस्वतीचं.गदगचं सरस्वतीचं प्राचीन मंदिर हे अकराव्या शतकात बांधलंय.पण सरस्वतीच्या मूर्ती त्याहून आधीच्या आढळतात. सरस्वतीची सर्वांत प्राचीन आढळलेली मूर्ती ही भारहून येथे सापडली आहे,जी पहिल्या शतकातली आहे.काही नृत्य-शारदाही दिसतात. पण अधिकांश मूर्ती ह्या वीणा घेतलेल्या

आहेत.म्हणजे वीणा हे वाद्य किती जुनं ? तर काही हजार वर्षं तरी नक्कीच..! म्हणजे बघा, संगीताचे उल्लेख आपल्याकडे प्राचीन काळापासून आढळतात !


सरस्वतीनं धारण केलेलं 'वीणा' हे तंतुवाद्य किमान चार हजार वर्षं तरी जुनं असावं असा अंदाज आहे. पूर्वी ही 'एकतंत्री वीणा' असायची. भरतमुनीने 'आपल्या' नाट्यशास्त्रात' 'चित्रा' (७ तारांची ) आणि 'विपंची' (९ तारांची )


ह्या प्रमुख वीणांचा उल्लेख केलेला असून घोषा, कच्छभी अशा दुय्यम वीणा सांगितल्या आहेत.


पण संगीताचे उल्लेख आपल्या वेदकाळापासून बघायला मिळतात.ऋग्वेदाला प्राचीनतम मानलं जातं,जो पाच हजार वर्षं जुना आहे.ऋग्वेदात संगीताचे उल्लेख येतात.यजुर्वेदाच्या ३० व्या कांडात १९ आणि २० व्या मंत्रांत अनेक वाद्य वाजवण्याचा उल्लेख येतो.अर्थात त्या काळात वाद्य वाजविणे' ही कला असावी.वाण,वीणा, कर्करीया तंतुवाद्यांबरोबरच अवनद्ध 'वीणा' - हे प्राचीन वाघ् वाद्यात दुंदुभी,गर्गरा तर सुषिर वाद्यात बाकुर,नाडी,तुणव,शंख यांचे उल्लेख येतात.


मात्र 'सामवेदात' संगीताचे विस्ताराने वर्णन मिळते. त्या काळात स्वरांना 'यम' म्हटले जायचे. सामवेदातल्या 'साम' चा संगीताशी घनिष्ठ संबंध होता. इतका की, 'छांदोग्योपनिषद' मध्ये प्रश्न विचारलाय,


कां साम्नो गतीरिती ? स्वर इति होवाच अर्थात 'साम' ची गती काय आहे ? उत्तर आहे स्वर.


वैदिक काळात तीन स्वरांच्या गायनाला 'साम्रिक' (आजच 'सामूहिक' ?) म्हणायचे. हे स्वर होते - ग,रे.स.पुढे हे सप्तसूर झाले. स्वरांचा क्रमांक . ठरवून जो समूह निर्माण झाला त्याला 'साम' म्हणायला लागले. पुढे युरोपमधे त्यांच्या संगीतातील अशा क्रमाला 'स्केल' हे नाव मिळाले.


याचाच अर्थ आपल्याकडे किमान तीन ते चार हजार वर्षांपूर्वी विकसित झालेले संगीत नांदत होते.पुढे भरतमुनींचे नाट्यशास्त्र आपल्याला मिळाले.अन् भारतीय संगीताच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब झाले.


ह्या भरत मुनींचा कालखंड इसवी सनापूर्वी साधारण पाचशे वर्षं मानला जातो.पण त्याबद्दल काहीसा विवाद आहे.कोणी त्यांचा जन्म इसवी सनापूर्वी शंभर वर्षं झाला असंही म्हणतात. ते काही असलं तरी भरत मुनींच्या नाट्यशास्त्राने एक मोठी गोष्ट केली.


भारतीय कला ह्या विकसित स्वरूपात,अगदी 'वैज्ञानिक रीत्या' अस्तित्वात होत्या हे निश्चितपणे सिद्ध झालं.


या ग्रंथात नाट्यशास्त्राबरोबरच इतर सपोर्टिव्ह कलांचीही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. गीत-संगीतासंबंधी विस्तृत वर्णन यात आढळते.


जगातलं सर्वांत जुनं संगीत कोणतं? किंवा सर्वांत जुनं वाद्य कोणतं? असं म्हणतात की, इसवी सनापूर्वी ४००० वर्षे मिस्रच्या लोकांनी बासरीसारखी काही वाद्यं निर्माण केली. डेन्मार्कमधे इसवी सनापूर्वी २५०० वर्षे ट्रम्पेटसारखं वाद्य निर्माण केलं गेलं.


मात्र पाश्चात्त्य जगाला सुरांच्या विशिष्ट श्रेणीत बसवलं ते पायथागोरसने.म्हणजे इसवी सनापूर्वी ६०० वर्षे.त्याने स्वरांचे मंडल तयार केले आणि त्याला गणितीय परिभाषेत बसवले.


दुर्दैवाने भारतात जुनी कागदपत्रे आणि इतर अवशेष मुसलमानांच्या आक्रमणात नष्ट झाली, त्यामुळे आपला नक्की इतिहास सांगता येत नाही.पण इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या नोंदी सापडतात आणि त्यानुसार संगीताचा किंवा वाद्यांचा नवीन शोध लागला आहे असं वाटत नाही.एखाद्या विकसित कलेला शब्दबद्ध केल्यासारख्या त्या नोंदी आहेत.


मात्र ऋग्वेद आणि सामवेदातील उल्लेख बघता आपले संगीत हे किमान ५ हजार वर्षे तरी नक्कीच जुने असावे. आणि गंमत म्हणजे सामवेदातील सूत्रांमधे एक विकसित आणि प्रगल्भ संगीतव्यवस्था उलगडत जाते.


वेदांबरोबरच अनेक उपनिषदांतूनही गीत-संगीत आणि इतर कलांचा उल्लेख मिळतो. श्रोतसूत्रांपैकी कात्यायनाचे श्रोतसूत्र आहे. मुळात हा वैदिक कर्मकांडासंबंधीचा ग्रंथ आहे. मात्र यातही उत्सवप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गीत-संगीताची रेलचेल आहे.या श्रोतसूत्राचा कालखंड साधारण तीन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.


पाश्चात्त्य संगीताचा विचार करता एक गंमत जाणवते.पाश्चात्त्य संगीतात दोन हजार / अडीच हजार / तीन हजार वर्षांपूर्वीचे उल्लेख ठामपणे केलेले आढळतात.मात्र त्या उल्लेखात नवीन काही शोधून काढण्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे.


उलट भारतीय ग्रंथांमधे जी वर्णनं आढळतात ती एखाद्या विकसित संगीत पद्धतीची माहिती देतात.अगदी सामवेदाच्या सूत्रांतही विकसित झालेल्या संगीताचे उल्लेख आहेत.याचाच अर्थ भारतीय संगीत अगदी शास्त्रशुद्धपणे कितीतरी आधी विकसित झालेलं आहे. किती आधी ? सांगणं कठीण आहे..!


एक दुर्दैव असंही की,भारतीय कलांच्या इतिहासाबद्दल जे संदर्भ येतात ते अधिकांश पाश्चात्त्य संशोधकांचेच असतात.ब्रॉडीज, इ. वुईनडिश, व्ही. स्मिथ, पिशेल, याकोबी, हार्मन कीट.... वगैरेसारख्यांचाच बोलबाला आहे.. त्यामुळे भारतीय संगीताच्या इतिहासाला एका उपेक्षित नजरेनंच पाह्यलं गेलंय.


जसं गीत-संगीत, तसंच नाटकाचंही. भारतासारखंच विकसित नाट्यशास्त्र सर्वांगानं बहरलं ते ग्रीसमधे.मात्र एकोणिसाव्या शतकात ह्यावरून वाद उसळला की भारतीयांनी ग्रीसच्या रंगभूमीवरून सर्व कल्पना उचलल्या,ग्रीसची रंगभूमी भारतीय नाट्यशास्त्रानं प्रभावित झाली होती..! यात नक्की काय घडलं.. ? की

ते पुढील प्रकरणात बघुया.. !!


१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..