नमस्कार मी विजय गायकवाड राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर ( कोल्हापूर ) जवळच असलेल्या टोप या गावात मी राहतो.पोट भरण्यासाठी जे काय सर्व संघर्ष करावे लागतात.ते मी करतोच कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करत असताना माझीही दमछाक होते,वैचारिक संघर्ष,न पटणारे विचार या धावत्या जगात मी ही अस्वस्थ होतो.मेनन पिस्टन रिंग टोप संभापूर या कंपनीमध्ये जनरल कास्टिंग (फौन्ड्री) या ठिकाणी मी काम करत आहे.दिवसभर शारीरिक कष्ट करतो,व सायंकाळी माझ्या घरट्याकडे म्हणजेच घराकडे परत येतो.कंपनी ते घर या सरळ मार्गावरील मी सरळ प्रवास करणारा माणूस.. माझ्याही जीवनात चढउतार हे येतात व जातात. या जगण्यावर या जगण्यावर मी शतदा प्रेम करतो. हा जीवनातला प्रवास करत असताना एक दिवस आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. ती मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही.
आयुष्यात माझी पुस्तकाशी झालेली सर्वप्रथम भेट तो क्षण माझ्यासाठी जिवंत व अविस्मरणीय होता. स्टीफन हॉकिंग साहेबांनी फार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं होतं की हे सगळं जग आपण फुकट वापरत आहोत या जगाला जर आपल्याला काय परत फुकट द्यायचं असेल तर असं काहीतरी द्या की ज्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटेल की खरंच आपण काहीतरी या जगाला दिलेलं आहे. कारण अनेकांनी आपल्याला बरचं काही दिलेलं आहे.त्यामुळे आपणही असंच काहीतरी दुसऱ्यांना द्यावं हे ओघाने आलेच.
'तुम्हाला कोणीही बघत नसताना तुम्ही जे असता तेच तुम्ही असता.' हे पुस्तकातील वाक्य मला जगायचं कसं हे सांगून जातं.परिस्थिती बदलल्यानंतर माणसाला बदलण्यास फार वेळ लागतो व त्रासही होतो.पण पुस्तके माझ्या जीवनात अंधकार नष्ट करून सदैव प्रकाशाची योजना करणारा चिरंतन असा प्रकाशाचा ठेवा आहे.वार ( हवा ) जेव्हा आपल्याला अंगाला जाणवत नसतं त्यावेळेला वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे हे आपण सहजपणे सांगू शकत नाही,पण त्याचवेळी जर आपण झाडाचा शेंडा पाहिला तर आपल्याला नक्कीच कळतं की वाऱ्याची दिशा कोणती आहे.पुस्तके मला परिस्थिती बदलण्या अगोदर बदलण्याचे बळ देतात.
'ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत..!'
हे जिवंतत्व मी पुस्तकातूनच शिकलो आहे.
'पुस्तके ही जमिनीवर असतात पण आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ती आपणास देतात.'
पुस्तक वाचल्यामुळे माझ्यामधील 'संयम' वाढीला लागला आहे.जे जसं आहे तसं ते स्वीकारायचं हे सत्य पुस्तक मला नेहमी सांगतात.शरीराच्या वाढीसाठी,विकासासाठी अन्न हे जसं महत्त्वपूर्ण आहे,त्याचबरोबर माणसाचे जीवन सुलभ होण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा ही जशी मूलभूत गरज आहे,तसंच पुस्तक वाचन ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. पुस्तकाच्या वाचनामुळे माझं अविकसित जीवन विकसित झालं,विस्तृत झालं व माझं मर्यादित जीवन हे अमर्यादित झालं.मानवी जीवनातील अवघडातील अवघड प्रश्नाची उत्तरे सरळ व सोप्या भाषेमध्ये मला पुस्तकात सापडतात.त्यामुळे मी नेहमीच निवांत व बिनधास्त असतो.कारण पुस्तके माझ्यासोबत असतात.मी दररोज न चुकता वाचन करतो. पुस्तक वाचन करणे आता माझा श्वास बनलेला आहे.
पुस्तक वाचन करणे म्हणजे माझे एक वेळचं जेवण आहे.
कोल्हापूरातील वाचणालयामध्ये सभासद झालो.बरीत पुस्तके वाचलीत.महिण्याकाठी मला पगारापोटी ९ ते १० हजार पगार मिळतो.
त्यातील महिण्याला किमान १ हजार ते पंधराशे रुपयाची पुस्तके विकत घेवून वाचतो.
'पुस्तक विकत घेणारे आणि वाचणारे लोक कोण असतात.असं तुम्हाला वाटतं ते गरीब नक्कीच नसतात."
कधी कधी पुस्तके वाचायला कमी पडलीत तर आमचे मित्र,मार्गदर्शक मला हवी ती पुस्तके आनंदाने पाठवितात.
त्यामध्ये सुनिल घायाळ,माधव गव्हाणे,विष्णु गाडेकर पाटील,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सुधीर सरवदे, विनायक पाटील,शितल खाडे,विश्वास खाडे,तात्या गाडेकर.सतिश खाडे,दादासाहेब ताजणे,राजेश कान्हेकर,संतोष पांचाळ,
सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,
निखिल इंगळकर व इतर मित्रमंडळी आवर्जुन पुस्तके पाठवतात.त्याच्या ऋणात कायम राहणे मला मनापासून आवडते.
चांगले वाचणे म्हणजे खरी पुस्तके खऱ्या
भावबळाने वाचणे.ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने
आणि संयमानेलिहिले जातात,तितक्याच हेतुपुरस्सरतेनेआणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत.हेन्री डेव्हिड थोरोने सांगितलेला नियम मी न मोडता पाळतो.त्यामुळे पुस्तके मला 'आपला' म्हणतात.माझ्याकडे सध्या १४८ पुस्तके आहेत.ती ४०७१५ रुपयाची आहेत.
स्वतःच स्वतःसाठी असणे,फार फार महत्त्वाचे आहे.मी जर स्वतःसाठीच नसेन,तर माझ्यासाठी कोण असणार आहे ? " हिलील यांच हे जीवनतत्व मला पुस्तकांनीच शिकवले आहे.
इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे, इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,दगड - धोंडे-नंदा खरे,वारूळ पुराण-नंदा खरे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,पाश्चात्य राजकीय विचारवंत,
शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स,सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस् अशाच अनुषंगाने मी पुस्तक वाचीत आहे.व शेवटपर्यंत वाचीत राहीन.
१९९६ साली मी शाळा सोडली.(मी ९ पास आहे.)अजूनही मला शाळेने सोडलेलं नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी शाळेशी व शाळा माझ्याशी जोडलेले आहोत. पुस्तकांनी मला जोडून ठेवलेले आहे.
तुमच्या वेदनेची दुःखाची जर तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही माणूस आहात तशीच दुसऱ्याच्या वेदनेची दुःखाची तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही जिवंत आहात. ही भावना संवेदना मला पुस्तकांनी दिली आहे.
जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन या ग्रंथामध्ये पुस्तकांविषयी अनेक महत्त्वपूर्ण नोंदी केलेल्या आहेत.
'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या;
अलेक्झांडरचं स्वप्न तुर्कस्थानचा खलिफा उमर याच्यामुळे उद्ध्वस्त झालं असलं, तरी २००२ साली तिथल्या सरकारने त्याचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं ठरवलं आणि पुन्हा बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया या नावाचं एक मोठं ग्रंथालय उभं केलं.हे ग्रंथालय अतिशय भव्य असं असून एकूण १० लाखांवर पुस्तकं,सव्वा दोन लाख चौरस फुटांचा वाचन कक्ष,३ सभागृह, १ तारांगण,४ संग्रहालयं,४ कलादालनं,उपाहारगृहं, प्रदर्शनं आणि वेगवेगळ्या विषयांनुसार केलेले वेगवेगळे पुस्तकांसाठीचे असंख्य कक्ष असा अवाढव्य पसारा या ग्रंथालयात आहे.या ग्रंथालयात जाताना बरोबर गाईड घेऊन जाणं आवश्यक असून आत जाण्यासाठी प्रवेश तिकीट खरेदी करावं लागतं.अरेबिक, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषेतली पुस्तकं जास्त प्रमाणात असून शिवाय जगातलं कुठल्याही देशातलं कुठलंही पुस्तक इथे तुम्हाला मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी २ हजार वाचक बसून निवांत वाचन करू शकतील अशी
सुरेख रचना या ग्रंथालयात केली आहे.एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचा सुखद अनुभव या ग्रंथालयात गेल्यावर मिळतो.पुरातन काळात जिथे अलेक्झांड्रिया विद्यापीठ होतं,त्याच जागेवर हे ग्रंथालय उभारण्यात आलं आहे. या ग्रंथालयाच्या उभारणीत इजिप्शियन सरकार, फ्रेंच सरकार आणि युनेस्कोनेही आर्थिक मदत केली आहे.या सगळ्यांच्या मदतीने भव्य असं 'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' हे ग्रंथालय आज दिमाखात उभं आहे.या ग्रंथालयात ८० लाख पुस्तकं ठेवण्याची सोय करून ठेवलेली आहे. १९४ देशांमधली पुस्तकं इथे बघायला मिळतात. त्या ग्रंथालयात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचीही पुस्तकं उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचं संगणकीकरण झालं असून इथे डिजिटल लायब्ररीचा विभाग देखील आहे. समजा,एखादं दुर्मिळ पुस्तक आपल्याला हवं असेल,तर अवघ्या पाच मिनिटांत तिथे असलेल्या प्रिंटरवरून ते हवं असलेलं पुस्तक मूळ पुस्तकासारखंच छापून त्या वाचकाला दिलं जातं हे विशेष!
"बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' या ग्रंथालयात अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग असून हजारो पुस्तकं ब्रेल लिपीत उपलब्ध आहेत. ऑडिओ स्वरूपातली पुस्तकं वाचण्यासाठी खास विभाग आणि बसायला आरामदायी खुर्च्या,हेडफोन्स अशी व्यवस्था वाचकासाठी केलेली आहे.एकदा वाचक ग्रंथालयात गेला,की तो सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत कितीही वेळ आतमध्ये व्यतीत करू शकतो.या ग्रंथालयाची संपूर्ण इमारत वातानुकूलित असून वाचकाला टिपण काढण्यासाठी वही आणि पेन मोफत उपलब्ध
केले जातात.संगणकावर हव्या असलेल्या पुस्तकाची माहिती टाकताच,तिथले स्वयंसेवक हवी तेवढी पुस्तकं वाचकाला त्याच्या टेबलवर आणून देतात.'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' सारखी ग्रंथालयं संपूर्ण जगभर निर्माण झाली, तर खरंच काय बहार होईल ?
ग्रंथालयांची जशी उभारणी झाली पाहिजे,तसंच प्रत्येक ग्रंथाची बांधणी चांगली,उत्तम दर्जाची होणं आवश्यक असतं.नाही तर पानं निखळतात आणि ग्रंथ नष्ट होतो.आजच्या भाषेत पुस्तकाचं बाइंडिंग नीट आणि पक्कं असायला हवं.पूर्वी कापडामध्ये घट्ट गुंडाळून ग्रंथ व्यवस्थित ठेवत. ते इतके घट्ट बांधलेले असत की,पाण्यात पडले तरी आतला कागद भिजत नसे.ग्रंथांच्या पानांना कसर लागू नये म्हणून त्यात सापाची कातण किंवा लिंबाची पाने ठेवत.म्हणून प्राचीन ग्रंथ हजारो वर्षे टिकले.थायलंडची राजधानी असलेलं बँकॉक हे शहर जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या शहराचं वैशिष्ट्य असं की,या शहरात मोजकीच पण पुस्तकांची इतकी भव्यं दुकानं आहेत,की इथे भेट देणारा पुस्तकप्रेमी चकित होतो.इथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची मांडणी आणि सजावट इतक्या आकर्षक पद्धतीने केलेली आहे,की वाचकाला पुस्तका विकत घेण्याचा मोह व्हावा.पुस्तक शोधताना प्रत्येक पुस्तकाला खालून स्प्रिंग लावलेल असल्यामुळे तिथलं बटण दाबताच हवं ते पुस्तक समोर येतं.त्या पुस्तकाला अनेक वाचकांनी हाताळू नये,त्याचं नवेपण अबाधित राहावं यासाठी ती व्यवस्था केली असून वाचक पुस्तक विकत घेण्यासाठी प्रवृत्त कसा होईल याची काळजी इथल्या दुकानांनी खूप कल्पकतेनं घेतली आहे.ही नाविन्यपूर्ण माहिती ऐकून मी थक्क झालो.
ज्या कुणाचं आयुष्य अतिशय साधं आहे,त्यांना समाधान नक्कीच मिळतं.आनंद मिळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठीही साधेपणा
अत्यंतिक महत्वाचा आहे. हे दलाई लामा यांचे वाक्य जगण्याला उर्मी देऊन जातं.
कारण आपण सर्वजण सुखी व समाधानी राहू शकतो.या धकाधकीच्या व धावत्या जगामध्ये,
आयुष्यामध्ये एवढाच एक शांततेचा विरंगुळा असेल तो ही स्वतःसाठी..
शेवटी जाता जाता..
प्रख्यात कवी गुलजार यांच्या एका सुरेख कवितेचा अनुवाद विजय पाडळकर यांनी केला, त्यात पुस्तकाशी हितगुज करताना गुलजार म्हणतात :
मित्राशिवाय सारा दिवस कसाबसा ढकलला स्वतःशीच अनोळखी असा
एकाकी,उदास
समुद्रकिनाऱ्यावर दिवस विझवून
मी परत इथेच आलो
निर्मनुष्य रस्त्यावरील रिकाम्या घरात
दरवाजा उघडताच
टेबलावर ठेवलेलं पुस्तक
हलकेच पान फडफडवीत म्हणालं
उशीर केलास,मित्रा!
"दररोज मी पुस्तके वाचतो..
आणि स्वतःला' च शिकवतो."
पुस्तकातील हे वाक्य मला बरचं काही शिकवून जातं.
"सर्वियन कादंबरीकार मिलोराद" यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात"
जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही"
पुस्तकांचे,लेखकांचे,प्रकाशकांचे पुस्तकासोबत जोडले गेलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद..
हा लेख मासिक 'शिक्षण यात्री' मध्ये जानेवारी - फेब्रुवारी या जोड अंकामध्ये प्रकाशित केल्याबद्दल संपादकिय मंडळ व ह्या अंकांच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..
विजय कृष्णात गायकवाड