केप्लरचा समकालीन असलेला गॅलिलेई गॅलिलिओ एक बंडखोर वैज्ञानिक म्हणूनच उदयास आला.आधुनिक विज्ञानाचा तसेच प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.
सूर्याभोवती पृथ्वी फिरते या कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा गॅलिलिओने केला.त्यासाठी त्याने जो त्रास सहन केला तो कोपर्निकसच्या वाट्याला आला नाही.कारण कोपर्निकसचे पुस्तक तो मृत्यूशय्येवर असताना प्रसिद्ध झाले.त्यामुळे नंतरच्या वादाला त्याला तोंड द्यावे लागले नाही.
गॅलिलिओ केवळ कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा करून थांबला नाही,तर धर्माधिष्ठीत दृष्टिकोनातून आलेल्या विचारांना निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे त्याने तपासायला सुरुवात केली.बहुसंख्य धर्माधिष्ठीत विचार इसवीसनापूर्वी होऊन गेलेल्या महान तत्त्ववेत्त्या ॲरिस्टॉटलचे होते.
ॲरिस्टॉटलच्या विचारपद्धतीमध्ये निरीक्षण आणि तर्काला वाव होता पण प्रयोगाला अजिबात स्थान नव्हते.नेमका हाच धागा पकडून गॅलिलिओने विश्वाबद्दलच्या परंपरेच्या ज्ञानाला अक्षरशः तडे दिले.
१८ फेब्रु.१५६४ रोजी इटलीतील पिसा येथे जन्मलेल्या या वैज्ञानिकाने पिसा विद्यापीठामध्ये वैद्यकीय अभ्यास सुरू केला.याच विद्यापीठात वयाच्या सव्वीसाव्या वर्षी गणिताचा अध्यापक म्हणून नंतर तो रुजूही झाला.१५९२ मध्ये त्याने पदुआ विद्यापीठात नोकरी पत्करली.पदुआ विद्यापीठात असताना तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचा अर्थात थर्मामीटरचा त्याने शोध लावला.
(गॅलिलिओ बहुसंख्यांकांना 'दुर्बिणीचा शोध लावणारा'अशी चुकीची माहिती आहे.त्याने थर्मामीटरचा शोध लावला हे माहीतच नाही.)
हॉलंडमधील चष्मे बनवणाऱ्या हॅन्स लिपरशेंनी दोन भिंगे एकासमोर एक धरून पाहिले असता दूरच्या वस्तू जवळ दिसू लागल्या.या भिंगांना त्यांनी नळकांड्यात बसवले आणि जगातील पहिल्या दुर्बिणीचा शोध सन १६०८ मध्ये लागला.जो लिपरशे यांनी आपल्या नावे केला. या दुर्बिणीचा वापर प्रामुख्याने जहाजावर दूरचे पाहण्यासाठी आणि युद्धाच्या वेळेस शत्रूसैनिकांची हालचाल पाहण्यासाठी केला जाऊ लागला.
गॅलिलिओला दुर्बिणीच्या शोधाची बातमी कळाल्यानंतर त्याने स्वतःची दुर्बिण तयार करायला सुरुवात केली आणि १६०९ मध्ये स्वतःची एक दुर्बिण विकसित केली.आपली दुर्बिण पृथ्वीवरच्या वस्तू पाहण्यापेक्षा त्याने आकाशाकडे रोखली.आकाशात दिसणारा सर्वात मोठा गोल,चंद्र त्याने आपल्या दुर्बिणीच्या क्षेत्रात घेतला.चंद्राचे निरीक्षण करायला त्याने सुरुवात केली.आणि काय आश्चर्य ! उघड्या डोळ्यांनी अत्यंत सुंदर आणि मोहक दिसणाऱ्या चंद्राचा पृष्ठभाग त्याला खडबडीत दिसला.चंद्रावरील खड्डयांचे,डोंगर दऱ्यांचे निरीक्षण त्याने वारंवार केले.चंद्राच्या निरीक्षणातून जे दिसले त्याची रेखाटने त्याने काढली.आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटोग्राफी केली तर चंद्रावर दिसणारे खड्डे आणि गॅलिलिओचे रेखाचित्र प्रचंड साम्य दर्शविते.
यावरून गॅलिलिओची निरीक्षणक्षमता किती प्रगल्भ होती याची प्रचिती येते.आकाशात चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदर दिसणारा चंद्र ओबडधोबड आहे.ही कल्पना धर्माधिष्ठीत विचारसरणीला मान्य होण्यासारखी नव्हती.पण वस्तुस्थिती मात्र तशीच होती.
गॅलिलिओने नंतर आपली दुर्बिण गुरू ग्रहाकडे रोखली.दि. ७ ते २४ जाने.१६१० अखेर गुरू ग्रहाचे त्याने निरीक्षण केले.सुरुवातीला त्याला गुरुभोवती तीन चांदण्या दिसल्या.त्या चांदण्या रोज आपली जागा बदलत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.दरम्यान १४ तारखेनंतर चौथी चांदणी त्याच्या दृष्टीपथात आली. या सर्व चांदण्या गुरू ग्रहाभोवती फिरत असल्याचे त्याचे निरीक्षण सांगत होते.गॅलिलिओने त्यांना गुरूचे उपग्रह म्हणून संबोधले.
गुरूच्या या चार उपग्रहांचा शोध गॅलिलिओने लावला.म्हणूनच गुरुच्या या चार उपग्रहांना 'गॅलिलियन उपग्रह' असे नाव मिळाले.आयो, युरोपा, गैनिमीड आणि कॅलिस्टो हेच ते गुरूचे सर्वात मोठे चार उपग्रह.
आज आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाला ज्ञात असलेले जवळजवळ ६३ उपग्रह गुरूला आहेत. म्हणजे ६३ चंद्र गुरू ग्रहाला आहेत.पृथ्वीला एकच उपग्रह की जो चंद्राच्या रुपाने फिरत आहे.पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून तर संकष्टी महिन्यातून एकदा येते.आपण जर गुरू ग्रहावर असतो तर महिन्यातून ६३ संकष्ट्या कराव्या लागल्या असत्या.एक संकष्टी सोडेपर्यंत दुसरी आणि दुसरी सोडेपर्यंत तिसरी अशा ६३ संकष्टया.आपण तरी एवढ्या संकष्ट्या केल्या असत्या का?याचा एकविसाव्या शतकात करणार नाही तर केव्हा करणार? संकष्टी सोडण्याच्या वेळेस चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला ओवाळून जेवतात.चंद्राचा उगवण्याचा आणि जेवणाचा काय संबंध? इतर दिवशी चंद्र उगवत नाही का ?चंद्र रात्री १२ वाजता उगवत असता तर जेवायचे थांबला असता का ? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायची नाही तर काय युरोपियन देशांनी ? गॅलिलिओ यानाने सन १९८९ रोजी गुरू ग्रहाच्या दिशेने मार्गक्रमण केले.सन १९९५ रोजी गुरू ग्रहाभोवती फिरून गॅलिलिओ यानाने त्या महान खगोल वैज्ञानिकाला सलाम ठोकला..
नंतर गॅलिलिओने शुक्र ग्रहाच्या निरीक्षणाला सुरुवात केली.दुर्बिणीतून शुक्राला पाहिल्यावर चंद्रासारख्याच कला त्याला दिसल्या.शुक्राच्या कलांचे निरीक्षण केल्यावर गॅलिलिओच्या लक्षात आले की शुक्र सुद्धा सूर्याभोवती फिरत असला पाहिजे.
गॅलिलिओने आपली दुर्बिण नंतर तळपणाऱ्या सूर्याकडे रोखायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही.निरीक्षणाची आवड निर्माण झाल्यानंतर व्यक्ती ध्येयाने प्रेरित होऊन कशी काम करत राहते याचे गॅलिलिओ हे एक उत्तम उदाहरण आहे.
दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला सूर्याच्या पृष्ठभागावर काळे डाग असल्याचे दिसले.
ज्या सूर्याला धर्माने देवत्व बहाल केलेले होते,त्या सूर्यावर काळे डाग आहेत हे सांगणे किती धाडसाचे असेल याची कल्पना करा.गॅलिलिओने ते जाहीरपणे सांगायचे धाडस केले.आजही एकविसाव्या शतकात सत्य सांगायचे धाडस आपण किती करतो याचे आत्मपरिक्षण केले तर गॅलिलिओच्या महानतेची कल्पना येते.
प्रस्थापित समजुतींना त्याने फारच मोठा धक्का या सर्व निरीक्षणाच्या माध्यमातून दिलेला होता.निरीक्षणे कशी करायची असतात याचा परिपाठच गॅलिलिओने नंतरच्या वैज्ञानिक जगताला घालून दिलेला होता.
खगोलातील या सर्व निरीक्षणावर आधारित 'दि स्टारी मेसेंजर' (The Starry Messenger) हे पुस्तक गॅलिलिओने मार्च १६१० मध्ये प्रसिद्ध केले.या पुस्तकाच्या प्रतीसुद्धा हातोहात खपल्या. या पुस्तकामुळे खगोलशास्त्राला मोठी चालना मिळाली.गॅलिलिओ प्रसिद्धीच्या झोतात आला.गॅलिलिओची व्याख्याने ऐकण्यास ठिकठिकाणी प्रचंड गर्दी होऊ लागली.
गॅलिलिओ केवळ खगोलाची निरीक्षणे करून थांबला नाही तर त्याने इतर दैनंदिन व्यवहारातही आपली कल्पनाशक्ती वापरली.तो ज्यावेळेस चर्चमध्ये प्रार्थनेला जात असे त्यावेळेस त्याला तिथे एक झुंबर हलत असलेले दिसे.हलत असलेल्या झुंबरावरून त्याच्या लक्षात आले की झुंबराला एका ठिकाणापासून त्याच ठिकाणी परत येण्यासाठी लागणारा कालावधी सारखाच आहे.घरातील दिवा त्याने त्याच पद्धतीने पाहिला आणि निरीक्षणे नोंदवली.दिव्याचा दोलनकाळ हा दिव्याच्या वस्तुमानावर नसून त्याच्या लांबीवर अवलंबून आहे,हा निष्कर्ष त्याने काढला.ज्या काळात वेळ मोजण्यासाठी घड्याळासारखे साधन उपलब्ध नव्हते त्या काळात त्याने लंबकाच्या घड्याळाचे तत्त्व शोधून काढले.
त्यानंतर हायजीन या शास्त्रज्ञाने लंबकाची घड्याळे शोधून काढली.लंबकाची घड्याळे १९९० पर्यंत घराघरामध्ये टांगलेली असायची.
म्हणजे गॅलिलिओ घराघरात पोहोचला होता. फक्त त्याच्या विचारांनी लोकांच्या मनात घर केलं नाही हाच काय तो फरक.
इटलीमधील चर्चमध्ये टांगलेला लँप ऑफ गॅलिलिओ आजही त्या महान वैज्ञानिक तत्त्वाची आठवण करून देत आहे.
तर्क लढवून निष्कर्ष काढण्याच्या प्रचलित असलेल्या ॲरिस्टॉटलच्या पद्धतीला गॅलिलिओने प्रयोगाच्या रूपाने छेद दिला.वैज्ञानिक दृष्टिकोनातील प्रयोगाचे महत्त्व सांगणाऱ्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरील त्याचा प्रयोग सर्वसामान्यांना अचंबित करणारा ठरला.
ॲरिस्टॉटलसहीत सर्वसामान्यांची अशी धारणा होती की,समान उंचीवरून दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू खाली सोडल्या तर जास्त वजनदार वस्तू लवकर जमिनीवर पोहचेल.गॅलिलिओने या विचाराचा छडा लावायचे ठरवले.
इटलीतील पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावर तो गेला.एका मदतनीसाच्या जवळ त्याने दोन वेगवेगळ्या वजनांच्या वस्तू दिल्या आणि इटलीवासियांना मनोऱ्याखाली जमायला सांगितले.इशारा मिळताच दोन्ही वस्तू मदतनीसाने एकाच वेळी सोडल्या.ॲरिस्टॉटलला चूक ठरवत गॅलिलिओने प्रयोगाच्या सहाय्याने स्वतःचे विधान प्रचलित केले
'असमान वजनांच्या वस्तूंना खाली येण्यासाठी लागणारा वेळ सारखाच असतो.'
प्रयोगाचे महत्त्व हे निर्विवाद आहे.प्रयोगच सत्याचा पुरावा देऊ शकतात हे गॅलिलिओने सिद्ध करून दाखवले.
वैज्ञानिक दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य गॅलिलिओने अधोरेखित केले.गॅलिलिओने नंतर खाली पडणाऱ्या वस्तूंचा वेग क्रमशः वाढत जातो हेही सिद्ध करून दाखविले.
या संशोधनाबरोबरच ज्या वादात गॅलिलिओला धर्मपीठाकडे जावे लागले तो वाद होता टॉलेमीचा पृथ्वीकेंद्रित आणि कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांत यांच्या दरम्यानचा.सन १६१३ पासून गॅलिलिओने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी तो या विषयावर भाषणे देत सुटला.
७ फेब्रु.१६१४ ला एका धर्मगुरूने रोमच्या कार्डिनल मिलिनोला पत्र लिहिले.'पृथ्वी स्थिर नाही'असे धर्मविरोधी वक्तव्य गॅलिलिओ करतो अशी तक्रार त्याने केली.
बायबल या धर्मग्रंथात ज्या गोष्टीला अधिष्ठान प्राप्त झालेले होते,त्या टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला गॅलिलिओ विरोध करत होता.धर्माला ही बाब निश्चितच खटकणारी होती.धर्मसंस्थेला ही बाब ढवळाढवळ वाटली.१६१६ मध्ये गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मगुरू पोपनी धमकी दिली आणि सांगितले की सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करू नकोस.धमकी मिळूनसुद्धा गॅलिलिओने जाहीर सभांमध्ये सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार सुरुच ठेवलेला होता.सन १६३२ मध्ये त्याने 'सूर्यकेंद्रित सिद्धांत आणि पृथ्वीकेंद्रित सिद्धांत या दोन सिद्धांतामधील द्वंद्व' (Dialogue concerning the two chief world systems) या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. सदर पुस्तकामध्ये त्याने सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार केलेला होता.
हे लिखित स्वरुपातील विचार धर्माला सहन झाले नाहीत.
गॅलिलिओला धर्माच्या न्यायालयापुढे बोलविण्यात आले.७ सप्टें.१६३२ ला प्रकृती ठीक नसल्यामुळे तो १५ फेब्रु. १६३३ ला न्यायालयापुढे हजर झाला.गॅलिलिओला बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने मोठ्या उदार अंतःकरणाने दिली.बहुतेक त्यांचा न्याय आधीच ठरलेला असावा.न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि त्याच्या सर्व साहित्यावर बंदी घालण्याचा हुकूम दिला.कालांतराने त्याला तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली.त्रास असहाय्य झाल्यावर आणि इतर संशोधनासाठी वेळ मिळावा या हेतूने गॅलिलिओ दोन पावले मागे सरकला.त्याने धर्माची आणि पर्यायाने धर्मगुरू पोप यांची गुडघे टेकून माफी मागितली. 'मी चुकलो' अशी कबुलीही त्याच्याकडून वदवून घेण्यात आली.पण हा बंडखोर शास्त्रज्ञ स्वतःशीच पुटपुटला 'तरी ती (पृथ्वी) फिरतेच.'
सन १९९२ ला ख्रिश्चन धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांनी गॅलिलिओ प्रकरणाची छाननी करण्यास सुरुवात केली.अर्थात सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे एव्हाना सिद्धही झालेले होते.अखेर पोपनी गॅलिलिओ संदर्भात धर्माने केलेली चूक मान्य केली.आणि ३१ ऑक्टो. १९९२ रोजी पोप जॉन पाल द्वितीय यांनी गॅलिलिओला चर्च दिलेल्या अन्यायी वागणुकीसंदर्भात संपूर्ण जगाची माफी मागितली.
गॅलिलिओचा मृत्यू झाला १६४२ साली.चर्चने माफी मागितली १९९२ साली.म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर त्याची माफी मागितली.असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! सत्य सांगितले अथवा वस्तुस्थिती निदर्शनास आणल्यानंतर कौतुक करण्याऐवजी शिक्षा दिली जाते आणि सत्य सांगणाऱ्याच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर चुकीच्या शिक्षेबद्दल माफी पण मागितली जाते.असा न्याय आपल्याला चालेल का? असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! धर्माधिष्ठीत विचारप्रणालीचा !!
एका अर्थाने ख्रिश्चन धर्म बरा असे मी म्हणतो.कारण गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर का होईना त्यांनी जगाची माफी मागितली.उशीरा का होईना त्यांना शहाणपण सुचले.
परंतु भारतीय समाजामध्ये ज्या थोर विभूतींनी, समाजसुधारकांनी माणसाला माणसात आणले, माणूसकीने वागवण्यास सांगितले,त्यांची माफी आमच्या धर्माने आणि धर्माच्या वारसदारांनी आजही मागितलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ ते शूद्र आहेत म्हणून नाकारला.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या म.फुलेंच्या अंगावर मारेकरी घातले.स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेण,चिखल फेकले,अवहेलना केली. शाहू महाराजांनी दीन-दलितांना मानाची पदे दिली म्हणून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उच्च विद्याविभूषित समाजसुधारकाची केवळ ते शूद्र होते म्हणून कुचेष्टा केली.
या सर्वच महामानवांनी सुचविलेल्या सुधारणा आज सर्वमान्य झाल्या आहेत.मात्र त्यांच्या धर्माने आजतागायत त्यांची माफी मागितलेली नाही.
गॅलिलिओवर झालेल्या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून सध्याचे धर्मगुरू पोप बेनेडिक्ट यांनी गॅलिलिओचा पुतळा २००८ मध्ये चर्चच्या भिंतीमध्ये उभा केलेला आहे.
आमच्या धर्माला प्रायश्चित म्हणून असे किती पुतळे बसवावे लागतील याची गणतीच न केलेली बरी.
१६३२ साली गॅलिलिओचे डोळे गेले. दुर्बिणीतून सूर्याची निरीक्षणे केल्यावर हा परिणाम झालेला असणं स्वाभाविक आहे.वैज्ञानिक स्वतःच्या ऐहिक सुखासाठी न झटता समाजासाठी झटत असतो.हे आजच्या स्वकेंद्रित झालेल्या समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
खगोलवैज्ञानिकांसाठी फार मोठा वैज्ञानिक इतिहास मागे ठेवून ८ जाने. १६४२ रोजी या महान वैज्ञानिकाची प्राणज्योत मालवली.
इतिहास,विज्ञानाचा,खगोलाचा अथवा सामाजिक असो,त्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन पुढे प्रगती करायला शिकले पाहिजे.पण प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचे वारंवार विकृतीकरण धर्माच्या माध्यमातून केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुस्लिमद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. माणसामाणसांमध्ये,धर्माधर्मामध्ये, जाती-जातींमध्ये अंतर वाढवण्यात काही विघ्नसंतोषी व्यक्ती आणि संघटना काम करत आहेत.त्यांच्या अतिरंजीत भूलथापांना तरुण वर्ग बळी पडतो आणि दंगली करण्यास उद्युक्त होतो. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो,दंगली घडविण्यासाठी नसतो.
गॅलिलिओला शिक्षा केली म्हणून आज कोणी चर्चविरोधात आंदोलने करत नाहीत.हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी विचारात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे.ते खरोखर मुस्लिमद्वेष्टे होते का? त्यांचा आरमारप्रमुख दौलतखान, तोफखानाप्रमुख इब्राहीमखान,विश्वासू नोकर मदारी म्हेतर,हिरोजी फर्जंद,वकील काजी हैदर,हेरप्रमुख बहिर्जी नाईक असे सर्व जातीधर्मातील सवंगडी त्यांच्यासाठी जीवावर उदार होते.शिवाजी महाराजांचे राज्य धर्माधिष्ठीत कधीच नव्हते.
युरोपमध्ये गॅलिलिओनंतर प्रबोधनाच्या चळवळीने जोर पकडला आणि युरोप आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतरांच्या पुढे प्रचंड वेगाने गेलेला आहे.आम्ही मात्र आजही इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये गुंग आहोत.
माणसामाणसांतील अंतर वाढवत आहोत.एक माणूस म्हणून,एक भारतीय म्हणून वैचारिक प्रगल्भपणा आत्मसात करणे गरजेचे आहे.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे आपणा सर्वांच्याच फायद्याचे आहे.
१३ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील व शेवटचा भाग.. धन्यवाद
समाप्ती…!