* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शहीद भगतसिंह यांची जेल डायरी…

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

शहीद भगतसिंह यांची जेल डायरी… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शहीद भगतसिंह यांची जेल डायरी… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

७/९/२२

शहीद भगतसिंह यांची जेल डायरी…

' लौकिक जीवन जगण्याचे मौलिक तत्व सांगणारी शहीद भगतसिंह यांची जेल डायरी..! '


तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल,तर जुने पुस्तक वाचा.

- ( इतर काही लोकांप्रमाणेच )

इव्हान पावलॉनेही हे म्हटल्याचं मानलं जातं.


जन्मदिवसाची भेट म्हणून सहकारी मित्र अमर पाटील यांच्याकडून मला शहीद भगतसिंह यांची जेल डायरी हे पुस्तक मनस्वी भेट म्हणून मिळाले. चित्रपट,कथा कादंबऱ्या यामधून शहीद भगतसिंह यांना पाहत गेलो. वाचत गेलो. पण तरीही मनात रुखरुख होतीच या सर्वांच्या पलीकडेही ते अभंगपणे अखंडपणे उभे आहेत.आदरणीय अभिजीत भालेराव साहेबांनी संपादन आणि अनुवाद केलेले हे पुस्तक मधुश्री पब्लिकेशनचे आहे.


सुरुवातीलाच शहीद भगतसिंह यांचे नातू यादविंदरसिंह यांचे शुभेच्छा पत्र आहे.यामध्ये भगतसिंह यांचे नामकरण,भगतसिंहावर त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजीतसिंह यांचा फार मोठा प्रभाव होता.स्वर्णसिंहाचे तुरुंगात अमाप हाल करण्यात आले, त्यामुळे वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांचे तुरूंगात निधन झाले. तर अजीतसिंहांनी शेतकऱ्यांना संघटित करून 'पगडी संभाल जट्' हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला ब्रिटिश इतके घाबरले की त्यांनी अजीतसिंहांना तब्बल ४० वर्षासाठी देशाबाहेर काढले.


कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी "आम्हाला युद्धकैदी म्हणून वागणूक मिळावी."असा आग्रह धरला." आम्ही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले आहे म्हणून मृत्युदंड देत असाल तर फाशी देण्यापेक्षा सैनिकासारखं आम्हाला गोळ्या घालून ठार करा."अशी मागणी केली. त्यांनी २० मार्च १९३१ रोजी पंजाबच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात ही मागणी केली होती.ब्रिटिशांनी ही मागणी नाकारली आणि सगळे कायदे धाब्यावर बसवून फाशीच्या ठरलेल्या दिवसाच्या आधीच म्हणजे २३ मार्चला संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी ज्यांना फाशी देण्यात आली. कायद्यानुसार ठरलेल्या दिवसाआधी फाशी देणे अवैद्य आहे.आणि फाशीची वेळ ही नेहमी सूर्योदयाची असते,तोही नियम तोडून लपून सायंकाळी फाशी देण्यात आली.


भगतसिंहांनी आपल्या शेवटच्या दिवसात वडिलांना (किशनसिंहांना ) एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात,

 " जनाबवालीद साहब,या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा माझ्या आयुष्याचा एक उद्देश आहे. त्यासाठी मी स्वतःला देशकार्यासाठी अर्पण केले आहे. माझी मातृभूमी गुलामीत असताना या जगातील सुखसोयींचा आणि ऐषोआरामाचे मला अजिबात आकर्षण वाटत नाही. तुम्हाला आठवत असेल,जेव्हा मी लहान होतो तेव्हा बापुजी (भगतसिंहांचे आजोबा सरदार अर्जुनसिंह) माझे नाव ठेवताना म्हणाले होते की या पोराला देशाच्या सेवेसाठी दान केले आहे. आज मी त्यांचाच शब्द खरा करत आहे. आपला विश्वासू भगतसिंह."


असंही दुसऱ्यांच्या आयुष्याचं भलं करण्यासाठी अशाही प्रकारचे दान असतं हे पाहून जीव घुटमळल्यासारखा झाला.


मनोगतामध्ये लेखक म्हणतात, भगतसिंहांवर लिहिलेल्या कादंबऱ्या,कविता वाचून काढल्या पण तरी त्यांची विचारधारा स्पष्ट होत नव्हती. केवळ शहीद - ए- आझम म्हणून सर्वांनी भगतसिंह यांची व्यक्तिरेखा उत्तमरित्या रंगवली होती. पण त्यांच्या व्यक्तित्वाचा एक मोठा टप्पा बहुतांशी दुर्लक्षित केला गेल्याचे सातत्याने जाणवू लागले. त्यांचे पत्रकार मित्र मंगेश चिवटे त्यांच्याकडून जेल डायरीबद्दल कळले. लेखकांचा अलौकिक असा व्यक्तित्वाचा प्रवास सुरू झाला. मुळात या डायरीमध्ये भगतसिंहांनी स्वतःचे विचार किंवा अनुभव लिहिलेले नाहीत तर तुरूंगामध्ये त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील महत्त्वाची वाक्ये, कविता नोंदवलेल्या आहेत.१९९४ साली भूपिंदर हुजा ज्यांनी ही डायरी प्रथम प्रकाशित केली होती. नंतर प्राध्यापक चमन लाल आणि इतर इतिहासकारांनी ही डायरी वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केली.


रसेल,मार्क्स,रुसो,थॉमस पेन,उमर खय्याम,गालीब,अशी अनेक महान व्यक्तीरेखा,त्यांचे विचार यामध्ये आहेत.हे वाचल्यानंतर भगतसिंहांचा आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.जतीनदा वारले तेव्हा भगतसिंहांनी लिहिलेली कविता वाचून त्यांचे पराकोटीचे दुःख जाणवले.पराक्रमाची वीरगीते वाचताना भगतसिंहांच्या निधड्या शौर्याचे रहस्य उमगले.


लेखकांची विनम्रता सत्यता मला नम्रपणा शिकवून गेली. जेव्हा ते सत्य प्रकट करतात,कि वाचकाला जर कुठले भाषांतर क्लिष्ट,नीरस किंवा अत्यंत पोरकट वाटले तर त्याचा दोष मला द्यावा आणि जर कुठले शब्द काळजाला भिडले तर भगतसिंहांना आणि नमूद केलेल्या लेखकांना नमस्कार करावा.मी अभिजीत भालेराव यांना नमस्कार केला. व डायरीचे पुढचे पान उघडले.


भगतसिंहांच्या ७१३ दिवसांच्या तुरुंगवासात जेल रेकॉर्डनुसार त्यांनी ३०२ ग्रंथ वाचून काढले म्हणजेच ते जवळ जवळ दर दोन दिवसाला एका ग्रंथाचा फडशा पाडत असत. द्वारकादास वाचनालयाचे ग्रंथपाल त्यांचे मित्र होते,तेच भगतसिंहांना पुस्तके पुरवीत असत. त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे,"तो मागत होता ती तितकी पुस्तकं मला कधीच पुरवता आली नाहीत. तो एका वेळी १०-१२ पुस्तकांची नावे देत असे. तरीपण त्याकाळच्या वाचनसंस्कृतीला सलाम करावासा वाटतो.


भगतसिंहांनी स्वतः एकदा भविष्यवाणी केली 'मी मेल्यानंतर लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळेल. नंतरची काही दशकं धामधुमीत जातील आणि मग या देशाला पुन्हा माझी आठवण येईल.' त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. नंतरची पाच-सहा दशके राष्ट्रबांधणीत गेली आणि मग एकविसाव्या शतकाच्या पहाटे लोकांना भगतसिंह पुन्हा आठवू लागले.


१९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तेव्हा भगतसिंह बारा वर्षाचे होते.या घटनेचा भगतसिंहांवर खूप गहिरा प्रभाव पडला.हत्याकांडानंतर दुसऱ्या दिवशी ते जालियानवाला बागमध्ये गेले आणि रक्ताळलेली माती त्यांनी एका काचेच्या बरणीत भरून घरी आणली. आयुष्यात शेवटपर्यंत त्यांनी त्या पवित्र मातीची पूजा केली.


कर्तारसिंह सराबा हे भगतसिंहांचे आदर्श होते. ते गदर पार्टीचे आणि गदर चळवळीचे मुख्य सदस्य होते. ब्रिटनमधून शिकून आल्यानंतर कर्तारसिंह लाहोरच्या कटात सामील झाले आणि कट उधळल्यामुळे पकडले गेले.'हा सुशिक्षित तरुण अत्यंत धोकादायक असल्याने त्याला फाशीच व्हायला हवी' असा खुद्द न्यायाधीशाने शेरा मारला म्हणून वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांना ब्रिटिशसरकारने फाशी दिली. हा क्रांतिकारक हसत हसत मृत्यूला सामोरा गेला.आयुष्यात शेवटपर्यंत भगतसिंह कर्तारसिंहांचा फोटो पाकीटात ठेवत असत. त्यांनी १९२६ मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली. संपूर्णपणे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर बांधलेली केवळ युवकांची कदाचित एकमेव संघटना असावी. इटलीच्या मॅझिनी आणि गॅरीबाल्डी यांनी स्थापन केलेल्या 'युथ लीग' कडून प्रेरणा घेऊन त्यांनी 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. वाढत्या सदस्यसंख्येमुळे भगतसिंहांनी १२ ते १५ वयाच्या शाळकरी मुलांसाठी 'बालभारत सभा' स्थापन केली.ही मुलेसुद्धा राजकीय क्षेत्रात फार सक्रिय होती. याचा पुरावा ब्रिटिश पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये सापडला आहे. बालभारत सभेच्या पंधरा वर्षाखालील जवळपास १००० मुलांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली होती.


जेलमध्ये शिव वर्मा हे क्रांतिकारक भगतसिंहांचे सोबती होते. त्यांनी म्हटले आहे,'भगतसिंहांनी तुरुंगाच्या चार ग्रंथ लिहून काढले होते."


१) Idea of Socialism

२ ) Autobiography

३ ) History of Revolutionary Movement in India

४ ) At The Door of Death


यात भर म्हणजे ही जेल डायरी आणि ' Why I am an Atheist ' हा लेख भगतसिंहांनी हे सर्व साहित्य कुमारी लज्जवती देवी यांच्या हाती गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवले. लज्जावती देवी या भगतसिंहांच्या डिफेन्स कमिटीच्या सेक्रेटरी होत्या म्हणून त्यांना तुरुंगात नेहमी

येण्याजाण्याची परवानगी होती. त्यांनी काही भाग पीपल वृत्तपत्राचे संपादक फिरोज चंद यांच्याकडे दिला.भगतसिंहांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे २७ सप्टेंबर १९३१ रोजी  'Why I am an Atheist ' फिरोज चंद यांनी प्रकाशित केले. उरलेले साहित्य लज्जावतींनी बिजोयकुमार सिन्हा यांना अंदमानवरून सुटून आल्यावरून दिले.सिन्हांनी ही पुस्तके त्यांच्या एका मित्राकडे दिली पण त्याने पोलिसांच्या भीतीने ती जाळून टाकली.


या जेल डायरीमध्ये द ओरिजनल ऑफ द फमिली : फ्रेडरिक एन्जेल्स - सध्याच्या कुटुंब पद्धतीचा उदय आणि त्यात निर्माण झालेल्या दोषांची मीमांषा मानव उत्पत्तीशास्त्राच्या अभ्यासातून लिहिली आहे.

होमरचे साहित्य आणि संपूर्ण पौराणिक कथांची निर्मिती, विवाह संस्थेतील दोष,एका पदामध्ये उमर खय्याम जीवनाचा उस्तव आनंदाने साजर्‍या करण्यास सांगत आहे. तो आपल्या जीवलगास म्हणतो,तू आत्ताचे क्षण असे जग की तुला भूतकाळातील दुःखांचा आणि भविष्याच्या चिंतेचा विसर पडेल.आयुष्य क्षणिक आणि नश्वर आहे म्हणून मृत्यू कधी ही आला तरी परवा करू नकोस. 


राजा राजेशाही,नैसर्गिक आणि नागरी हक्क, मला स्वातंत्र्य द्या किंवा मरण,कामगारांचा हक्क,खरे पाहता वाचकाला या पुस्तकात काही सापडू शकते,पश्चिमेच्या औद्योगिकरणाच्या जंगलात कामगार गुणगुणत असत, असे ख्रिश्चन समाजवाद्यांचे एखादे विडंबनकाव्यही सापडू शकते. अराजकतावादी आणि बंडाच्या प्रेषितांनासुद्धा या पुस्तकात जागा मिळाली आहे. या पुस्तकातील काही गोष्टी म्हणजे केवळ भावनांचा उद्रेक आहे असे वाचकाला वाटत असेल तर मला इतकेच म्हणायचे आहे की वाचकाने त्याच्या विश्वासू संग्रहकर्त्याला ( या पुस्तकाच्या लेखकाला ) किंवा त्या साहित्यकाला दोष देऊ नये. दोष द्यायचा असेल तर तो वाचकाने स्वतःला द्यावा कारण देशातील बिकट परिस्थितीमुळे लोक वेडेपणाच्या आणि नैराश्याच्या कडेलोटापर्यंत जाऊन पोहोचले असताना वाचक निष्क्रिय असेल तरी एका अर्थी या परिस्थितीला त्याची मूकसंमतीच आहे.

Page 19, Cry for Justice by Upton Sinclair


ज्या माणसाला उदरनिर्वाहासाठी घाणेरड्या नाल्यातील मासे पकडावे लागतात आणि कडाक्याच्या थंडीपासून जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरील पिंपाच्या आड लपून,अंग चोरून झोपावे लागते. त्या माणसाच्या लेखी धर्म आणि नैतिकता या शब्दाला काहीच अर्थ नाही.

जेम्स रसेल लॉवेल यांची स्वातंत्र्य कविता,थॉमस ग्रे,हुतात्मे,असे वाचणीय उतारे,विचार स्तब्ध करतात.


" जोपर्यंत ( जगात ) कुठे दबलेला पीडित वर्ग आहे, मी त्यात आहे.जोपर्यंत कुठे गुन्हेगारीतत्व फोफावताहेत,मी त्यात आहे.जोपर्यंत एखादाही माणूस तुरुंगात बंदिस्त आहे,तोपर्यंत मी स्वतंत्र नाही."


एका क्रांतीकारकाचे मृत्युपत्र,स्वातंत्र्यलढा,आत्म्याचे अमरत्व,ही जेल डायरी वाचण्यासाठी विशिष्ट वेळ काढावा.


अर्थहीन तिरस्कारासाठी नाही, मान - सन्मानासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही,पाठीवर शाबासकी मिळविण्यासाठी नाही,पण फक्त आणि फक्त ध्येयाच्या थोरवीसाठी,तुम्ही आमच्यासाठी केलंत ते कोणीच विसरणार नाही.हुतात्म्यांना ब्रिटिश कवी आणि विचारवंत क्लॉग श्रद्धांजली देत आहेत.


तुरुंग


तिथे न हवा असते,

न सृष्टी असते,

न काळवेळाचा संबंध असतो,

तिथे काहीच थांबत नाही, काहीच बदलत नाही,

काही मंगल नाही,

काही अमंगलसुद्धा नाही,

तिचे फक्त एक निश्चल श्वास आणि भयाण शांतता आहे,

ज्यात जीवनही नाही आणि मृत्यूही नाही.

प्रसिद्ध कवी लॉर्ड बायरन यांची ही कविता याठिकाणी वाचायला मिळेल.


महान ते महान आहेत,

कारण आपण गुडघ्यांवर आहोत,

चला,

उभे राहूया आपणास ते उभे राहण्याचे बळ देत आहेत.


रुसोची समता तुम्हाला सांगत आहे.'कोणीही इतके श्रीमंत असू नये की एका गरिबाला विकत घेऊ शकेल आणि कोणीही इतके गरीब असू नये की वेळप्रसंगी स्वत:ला विकावे लागेल. विषमताच जुलूमशाहीला जन्म देते. लिहिण्यासारखं भरपूर आहे पण काही गोष्टी आपण स्वतःहून वाचाव्या लागतात व समजून घ्यावा लागतात.


जाता जाता..


सेल नंबर १३७,सेंट्रल जेल, लाहोरमध्ये, बटुकेश्वर दत्त यांनी हा तुरुंग सोडण्याच्या ४ दिवसांपूर्वी,१२ जुलै १९३० ला ( ही स्वाक्षरी ) घेण्यात आली आहे. - भगतसिंह


( बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आणि त्यांना दुसर्‍या तुरुंगात हलविण्यात आले, तेव्हा निरोपाच्या वेळी बटुकेश्वर यांनी दुःख व्यक्त केले," मला तुमच्यासारखं वीरमरण येत नाहीये." त्यावर भगतसिंह बोलले " मित्रा, तुझं काम आमच्यापेक्षा जास्त अवघड आहे. फाशीचा दोर आवळला की आम्ही मरून जाऊ पण तुला जन्मठेपे तर रोज मरण यातना होतील. तरीही तुला जिवंत राहायचे आहे. आपली स्वतंत्र भारताचे स्वप्न उराशी घेऊन जगायचं आहे."


श्रीमती विद्यावती कौर ( भगतसिंहांच्या आई, त्यांना पंजाबमाता म्हणून गौरविले जाते ) तुरुंगात भेटावयास गेल्या होत्या. त्या म्हणाल्या," बेटा भगत, इतक्या लहान वयात तू मला सोडून जात आहेस!" त्यावर भगतसिंहांनी उत्तर दिले,"बेबेजी, मी या देशात एकसाथ तेजोमय दीप लावत आहे ज्यात ना तेल आहे ना तूप आहे. हा दीप माझ्या बलिदानाच्या रक्तावर आणि विचारांवर तेवत राहील.तुम्हाला या देशात उद्या कुठेही अन्यायाशी,भ्रष्टाचाराशी लढणारा तरुण व दिसला तर तो तुमचा मुलगा भगतच आहे असे समजा."


देशाच्या युवा पिढीमध्ये प्रचंड उत्साह अन् अमर्याद ऊर्जा असते. कोणत्याही राष्ट्राच्या शक्तीचे मोजमाप त्या देशातल्या युवा शक्तींवर केले जाते. ज्या देशाची युवा शक्ती जागृत असते त्या देशाला कसल्याही प्रकारच्या शत्रूपासून काडीचाही धोका नसतो.


क्रांतिकारकांना उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी शक्यतो शांततापूर्ण किंवा कमीत कमी हिसेंचा मार्ग निवडा,असे भगतसिंह सांगत असतं. आपण येथे भगतसिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारातील साधर्म्य पाहू शकतो आणि प्रत्येक वेळी अहिंसेचाच मार्ग निवडण्याच्या गांधीजींच्या तत्त्वाशी तुलना करू शकतो.


(क्रिमियाच्या युद्धात इंग्लंड उतरला ते रशियाला तुर्कस्तानावर ताबा मिळवण्यापासून रोखण्यासाठी.दरम्यान २५ ऑक्टोबर १८५४ रोजी एक भीषण लढाई झाली. त्या लढाईवरील कवितेतील ओळी)


" काळीज देशील तर असं दे हे ईश्वरा,

जे दुःखाचा उन्हाळा पण आनंदात व्यतीत करेल."


शेवटी मनाला विचार करायला लावणारं वाक्य महाकवी पाश म्हणतात," भगतसिंह फासावर चढण्यापुर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते, जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुडपून गेले.आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे."


कोर्टात सुरू असलेल्या खटल्यासाठी अभ्यास करत असताना स्वतंत्र भारताचे स्वप्न रंगवण्याची महान काम त्यांनी या डायरी मार्फत केले. त्यांचे विचार आणि त्यांचा अभ्यास पुस्तकाच्या पाना-पानावर आपल्याला स्पष्ट दिसतो. प्रत्येकाने वाचण्यासारखं असं पुस्तक पुनश्च सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद...!


" आयुष्याला अर्थ देणारे गुरु म्हणजे माझ्यासाठी माझी पुस्तके आहेत."


◆विजय कृष्णात गायकवाड