इसवी सनाच्या दहाव्या शतकात,अर्थात इ.स. १००० मध्ये,भारत हा जगातली सर्वांत मोठी आर्थिक शक्ती होता.जागतिक व्यापारात भारताचा वाटा हा २९% पेक्षा जास्त होता असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन यांनी लिहून ठेवलं आहे. (सध्या जागतिक व्यापारात १४.४% वाटा असलेला चीन पहिल्या क्रमांकावर आहे.अर्थात या बाबतीत भारताचा 'विक्रम' कोणीही मोडू शकलेला नाही..!) 'बेरेनाईक प्रकल्पा' सारख्या ठिकाणांमधून भारताच्या ह्या जागतिक व्यापाराचे अनेक प्रत्यक्ष पुरावे मिळतात.
याचा दुसरा अर्थ,भारताची निर्यातक्षमता प्रचंड होती.'फक्त भारतातून केलेल्या आयातीच्या 'कमिशन'मधून युरोपातली शहरं समृद्ध होत होती'असं युरोपियन इतिहासकारांनीच लिहून ठेवलं आहे..
अर्थातच त्या काळात भारतात तशा क्षमतेची माणसं,
तंत्रज्ञ,कामगार,व्यापारी,संशोधक असतील,तेव्हाच तर जागतिक व्यापारातील हे स्थान भारताला प्राप्त करता आले.आणि जर ही अशी कुशल माणसं भारतात असतील,तर ती तयार कशी होत असतील..? त्यांच्या प्रशिक्षणाची काय व्यवस्था असेल..? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
इंग्रज इतिहासकारांनी असे चित्र निर्माण करून ठेवलंय की त्यांनीच भारतात शिक्षणपद्धत रुजवली शाळा काढल्या,कॉलेज उभारली वगैरे इंग्रज येण्यापूर्वी भारतात फक्त संस्कृतचं आणि पौरोहित्याचं शिक्षण मिळत होतं असा (गैर) समज फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरलाय.
याशिवाय 'इंग्रज येण्यापूर्वी शिक्षण फक्त ब्राम्हणांना आणि तेही पुरुषांना उपलब्ध होतं' असाही एक खूप मोठा (गैर) समज पसरवून ठेवण्यात आलाय.दुर्दैवानं काही भारतीय इतिहासकारांनी आणि समाजात काम करणाऱ्या तथाकथित 'सेक्युलर' लोकांनीही,इतिहासाचा धांडोळा न घेता याच विचारांची री ओढलेली दिसते.आता हे जर खरं असेल तर एक हजार वर्षांपूर्वी भारताचा जागतिक व्यापारात जवळपास एक तृतीयांश वाटा कसा काय असू शकतो,याबाबत कोणीच काही सांगत नाही...!
मात्र इतिहासाचे एक एक पुरावे बघत आपण पुढे जाऊ लागलो की जे चित्र दिसते,ते फारच वेगळे,भव्य आणि अभिमान वाटावा असे आहे.इंग्रज आणि मुस्लीम आक्रमक येण्यापूर्वी या देशात जी शिक्षणपद्धती होती,तिची तोड जगात कुठेही दिसत नाही.अत्यंत व्यवस्थित रचलेली ही पद्धत,आवश्यक त्या सर्व क्षेत्रांत ज्ञान आणि प्रशिक्षण देत होती.
जगातले पहिले विद्यापीठ (विश्वविद्यालय - युनिव्हर्सिटी) हे भारतात प्रारंभ झाले,हे किती लोकांना माहीत आहे..? त्या काळात भारतात 'अशिक्षित' असा प्रकारच नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..? आज आपली मुलं शिकायला वेगवेगळ्या देशांत जातात.मात्र त्या काळात वेगवेगळ्या देशांतली मुलं भारतात शिकायला येत होती,परंतु एकही भारतीय मुलगा शिकायला बाहेर जात नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..?
प्रख्यात सूफी संगीतकार,गायक,कवी आणि 'कव्वाली'चा जनक अमीर खुस्रो (सन १२५२ - १३२५) हा जेव्हा भारताच्या विद्यापीठांमध्ये आला,तेव्हा भारतावर मुस्लीम आक्रमकांचे आक्रमण होऊन त्यांचा जम बसायला लागला होता.साहजिकच तो काळ,भारतीय विद्यापीठांचा पडता काळ होता.मात्र तरीही अमीर खुस्रोने भारतीय शिक्षणाबद्दल आणि येथील विद्यापीठांबद्दल जे लिहून ठेवलंय ते अफाट आहे.भारतीय शिक्षणपद्धतीची खुस्रोने बरीच प्रशंसा केलेली आहे.
मुलांच्या 'अरबी सुरस आणि चमत्कारिक' गोष्टींचा नायक हारून अल रशीद हा बऱ्याच आधीचा.सन ७५४ ते सन ८४९ ह्या काळातला. याने आणि अरबी सुलतान अल मन्सूरने भारतीय विद्यापीठांतून हुशार मुलांना घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले होते अशा नोंदी बऱ्याच ठिकाणी आढळतात.
हा भारतातला पहिला ज्ञात 'कॅम्पस इंटरव्ह्यू'..! सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचा..!!
मुस्लीम आक्रमक भारतात येण्याआधी भारतात परिपूर्ण शिक्षणप्रणाली होती.या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मुला / मुलींना साधारण आठव्या वर्षापर्यंत घरीच शिकवलं जायचं. आठव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार झाला की त्याला गुरुकुलामध्ये किंवा गुरूकडे पाठविण्याची पद्धत होती.येथे 'गुरू' म्हणजे फक्त संस्कृत शिकविणारे ऋषी असा अर्थ कदापि नाही. 'गुरू' हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज माणूस असायचा. समुद्रकिनाऱ्यावरच्या बऱ्याच कुटुंबांमधील मुलं ही जहाज बांधणाऱ्या आपल्या गुरूकडे राहून, जहाजबांधणीचं प्रत्यक्ष शिक्षण घेत.हीच पद्धत धनुर्विद्या,मल्लविद्या,
लोहारकाम,वास्तुविद्या वगैरेसारख्या गोष्टी शिकण्यासंबंधी होती.साधारण ८-१० वर्षे गुरूकडे शिक्षण घेतल्यानंतर यातील काही विद्यार्थी विद्यापीठात पुढील उच्च शिक्षणासाठी जात.या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी शास्त्रं आणि कला शिकण्याची व्यवस्था होती. पुढे मुसलमान आक्रमकांनी ही विद्यापीठं नष्ट केली.त्यामुळे इसवी सन १२००-१३०० नंतर ह्या विद्यापीठांचं अस्तित्वच नष्ट झालं.मात्र - तरीही गुरुगृही शिकण्याची परंपरा बऱ्याच अंशी कायम राहिली.
या आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांनी शिकण्याची पद्धत आणि परंपरा होती.ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.प्रारंभिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ऋषिका' आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ब्रम्हवादिनी' म्हटले जायचे.
ऋग्वेदात अशा ऋषिका आणि ब्रम्हवादिनी स्त्रियांची नावेच दिलेली आहेत.
रोमासा,लोपामुद्रा,अपला,कद्रू,घोष,गौपयना,
जुहू,वागंधिनी,पौलोमी,जरिता, श्रद्धा,
कामायनी,उर्वशी,सारंगा,यमी,इंद्रायणी, सावित्री,देवजयी,नोधा,सिकातनीबावरी, अक्रीष्ट्रभाषा,इत्यादी.अशी २३ नावं दिलेली आहेत..
पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणासंबंधी लिहून ठेवलंय.मुलींकरिता वसतिगृहं (होस्टेल्स) होती.त्यासाठी पाणिनीने 'छत्रीशाळा' हा शब्द वापरलाय.उपनिषद काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा उल्लेख येतो.एकुणात काय,तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण फार चांगले होते.स्त्रिया मोकळेपणी समाजात मिसळत होत्या.
शिक्षकांची किंवा गुरूंची ही मोठी परंपरा होती, जी शतकानुशतकं चालत आलेली होती. आचार्य/ उपाध्याय /चरक/ गुरू/यौजनासातिका/ शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाध्या गुरूंसाठी होत्या.
विद्यापीठांमध्ये शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचाही मोठा उत्सव असायचा.सत्रारंभ सोहोळ्याला 'उपकर्णमन' आणि सत्र समापन सोहोळ्याला 'उत्सर्ग' म्हटले जायचे. उपाधी प्रदान सोहोळ्याला (ज्याला आपण 'ग्रॅज्युएशन सेरेमनी' म्हणतो), 'समवर्तना' म्हणायचे.
सुट्टयांसाठी 'अनध्याय' हा शब्द वापरला जायचा.
वर्षभरातील प्रमुख अनध्याय होते महिन्यातील दोन्ही अष्टम्या,दोन्ही चतुर्दशी, अमावस्या,पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.या नित्य अनध्यायांशिवाय नैमित्तिक अनध्यायही असायचे.अर्थातच आजच्यासारखी 'रविवारी सुटी' ही भानगड नव्हती.गंमत म्हणजे,भारतीय संस्कृतीचा प्रसार ज्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये,उदा - लाओस,कंबोडिया,जावा-सुमात्रा (इंडोनेशिया), सयाम (थायलंड)- झाला,त्या सर्व देशांमध्ये अगदी अलीकडल्या काळापर्यंत अनध्यायाचे दिवस हे प्राचीन भारतीय पद्धतीप्रमाणेच होते. -
तक्षशीला विद्यापीठ
जगातील पहिले विश्वविद्यालय (विद्यापीठ) हे 'तक्षशीला' मानले जाते.आजच्या पाकिस्तानात (रावलपिंडीपासून १८ मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या सातशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन ४५५ मध्ये 'पूर्व युरोप' च्या आक्रमकांनी,अर्थात 'हूणांनी' ते नष्ट केले.जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या ह्या विद्यापीठाने सुमारे १२०० वर्षं ज्ञानदानाचे मोठे काम केले.श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली,अनेक जगप्रसिद्ध विद्यार्थी दिले.तक्षशीला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षांतच मगध राज्यात (आजच्या बिहारमधे), नालंदा विद्यापीठ स्थापन झाले.
ही दोन्हीही नामांकित विद्यापीठ एकाच वेळेस कधीही कार्यरत नव्हती.
असे म्हणतात,तक्षशीला ह्या नगरीची स्थापना भरताने त्याच्या मुलाच्या,'तक्षाच्या' नावावर केली.पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले.जातक कथांमध्ये तक्षशीला विद्यापीठासंबंधी बरीच माहिती मिळते.ह्या कथांमध्ये १०५ ठिकाणी ह्या विद्यापीठाचे संदर्भ मिळतात.त्या काळात, अर्थात सुमारे हजार वर्षे,तक्षशीला ही संपूर्ण भरतखंडाची बौद्धिक राजधानी होती.तिची ही ख्याती ऐकूनच 'चाणक्य' सारखी व्यक्ती मगध (बिहार) हून इतक्या दूर तक्षशीलेला आली.बौद्ध ग्रंथ 'सुसीमजातक' आणि 'तेलपत्त' मध्ये तक्षशीलेचे अंतर काशीपासून २००० कोस सांगितले आहे.
इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी,जेव्हा 'चिकित्सा' शास्त्राचे नाव सुद्धा जगात कुठेच नव्हते,तेव्हा तक्षशीला विद्यापीठ हे चिकित्साशास्त्राचे फार मोठे केंद्र मानले जात होते.येथे ६० पेक्षा जास्त विषय शिकवले जात होते.एका वेळेस १०,५०० विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.
तक्षशीला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फार उज्वल परंपरा आहे. -
या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर,अर्थात इसवी सनापूर्वी ७०० वर्ष,येथून शिकून गेलेला पहिला प्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे पाणिनी,ज्याने संस्कृतचे व्याकरण तयार केले.
इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात, चिकित्साशास्त्र शिकलेला 'जीवक' (किंवा 'जिबाका'), पुढे जाऊन मगध राजवंशाचा राजवैद्य झाला.याने अनेक ग्रंथ लिहिले.
इसवी सनापूर्वी चौथ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी 'चाणक्य', जो पुढे 'कौटिल्य' नावाने प्रसिद्ध झाला. चिनी यात्री आणि विद्यार्थी, 'फाह्यान' हा सन ४०५ मधे तक्षशीला विद्यापीठात आला.हा काळ ह्या विद्यापीठाचा पडता काळ होता.पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली.अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले.अर्थातच फाह्यानला तेथे फार काही ज्ञानाचा लाभ झाला नाही.त्याने तसे लिहून ठेवलंय.पुढे सातव्या शतकात, तक्षशीलासंबंधी वर्णनं ऐकून आणखी एक चिनी यात्री,'ह्युएन त्सांग' तेथे गेला,तर त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण आढळली नाही.
नालंदा विद्यापीठ
हूण आक्रमकांनी ज्या काळात तक्षशीला विद्यापीठ उद्ध्वस्त केले,जवळपास त्याच काळात मगध साम्राज्यात नालंदा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली जात होती.मगधाचे महाराज 'शकादित्य' (अर्थातच गुप्तवंशीय सम्राट कुमार गुप्त : सन ४१५ ते ४५५) यांनी आपल्या अल्पकाळात नालंदामधील जागेला विद्यापीठाच्या रूपात विकसित केले. या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव होते - 'नलविहार'.
पुढे इसवी सन ११९७ मध्ये बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळून टाकेपर्यंत सुमारे सातशे वर्षं, हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होते.
ह्या विद्यापीठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे.अनेक दुर्लभ आणि दुर्मीळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह ह्या विद्यापीठात होता.'चिनी यात्री 'ह्युएन त्सांग' येथे दहा वर्षं अध्ययन करत होता.त्याचा गुरू शीलभद्र हा आसामचा होता. ह्युएन त्सांगने ह्या विद्यापीठाबद्दल भरभरून आणि खूप चांगले लिहिले आहे.
नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचं एक फार मोठं संकुल होतं.यातील प्रमुख भवनं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नरंजक.सर्वांत उंच प्रशासकीय भवन होतं 'मान मंदिर'.
विक्रमशील विद्यापीठ
आठव्या शतकात बंगालचा पालवंशीय राजा धर्मपालने ह्या विद्यापीठाची स्थापना आजच्या बिहारमधे केली होती.ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत ६ विद्यालयं होती.प्रत्येक विद्यालयात १०८ शिक्षक होते.दहाव्या दशकातील प्रसिद्ध तिब्बती लेखक तारानाथने ह्या विद्यापीठाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे.ह्या विद्यापीठात प्रत्येक दाराला एक एक प्रमुख आचार्य नियुक्त होते.नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हे आचार्य परीक्षा घ्यायचे.त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश मिळत असे.हे आचार्य होते- पूर्व द्वार - पं. रत्नाकर शास्त्री,पश्चिम द्वारवर्गाश्वर कीर्ती,उत्तरी द्वार - नारोपंत आणि दक्षिणी द्वार प्रज्ञाकर मित्रा,यांतील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते.आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापीठाचे सर्वाधिक प्रसिद्ध आचार्य झालेले आहेत.
बाराव्या शतकात येथे ३,००० विद्यार्थी शिकत होते.हा या विद्यापीठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते आणि मिळेल ती ज्ञानाची साधनं आणि स्थानं उद्ध्वस्त करत होते.म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत,त्यांवरून असं लक्षात येतं की,विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहात ८,००० लोकांची बसायची व्यवस्था होती.
या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिब्बती विद्यार्थ्यांची संख्या सर्वांत जास्त होती. त्याचं एक कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या 'वज्रयान' संप्रदायाच्या अभ्यासाचं हे महत्वाचं आणि अधिकृत केंद्र होतं.
नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्यानंतर,सुमारे सहा वर्षांनी,अर्थात सन १२०३ मध्ये,नालंदा जाळणाऱ्या बख्तियार खिलजीनेच ह्या विद्यापीठालाही जाळून टाकलं.
उड्डयंपूर विद्यापीठ
पाल वंशाची स्थापना करणाऱ्या राजा गोपाळने ह्या विद्यापीठाची स्थापना बौद्ध विहाराच्या रूपात केली होती.याच्या विशाल भवनांना बघून बख्तियार खिलजीला वाटलं की हा एखादा किल्लाच आहे.म्हणून त्याने यावर आक्रमण केलं.वेळेवर सैनिकी मदत मिळू शकली नाही. फक्त विद्यार्थी आणि आचार्यांनीच शर्थीनं झुंज दिली.पण सर्वच्या सर्व मारले गेले.. !
सुलोटगी विद्यापीठ
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हे महत्त्वाचे विद्यापीठ.अकराव्या शतकाच्या शेवटी उभे राहिले.राष्ट्रकूटांचे शासन असताना कृष्ण (तृतीय) ह्या राजाचा मंत्री नारायण याने हे विद्यापीठ बांधले.मात्र विद्यापीठ म्हणून काही करून दाखविण्याच्या आतच यावर मुसलमानी आक्रमकांनी कब्जा केला आणि ह्याला उद्ध्वस्त केलं.येथील पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय अल्पावधीतच संस्कृत शिक्षणासाठी चर्चित झाले होते.देशभरातली निवडक २०० विद्यार्थ्यांना भोजन-निवासासह शिक्षण देणारे हे विद्यापीठ वैशिष्ट्यपूर्ण होते.
सोमपूर महाविहार
बांगलादेशच्या नवगाव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यातील पहाडपूर गावात महाविहार म्हणून स्थापित झालेले हे शिक्षा केंद्र पुढे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आले.पाल वंशाचा दुसरा राजा धर्मपाल देव ह्याने आठव्या शतकाच्या शेवटी ह्या विहाराचे निर्माणकार्य केले.जगातील सर्वांत मोठे बौद्ध विहार म्हणता येईल अशी याची रचना होती.चीन/ तिब्बत/ मलेशिया / जावा / सुमात्रा येथील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते.
दहाव्या शतकातील प्रसिद्ध विद्वान अतीश दीपशंकर श्रीज्ञान हे ह्याच विद्यापीठाचे आचार्य होते.
रत्नागिरी विद्यापीठ,ओडिशा सहाव्या शतकात बौद्ध विहाराच्या रूपात स्थापन झालेले हे स्थान पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र झाले.तिबेटमधील अनेक विद्यार्थी येथून शिकून गेले.तिबेटीयन इतिहासात या विद्यापीठाचा उल्लेख 'कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ' असा केलेला आहे.कारण येथे खगोलशास्त्राचा अभ्यास व्हायचा.
अखंड भारताच्या अक्षरशः कानाकोपऱ्यात शिक्षणाची ही केंद्र वसलेली होती.अगदी लहान नाही.लहान विद्या केंद्र तर किती होती त्याची गणतीच नाही.
जबलपूरला,भेडाघाटमधे चौसष्ट योगिनींचे मंदिर आहे. त्याला 'गोलकी मठ' असेही म्हणतात.ह्या 'गोलकी मठ'चा उल्लेख 'मलकापूर पिलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोदकामातही झालेला आहे.
'मटमायुर वंश' हा कलचुरी वंशांपैकीच एक आहे.या वंशाच्या युवराजदेव (प्रथम) ह्याने ह्या मठाची स्थापना केली.मुळात हे तांत्रिक आणि इतर विषयांचं विद्यापीठ होतं.ह्या गोलकी मठाच्या अर्थात विद्यापीठाच्या आधीन अनेक विद्यालयंही आंध्र प्रदेशात होती.
बंगालमधील 'जगद्द्ल',आंध्र प्रदेशातील 'नागार्जुनकोंडा',
काश्मीरमधील 'शारदापीठ', तामिळनाडूमधील 'कांचीपुरम',ओडिशामधील 'पुष्पगिरी',उत्तर प्रदेशातील 'वाराणसी'... अशी किती नावं घ्यावीत..? ही सारी ज्ञानमंदिरं होती, ज्ञानपीठं होती.अगदी वनवासी अन् (आजच्या भाषेत) मागास भागातही आवश्यक ते शिक्षण सर्वांना मिळत होते.संस्कृत ही फक्त राजभाषाच नव्हती तर ती लोकभाषा होती.पुरुषपूर (पेशावरचे प्राचीन नाव) पासून ते कंबोडिया, लाओस,जावा सुमात्रापर्यंत संस्कृत हीच भाषा चालत होती.इसवी सनापूर्वी शंभर / दोनशे वर्षांपासून ते इसवी सन अकराशेपर्यंत या संपूर्ण भूभागावर संस्कृत ही राजभाषा आणि लोकभाषा म्हणून प्रचलित होती.भारतीय विद्यापीठांची कीर्ती जगभरात पसरली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात भारत सर्वोच्च स्थानावर होता,आणि म्हणूनच व्यापारातही होता..! -
आज ह्या साऱ्या गोष्टी परीकथेतल्या वाटतात. एक हजार वर्षांच्या मुस्लीम आणि इंग्रजी राजवटीमुळे आपलं समृद्ध असं ज्ञान तर आपण विसरलोच,पण शिक्षणाच्या बाबतीतही पूर्णपणे मागासलो.
शिक्षणाचा आपला समृद्ध वारसा आठवायला आपल्याला पाश्चात्त्य चिंतकांची आणि संशोधकांची मदत लागते,हीच आपली शोकांतिका आहे.
२१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…