नमस्कार मी विजय गायकवाड
पोट भरण्यासाठी जे काय सर्व संघर्ष करावे लागतात. ते मी करतोच कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करत असताना माझी ही दमछाक होते,वैचारिक संघर्ष,न पटणारे विचार या धावत्या जगात मी ही अस्वस्थ होतो. हे लिहीत असताना मेनन पिस्टन रिंग टोप संभापूर या कंपनीमध्ये जनरल कास्टिंग (फौन्ड्री) या ठिकाणी काम करत आहे. दिवसभर शारीरिक कष्ट करतो,व सायंकाळी माझ्या घरट्याकडे म्हणजेच घराकडे परत येतो. कंपनी ते घर या सरळ मार्गावरील मी सरळ प्रवास करणारा माणूस.. माझ्याही जीवनात चढउतार हे येतात व जातात. या जगण्यावर व या जन्मावर मी शतदा प्रेम करतो. हा जीवनातला प्रवास करत असताना एक दिवस आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. ती मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही.
आयुष्यात माझी पुस्तकाशी झालेली सर्वप्रथम भेट तो क्षण माझ्यासाठी जिवंत व अविस्मरणीय होता.
स्टीफन हॉकिंग साहेबांनी फार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं होतं की हे सगळं जग आपण फुकट वापरत आहोत या जगाला जर आपल्याला काय परत फुकट द्यायचं असेल तर असं काहीतरी द्या की ज्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटेल की खरंच आपण काहीतरी या जगाला दिलेलं आहे.
कारण अनेकांनी आपल्याला बरचं काही दिलेलं आहे.त्यामुळे आपणही असंच काहीतरी दुसऱ्यांना द्यावं हे ओघाने आलेच.
'तुम्हाला कोणीही बघत नसताना तुम्ही जे असता तेच तुम्ही असता.' हे पुस्तकातील वाक्य मला जगायचं कसं हे सांगून जातं.परिस्थिती बदलल्यानंतर माणसाला बदलण्यास फार वेळ लागतो व त्रासही होतो. पण पुस्तके माझ्या जीवनात अंधकार नष्ट करून सदैव प्रकाशाची योजना करणारा चिरंतन असा प्रकाशाचा ठेवा आहे. वार (हवा) जेव्हा आपल्याला अंगाला जाणवत नसतं त्यावेळेला वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे हे आपण सहजपणे सांगू शकत नाही,पण त्याचवेळी जर आपण झाडाचा शेंडा पाहिला तर आपल्याला नक्कीच कळतं की वाऱ्याची दिशा कोणती आहे. पुस्तके मला परिस्थिती बदलण्या अगोदर बदलण्याचे बळ देतात.
'ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत..!'
हे जिवंतत्व मी पुस्तकातूनच शिकलो आहे.
'पुस्तके ही जमिनीवर असतात पण आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ती आपणास देतात.'
पुस्तक वाचल्यामुळे माझ्यामधील 'संयम' वाढीला लागला आहे. जे जसं आहे तसं ते स्वीकारायचं हे सत्य पुस्तक मला नेहमी सांगतात. शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी अन्न हे जसं महत्त्वपूर्ण आहे,त्याचबरोबर माणसाचे जीवन सुलभ होण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा ही जशी मूलभूत गरज आहे,तसंच पुस्तक वाचन ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. पुस्तकाच्या वाचनामुळे माझं अविकसित जीवन विकसित झालं,विस्तृत झालं व माझं मर्यादित जीवन हे अमर्यादित झालं. मानवी जीवनातील अवघडातील अवघड प्रश्नाची उत्तरे सरळ व सोप्या भाषेमध्ये मला पुस्तकात सापडतात.त्यामुळे मी नेहमीच निवांत व बिनधास्त असतो.कारण पुस्तके माझ्यासोबत असतात. मी दररोज न चुकता वाचन करतो. पुस्तक वाचन करणे आता माझा श्वास बनलेला आहे.
ज्या कुणाचं आयुष्य अतिशय साधं आहे,त्यांना समाधान नक्कीच मिळतं.आनंद मिळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठीही साधेपणा अत्यंतिक महत्वाचा आहे. हे दलाई लामा यांचे वाक्य जगण्याला उर्मी देऊन जातं.
मग दररोज वाचन करत असताना माझ्या मनात विचार आला की आपण हे वाचलेलं इतरांनाही द्यावं म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये,आयुष्यामध्ये आनंदाची,समाधानाची वाढ होईल. म्हणूनच माझ्या मित्रांनी ( त्यांची सन्मानित नोंद आपणास ब्लॉगवरती दिसेलचं) तेसुध्दा असाच मोकळा व मोठा विचार करतात. त्यांनी या ब्लॉगचे निर्माण केले. मला प्रेरणा दिली आणि मी या ब्लॉगवरती आता पुस्तकातील काही घटना प्रसंग,पुस्तकातील ज्ञान वाढवणारं असं आपल्या सर्वांना द्यावं म्हणून हा सर्व खटाटोप करत आहे.आपणही यावरील लेख,कथा गोष्टी वाचाव्यात व आपलं जीवनही आनंदाने जगावं काही सूचना असतील तर नक्कीच कळवाव्यात.
कारण आपण सर्वजण सुखी व समाधानी राहू शकतो. या धकाधकीच्या व धावत्या जगामध्ये,आयुष्यामध्ये एवढाच एक शांततेचा विरंगुळा असेल तो ही स्वतःसाठी..
शेवटी जाता जाता..
पुस्तकाचं संपादन करणारे एक जण म्हणतात, तसं,
"वाचकांचे आयुष्य शक्य तेवढं आरामदायी करणं, हेच माझं काम आहे.कोणत्याही पुस्तकातला महत्त्वाचा संदेश किंवा त्यातून काही घेण्यासारखं असेल,तर ते वाचकांपर्यंत शक्य तितक्या स्पष्टपणे पोहोचवणेच माझे उद्दिष्ट असतं."
आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व धन्यवाद
विजय कृष्णात गायकवाड