या अनंत विश्वात विसाव्या शतकात पृथ्वीवर राहणारी मानवजात ही एकच बुद्धिमान जमात अस्तित्वात आहे का?
रात्रीच्या स्वच्छ आणि निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी आपल्याला किमान ४५०० तारे दिसतात असे निदान खगोलशास्त्रज्ञ तरी सांगतात.छोट्याशा वेधशाळेतील दुर्बिणीतून वीस लाख तारे दिसू शकतात.आधुनिक वेधशाळेतील रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या (आरशाच्या दुर्बिणीच्या सहाय्याने आणखी कोट्यावधी तारे आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात.
पण अनंत विश्वाचा विचार करता आपली ग्रहमाला हा अगदी नगण्य भाग आहे.आकाशात तारे सारख्याच दाटीवाटीने पसरलेले नाहीत. आकाशाच्या विशिष्ट भागात त्यांनी बरीच गर्दी केलेली आढळते.या ताऱ्यांच्या दाटीवाटीमुळे आकाशाच्या मध्यभागी एक लांबचलांब व थोडा रूंद असा पांढुरका पट्टा तयार झाला आहे. त्याचा आकार लंबवर्तुळाकार चकतीसारखा आहे.यालाच म्हणतात आकाशगंगा !
आपली ग्रहमाला अशा आकाशगंगेच्या कडेला जे तुरळक तारे दिसतात त्यातल्या एका ताऱ्याभोवती म्हणजे सूर्याभोवती आहे
या ताऱ्यांमधील अंतर मोजायला मैल हे परिमाण अगदीच तोकडे पडते.त्यासाठी प्रकाशवर्ष, म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर कापील तितके मैल (प्रकाशवर्ष १८६००० X ६० X ६० X २४X३६५ मैल) हेच परिमाण वापरावे लागते. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या सहाय्याने ज्या काही आकाशगंगा दिसतात,त्यांची त्रिज्याच १५ लाख प्रकाशवर्ष असेल आणि इलेक्ट्रॉनिक टेलिस्कोपने आपण जितके तारे पाहू शकतो तो आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यातही तो येऊ शकत नाही.अर्थातच हे सर्व आकडे फक्त आजतागायतच्या झालेल्या संशोधनाला अनुलक्षून आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
खगोलशास्त्रज्ञ हार्लो शेपली यांच्या मते आपल्या दुर्बिणीच्या टप्प्यात साधारण १० (२०) (एक वर वीस शून्ये) इतके तारे येतात.समजा की हजारात एखाद्याच ताऱ्याभोवती आपल्यासारखी ग्रहमाला आहे आणि अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एकाच ताऱ्यावर जीवन निर्मितीस आवश्यक अशी परिस्थिती आहे.तरी अशा ताऱ्यांची संख्या येईल १० (१४) (एक वर चौदा शुन्ये)
अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एखाद्याच ताऱ्यावर जीवनास आवश्यक अशी परिस्थिती खरोखरच निर्माण झाली असेल असे समजले तरी अशा ताऱ्यांची संख्या असेल १०(११) (एक वर आकरा शुन्ये)आणि यापैकी हजारात एका ताऱ्यावर जीवसृष्टीचे अस्तित्व गृहीत धरले तरी १० कोटी इतक्या ताऱ्यांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता निर्माण होते.हा आकडा थक्क करणारा नाही ?
प्रोफेसर डॉ.विली ली दुसऱ्या तऱ्हेने विचार करतात.
त्यांच्या मते आपल्या आकाशगंगेतच साधारणतः३० अब्ज तारे आहेत आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते त्यापैकी १८ अब्ज ताऱ्यांना तरी आपल्यासारख्या ग्रहमाला आहेत. समजा शंभरात एखाद्या ग्रहमालेतील एकाच ग्रहावर जीवन निर्माण होण्यासारखी परिस्थिती अस्तित्वात आहे असे समजले आणि पुन्हा त्यापैकी शंभरात एकाच ग्रहावर जीवसृष्टी खरोखरच निर्माण झाली असेल तरी अशा ग्रहांची संख्या होईल १८ लाख,हा आकडा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून मानवसदृश प्राणी पुन्हा शंभरात एकाच ग्रहावर निर्माण झाला असेल असे गृहीत धरले तरी फक्त आपल्याच आकाशगंगेत १८००० ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता निर्माण होते.
पण शेवटी ही सर्व आकडेवारी तशी फसवीच ठरते.
दुर्बिणीच्या तंत्रात जसजशी सुधारणा होते आहे तसतसा जो मूळ आकडा धरून आपण गणिते करीत आहोत तो आकडाच बदलतो आहे.आता खगोलशास्त्रज्ञ म्हणायला लागलेत की आकाशगंगेत ३० अब्ज नव्हे तर १०० अब्ज तारे आहेत म्हणून !
तेव्हा या आकड्यांच्या जंजाळात फसण्यापेक्षा अमेरिकेच्या अणुशक्ती कमिशनच्या एम्स संशोधन केंद्रातील बायोटेक्निकल विभागाचे प्रमुख डॉ.जॉन बिलिंगहॅम म्हणतात ते खरे समजायला हरकत नाही.ते म्हणतात,
'पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे प्रथम निर्माण झालेले किती तरी ग्रह आहेत.त्यांच्यापैकी ज्या ग्रहांवर बुद्धिमान जीव निर्माण झाले असतील,त्यांच्या संस्कृतीही त्याच प्रमाणात आपल्यापेक्षा प्रगत असेल ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही.पाषाण युगातील मानवापेक्षा आपण जितके पुढारलेले आहोत तेवढ्याच त्या संस्कृती आज आपल्यापुढे असतील. '
जीवन अस्तित्वात असण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आवश्यक मानतो ? त्यासाठी पृथ्वीसदृश वातावरण तसेच वनस्पती जीवन, प्राणी जीवन आवश्यक आहे असे गृहीत धरूनच आपण सर्व विचार करतो.पण पृथ्वीसारख्या ग्रहांवरच जीवन शक्य आहे असे ठामपणे म्हणायला कुठे काही आधार कधी तरी आपल्याला सापडला आहे का? मुळीच नाही.
इतकेच काय तर प्राणवायू आणि पाणी यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे हे म्हणणे सुद्धा चूक आहे.
प्राणवायूची आवश्यकता नसलेले,एवढेच नव्हे तर थोडा फार प्राणवायू असलाच तर ज्यांना तो विषवत वाटेल असे जीवजंतू आपल्या पृथ्वीवरच अस्तित्वात आहेत.
खूप उष्ण नाही,खूप थंड नाही,भरपूर पाणी आणि प्राणवायू यांनी समृद्ध अशी पृथ्वी म्हणजे जीवन निर्मितीसाठी आदर्श असा ग्रह आपण मानतो. शयाला तसा काही पुरावा आहे काय? आणि तुलना कोणत्या ग्रहांशी करणार? निरनिराळ्या तऱ्हेचे वीस लाख जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असा अंदाज असला तरी साधारण बारा लाखांहून अधिक तर आपल्या वैज्ञानिकांना ठाऊकच नाहीत.त्यापैकी हजारो जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात असायलाच नको होते,जगायलाच नको होते.खरोखर जीवनासाठी आवश्यक अशा नक्की गोष्टी कोणत्या आहेत याबाबतचे प्रचलित सिद्धान्त पुन्हा तपासून बघणेच आवश्यक आहे.
रेडिओ अँक्टिव्ह पाण्यात सूक्ष्म जंतूसुद्धा जिवंत राहणे शक्य नाही असे कोणालाही वाटेल.पण अणुभट्टयांच्या आसपासच्या अशा प्राणघातक पाण्यात फोफावणारे जीवजंतूही आहेत.
डॉ.सिगेल या शास्त्रज्ञाने 'गुरू' या ग्रहासारखे वातावरण प्रयोगशाळेत तयार करून त्यात जंतू व छोटे कीडे वाढवले.अमोनिया,मिथेन, हायड्रोजनसुद्धा त्यांना मारू शकले नाहीत.
हिन्टन आणि ब्लूम या कीटक शास्त्रज्ञांनी चिलटासारख्या प्राण्यांना १००० सेंटिग्रेड तपमानावर कित्येक तास ठेवून वाळवले व नंतर द्रवरूप हेलियममध्ये बुडवले.अति गरम वातावरणातून अति शीत हेलियममध्ये बुडवल्यावर व नंतर पुन्हा नेहमीच्या वातावरणात सोडल्यावरसुद्धा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.ज्वालामुखीत राहणारे,
दगड खाणारे,लोखंड निर्माण करणारे जीवजंतूही आपल्याला माहीत आहेत.
आपण पृथ्वीवरचे वातावरण जीवन निर्मितीसाठी योग्य म्हणत असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर अगदी वेगळे वातावरण असेल आणि तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर तेथील बुद्धिमान प्राण्यांनाही असेच वाटत असेल की त्यांच्या ग्रहावरचे हवामानच जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहे तेव्हा या अथांग विश्वात आपणच तेवढे बुद्धिमान प्राणी अस्तित्वात आहोत हे म्हणणे अगदीच निरर्थक आहे.अशीही शक्यता आहे की भविष्यकाळात अंतराळात अनेक तऱ्हेचे जीवन अस्तित्वात आहे हे आपल्या भावी पिढ्या बघतील.
आपण ते बघायला नसलो तरीही त्या पिढ्यांना मात्र आपली मानव-जमात हीच सर्वांत जुनी व बुद्धिमान अशी जमात आहे ही कल्पना बाजूला ठेवावीच लागेल.
जुने जीवजंतू आणि प्राणी नष्ट होणे व त्यांची जागा नवीन तऱ्हेच्या जीवजंतू आणि प्राण्यांनी घेणे ही क्रिया अखंडपणे कोट्यावधी वर्षे चालू आहे व पुढेही चालू राहणार आहे.जगात सापडणाऱ्या निरनिराळ्या तऱ्हेच्या दगडांचे वेगवेगळ्या तऱ्हानी संशोधन केल्यावर पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला असे शास्त्रज्ञ म्हणतात.पण शास्त्र एवढेच जाणते की २० लाख वर्षांपूर्वी प्रथम मानवसदृश प्राणी अस्तित्वात आला.
त्यापैकी आपल्याला साधारणतःसात एक हजार वर्षांचा इतिहास थोडा फार कळला आहे.त्यासाठी सुद्धा किती श्रम आणि कष्ट घ्यावे लागले आहेत.तरीही मधली कित्येक शतके अशी आहेत.की त्या काळात खरोखर काय घडले ते आपल्याला माहीत नाही.अज्ञात विश्वाच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासाशी तुलना करता मानवाच्या सात हजार वर्षांच्या इतिहासाला खरोखर किती किंमत आहे?
विसाव्या शतकात प्रगतीच्या ज्या पल्ल्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत तिथे पोहोचायला चार लाख वर्षे घेऊन पुन्हा या विश्वात आमच्यासारखे बुद्धिमान आम्हीच,असा गर्व आपण किती करावा?
कशावरून दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहांवर आपल्याला स्पर्धक नसतील? कशावरून काही ग्रहांवर प्रगतीला जास्त पोषक परिस्थिती निर्माण झाली नसेल की ज्यामुळे तेथील जमाती इतक्या प्रगत अवस्थेला पोहोचल्या असतील की आजसुद्धा आपणच त्यांच्यापुढे मागासलेले
ठरू ?
शेकडो पिढ्या म्हणत होत्या की पृथ्वी सपाट आहे म्हणून,सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे हजारो वर्षे विद्वान लोक आपल्याला सांगत होते.हा अनुभव असूनही आपण म्हणावे की आपल्या आकाशगंगेच्या मध्यापासून तीस हजार प्रकाशवर्षे लांब कडेला असलेला आपला पृथ्वी हा नगण्य ग्रहच सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू आहे म्हणून ?
विश्वाचा विचार करता पृथ्वी अगदीच क:पदार्थ आहे हे लक्षात घेऊन अज्ञात अंतराळाचे संशोधन करण्याची वेळ आज आली आहे.आपल्या उज्ज्वल भविष्यकाळातील संधी अंतराळ संशोधनातच मिळतील असे आपल्या 'देवांनी' नाहीतरी सांगून ठेवले आहेच.या भविष्यकाळात नजर टाकेपर्यंत प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे आपला भूतकाळ तपासण्याचे धैर्य आपल्याला मिळणार नाही.
देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर !
लेखक - बाळ भागवत
मेहता पब्लिशिंग हाऊस