"हे पेन मी विकत घेतले,पण हे चालत नाही."
"त्याला मी काय करणार? "अहो,तुम्ही मालक आहात ना या दुकानाचे?मग हे पेन चालत नाही तर ती तुमची जबाबदारी नाही?"
"पेनबाबत कोणतीही गॅरंटी नाही हे मी तुम्हाला कालच सांगितले होते."
"ते बरोबर आहे हो,पण म्हणून काय एकाच दिवसात…?"
"त्याला इलाज नाही. कारण पेन ही अशीच असतात."
"काय राव... मग कशाला विकताय असली पेनं?"
ज्या काळामध्ये पहिल्यांदा पेन ही वस्तू बाजारात आली त्यावेळेस अशीच परिस्थिती होती.पेनं विक्रेत्याचे आणि ग्राहकाचे असेच संभाषण होत असे.अशाच एका दुकानामध्ये जॉर्ज नोकरीला होता. तो होता हिशेब वगैरे लिहायला.पण मधून मधून त्याला गिन्हाईकही बघावे लागे.कधी कधी तर गिन्हाईक अगदी तावातावाने येत असे.अशा वेळेस जॉर्ज ते पेन त्याला काही प्रमाणात दुरुस्त करून देत असे.खरं तर जॉर्जता हा छंद जडला होता. तो आपल्या फावल्या वेळेत खराब झालेली पेनं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असे. हे करता करता त्याला त्यातील काही त्रुटी आढळल्याही होत्या.त्यामुळे त्याला ही पेनं दुरुस्त करता येवू लागली होती. जॉर्जच्या या छंदामुळे लोकदेखील त्या दुकानातूनच पेन खरेदी करू लागले होते. कारण इतरत्र पेन खराब झाल्यास दुरुस्त करण्याची कोणतीही सोय नव्हती.
बघता बघता जॉर्जच्या मालकाचे दुकानही चांगले चालू लागले.आणि जॉर्जने पेन दुरुस्त करण्यामध्ये प्रावीणाही मिळवले.आता जॉर्जला पेनमध्ये कोणकोणत्या त्रुटी राहिल्या आहेत,हे पूर्णपणे कळले होते त्यामुळे त्याच्या मनामध्ये असे आले की आपण जाऊन पेन निर्माण करणाऱ्या कंपनीलाच ही गोष्ट सांगायची आणि जर त्यांनी मान्य केले तर त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरीही मागायची.जॉर्ज या गोष्टीवर विचार करू लागला आणि एके दिवशी त्याच्या मनामध्ये एक वेगळाच विचार आला. आपल्याला आढळलेल्या सर्वं त्रुटी पेन निर्मात्यांना सांगण्याऐवजी आपणच जर उत्तम दर्जाचे पेन तयार करू शकलो तर ? या एका कल्पनेने जॉर्जची झोपच उडाली.आपण एक उत्तम दर्जाचे पेन निर्माण करू शकू हा त्याच्याजवळ विश्वास होता.पण त्यासाठी लागणारे भांडवल नव्हते.
पण जॉर्जने ठरविले की,आपण ही जोखीम घ्यायची.तो त्या दृष्टीने तयारीला लागला आणि स्वतःच्या आडनावाची 'पार्कर' कंपनी त्याने काढली.बघता बघता 'पार्कर' पेन जगप्रसिद्ध झाले आणि जॉर्ज पार्कर नावारूपाला आला.
काय,एका सामान्य माणसाची ही गगनभरारी अचंबित करून टाकते ना? अहो,ही भरारी घेण्याची क्षमता तुमच्या-आमच्यातही आहे बरं का.पण आपण खरंच गांभीर्याने त्याकडे पाहत नाही.आता या जॉर्ज पार्करकडे असे कोणते गुण होते असे तुम्हाला वाटते?पहिली गोष्ट म्हणजे केवळ कामापुरते काम न करता अधिक काहीतरी करण्याची वृत्ती आणि मानसिकता असणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या वृत्तीलाच इंग्रजीमध्ये Initiative असे म्हणतात. 'इनीशिएटिव्ह' म्हणजे स्वत:हून स्वयंस्फूर्तीतून एखादी गोष्ट करण्याची वृत्ती.ही वृत्ती जॉर्जमध्ये होती.म्हणून त्याला कोणीही न सांगता त्याने आपण पेन दुरुस्त करू शकू काय,याचा विचार केला.जॉर्जकडे दुसरा महत्त्वाचा गुण होता आणि तो म्हणजे लोकांना काहीतरी उत्तम द्यायचे. अलीकडे आपली मानसिकता बदलत चालली आहे.म्हणूनच लोक पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात.त्यामध्ये वेळप्रसंगी दुसऱ्याला फसवावे लागले तरी चालेल अशी वृत्ती ठेवतात. पण अशाप्रकारची वृत्ती काही कामाची नाही. कारण अशा वृत्तीचे लोक फार काळ टिकू शकत नाहीत.म्हणून जे लोक स्वतःच्या कामापासून ते आपण दुसऱ्याला देत असलेल्या गोष्टीपर्यंत दर्जाचा विचार करतात.त्यांना कधीही अपयश येत नाही.
पार्करमध्ये असलेला तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जोखीम घेण्याची वृत्ती.या पुस्तकामध्ये हा गुण अनेक ध्येयवेड्यांमध्ये आपल्याला आढळून येईल.जर जॉर्जने त्याचा फॉर्म्युला एखाद्या पेन विक्रेत्याला विकला असता तर कदाचित त्याला त्यासाठी पैसेही मिळाले असते आणि त्या कंपनीमध्ये नोकरीही.पण जॉर्जने तसे केले नाही.कारण त्याला त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये विश्वास होता आणि त्यामुळेच आपण आपल्याजवळ काही नसतानाही हे सुधारित पेन स्वतःच तयार करूया,अशी जोखीम तो घेऊ शकला.
अर्थात जॉर्जमधील गुण आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला काही पेन दुरुस्त करण्याचे तंत्रच अवगत व्हायला पाहिजे असे नाही.आपण जे काम करतो त्यापेक्षा अधिक आणि वेगळे आपण करू शकतो काय,हे शोधले पाहिजे. एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचे काम संपल्यावर जर समजा,
ॲक्युप्रेशरही पद्धती शिकायची ठरविली आणि जर त्यामध्ये तो तज्ज्ञ झाला तर लोक त्याच्याकडे आपोआप येऊ लागतील.
अर्थात हे एक साधे उदाहरण मी तुम्हाला दिले. जर तुमच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असेल तर निश्चितपणे तुम्हाला काहीतरी शोधून काढता येऊ शकेल.त्याचप्रमाणे जॉर्जमध्ये असणारा दर्जादेखील तुम्ही तुमच्या कामामध्ये आणू शकता.
भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदीप पवार