१.१ प्राचीन जग आणि भारतातलं आयुर्वेद..
बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र ही विज्ञानाची शाखा सजीवांचा अभ्यास करते. खरं तर ज्या क्षणी माणसाला आपल्या आजूबाजूचे दगड, माती,नद्या,समुद्र आणि पाणी या निर्जीव गोष्टी आणि हालचाल करणारे प्राणी,पक्षी,
वाढणाऱ्या वनस्पती आणि आपण स्वतः या सजीव गोष्टींमध्ये असलेल्या फरकाची जाणीव झाली, त्या क्षणी बायॉलॉजीचा जन्म झाला!
अर्थात,हा काळ तसा फारच जुना म्हणावा लागेल.पण माणसाच्या मनात कायमच आपल्या भोवतालच्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं,त्यामुळेच माणूस जीवनाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगती करू शकला.
अश्मयुगातला माणूस जेव्हा स्वतःच उत्क्रांत होत होता,जंगली अवस्थेत होता,तेव्हा तो झाडाला लागलेली,जमिनीवर पडलेली किंवा पक्ष्यांनी प्राण्यांनी खाऊन उष्टी केलेली फळं-कंदमुळं,
बेरी,लहान किडे वेचून खायचा किंवा शिकार करून प्राणी आणि पक्षी यांना मारून खायचा.कोणती फळं चांगली लागतात,कोणती विषारी आहेत,कोणत्या प्राण्याची शिकार कशी करावी या गोष्टींचं ज्ञान तो तेव्हापासून आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करत राहिला.हेही खरं तर जीवशास्त्राचंच ज्ञान होतं.पण ते ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं घेतलं नव्हतं तर ते आपल्या उपयोगासाठी घेतलं होतं.गंमत म्हणजे आपण कोणत्याही विज्ञान शाखेचा इतिहास पाहिला तर त्यात माणसानं आधी उपयोगाकरता ज्ञान मिळवलं आणि नंतर त्यातल्या पायाभूत विज्ञानाचा शोध घेतला! म्हणजेच आधी चक्क अप्लाइड सायन्स आलं आणि नंतर फंडामेंटल सायन्स आलं!
बायॉलॉजीच्या बाबतीतही हेच झालं.सुरुवातीला माणसानं आपल्या भोवतीच्या वनस्पती आणि प्राणी यांचे उपयोग शोधले आणि नंतर त्यांच्याबद्दलचा अभ्यास केला.त्यामुळेच आधी वैद्यकशास्त्र,
औषधनिर्माणशास्त्र,आयुर्वेद,शेती आणि पशुपालन या गोष्टी आल्या आणि त्यानंतर वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र आले.
गंमत म्हणजे ज्या गोष्टी आज आपण विज्ञानात समाविष्ट करतो,त्या गोष्टींना पूर्वीच्या काळी विज्ञान म्हणतच नव्हते! माणसाच्या इतिहासातली अनेक शतकं बायॉलॉजीला विज्ञानाचा दर्जा नव्हता.बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विज्ञान शाखेचा अभ्यास खरं तर ख्रिस्तपूर्व काही हजार वर्षांपासून सुरू झाला होता.त्यात भारतातलं आयुर्वेद आणि ग्रीसमधलं नॅचरल सायन्स आघाडीवर होतं.पण बायॉलॉजी या शब्दाचा उगम व्हायला मात्र अठरावं शतक उजाडावं लागलं.त्याआधी बायॉलॉजीला नॅचरल हिस्ट्री,नॅचरल फिलॉसॉफी,नॅचरल थिऑलॉजी अशी अनेक नावं होती.
बायॉलॉजी हा शब्द सगळ्यात आधी..
फ्रेंच बायॉलॉजिस्ट जीन बाप्टिस्ट पिअरे अँटोनी दे मोनेत दे लॅमार्क Jean-Baptiste Pierre Antoine de Monet de Lamarck
यानं अठराव्या शतकात वापरला.हा शब्द बायॉस म्हणजे सजीव आणि लॉगॉस म्हणजे अभ्यास या दोन ग्रीक शब्दांच्या जोडणीतून (संधीतून) आलेला आहे.
लॅमार्कनंच आपल्या पुस्तकात पहिल्यांदा व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स यांच्यातला फरक दाखवून दिला.त्यानंतर मात्र १७९९ मध्ये थॉमस बेडॉस (Thomas Beddoes) यानं,१८०० मध्ये कार्ल फ्रेडरिक बर्दाच (Karl Friedrich Burdach)आणि मायकेल ख्रिस्तोफ हॅनोज़ (Michael Christoph Hanow's) यानं १७६६ मध्ये या तिघांनी हा शब्द - स्वतंत्रपणे आपापल्या पुस्तकांमध्ये वापरल्याचे उल्लेख आहेत.यानंतर मात्र सजीवांच्या अभ्यासासाठी सगळीकडेच 'बायॉलॉजी' हा शब्द वापरात यायला लागला.यानंतर बॉटनी आणि झूऑलॉजी या बायॉलॉजीच्या दोन महत्त्वाच्या शाखा मानल्या जायला लागल्या.
एखादा रोग भूतपिशाच बाधा झाल्यानं होतो आणि देवाची उपासना केल्यावर बरा होतो ही अंधश्रद्धा दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीपासून जगात सगळीकडेच कित्येक शतकं कायम होती.
त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही गोष्टीचं कार्य-कारण-भाव समजण्यासाठी माणसानं वैज्ञानिक दृष्टिकोनानं बघण्याआधी सगळ्याच गोष्टींकडे धार्मिक आणि अंधश्रद्धेच्या चश्म्यातून पाहिलं होतं.चश्मा कसला झापडंच ती विज्ञानानं ही झापडे काढून टाकून माणसाला कारणमीमांसेची स्वच्छ दृष्टी दिली.
त्या काळी विज्ञानाचा अभ्यास करणंही तितकं सोपं नव्हतं.विज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय शोधायचं आणि कसं शोधायचं हेही माणसालाच ठरवावं लागणार होतं.
आपणच वाट आणि आपणच वाटसरू
अशी माणसाची अवस्था होती.
त्या काळी मग माणूस वेगवेगळे जिवंत प्राणी, खाटकाच्या दुकानातले कत्तल केलेले मृत प्राणी किंवा धार्मिक स्थळी बळी दिलेल्या प्राण्यांचं निरीक्षण करायचा.अर्थात,अशी निरीक्षणंही पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी केलेली नव्हती तर यातून आपल्याला त्या प्राण्याचा जास्त उपयोग कसा होईल आणि ते ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीला कसं देऊ शकू या विचारांनीच केलेलं होतं.गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक देशांमधले अँनॅटॉमिस्ट हे चक्क एखाद्या मेंढयाची कत्तल करून त्याच्या यकृताच्या आकारावरून त्या देशाच्या राजाचं आणि देशाचं भविष्य सांगणारे ज्योतिषी होते! शिवाय,अनेक देशांमध्ये सूर्याला प्राण्याचं किंवा चक माणसाचं हृदय अर्पण केल्यानं आपलं भलं होतं अशा प्रकारच्या अंधश्रद्धाही होत्याच.त्यातून अनेक देशांमध्ये युद्धं व्हायची तेव्हा माणसं मरायची,त्यांचे अवयव तुटायचे.अशा माणसांना मग त्या त्या काळचे वैद्य,हकीम किंवा डॉक्टर्स त्या वेळच्या ज्ञानानुसार उपचार करायचे.गंमत म्हणजे पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या अशा गोष्टींतूनच माणसाकडे आपल्या शरीरात कोणते अवयव असतात याची बरीचशी जमा होत गेली.उपयुक्त माहिती जमा होत गेली.
सदरची वाचणीय व ज्ञानात वाढ करणारी ही वैज्ञानिक माहिती सजीव या पुस्तकातील आहे.लेखक -अच्युत गोडबोले अमृता देशपांडे,प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन
आजपासून जवळपास ३००० वर्षापूर्वीची मृत शरीरं जपून ठेवण्याची इजिप्शियनांची कला पाहिली की थक्क व्हायला होतं.माणसाच्या शरीराचं सखोल ज्ञान असल्याशिवाय मृत शरीराची ममी तयार करणं शक्यच नव्हतं.काही ममीज तर इतक्या व्यवस्थित आहेत,की आजही आपण अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली ती व्यक्ती कशी दिसत असावी याची स्पष्ट कल्पना करू शकतो! मृत शरीराची ममी बनवण्याचा हा कार्यक्रम तब्बल ७० दिवस चालायचा!आधी मृत शरीरातले काही अवयव आणि शरीरातलं जवळपास सगळं पाणी काढून टाकून नंतर त्या शरीरात मसाले भरून ते शरीर पुन्हा बंद केलं जायचं.यातूनच कोरडं असलेलं शरीर कुजत नाही हे माणूस त्याच वेळी शिकला होता..
बॅबिलॉनच्या काळात ख्रिस्तपूर्व १९२० मध्ये मेसोपोटेमियातल्या दगडांत कोरलेल्या हमुराबी कोडमध्येही वैद्यकशास्त्राबद्दल लिहिलेलं आढळून येतं.यातून त्या लोकांकडे मागच्या अनेक पिढ्यांतून माणसाच्या शरीराच्या निरीक्षणांतून चालत आलेलं उपयुक्त ज्ञान होतं असं लक्षात येतं.
विशेष म्हणजे या ज्ञानाची उपासना सगळ्यात आधी आपल्या भारतात सुरू झाली,ज्या वेळी इतर सगळ्या जगात विज्ञान तर सोडाच,पण वैज्ञानिक दृष्टिकोनही विकसित व्हायला अजून काही शतकं लागणार होती,त्यावेळी भारतात अनेक ज्ञान शाखा विज्ञानाच्या पायावर अढळपणे उभ्या होत्या.भारतात खूप पूर्वीपासूनच विज्ञानाची आणि गणिताची खूपच मोठी परंपरा होती.
ख्रिस्तपूर्व २८०० ते २५००च्या काळात
प्रचंड भरभराटीला आलेली मोहेंजोदडोची संस्कृती,तिथली सुनियोजित शहरं,तिथलं इंजिनिअरिंग,धातुकाम,वजन आणि औषधं हे सगळं थक्कच करणारं होतं.रावळपिंडीपासून ३२ किमी पश्चिमेला असलेल्या पेशावरजवळ ख्रिस्तपूर्व ११ व्या शतकात स्थापन झालेलं तक्षशिला विद्यापीठ,
त्यातला व्याकरणतज्ज्ञ पाणिनी,ख्रिस्तपूर्व ८ व्या शतकातला आयुर्वेदाचार्य अमेय,ख्रिस्तपूर्व ४ थ्या शतकातला तिथलाच अर्थतज्ज्ञ कौटिल्य,ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून ते इ.स. ७०० पर्यंत चाललेलं नालंदा विद्यापीठ हे पाहून आपण चाटच पडतो. पाचव्या शतकातले आर्यभट्ट आणि वराहमिहीर, ७ व्या शतकातला ब्रह्मगुप्त,त्याच सुमारास भारतानं जगाला दिलेली शून्य (0) ची भेट आणि त्यानंतर झालेले महावीर (इ.स. ८५०),मंजुला (इ.स. ९३२),
श्रीपती (इ.स. १०२०) आणि भास्कराचार्य इ.स. (१११४) हे फार महान गणितज्ञ भारतात होऊन गेले आहेत.
याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर आणि ज्ञानप्रवाहांवर जाहीर चर्चा व्हायच्या. अनेक राजांच्या दरबारात अशी हुशार मंडळी वादचर्चेसाठी लोकप्रिय असायची.इतर प्रांतातली हुशार मंडळीही या वादचर्चेसाठी मुद्दाम आदरानं बोलावली जायची आणि त्यांच्यात वादचर्चा व्हायच्या.त्यातून सगळ्यांनाच नव्यानं शोध लागलेलं ज्ञान (आजच्या भाषेत 'कटिंग एज' नॉलेज) मिळत होतं.या सगळ्या विज्ञानवादावर आणि वादचर्चेबद्दल चार्वाक आणि लोकायत यांच्या तत्त्वज्ञानाच्या लिखाणातून आपल्याला कळतं.
नोबेल पारितोषिक मिळवलेले भारताचे सुपुत्र अमर्त्य सेन यांनी आपल्या 'द अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' या पुस्तकात अतिशय रंजकपणे हे मांडलंय.त्यात त्यांनी पूर्वीच्या काळी भारतात संस्कृती,वेगवेगळ्या ज्ञानशाखा,समाजशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र यांच्याबद्दलच्या वादचर्चा कशा चालायच्या हे रसाळपणे लिहिलंय.
क्रमशः