आश्चर्यकारक अचंबित सर्वोत्तम जगण्याच्या नोंदी असणारे 'पक्षीगाथा' हे पुस्तक..!
वायुगतिकी ( aerodynamics ) च्या नियमांनुसार फुलपाखराला उडता यायला नको. तरीही ते उडतं. माहित आहे असं का?
कारण फुलपाखराला हे नियम माहीतच नाहीत.
आमचे परममित्र माधव गव्हाणे साहेब त्यांच्यासोबत नेहमी सुसंवाद होतो न चुकता.पक्षिगाथा' या पुस्तकातील नोंदीच्याबद्दल आमच्यात चर्चा झाली. पक्ष्यांचे जग खूपच वेगळं व आश्चर्यकारक जीवनाशी निगडित असते. त्यातील नोंदी ऐकत असताना. मी त्यांच्याकडून त्या पुस्तकांचा फोटो मागून घेतला. व ते पुस्तक लगेच मागवून घेतले.
सरपटणार्या प्राण्यांचे युग डायनासॉर आणि टेरोसॉर यांच्या अचानक नाहीशी होण्यासोबत संपुष्टात आले. त्यानंतर सुरू झाले सध्याचे सस्तन प्राण्यांचे युग. या युगाच्या सुरुवातीपासूनच (सुमारे ६३ दशलक्ष वर्षापूर्वी) पक्षांच्या निर्मितीला सुरुवात झाली.आजच्या अनेक पक्षांचे पूर्वज १३ दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात होते. सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वीचा हा काळ पक्षी जातींचा अतिशय भरभराटीचा काळ मानला जातो. या काळात सुमारे ११,६०० पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात असाव्यात.या काळानंतर एकीकडे माणसाचा विकास झाला. तर दुसरी पृथ्वीच्या वातावरणात व पृष्ठभागात मोठे बदल होऊ लागले. यामुळे अनेक जाती नष्ट झाल्या,तर अनेक जातींमध्ये मोठे बदल झाले. आजच्या घडीला पक्ष्यांच्या ८.५०० जाती अस्तित्वात आहेत. आणि ८०० प्रकारच्या नष्ट झालेल्या जातींचे वर्णन वेगवेगळ्या पुराव्यांवरून करण्यात आले आहे.
वर सांगितल्याप्रमाणे पक्षांची नाजूक शरीर रचना व ठिसूळ हाडे यांच्यामुळे त्यांचे जीवाश्म सापडणे कठीण जाते. त्यामुळे गेल्या १४० दशलक्ष वर्षात किती पक्षांच्या जाती जन्माला आल्या आणि नष्ट झाल्या याचा अंधुकसा अंदाजही आपल्याला बांधता येत नाही. जीवाश्माच्या इतिहासाचे तज्ञ ब्रॉडकॉर्ब यांच्या मते
आदिपक्षापासून आजपर्यंतचे सर्व पक्षी मिळून सुमारे १,६३४,००० जाती असाव्यात! आपल्याला माहीत असणाऱ्या पक्ष्यांच्या जातीचे प्रमाण किती नगण्य आहे तेवढेच आपण यावरून समजून घेऊ या..
या पुस्तकाची सुरुवातच इतकी भारदस्त आहे.कि 'जिवंत मनात' संवेदनशील,भावनिक पातळीवर नैसर्गिक व्यक्तिमत्व बहरते.
या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी गन्स,जर्म्स अँड स्टील जेरेड डायमंड यांनी लिहिलेल्या पुस्तकात (आरंभ रेषेपर्यंत मागे जाणे)
जे पुस्तक मानव जातीचा तेरा हजार वर्षाचा संक्षिप्त इतिहास सांगते.
मानवाने पशूंच्या मोठ-मोठ्या प्रजातींचा केलेला समूळ संहार.आज आपण मोठ्या सस्तन प्राण्यांचा खंड म्हणून आफ्रिकेस ओळखतो. आफ्रिकेच्या सेरेंगेटी मैदानी प्रदेश आणि एवढ्या नसल्यातरी आधुनिक युरेशियातही अशियाई गेंडे, हत्ती, वाघ आणि युरोपियन मूस ( फताड्या शिंगाचे हरीण ),अस्वले अशा मोठ्या सस्तन प्राण्यांच्या बर्याच प्रजाती आहेत.( क्लासिकल युगात म्हणजे ख्रिस्तपूर्व ८ वे शतक ते इ.स.५ वे/६ वे शतक या काळात युरोपात सिंहसुद्धा होते.) परंतु ऑस्ट्रेलिया/न्यू गिनी येथे तसे मोठे सस्तन प्राणी आजच्या घडीला नाहीत, फक्त हा १०० पौंडी कांगारू जेवढे आहेत. परंतु पूर्वी तिथे विविध प्रजातींच्या महाकाय सस्तन प्राण्यांचे कळप होते. त्यात महाकाय कांगारू आणि डिप्रोटोडोन्ट म्हणजे गेंड्यांसारखे दिसणारे, परंतु कांगारूंसारखे पोटावरील पिशवीत पिल्लाला ठेवणारे प्राणी होते तसेच आकारानं गायीएवढे परंतु पोटावरील पिशवीत पिल्लू ठेवणारे बिबळेही होते. त्याशिवाय ४०० पौंड वजनाचे शहामृगासारखे न उडणारे पक्षी होते. एक टन वजनाचा सरडा, महाकाय अजगर, जमिनीवर राहणाऱ्या मगरी असे फार मोठे सरपटणारे प्राणी तिथे होते. परंतु ऑस्ट्रेलिया/न्यू गिनीत मानवाचे आगमन झाल्यावर हे सर्व महाकाय प्राणिजग (मेगाफॉन) अदृश्य झाले.
चला आता पाहू या पुस्तकातील नोंदी ज्या पक्षीजगत आपणास समजून सांंगतील.
पक्ष्यांच्या हृदयाची धडधड त्याच्या आकारावर आणि त्याच्या कार्य पद्धतीवर अवलंबून असते. मोठ्या पक्ष्यांचे ह्रदय सावकाश धडधडते. शहामृगाच्या हृदयाचे ठोके मिनिटाला केवळ ३८ असतात, तर बहुतेक गान पक्ष्यांचे ( song birds ) ठोके मिनिटाला २०० - ५०० पर्यंत असतात.
पक्ष्यांच्या त्वचेवर ग्रंथीच नसतात. त्यामुळे त्यांना घाम येत नाही. शरीर गरम झाल्यास ते धापा टाकतात किंवा सावलीत जातात.
आधुनिक पक्ष्यांना दात नाहीत. प्राचीन काळात त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या काळात दात होते, पण उत्क्रांती होताना उडतानाचे वजन कमी असावे म्हणून दात गेले. मात्र काही पक्ष्यांच्या चोचीच्या कडेला दातरे असतात. त्याचा उपयोग चावण्यासाठी होत नसून भक्ष्य धरून ठेवण्यासाठी होत असावा. अंड्यातील पक्षाच्या पिलाला एक 'दात'असतो. अंड्याचे कवच फोडून बाहेर येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण तो खरा दात नाही. अंड्याबाहेर आल्यावर काही दिवसातच तो गळून जातो.
पक्ष्यांना जीभ असते, पण तिला फारसे रुची ज्ञान नसते. कारण त्यांच्या रुचिकलिका जेमतेम ३० ते ७० असतात. माणसाला ९००० च्या आसपास रुचिकालिका असतात. त्यामुळे त्याला जिव्हालौल्य विविध चवींचे-असते. पाळीव कोंबड्यांना त्या थोड्या जास्त म्हणजे २५० ते ३५० असतात. पोपटाच्या जाड जिभेवर सर्वाधिक म्हणजे ४०० रुचिकालिका असतात. पक्ष्यांना खारट चव चांगली कळते, पण त्यांना तुरट-गोड मधला फरक कळत नाही. काही जातींच्या पक्षांना आहारातील पुरक क्षार हवे असतात. पक्ष्यांना दात नसल्याने चावण्याचा प्रश्न नसतो. खाद्य सरळ गिळले जाते.
पक्ष्यांची पिसे केरॅटिनपासून तयार होतात. हे एक वजनाला हलके पण भक्कम आणि लवचिक असे प्रथिन असते. पक्ष्यांची चोच, नखे यामध्ये केरॅटिन असते. आपल्या नाकात आणि केसातही केरॅटिन असते. पिसांची संख्या जातीनुसार वेगळी असते.
हमिंगबर्डला हजाराहून कमी पिसे असतात तर अमेरिकन व्हिसलिंगला २५०० हून अधिक असतात.
पाणपक्षी शरीर जलरोधी करण्यासाठी तेल पसरवतो. पुष्कळ पक्ष्यांच्या शेपटीच्या बुडाला तैलग्रंथी असतात. त्यातून येणारे तेल तो आपल्या चोचीने सर्वांगावर लावतो. मात्र त्याचे अंग तेलाने माखले गेले असेल तर त्याला उडता वा पोहता येत नाही. त्यामुळे मृत्यू अटळ. समुद्रात सांडलेल्या तेलामुळे अशी वेळ येते.
पावसाळ्यात पक्षी भिजल्यास अंग फडफडवून पाणी उडवून लावतात. इतर वेळी जलाशयाच्या कडेला, इथे तिथे साचलेल्या पाण्यात उतरून पक्षी अंग ओले करून जागच्याजागी थरथरुन स्वतःला स्वच्छ करतात. कधीकधी पक्षी धुलीस्नान स्नान करतात. मातीने अंग माखुन नंतर थरथरून ती धूळ झटकून टाकतात. पंखात साचलेले तेल ते अशा पद्धतीने हटवतात. पिसात घुसलेले किडे मुंग्या उडवून लावतात. लहानपगी पिले घरट्यात असतानाच त्यांच्या शरीरावर उवा किंवा तत्सम कीटक चढतात. हे किटाणू पक्षांच्या उर्वरित आयुष्यात तिथे राहतात. तरीही ते त्रासदायक होत नाहीत. पण पक्षी आजारी अशक्त झाला तर मात्र कीटाणूंची वाढ अधिक होते. सामान्यत: पक्षी या किटाणूंना चोचीने काढून टाकतात.धूलिस्नानही उपयोगी असते. नीलपंखासारखे पक्षी मुंग्या मध्ये सोडतात किंवा मुंग्यांना उचलून पिसांमध्ये सोडतात किंवा मुंग्यांना तिथे रगडतात. मुंग्यामधील फॉर्मिक ॲसिड जंतुनाशक असते. हे पक्ष्यांचे मुंगीस्नान.मैना, जंगलमैना, कोतवाल व इतर पक्षी मुंगी स्नान करताना आढळल्याच्या आहेत.
शिकारी पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. त्यामुळेच ते फार दुरूवरून आपली शिकार ओळखतात.केस्ट्रेल पक्षी माळावर चालणाऱ्या उंदराला दीड कि.मी. उंचीवरून देखील अचूक हेरतो. आफ्रिकेतील मार्शल गरुडाची नजर केस्ट्रेलपेक्षाही अधिक तीक्ष्ण असते. एकदा एका टेकडीवर बसलेल्या गरुडाने सुमारे साडेसहा दूर असलेला.गिनीफाऊल पक्षी हेरून त्यावर झपाट्याने घेतलेली झेप बघितल्याची नोंद आहे. माणसाला साधारणपणे एक कि.मी. च्या पलीकडून गिनीफाऊल दिसू शकत नाही. हे वाचून पक्ष्यांचे निसर्गाशी असणारे नाते पाहून मी नतमस्तक झालो.
मानवी डोळ्याचे स्वच्छमंडल ( Cornea ) किंचित वक्राकार असते. पण पक्षाच्या डोळ्याचे स्वच्छमंडल अगदी सपाट असल्याने त्याच्या दृकपटलाचे क्षेत्र व्यापक होते. माणसाच्या दृकपटलापेक्षा त्याचे दृकपटल पाच पटीने अधिक प्रकाशमान असतो. माणसाच्या प्रत्येक डोळ्यात एक असा बिंदू असतो की जिथे दृष्टी सर्वात तीक्ष्ण असते. ससाण्याच्या प्रत्येक डोळ्यात मात्र असे दोन बिंदू असतात. त्यामुळे त्याचे दृष्टीज्ञान मानवी डोळ्यापेक्षा आठपटींनी अधिक असते.
काही पक्ष्यांची, विशेषतः सागरी पक्षी, सफाई करणारे पक्षी, रात्री शिकार करणाऱ्या पक्षांचे नाक अधिक तीक्ष्ण असते. गिधाडांचे नाक बंद करून त्यांना सोडले असता ते मृत जनावरपर्यंत पोहोचण्यास असमर्थ झाले.स्टॉर्म पेट्रेलसारखे २५ कि.मी. दूर असलेले खाद्य हुंगू शकतात. याचा फायदा घेत समुद्री पक्ष्यांचा शोध घेणारे 'चुम' नावाने ओळखले जाणारे घाणेरड्या वासाचे द्रव्य सागराच्या पृष्ठभागावर शिंपडतात. त्या वासाने हे पक्षी तिथे पोहोचतात.
भरगच्च जंगलात मरून पडलेला प्राणी दिसत नाही पण टर्की गिधाड सडलेल्या मांसाची दुर्गंधी जाणून तिथे पोचते. जर्मनीच्या पोलीस खात्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या प्रेतांचा शोध घेण्याकरता प्रशिक्षित टर्की गिधाडांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.
इंग्रजी भाषेत बावळट माणसाला पक्षी बुद्धीचा ( Bird brained ) म्हणून संबोधले जाते पण हे पक्ष्यांना अन्याकारक आहे. कारण त्यांचे अन्नशोधाचे कौशल्य लांब अंतरावरचे अचूक स्थलांतर पाहिले. तर त्याच्या बुद्धिमत्तेला नावे ठेवता येणार नाहीत पक्षांना किचकट गोष्टी शिकवता येतात तर काही न शिकवता बाह्यसाधने वापरून शिकतात.
एखादी अळी वा फुलपाखरू खाल्ल्याने त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुन्हा त्या अळी वा फुलपाखराला तोंड लावत नाहीत. काही भडक रंग धोकादायक असतात हेही त्यांना अनुभवाने कळते. हेरिंग गल पक्षी सिंपले चोचीत घेऊन उंच जातात व त्या शिंपा दगडावर आपटतात तेव्हा त्यातून कालव खायला मिळतात हे त्यांना समजते.
जपानमधील काही शहरातील कावळे रस्त्यावरच्या रहदारीचे दिवे लाल असताना तिथे अक्रोड टाकतात.हिरवे दिवे लागले की रहदारी सुरु होऊन अक्रोड फुटतात.पुन्हा दिवे लाल झाले की रहदारी थांबल्यावर ते तुकडे गोळा करतात.यावरुन त्यांची निरीक्षणशक्ती लक्षात येते.
आफ्रिकन गिधाडे शहामृगाच्या अंड्यावर दगड टाकून अंडे फोडताना दिसले आहेत.लॅमरगीअर हाडे घेऊन उडतात व ती हाडे दगडावर आपटतात व फुटल्यावर आतील मगज खातात. पाम कोकॅटू झाडाच्या पोकळ बुंध्यावर बाहेरुन काठी आपटून आत किडाकीटक दडलेला आहे का याचा अंदाज घेतो.हायसिंथ मकाव कठीण कवचीच्या बिया तोडताना चोचीला इजा होऊ नये म्हणून ती बी पानात गुंडाळून तीवर दाब देतो.
गेल्या ३०० वर्षात किमान ८० प्रजाती नामशेष झाल्या आहेत.१८५० ते १९०० काळात ४५ प्रजाती नष्ट झाल्या तर १८६५ ते १९०७ दरम्यान २१ प्रजाती संपल्या. आता तर वर्षाला एक याप्रमाणे त्यांचा अस्त होत आहे.
" मारुती चितमपल्ली यांच्या निळावंती पुस्तकातील एक नोंद आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो. त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.
घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते. याशिवाय ते फुलांचे परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.
वैयक्तिक क्षेत्र जपा..!
गर्दीच्या रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना एकमेकाचे धक्के लागतात, पण त्याहीपेक्षा दाटीने उडताना पक्षी कधी एकमेकांवर आदळताना दिसत नाहीत. कारण गर्दीत असूनही प्रत्येकाने आपले वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते. त्या क्षेत्रात दुसरा पक्षी घुसखोरी करत नाही. कळपात उडत असताना प्रत्येकाला आपल्या पुढच्या, मागच्या, बाजूच्या पक्षाचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे कळपाने वेग वाढवला वा कमी केला तरी प्रत्येक जण त्यांच्याशी जुळवून घेतो, त्यामुळे तो कळप एकसंध उडतो हे जाणवते. आपल्या पुढच्या व आजूबाजूच्या पक्षातील गतिबदल अल्पांशात शेजाऱ्याला कळतो. त्यामुळेच मोठ्या कळपातील उडतानाची लहर १५ मिलीसेकंदापेक्षा कमी वेळा हाललेली दिसते.
पक्ष्यांच्या शरीरात दोन जैविक घड्याळ असतात. त्यांना बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात त्यानुसार ते स्थलांतराची अचूक वेळ निवडतात. अलीकडच्या संशोधनात पक्ष्यांच्या शरीरातील सुपर ऑक्साईडमुळे त्यांना पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दिसते असे कळले आहे. त्यांच्या डोळ्यात प्रकाशग्राही क्रिप्टोक्रोम नावाचे द्रव्य असते. ते जैविक होकायंत्राचे काम करते. सुपर ऑक्साईड त्याच्याशी अभिक्रिया घडवते. सुपर ऑक्साईड विषारी असते. शरीरातील त्याचे प्रमाण अल्प असते. पण तेवढे जैव होकायंत्राचे काम करून घेण्यासाठी पुरेशी असते.
गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणारा गुप्तहेर ००७ जेम्स बॉंड आपल्याला माहित आहे.इयान फ्लेमिंग या लेखकाचा तो मानसपुत्र.इयान फ्लेमिंग एकदा वेस्ट इंडिज बेटातील जमैका येथे गेले असता त्यांचे शेजारी 'जेम्स बाँड हे पक्षी शास्त्रज्ञ' होते त्यांनी ' फिल्ड गाईड ऑफ बर्ड्स ऑफ द वेस्ट इंडीज' हे पुस्तक लिहिले होते.इयान फ्लेमिंगच्या हातात ते पुस्तक पडल्यावर त्यातील पक्ष्यांकडे नाही तर त्या लेखकाच्या नावाने ते प्रभावित झाले व त्यांनी आपल्या माणसपुत्राचे नाव ठेवले.- "जेम्स बाँड"
जपानमधील बुलेट ट्रेनचा इंजिनियर राजी नकात्सु आहे.तो पक्षिनिरीक्षक आहे.त्या ज्ञानाचा उपयोग त्याने बुलेट ट्रेनचे डिझाइन बनवताना केला. खंड्या हवेतून म्हणजे कमी प्रतिकाराच्या माध्यमातून पाण्यात म्हणजे अधिक प्रतिकाराच्या माध्यमात प्रवेश करतो त्या वेळी ना पाणी उसळते ना आवाज. त्यासाठी त्याच्या चोचीला श्रेय द्यावे लागते. बुलेट ट्रेनला अशा तऱ्हेच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. नकात्सूने ट्रैनची रचना करताना तिची रचना खंड्यांच्या चोचीसारखी केली. ही ट्रेन कमी प्रतिकाराच्या उघड्या हवेतून अधिक प्रतिकाराच्या बोगद्यात प्रवेश करताना जो आवाज करण्याची शक्यता होती ती त्याने गाडीच्या नाकाची रचना खंड्यांच्या चोचीसारखी करून खूपच कमी केली.
गाडीने वीज ग्रहण करण्यासाठी काही डब्यांवर पेंटाग्राफ बसवावे लागतात.ते पेंटाग्राफसुध्दा खुप आवाज करत.तो कमी करण्यासाठी घुबडाच्या शरीररचनेचा अभ्यास उपयोगी पडला.घुबल आपल्या शेजारून उडत गेले तरी त्याच्या पंखांचा आवाज होत नाही.हे साध्य होते त्याच्या प्राथमिक पिसांच्या रचनेमुळे.त्यामुळे एकच मोठा हवेचा भोवरा तयार न होता असंख्य छोटे भोवरे तयार होऊन आवाज कमी होतो.त्याने पेंटोग्राफची रचना त्या धर्तीवर केल्याने त्यांचा भणभणाट कमी झाला. निसर्गात दडलेले विज्ञान उपयोगी पडते ते असे.
जाता जाता
हे पुस्तक म्हणजे निसर्ग,प्राणी,पक्षी व माणसांच्या एकोपाचा जीवन संदर्भ ग्रंथ आहे.जो ग्रंथ समस्त मानव समाजाने वाचलाच पाहीले.यातील नोंदी नाविन्यपूर्ण आहेत.पक्षी आपल्याशिवाय राहू शकतात.पण आपण राहू शकत नाही.'प्रवास' या पुस्तकातील माणसाचे व पक्षाचे संवेदनशील नाते दृढ करणारे आहे.आपल्या उत्क्रांतीमध्ये पक्षांची भुमिका महत्वाची आहे.
इतर नोंदी ज्या पक्षांबाबत अदभुत ज्ञान देतात.
'प्रवास'(अच्युत गोडबोले,आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन)पुस्तकातील ही नोंद विचार करायला लावणारी आहे.
कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो पक्षांचा स्वभाव आणि त्याची दिनचर्या यांचा अभ्यास केला तर ते ठराविकच पद्धतीने वागताना आपल्या लक्षात येते.उदा. ठराविक हंगामात काही पक्षी स्थलांतरित होतात.ठराविकच झाडावर आपलं घरटं बांधतात, अन्नाच्या वेळाही त्यांच्या साधारणपणे ठरलेल्या असतात. त्यांच्या या सवयीचा उपयोग आपल्याला दिशादर्शक म्हणून होऊ शकतो ही कल्पना खलाशांना आली.आणि त्यांनी त्यांचा अभ्यास चालू केला. दिशादर्शकाचा असा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पक्षी हे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात ही कल्पना खरोखरच भन्नाट होती मुख्य म्हणजे विश्वासार्ह होती. समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता. आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं. तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा. पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.पक्षांचे असे सर्वोत्तम स्थान आहे मानवी जीवनातील..!
'शरीर' (अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मनोविकास प्रकाशन) पुस्तकातील ह्या दोन नोंदी अभ्यासपूर्ण व वाचणीय आहेत.बेडूक कुठलीही हालचाल करणारी गोष्ट चटकन टिपू शकतो;अशी ती गोष्ट म्हणजे माशा किंवा किडे असतील तर त्यांच्यावर झडपही घालू शकतो; पण त्या बेडकासमोर मेलेली माशी असेल तर तो उपाशी असला तरीही तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही.आणि हे 'मेलेला प्राणी मी खात नाही' अशा स्वाभिमानामुळे नव्हे तर ती माशी काहीच हालचाल करत नसल्यामुळे ती त्याला जाणवत नाही म्हणून !
मुख्य चवी पाचच आहेत.गोड,आंबट,खारट,कडू आणि उमामी शेवटची मूळ चव ही उमामी आहे. हा मूळ जपानी भाषेतला शब्द जसाचा तसा वापरला गेलाय, कारण ही चव आता नव्यानंच वैज्ञानिकांना सापडली आहे.उमामी या शब्दाचा अर्थ स्वादिष्ट असा होतो.ग्लुटामेट या अमायनो ॲसिडची ही चव आहे.हिचं वैशिष्ट्य म्हणजे, या चवींच माणसाला चक्क व्यसन लागू शकतं!ही चव म्हणजेच चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या 'मोनोसोडियम ग्लुटामेट ( अजिनोमोटो ) रसायनामुळे येते.
या पुस्तकाची १०० पानांची पृष्ठ संख्या आहे.सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन यांचे प्रकाशन आहे.तर दिगंबर गाडगीळ हे लेखक आहेत.
विजय गायकवाड