उत्क्रांतीतल्या व जीवशास्त्रातल्या अभ्यासकांच्यामते या जगातील सगळ्यात प्रगत प्रजाती ही 'पक्षी' आहे.
मेंदूचा आकार,पखांची ठेवण यांच्या क्षमता पाहील्या तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.एवढ्या छोट्या मेंदूमध्ये जीवन जगण्याच्या नोंदी कशा काय राहू शकतात? एवढ्याशा पखांचा उपयोग करुन फारच दुरचा प्रवास कसा काय करु शकतात?म्हणजेच पक्षी हा उत्क्रांत आहे याची खात्री पटू लागते.
पक्ष्यांचे अन्नशोधाचे कौशल्य लांब अंतरावरचे अचूक स्थलांतर पाहिले.तर त्याच्या बुद्धिमत्तेला नावे ठेवता येणार नाहीत पक्ष्यांना किचकट गोष्टी शिकवता येतात तर काही पक्षी न शिकवता बाह्यसाधने वापरून शिकतात.
एखादी अळी वा फुलपाखरू खाल्ल्याने त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुन्हा त्या अळी वा फुलपाखराला तोंड लावत नाहीत.काही भडक रंग धोकादायक असतात हेही त्यांना अनुभवाने कळते.हेरिंग गल पक्षी सिंपले चोचीत घेऊन उंच जातात व त्या शिंपा दगडावर आपटतात तेव्हा त्यातून कालव खायला मिळतात हे त्यांना समजते.
जपानमधील काही शहरातील कावळे रस्त्यावरच्या रहदारीचे दिवे लाल असताना तिथे अक्रोड टाकतात.हिरवे दिवे लागले की रहदारी सुरु होऊन अक्रोड फुटतात.पुन्हा दिवे लाल झाले की रहदारी थांबल्यावर ते तुकडे गोळा करतात.यावरुन त्यांची निरीक्षणशक्ती लक्षात येते.(पक्षीगाथा या पुस्तकातील नोंदी)
हेरॉन नावाचा एक पक्षी आहे.तो बगळ्यासारखा साधारणत: दिसतो.पांढरा हेरॉन व काळा हेरॉन आहेत.त्यापैकी काळा हेरॉन हा आपलं खाद्य कशाप्रकारे मिळवितो.(यासंदर्भात व्हिडीओ आहेत.)
हा पक्षी मासे धरण्यासाठी वाहणाऱ्या पाण्यात किंवा पाण्याजवळ जाऊन तिथे तो आपल्या पंखाची छत्री तयार करून सावली तयार करतो.मासे सावली आली म्हणून तिथे येतात आणि नेमक्या वेळी त्यातील एक मासा तो उचलतो,आणि खावून टाकतो. गमंतीशीर पण शिकण्यासारखी गोष्ट आहे
त्यानंतर पांढरा हेरॉन हा जरा जास्तच हुशार आहे. हा काय करतो,तर खाण्याचा एखादा पदार्थाचा तुकडा पाण्यावरती टाकतो.व तो खाण्यासाठी ज्यावेळेला मासे येतात त्यावेळी त्यातला एक मासा तो उचलतो आणि खाऊन टाकतो.
आणखी एका व्हिडीओच्या संदर्भानुसार सतिश खाडे याला कोथरुडचा पांढरा हेरॉन म्हणतात.कारण हा जरा इतरांच्यापेक्षा 'वेगळा विचार करणारा'आहे. तर हा काय करतो.कुठून तरी थर्माकॉलचा एक तुकडा आणून तो पाण्यात टाकतो,त्या पाण्यातील माशांना वाटतं.की हे काहीतरी अन्न आहे,आणि ज्या वेळेला तो तुकडा खायला मासे येतात.त्या वेळेला तो त्यांची शिकार करतो. तो थर्माकॉलचा तुकडा तो तसाच जपून ठेवतो. खाऊन झाल्यानंतर परत निवांतपणे तोच तुकडा टाकून तो अशा पद्धतीने दररोज शिकार करतो.
कावळा आपल्या सर्वांना माहीत असणारा जवळचा व सुपरिचित असा आहे,त्यामुळे त्याचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे. त्याला अभ्यासाअंती बुद्धिमानही
म्हटलेलं आहे.त्यातील काही प्रयोग..
एकदा काय झालं कावळ्याला आवडणाऱ्या मांसाचे तुकडे एका दोरीला बांधून झाडाच्या फांदीला अडकून ठेवले.आता अडकून ठेवल्यामुळे ही दोरी मागे पुढे होत होती कावळ्याने ते बघितले आणि त्याने दोरीवरील मांसाला टोच मारून खात्री करून घेतली. त्याने बराच वेळा टोच मारून ते खाण्याचा प्रयत्न केला पण ते थांबत नव्हते.मग त्यांने थोडा थांबून विचार केला.
आणि एक भन्नाट कल्पना त्याला सुचली.त्याने मग काय केले तर एका पायाने ती हलणारी दोरी वर ओढून घेतली. (जशी आपण आडातून पाण्याची घागर वर ओढतो तशी) आणि मग निवांतपणे त्यांने ते मांस खाल्ले..
ज्या वेळेला आपण आरशामध्ये बघतो त्यावेळेला आरशामध्ये दिसणारी वस्तू डावीकडे किंवा उजवीकडे अशी दिसते त्या ठिकाणी आपण गोंधळतो.कावळ्याच्या समोर आरसा ठेवण्यात आला.व त्याच्या मागच्या बाजूला त्याला आवडणारा मांसाचा तुकडा ठेवला.कावळ्याने आरशात तो तुकडा बघितला आणि मागे वळून त्याने तो चटकन खाऊन टाकला मागे वळून बघितल्यानंतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असा त्याचा गोंधळ झाला नाही. हे त्याच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे.
अभ्यासकांच्या अभ्यासानुसार माणसांच्या ७ वर्षाच्या मुलाला जेवढी बुद्धिमत्ता असते,बुध्यांक असतो.तेवढी बुद्धिमत्ता व बुद्ध्यांक कावळ्याला असतो.
काही पक्षांना आकडेसुद्धा मोजता येतात.जपान व चीनमध्ये मासेमारी करताना एका विशिष्ट लांब मानेच्या बगळ्यासारख्या पक्षाचा मासेमारीसाठी उपयोग करून घेतात.तो मासे पकडण्यामध्ये माहीर असतो. लहान नावेतून अशा दोन-चार पक्षांना ते घेऊन जातात.त्यांच्या लांब मानेमध्ये एक कडी अडकवली जाते,त्याने मासा खाऊ नये म्हणून,पण त्याने ७ मासे पकडून आणल्यानंतर तो मासेमारी करणारा माणूस त्या पक्षाच्या मानेमध्ये घातलेले कडी काढतो,आणि त्याला एक मासा खायला देतो.यात गमतीशीर भाग असा आहे,की ७ मासे आणल्यानंतर जर त्या माणसाने त्याची कडी काढून त्याला मासा खायला दिला नाही तर तो पक्षी मासे पकडण्यासाठी जातच नाही.म्हणजेच तो पक्षी आकडे ओळखतो त्याला आकड्याचे ज्ञान झालेले आहे.
हेमलकसा या ठिकाणी प्रकाश आमटे त्यांच्या घरी घडलेली घटना.. त्यांच्या घरी पाहूणे आलेले. प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांची मैत्रीण त्यांना भेटण्याकरता आली होती. तर या ठिकाणी मंदाकिनी अंगणामध्ये बसल्या होत्या आणि त्यांची मैत्रीण घरातून त्यांच्याशी बोलत होती. एक दोन वाक्य बोलल्यानंतर काही वेळे शांततेत गेला आणि त्यांनी बोललेली दोन वाक्ये त्यांच्या आवाजात जशी आहेत तशी त्यांच्या कानावर आलीत. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण त्यांना काही दिसलं नाही,त्यांना वाटले आपल्याला भास झाला असेल म्हणून त्या पुन्हा बोलू लागल्या.परत दोन-तीन वाक्ये बोलल्यानंतर त्यांच्या आवाजात हुबेहुब पुन्हा तीच वाक्ये त्यांना ऐकायला आलीत.आता मात्र त्यांना काही समजेना आसपास तर कोणी दिसेना,मग हे कोण बोलत आहे? त्या तशाच तडक बाहेर मंदाकिनी जवळ गेल्या आणि म्हणाल्या 'अगं या ठिकाणी कोणीतरी आहे जे माझ्या आवाजाची नक्कल करून बोलत आहे'.मला तर इथं कोणीही दिसत नाही,मला तर हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय.त्यावर मंदाकिनी हसल्या,आपल्या मैत्रिणीला घेऊन आत गेल्या आणि म्हणाल्या ही गमंत आमच्या येथे येणाऱ्या जवळजवळ सर्व पाहुण्यांच्या बाबतीत घडते.घरात आल्यानंतर भिंतीवरती एका खुट्टीवर एक लहान मैना बसली होती.तिच्याकडे बघत त्या आपल्या मैत्रीणीला म्हणाल्या,ही मैना तुझी हुबेहूब नक्कल करते.आपल्याला फक्त मिठू मिठू पोपट माहीत असतो. पण माणसाच्या आवाजाची नक्कल करणारी जंगली मैना माहीत नसते.
'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..
● विजय कृष्णात गायकवाड