* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मला 'मी' च बनायचं आहे!" हे जाणीपूर्वक सांगणारं पुस्तक .! द बायोलॉजी ऑफ बिलीफ

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

मला 'मी' च बनायचं आहे!" हे जाणीपूर्वक सांगणारं पुस्तक .! द बायोलॉजी ऑफ बिलीफ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मला 'मी' च बनायचं आहे!" हे जाणीपूर्वक सांगणारं पुस्तक .! द बायोलॉजी ऑफ बिलीफ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३०/९/२२

"मला 'मी' च बनायचं आहे!" हे जाणीपूर्वक सांगणारं पुस्तक .! द बायोलॉजी ऑफ बिलीफ

ज्या पाच लोकांच्या संगतीत तुम्ही असता त्या पाच लोकांच्या व्यक्तिमत्वाची 'सरासरी' म्हणजे तुम्ही असता.


जिम रॉन


माझ्यासोबत असणाऱ्या नेहमीच माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.


 मी 'शरीर' अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे या लेखकांचे पुस्तक वाचत होतो.या पुस्तकात शरीराबद्दल संपूर्ण माहिती शरीरातील अवयवांची त्या अवयवांचा लागलेला शोध खूपच प्रभावीपणे,सोप्या भाषेत सुरेख पद्धतीने लिहिले आहे.५५८ पानांचे हे पुस्तक मला माझ्या शरीररुपी चेहऱ्याची ओळख करून देत आहे,तेही जिव्हाळ्याने प्रेमाने,२७३ पाने वाचून संपली आहेत. याच पुस्तकातील मनोगतामध्ये आदरणीय लेखक अच्युत गोडबोले पान १९ वरती डायबेटीसच्या बाबतीत एका डॉक्टरांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी विचारलं, " डायबेटिस न होण्याकरता काय करावं ? " तर त्यांनी उत्तर दिलं, " आधी तुम्ही डायबेटीस न झालेले आई-वडील निवडा ! " याचाच अर्थ, डायबेटीस ( मधूमेह ) ते डिप्रेशनपर्यंत आपल्याला होणारे कित्येक विकार हे आनुवंशिकतेमध्येच ( जेनेटिकली ) ठरलेले असतात.


हे वाचत असता काही दिवसांपूर्वी 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ' हे पुस्तक वाचलं होतं. साकेत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले.ब्रुस एच.लिप्टन मुळ लेखक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. या पुस्तकाचा अनुवाद शुभांगी रानडे - बिंदू यांनी केला आहे.पुस्तकाची पाने २५३ आहेत.


अनुवंशशास्त्रांच्या आत्तापर्यंत रूढ असलेल्या वर्चस्वाचं गुपित उलगडणारे स्वतःला अनुवंशिकतेचा बळी मांनण्याच्या मानसिकतेला स्पष्ट धुडकावून लावणारे हे पुस्तक अत्यंत निर्भीड आणि नवी दृष्टी देणारे आहे.डॉ.लिप्टन यांच्या या प्रतिपादनासाठी त्यांनी क्वांटम जीवशास्त्रातील ठोस पुरावेही यात दिले आहेत. आपल्या मानसिक धारणाच आपलं आयुष्य घडवत असतात, ही माहिती डॉ.लिप्टन वाचकांना केवळ सांगतात असे नव्हे,तर अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे पटवूनही देतात. हे आपल्याला विचार करायला लावणारे, प्रेरणादायी पुस्तक आहे.असे ली पुलोस,Ph.D.A.B.P.P, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया Miracles & Other Realities च्या लेखकांनी व इतरही सर्वोत्तम लोकांनी या पुस्तकाबद्दल सांगितले आहे.


एपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानव जातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांनि आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशामुळे डीएनएचे नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशामध्ये आपल्या ( सकारात्मक किंवा नकारात्मक ) विचारांतून तयार होणाऱ्या उर्जातरंगाचाही समावेश असतो,असं लिफ्टने म्हणतात.


पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असे हे संशोधन सांगतं.


पुस्तकाचे मलपृष्ठ आपल्याला पुस्तकाच्या मुख्य विषयाकडं घेऊन जातं.!


डॉ.लिप्टन यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून करत असलेल्या विद्यादानातून जीवशास्त्र हे खरोखरीच एक जिवंत, चैतन्यमय आणि आपल्यात मिसळून गेलेलं विज्ञान आहे, पृथ्वीच्या कोठल्यातरी तुकड्यात अस्तित्वात असलेलं दूरस्थ विज्ञान नाही,याची खात्री पटली.


त्या कॅरेबियनच्या महाविद्यालयात शिकवताना निसर्ग आमच्या अवतीभवती होता.त्या बेटावरच्या सुंदर बागांसारख्या जंगलात शांततेने बसलेलो असताना आणि त्या नितळ पाण्यातल्या सुंदर प्रवाळ भिंतीचं निरीक्षण करताना, प्राणी आणि वनस्पती प्रजातींचं जीवन किती अद्भुतपणे मिसळून गेलं आहे, हे मला समजलं. या सर्वांचे निसर्गाने किती नाजूक संतुलन साधलेलं असतं, हे जाणवलं. केवळ प्राणी आणि वनस्पती यांचंच नाही, तर त्या सर्वांचं त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी किती अचूक संतुलन असतं हे मला दिसून आलं.कॅरेबियन बेटांच्या त्या स्वर्गीय वातावरणात, निसर्गाच्या कुशीत बसून त्याचं निरीक्षण करताना मला तीव्रतेने जाणवलं की, आपण जे पाहत आहोत, तो जीवनाचा लढा ( Struggle for Life ) नाही,तर या सर्वांनी मिळून गायलेलं जीवनाचं मधुर गाणं आहे. डार्विनच्या प्रभावामुळे आपल्या जीवशास्त्रज्ञांनी निसर्गातल्या विविध प्रजातींमधल्या सहकार्याकडे काहीही लक्ष न देता, त्यांच्यातल्या लढ्यायाकडेच जास्त लक्ष केंद्रित केलं आहे, याची मला खात्री पटली.


शास्त्रज्ञ जेव्हा एखाद्या पेशीला शरीरापासून वेगळे काढून कृत्रिम स्थितीत प्रयोगशाळेत वाढतात तेव्हा ती लीलया तेथे जिवंत राहते वाढते. प्रत्येक पेशी काही विशिष्ट कार्यासाठी अस्तित्वात आलेली असते आणि तिच्या वाढीला उपयुक्त ठरतील अशा वातावरणाची ती जाणीवपूर्वक निवड करते आणि जे वातावरण तिला घातक ठरू शकेल ते ती जाणीवपूर्वक टाळतेसुद्धा. मानवाप्रमाणेच प्रत्येक पेशीसुद्धा आपल्या सभोवतालच्या वातावरणातील विविध प्रेरक घटक ओळखते, त्याचे विश्लेषण करते आणि मग स्वतः जिवंत राहण्याच्या दृष्टीने त्या घटकांना योग्य तसा प्रतिसाद देते.


इतकेच नाही तर आपल्या अवतीभवतीच्या वातावरणामुळे येणार्‍या अनुभवांचे स्मरणसुद्धा पेशी ठेवू शकते आणि पुढच्या पिढीच्या पेशींपर्यंत पोहोचवूही शकते. उदाहरणार्थ जेव्हा गोवराचे विषाणू एकाद्या बालकाच्या शरीरात प्रवेश करतात, जेव्हा त्या बालकाच्या शरीरातील एक अपरिपक्व प्रतिकारक पेशी त्याचा सामना करण्यासाठी पुढे येते. या विषाणूला प्रतिकार करेल असे प्रथिन,ज्याला प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडी असे म्हणतात, तयार करणे हे त्याचे काम असते.


या प्रक्रियेत सर्वात आधी या प्रतिकारक पेशीला असे एक जनुक तयार करावे लागते, ज्यामध्ये त्या विषाणूच्या प्रतिद्रव्याच्या रचनेचा आराखडा असेल. हे असे जनुक निर्माण करण्याची पहिली पायरी त्या अपरिपक्व प्रतिकारक पेशीच्या केंद्रकात घडते. या केंद्रकामध्ये डीएनएच्या रेणूंनी बनलेले असंख्य तुकडे असतात. असा प्रत्येक तुकडा म्हणजे एका विशिष्ट प्रथिनासाठीचा आराखडा असतो. डीएनएचे हे असंख्य तुकडे अनेक वेगवेगळ्या तर्‍हांनी एकमेकांशी जोडून,अपरिपक्व प्रतिकारक पेशी अनेक जनुके तयार करते. प्रत्येक जनुक एकमेव रचनेचे एक प्रतिद्रव्य तयार करू शकते. जेव्हा गोवराच्या विषाणूच्या रचनेला सुयोग्य असे प्रतिद्रव्य एखाद्या प्रतिकारक पेशीत तयार होते, तेव्हा ती त्या कार्यासाठी 'सुरू' होते. विषाणूंवर असलेले अँटिजन आणि त्यावर लागू पडणारु अँटीबॉडी यांची भौतिक रचना कुलूपकिल्लीच्या उदाहरणाने स्पष्ट होईल. प्रत्येक कुलपाला त्याची स्वतःचीच किल्ली उघडू शकते. तसेच प्रत्येक अँटिजेनला त्याची अँटीबॉडीच लागू पडते.


अशा रीतीने 'चेतलेल्या' प्रतिकारक पेशी अजून एका अद्भुत प्रक्रियेद्वारे,जिला 'आकर्षण परिपक्वता' असे नाव आहे, प्रतिद्रव्याच्या प्रथिनाचा आकार गोवराच्या विषाणूच्या अँटिजेनला अगदी चपलख लागू पडेल,असा बनवतात.( ली आणि सहकारी २००३,अँडम्स आणि सहकारी २००३.)


यानंतर सोमॅटिक हायपरम्युटेशन या गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे ही पेशी या नवीन जनुकाच्या शेकडो प्रति तयार करते. मात्र, प्रत्येक नवीन जनुकात किंचित वेगळ्या रचनेच्या प्रतिद्रव्याचा आराखडा असतो, जेणेकरून ते प्रतिद्रव्य किंचित वेगळ्या रचनेच्या अँटिजेनला लागू व्हावे. त्यानंतर ती प्रतिकारक पेशी असे जनुक निवडते, ज्याचे प्रतिद्रव्य गोवराच्या त्या विषाणूला तंतोतंत लागू पडते. हे निवडलेले जनुकसुद्धा सोमॅटिक हायपरम्युटेशन प्रक्रियेद्वारे अधिकाधिक अचूक प्रतिद्रव्य मिळेल, असा बदल स्वतःच्या रचनेत घडवून आणते. ( वू आणि सहकारी २००३,ब्लॅडन आणि स्टील १९९८,दियाज आणि कसाली २००२,गीअरहार्ट २००२.)


अशा रीतीने घडवलेले प्रतिद्रव्य गोवराच्या विषाणूवर चिकटून त्याला जणू कुलूपबंद,निष्प्रभ करते आणि प्रतिद्रव्य चिकटलेला विषाणू, शरीरातील लढाऊ पेशींना ओळखू येतो आणि त्या त्याचा झपाट्याने नाश करतात आणि ते बालक गोवरापासून वाचते, पेशी या विशिष्ट प्रतिद्रव्यांचे चांगलेच 'जनुकीय स्मरण' ठेवतात आणि भविष्यात जर कधी पुन्हा गोवराचा विषाणू शरीरात शिरला,तर त्याच्या प्रतिकारासाठी अचूक ती प्रतिद्रव्ये निर्माण करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू होते. हे प्रतिद्रव्य निर्माण करणारी पेशी जेव्हा विभाजित होते, तेव्हा हे जनुक पुढच्या पेशींमध्ये पाठवले जाते. यावरून हे लक्षात येते की, गोवराच्या विषाणूबाबत पेशी केवळ 'शिकते'असे नाही, तर त्याचे 'स्मरणही' ठेवते, जे नवीन जनुकाद्वारे तिच्या पुढच्या पिढ्यांमध्ये नेले जाते. जनुकीय अभियांत्रिकीचा हा अद्भुत पराक्रम अत्यंत महत्वाचा आहे; कारण या वरून पेशींना पिढीजात 'बुद्धिमत्ता'असते,हे कळून येते. या बुद्धिमत्तेच्या मुळेच पेशी उत्क्रांत होऊ शकतात. (स्टील आणि सहकारी,१९९८)


पेशी इतक्यात चतुर चलाख असतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. या पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली तीच मुळी एकपेशीय सूक्ष्मजीवांचा रूपात पृथ्वी निर्माण झाल्यापासून साठ कोटी वर्षांमध्ये हे एकपेशीय सजीव अस्तित्वात आल्याचे पुरावे जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळालेले आहेत.त्यापुढची सुमारे पावणेतीन अब्ज वर्षे पृथ्वीवर निरनिराळ्या एकपेशीय सजीवांचेच राज्य होते. यात बॅक्टेरिया,अल्गी आणि अमिबासारख्या एकपेशीय सजीवांच्या समावेश होतो.


सुमारे साडेसात कोटी वर्षांपूर्वी या एकपेशीय सजीवांनी अधिक चतुरपणा गाठला, तेव्हा प्रथम वनस्पती आणि प्राण्यांसारखे बहुपेशीय सजीव अस्तित्वात आले‌.हे सुरुवातीचे बहुपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय सजीवांचे, एकमेकांशी सैलसरपणे जोडलेले मोठे समूहच होते.सुरुवातीचे असे हे समूह केवळ शेकडो किंवा हजारो पेशींचे, तुलनेने लहानच असे समूह होते. मात्र सातत्याने असे एकमेकांशी जोडून राहण्याचे उत्क्रांतीच्या दृष्टीने होणारे फायदे या चतुर पेशींना काही काळातच समजले आणि या ज्ञानाचा उपयोग करत,या पेशींना लक्षावधी,कोट्यावधी आणि अगदी अब्जावधींचे समूह करत, एकमेकांची सामंजस्यपूर्ण व्यवहार करणाऱ्या पेशींच्या संस्था उभारल्या. एका पेशीचा आकार अतिसूक्ष्म, मानवी डोळ्यांना न दिसणारा असला, तरी पेशींनी चतुरपणे जमवलेल्या या समूहांचा आकार डोळ्यांना न दिसणार्‍या एखाद्या ठिपक्यापासून ते एखाद्या मोठ्या कातळाएवढा असू शकतो.मानवी डोळ्यांना या सुस्थापित पेशीसमूहांचे जसे आकलन होते, त्यानुसार जीवशास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण केले‌ जसे की,हा उंदीर,तो ससा,तो हत्ती.मानवी डोळ्यांना ससा,हा 'एक' सजीव म्हणून दिसत असला,तरी तो प्रत्यक्षात, अत्यंत सुसंगत आणि कार्यक्षम रीतीने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या अब्जावधी पेशींचा समूहच असतो.


फारच गुंतागुंतीची सरळ साधी सोडवणूक करताना,काही बौद्धिक, वैचारिक मंथन घडवत वाचन सुरूचं असतं.


पुढे तर धक्काच बसला. डार्विन हा जरी आत्तापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञ असला तरी उत्क्रांती हे वैज्ञानिक सत्य असल्याचे प्रथम दाखवून देणारा शास्त्रज्ञ होता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ जीन बाप्टिस्ट डी‌.लॅमार्क.अगदी डार्विनच्या सिद्धांताला विसाव्या शतकातील रेण्वीय अनुवंशशास्त्राची जोड देऊन 'निओडार्विनिझम' या सिद्धांताची रचना करणारा अनर्स्ट मेयर हा शास्त्रज्ञ सुद्धा लॅमार्कलाच उत्क्रांती सिद्धांताचा  जनक मानतो.मेयरने १९७० मध्ये लिहिलेल्या 'उत्क्रांती आणि जीवनाची विविधता' या पुस्तकात,लॅमार्क हाच उत्क्रांतीवादाचा जनक असल्याचे मत नोंदवले आहे.*


लॅमार्कने डार्विनच्या पन्नास वर्षे आधीच आपला सिद्धांत मांडला होता आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेबाबत त्याची मते डार्विनपेक्षा काहीशी मवाळ होती.लॅमार्कच्या मते सजीव आणि त्यांचे वातावरण, यांच्यातील 'सहकार्यपूर्ण' आणि 'निर्देशक' देवाण-घेवाणमुळे सजीवांना या गतिशील जगात जिवंत राहणे आणि उत्क्रांत होणे शक्य होते. आपल्या भोवतीच्या बदलत्या वातावरणाशी सजीव सातत्याने जुळवून घेतात आणि या दरम्यान त्यांच्या रचनेत होणारे उपयोगी बदल ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवत राहतात. उक्रांतीबाबतचे लॅमार्कचे हे विचार आणि आजच्या आधुनिक पेशीशास्त्रज्ञांचे, शरीरातील प्रतिकारक संस्था त्यांच्या वागण्यानुसार कशा जुळते घेतात, याबाबतचे विचार,आश्चर्यकारकरित्या एकमेकांना अनुरूप आहेत. उत्क्रांतीसाठी शरीररचनेतील बदल होण्यास "फार मोठा कालावधी" लागतो,असेच लॅमार्कने म्हटले होते.


मात्र,"सजीवांना निर्माण करणाऱ्या तत्त्वाने, कोट्यवधी वर्षाच्या कालावधीत अधिकाधिक क्लिष्ट रचनेचे सजीव निर्माण केले आहेत" या आणि अशा विचारांवर लॅमार्कचा सिद्धांत आधारित आहे, असे आपल्या पुस्तकात लिहून जॉर्डानोव्हा,या शास्त्रज्ञाने जणू लॅमार्कला पाठिंबा दिला.


या दरम्यान झालेला त्रास, त्यांच्या सहकाऱ्यांनी या मताची केलेली टवाळी हि खुपचं मनाला लागते.


ब्रिटिश डॉक्टर फ्रँक रायन यांनी आपल्या, ( Ryan 2002, Page 16 ) 'डार्विन्स ब्लाइंड स्पॉट'या पुस्तकात जीवसृष्टीत 'सिंबायोटिक' म्हणजेच सहजीवी नातेसंबंध असतात.या अनुषंगाने उदाहरण दिले आहे. गोबी मासा आणि एक प्रकारचा शिंपला एकमेकांच्या सहाय्याने राहतात. शिंपला अन्न मिळवतो,तर गोबी मासा संरक्षण पुरवतो.'हर्मिट' खेकड्याची एक प्रजाती एका गुलाबी ॲनेमोन प्राण्याला स्वतःच्या कवचावर राहू देते. मोठे मासे ऑक्टोपस हर्मिट खेकड्याला खाऊ पाहतात,तेव्हा ॲनेमोन हा प्राणी आपले चमकदार रंगीत तंतू फिस्कारून त्यातील विष त्या शत्रूंवर उधळतो, त्यामुळेच त्या भक्षक प्राण्यांना हर्मिट खेकड्याचा नाद सोडून पळ काढावा लागतो,हे सर्वज्ञात आहे. या विलक्षण सुरक्षेबद्दल ॲनेमोनला खेकड्याने खाऊन उरलेले अन्न मिळते.जे त्याला पुरेसे असते.


अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे प्रबंधक डॅनियल ड्रेल यांनी 'सायन्स' या नियतकालिकासाठी बोलताना म्हटले होते की,"प्रजाती, म्हणजे काय, हे सुलभपणे सांगणे आता अवघड झाले आहे !" ( पेनिसी २००१ )


टोमॅटोच्या रोपातील एकाद्या जनुकात केलेला हस्तक्षेप केवळ त्या प्रजातीपुरता न राहता, पूर्ण सजीवसृष्टीवर परिणाम करणारे ठरू शकतो आणि तो परिणाम ही असा की, ज्याची आपण आता कल्पना करू शकत नाही. आत्ताच एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जनुकीय फेरफार केलेले पदार्थ जेव्हा मानव खातो तेव्हा त्या खाद्यान्नातील कृत्रिम जनुके आतड्यातील उपकारक जिवाणूंमध्येही प्रवेश करतात आणि त्या जीवाणूंच्या गुणधर्मात बदल घडवतात. ( हेरिटेज २००४,नेदरवूड आणि सहकारी २००४ ) तसेच जनुकीय फेरफार केलेल्या प्रजाती आणि स्थानिक वनस्पती प्रजाती यांच्यात जनुकीय देवाण-घेवाण होऊन कोणत्याही प्रतिबंधक औषधाला दाद न देणार्‍या तण प्रजाती उत्पन्न झालेले आहेत.(मिलियन २००३,हेगुड आणि सहकारी २००३,देस्प्लांक आणि सहकारी २००२,स्टेशन्सवर आणि स्नो २००१)


सर्व प्रजातींमध्ये येनकेन प्रकारेण साहचर्य असते, हे सत्य न ओळखता आपण जनुकीय अभियांत्रिकीचे प्रयोग करत राहिलो, तर मनुष्यजातीच्या अस्तित्वालाच आपण धोक्यात घालू,असा इशारा आपल्याला जनुकीय उत्क्रांतीशास्त्रज्ञ देत आहेत.'एका प्राण्याला' मध्यवर्ती धरून रचल्या गेलेल्या डार्विनवादाच्या पलीकडे आपण पाहायला हवे,'सजीवांच्या समूहा' ला केंद्रस्थानी ठेवणारा सिद्धांत अंगीकारायला हवा. उत्क्रांती ही सर्वात प्रबळ सजीवाच्या जिवंत राहण्याशी निगडित आहे.इ.स.१९९८ मध्ये 'सायन्स' या नियतकालिकातील लेखात लेंटनम्हणतात,"उत्क्रांतीमध्ये सुट्ट्या, एकट्या जीवांच्या भूमिकेवर लक्ष देण्याऐवजी सगळ्या सजीवांवर आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करायला हवे, तेव्हाच कोणते गुण टिकणार आहेत आणि वर्चस्व गाजवणार आहेत, हे आपल्याला पूर्णपणे समजेल." टिमोथी लेंटन हे जेम्स लव्हलॉक या शास्त्रज्ञाने मांडलेल्या या सिद्धांताला अनुमोदन देतात. (गाया ग्रीक शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी देवता.) या सिद्धांतामध्ये असा विचार मांडलेला आहे की, पृथ्वी आणि पृथ्वीवरची संपूर्ण सजीव सृष्टी यांना एकत्रितपणे एकच जिवंत प्राणी समजायला हवे. हा सिद्धांत ज्यांना मान्य आहे, असे शास्त्रज्ञ साहजिकपणे अर्थात या सर्वश्रेष्ठ प्राणीमात्रांचे, निसर्गाने कुशलपणे साधलेले संतुलन बिघडू शकेल, अशा कोणत्याही घटकाला कडाडून विरोध करतात. मग तो घटक जंगलतोड,असो

ओझोनच्या थराचा नाश असो किंवा जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने सजीवांची जनुकीय रचना बदलणे हा असो. असा कोणताही घटक पृथ्वीसह सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचाच घात ठरेल असे शास्त्रज्ञ मानतात.


ब्रिटनच्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन परिषदेने नुकतेच केलेल्या संशोधन वरील सिद्धांताला आधार देणारे आहे. (थॉमस आणि सहकारी २००४, स्टीव्हन्स आणि सहकारी २००४). पृथ्वीच्या इतिहासात आत्तापर्यंत पाच वेळा सजीवसृष्टीचा महासंहार घडून आल्याचे पुरावे सापडतात. हे सगळे संहार पृथ्वीच्या बाहेरच्या घटकांमुळे झाले, असे मानले जाते. जसे की धूमकेतूने पृथ्वीला दिलेली धडक. मात्र हल्लीच्या एका संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे की, पृथ्वी सध्या सहावा महासंहार अनुभवत आहे.(लोवेल २००४) मात्र, यावेळच्या महासंहाराचे कारण पृथ्वीबाहेरचे नाही. या संशोधनात सहभागी झालेले जेरेमी थॉमस हे शास्त्रज्ञ म्हणतात,"आम्हाला विचाराल,तर सध्याचा हा महासंहार केवळ एका प्राण्यांमुळे होत आहे -  मानव."


हे पुस्तक म्हणजे माझ्यासाठी नवीन माहिती त्याच बरोबर धक्क्यावर धक्के देणारे केंद्रक होते. सगळीकडे आश्चर्य अचंबा, सर्व काही अविस्मरणीय


प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला इतकं नक्कीच माहीत असतं, की मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. काही लोकांना आपल्याला औषध मिळत आहे, या केवळ विश्वासाऩच बरोबर वाटू लागतं, हे या विद्यार्थ्यांना दिसून आलेलं असतं."हे औषध आहे, घे, म्हणजे बरे वाटेल,"असं डॉक्टरनं सांगून दिलेली गोळी घेतल्यावर त्या पेशंटला बरं वाटल्याची कित्येक उदाहरणं असतात. भले मग ती गोळी फक्त साखरेची का असेना! वास्तवात औषध नसलेला पदार्थ औषध समजून घेतल्यानंतर बरं वाटणं, याला वैद्यकीय भाषेत प्लॅसीबो परिणाम, असं म्हणतात. उर्जेवर आधारित असलेल्या PSYCH - K या मानसोपचार पद्धतीचा जनक असलेला लेखकांचा मित्र शास्त्रज्ञ रॉब विल्यम्स याला 'प्लॅसीबो परिणाम' म्हणण्यापेक्षा  'दृष्टीकोनाचा परिणाम'असं म्हणणं संयुक्तिक वाटतं.थोडक्यात हा 'धारणांचा परिणाम' मान्य केला जातो.


क्योटो विद्यापीठातल्या संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांनाही दिसून आलं आहे, चिंपांझी माकडांची पिल्लं केवळ त्यांच्या आईच्या वर्तणुकीचे निरीक्षण करूनच आयुष्याचे धडे शिकतात. केवळ आईचं निरीक्षण करून लहान पिलं/बालकं अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी शिकू शकतात. त्यांना त्या पालकांनी प्रत्यक्ष समजावून द्यावे लागतातच असं नाही! (सायन्स २००१)


मानव जाती मध्ये सुद्धा असचं घडतं. पालकाची वर्तणूक, त्यांच्या धारणा आणि त्यांचे दृष्टिकोन त्यांच्या मुलांच्या सुप्त मनामध्ये कायमचे कोरले जातात. एकदा का ते असे सुप्त मनात कोरले गेले की, पुढच्या आयुष्यात तेच सगळ्या जीवनाचं नियंत्रण करतात. जर आपण त्यांना बदलण्याचा मार्ग शोधून काढला नाही, तर..


पालकांकडे पाहूनच मुलं सगळं शिकतात, ते ज्यांना अजून पटत नसेल त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडात बसलेले अपशब्द त्यांची मुलं पण वापरतात का नाही,ते आठवून पहावे. त्यांच्या मुलांनं तो अपशब्द पहिल्यांदा केव्हा उच्चारला, ते हे आठवून पहावं. व तो शब्द अगदी तुमच्याच स्टाईलनं बोलला असल्याचेही तुमच्या लक्षात आले असेल, अशी लेखकाने दिलेली खात्री मला खरच मनापासून खात्रीशीर वाटली.


(तसं तर कुठलंच मूल जन्माला येताना मनाची पाटी कोरी ठेऊन येतचं नाही, गर्भावस्थेत असताना ते काही गोष्टी ग्रहण करून मगच जन्माला आलेलं असतं.) दत्तक पालकांनी हे सत्य एकदा समजून घेतलं, की मग त्यांचं मुलांसह आयुष्य सोपे होईल, प्रसंगी मुलांच्या काही समजून ती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, हे त्यांना कळेल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील.


अर्थातच मानवाला त्याच्या बालपणात काय हवं असतं, तर प्रेमानं केलेलं पालन पोषण आणि भरपूर लोकांचा सहवास, ज्यातून ते बालक चालणं बोलणं, रितीरिवाज शिकतं. अनाथालयातल्या बालकांना केवळ पाळण्यात ठेवून वेळच्यावेळी अन्न, पाणी, आणि औषध दिलं जातं, ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात या सगळ्यांबद्दल खूप प्रेम असेल असं नसतंच. त्या अश्राफ बालकांना कधी प्रेमळ हास्य मिठी किंवा गालावरचा पापा मिळत नाही, त्याच्या विकासात अतिशय गंभीर समस्या येतात.रोमानियातल्या अशा एका अनाथालयातल्या  मुलांचा अभ्यास मेरी कार्लसन यांनी केला. त्या हार्वढ वैद्यकीय महाविद्यालयातल्या मज्जाजैवशास्त्रज्ञ आहेत. प्रेमाचा स्पर्श न होता, केवळ अन्नपाणी देऊन वाढवलेल्या त्या मुलांची वाढ योग्य तऱ्हेनं न होतात खुटंली आणि त्यांचं वागणं सामान्य मुलांसारखं न राहता विचित्र झालं,असं त्यांना या अभ्यासातून दिसून आलं कार्लसन यांनी या अनाथालयातल्या काही महिने ते तीन वर्षे,या वयोगटातल्या साठ मुलांचा अभ्यास केला.या मुलांच्या लाळेतून त्यांनी त्यांच्या रक्तातलं कॉर्टिसोलचं प्रमाण तपासलं.ज्या मुलांच्या रक्तात कॉर्टिसोलची पातळी जास्त होती, त्यांच्या वाढीवर जास्त विपरीत परिणाम झाला, असं दिसून आलं.

( होल्डर १९९६.)


निकोलस कोपर्निकस या उत्तम राजकारणपटू आणि प्रतिभावान खगोलशास्त्रज्ञानं धर्मसंस्था आणि वैज्ञानिक यांच्या दरम्यान उभी रेघ मारून अध्यात्मापासून विज्ञान वेगळं केलं. कारण पृथ्वी नव्हे तर सूर्य मध्यभागी असतो आणि सूर्य पृथ्वीभोवती नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा त्याचा महान शोध,धर्मसंस्थेच्या पचनी पडणे शक्यच नव्हतं.चर्चेच्या मते पृथ्वी हाच विश्वाचा केंद्रबिंदू होता.आपण हा शोध जाहीर केला,तर धर्मसंस्थेकडून आपल्यावर पाखंडी असल्याचा शिक्का बसेल आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल,याची पूर्ण कल्पना असल्यानं कोपर्निकसनं हा महान शोध कित्येक वर्षे गुप्तच ठेवला. आपल्या आयुष्याची अखेर दिसू लागेपर्यंत त्यांनं हा शोध हुशारीने लपवला आणि आपली अखेर जवळ आली आहे,असं पाहताच तो प्रसिद्ध केला. त्याची ही चतुराई अत्यंत योग्य ठरली, असंच म्हणावं लागेल; कारण त्यानंतर सत्तावन्न वर्षांनी जिआर्डानो ब्रूनो,या डॉमिनिक धर्मगुरूनं जेव्हा धाडस दाखवून कोपर्निकसच्या या सिद्धांताला मान्यता जाहीर केली तेव्हा त्याला पाखंडी ठरवून चक्क जाळून टाकलं गेलं... कोपर्निकस खरंच हुशार म्हणायचा... कारण त्यानं आपला शोध मरणाआधी जाहीर केल्यानं त्याला पाखंडी ठरवून त्याचा छळ करण्याची धर्मसंस्थेची संधी हुकली."थडग्यात जाऊन छळ करणं त्यांना शक्य झालं नाही !" शोधकर्ताच मरण पावल्यानं त्या शोधाचा सामना धर्मसंस्थेला करावा लागला.


जाता जाता


तुम्ही संध्याकाळी तुमच्या बागेत बसता आणि सूर्यास्त पाहता. त्यावेळी तुम्हाला आकाश रंगीबेरंगी दिसतं आणि ते तुम्हाला आवडतं.आता हे रंग कशामुळे उद्भवतात, तर हवेच्या प्रदूषणामुळे, जितकी हवा प्रदूषित तितके सूर्यास्ताच्या वेळी जास्त रंग दिसतात. मानवाने आपले उद्योग असेच सुरू ठेवले तर आपली पृथ्वी आपल्याला याहूनही जास्त रंगाची उधळण असलेले सूर्यास्त दाखवेल,हे नक्की.


माझा 'स्व' हा वातावरणात अस्तित्वात असतो, माझं शरीर अस्तित्वात असो की नसो. टीव्हीचं उदाहरण घेऊन बोलायचं तर माझं शरीर बंद पडलं आणि भविष्यात असं एक मूल (जैविक टिव्ही सेट) जन्माला आलं,ज्याची सेल्फ रिसेप्टर प्रथिनं अगदी तंतोतंत माझ्या आधीच्या शहराच्या सेल्फ रिसेप्टर प्रथिनांसारखी असतील,तर ते नवं मूल माझा 'स्व' वातावरणातून उतरवून घेईल. मी या जगात पुन्हा अवतरेन. माझा शरीराचा टीव्ही मेला, तरी माझ्या 'स्व' चं प्रक्षेपण हवेत असतंच.माझं 'स्व' त्व ही माहितीच्या प्रचंड साठ्यांनं बनलेल्या वातावरणात अस्तित्वात असलेली माझी सही आहे. शरीर मेलं तरी आपला 'स्व' वातावरणात अस्तित्‍वात असतोच.'स्व' चे सिग्नल्स वातावरणात निरंतर अस्तित्वात असतात, ते अमर असतात. आपण सगळेच या तर्‍हेनं अमर आहोत. वातावरण म्हणजे सर्वेसर्वा, तो परमात्मा आणि आपल्या सेल्फ रेस्पेक्ट अँटेना त्या पूर्ण वर्णपटातला एक लहानसा पट्टा डाऊनलोड करून घेतात. आपण त्या परमात्म्याचा एक लहानसा अंश आहोत.


हे पुस्तक स्वतःबद्दल सांगत आणि जाता जाता मला एका पुस्तकाची आठवण करून जातं जे आमचे परममित्र आहेत डॉ.रवींद्र श्रावस्ती लिखित"मृत्यू सुंदर आहे ?"


निष्प्रेम आयुष्याला काही अर्थ नसतो, प्रेम म्हणजे जीवनाचं जल ते ह्रदयानं आणि आत्म्यानं पिऊन घ्या


या नाविन्यपूर्ण जीवन जगण्याचा दृष्टीकोनातून जीवन दाखवणार्‍या पुस्तकाचे,लेखकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद..