* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

७/११/२२

५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

१९९०-९१ सालची गोष्ट. मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या BESE कंपनीला मुंबई जवळच औष्णिक विद्युत केंद्र सुरू करायचे तेव्हा उहाणूला ते करायचे ठरले. तिथे ५०० (२x२५०) मेगावॉटचा प्रकल्प उभारायचा होता... औष्णिक विद्युत केंद्राला कूलिंग टॉवरसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते... या केंद्रासाठी कुलिंग टॉवरला लागणारे पाणी दरदिवशी २०० लाख लिटर लागणार होते.एवढे पाणी फक्त उपलब्ध होणार.. आणि ते समुद्रातच सोडू शकणार. त्यामुळे अर्थातच समुद्राचे पाणी घ्यायचे ठरले. पण समुद्राच्या पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात असलेले क्षार आणि त्यातही मुंबई जवळ असल्यामुळे मुंबईचे सर्व प्रदूषित पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळलेले.त्यामुळे एक तर खूप मोठ्या क्षमतेचे पाणी उपसण्याचे पंप लागणार होते.म्हणजे १,७०० एच.पी.चा एक तसे चार पंप,तसेच प्रदूषित व खाऱ्या पाण्यामुळे नेहमीचा पोलादापासून बनवलेल्या पंपाला गंज लागणे,झीज होणे व इतर केमिकल्समुळे पोलाद खराब होणे,यातून तो वरचेवर खराब,नादुरुस्त होणे हे झाले असते. याला उपाय म्हणून स्टेनलेस स्टीलचे सगळे पार्ट बनलेला पंप बसवायला हवा होता.पण स्टील पंपाची किंमत खूप जास्त होती. शिवाय आहे तेवढ्या क्षमतेचा पंप किर्लोस्कर कंपनी काय,भारतात कोणी बनवला नव्हता.... किंवा बनवतही नव्हते... त्यामुळे आयात करणे हाच पर्याय होता... आयात केली तरी त्याची खात्री देता येत नव्हती, या पंपाच्या उभारणीसाठी BESE ने टेंडर मागवले.मोठ्या किमतींच्या किंवा खूप कौशल्याच्या कामाचे टेंडरसाठी दोन तीन टप्पे असतात. पहिला टप्पा असतो, 'प्रिक्वलिफिकेशन' म्हणजे 'पूर्व पात्रता',यात तुम्ही हे काम कसे करणार आहात,यातील तुमचा अनुभव, तंत्रज्ञान काय असणार आहे... या आणि अशा अनेक गोष्टी चर्चिल्या जातात. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने हे टेंडर भरायचे ठरवले. त्यासाठी अभियंत्यांची एक टीम निवडली गेली. त्यात रविंद्रजी ही होते... त्यांच्यापेक्षा अनेक अनुभवी अभियंते पण टीममध्ये होतेच.या सर्वांनी मिळून एक नवीन कल्पना मांडली.स्टेनलेस स्टीलच्या पंप ऐवजी काँक्रीटची बॉडी असलेल्या पंप तयार केला तर? अशा प्रकारचे अगदीच मोजके पंप जगात काही ठिकाणी वापरले जात असल्याचे त्यांना वाचून माहिती होते.एक-दोघांनी कॉन्फरन्समध्ये ही हे ऐकले होते. मग या टीमने त्यावर पूर्ण अभ्यास केला. त्याविषयी पुर्ण तंत्रज्ञान त्याच्या खाचाखोचा,आर्थिक गणिते यावर भरपूर परिश्रम घेतले. आणि या निर्णयावर आले की... आपण हे काँक्रिट वोल्युट पंप करू शकतो.आणि हे करायचेच... आपण भारतातला पहिला काँक्रीट वोल्युट पंप बनवू आणि कामही मिळवू.पूर्व पात्रता मीटिंगमध्ये किर्लोस्करच्या टीमने काँक्रीट वोल्युट पंप आणि त्यावर आधारित सर्व कामाची उत्तम मांडणी व सादरीकरण केले. BESE च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे शंका समाधान केले. ही कल्पना व तंत्रज्ञान पसंत पडले. पण त्यांनी काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपनीला बरोबर घ्या अशी अट घातली. त्यासाठी मग एका फ्रेंच कंपनी बरोबर करार झाला. तंत्रज्ञान पुरवण्याबाबत आणि स्पर्धेतून किर्लोस्कर कंपनीला हे काम देण्यात आले. काँक्रीट वोल्युट पंप KBL पहिल्यांदा करत होते, त्यामुळे या टीमला धाकधूक होती.पण गेली अनेक वर्षे पंप बनविण्यातून आत्मविश्वास ही होता.या साईटवर काम सुरू करून पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या टीममध्ये रविंद्रजी यांची नेमणूक झाली होती.


हा काँक्रीट वोल्युट पंप काय आहे?


पोलादाचा पंप समुद्राच्या किंवा प्रदूषित पाण्याने गंजतो. त्याला भरपूर सुट्या भागांनी जोडावे लागते तेही गंजतात, वारंवार बदलावे लागतात. तसेच त्याला व्हायब्रेशन्स ही खुप येतात. ते टाळणे जवळजवळ अशक्य आहे. गंजण्यावर पर्याय म्हणून स्टेनलेस स्टील किंवा तत्सम मिश्र धातूचे पंप बनवणे हा पर्याय असतो.पण तुलनेने ते खूप महाग पडतात. त्याबरोबर व्हायब्रेशन त्यांना ही टळत नाही.त्यातून दुरुस्ती व स्पेअर पार्टचा खर्च स्टेनलेस स्टीलमुळे आणखीनच महागडा होतो.तसेच पंप नादुरुस्त झाल्यावर काम बंद पडू नये म्हणून राखीव पंपांची ही सोय ठेवावी लागते.हा अधिकचा खर्च असतो. याला पर्याय पंपाचा गाभारा म्हणजे केसिंग म्हणूया, बॉडी म्हणूया,तो भाग पूर्ण काँक्रीटचा बनवायचा अशा प्रकारची ती रचना असते. पोलाद किंवा स्टेनलेस स्टील ऐवजी काँक्रीटची बॉडी असल्याने गंजणे होतच नाही. तसेच अनेक सुट्टया भागांना सुट्टी मिळते या रचनेमध्ये. हा पंप M २५ ग्रेडचे काँक्रीट वापरून केलेला असतो. अगदी भूकंपप्रवण किंवा अशीच खास गरज असेल तरच M ४० काँक्रीटचा असतो. (आपल्या सामान्य इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट M १५ ग्रेडचे असते) M २५ ग्रेडमध्ये M १५ पेक्षा सिमेंटचे प्रमाण अधिक असते.


हे कॉक्रिट वोल्युट पंप बनवताना खूप आव्हानात्मक असतो तो भाग म्हणजे त्याचा साचा बनवणे... इंजिनिअरिंगच्या भाषेत याला फॉर्मवर्क असे म्हणतात.त्या पंपाच्या काँक्रीटसाठीच्या साच्या बनवताना सर्व मापे मायक्रोनपर्यंत (म्हणजे मिलिमीटरचा दहावा भाग) तंतोतंत पाळावे लागतात.सर्व प्रक्रियेत हे साध्य करणे इंजीनियरिंग व फॉर्मवर्क करणारे कारागीर यांचा खूप कस लावणारे काम आहे. काँक्रीट पंपाचे आयुष्य कमीत कमी पन्नास वर्षे असते किंबहुना त्यापुढेही ते चालू शकतात. इतके मोठे पोलाद किंवा स्टेनलेस स्टीलचे पंप खूप थोड्या ठिकाणी बनवतात,त्याच्या बाकीच्या ॲक्सेसरीज बाबतही तेच,शिवाय,त्याचा आयात खर्च, वाहतुकीचा खर्च,वाहतुकीतील सुरक्षा, वेगवेगळे कर अशा सगळ्यांचा विचार करता काँक्रीट वोल्युट पंप सर्व बाजूंनी सरस आहे.


भारतातला हा सर्वात मोठा पंप असणार होता; ९० च्या दशकात आणि पहिलाच पंप असणार होता. काँक्रीट वोल्युट पंप हा पंप दर तासाला दोन कोटी साडेसात लाख लिटर पाणी खेचून २० मीटर उंचीवर नेऊन सोडतो. हा पंप आजही उत्तम चालू आहे.विनातक्रार ! हा पंप बसवण्याचे ठरल्यापासून त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे; त्याचे प्रशिक्षण,त्यावरची साईटवरती प्रत्यक्ष काम करताना करावे लागणारे किरकोळ बदल, हे काम पूर्ण करून घेऊन प्रत्यक्ष पंप चालू करण्यापर्यंतची सर्व जोखीम व जबाबदारी टीमनी उचलली होती.पहिल्या पंपाची यशस्वी निर्मिती झाल्यावर पुढे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीने हे पंप वापरता येईल का याबद्दल विचारणा केली. ही जगातली पाचव्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. सर्व मिळून ही ६० हजार मेगावॉट इतकी वीज बनवते.भारताच्या गरजेच्या ४० टक्के वीज ही कंपनी बनवते. त्यांच्याकडे ही पहिल्या प्रकल्पात यशस्वी झाल्यावर अनेक प्रकल्पात एनटीपीसीने अधिक मोठ्या क्षमतेची ही कॉक्रीट वोल्युट पंप वापरले.अर्थातच ते सर्व किर्लोस्कर कंपनीने उभारले. पहिला पंप बसवून २७ वर्षे झाली. त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही.


सौराष्ट्र सब कॅनॉल यशस्वी कहाणी 


या काँक्रीट वोल्युट पंपाची कीर्ती वाढत होती आणि यशस्वीताही... १९९४ मधली गोष्ट, पंडित नेहरूंनी कोनशिला बसवलेल्या आणि अनेक वर्षे काम चाललेल्या सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होत आले होते. त्या प्रकल्पाचे कॅनॉल बांधकाम सुरू होते. हा कॅनॉल सरदार सरोवरपासून सुरु होवून,पूर्ण गुजरात व राजस्थानातून तो जैसलपरपर्यंत जातो. त्याची लांबी ५४३ किलोमीटर आहे.याचा सब कॅनाल सौराष्ट्राला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला आहे.आत्ताचा सौराष्ट्राचा भूभाग लाखो वर्षापूर्वी समुद्रातील एक बेट होते. पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे पुढे हे बेट भारतीय उपखंडाला येऊन चिकटले. त्यामुळे सौराष्ट्राच्या रचना बशीसारखी आहे. सीमेवर उंचवटा व मध्यवर्ती भाग खोल गेला आहे. तीन कोटी लोकसंख्या असलेल्या सौराष्ट्रात पाऊस खूप कमी पडतो.सौराष्ट्रात कोणतीही नदी वाहत नाही. फक्त खोलगट भागात मध्यवर्ती ठिकाणी नळ सरोवर आहे. पण जमीन मात्र खूपच उपजाऊ. भुईमूंगाच्या उत्पन्नासाठी तर अतिउत्तम... पण पाणी नाही... त्याचबरोबर खाद्यतेल व्यापार सौराष्ट्रात मोठा! तेथील तेल व्यापारी आणि सौराष्ट्रातील राजकीय लॉबी गुजरातच्या राजकारणावर पकड ठेवून असते... त्यामुळे आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सुद्धा सौराष्ट्राला पाणी पोहोचवणे सर्व विपरीत परिस्थितीत सुद्धा आवश्यक बनले होते. सरदार सरोवर ते सौराष्ट्रपर्यंत पाणी उताराने जाऊ शकत नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे. त्या अर्थाने विपरीत परिस्थिती! पाणी सौराष्ट्राला पुरवायचे,पण कसे हे तंत्रज्ञ अभियंत्यांना हे मोठे आव्हान होते. त्यावर उत्तर शोधले होते ते असे कि,सरदार सरोवर ते गांधीनगर जवळ कडी गावापर्यंत पाणी उताराने आणले जाईल... हे पाणी उपसा जलसिंचन पद्धतीने पाच टप्प्यात सौराष्ट्रात पोचवायचे. प्रत्येक टप्प्यावर पाणी तलावात न सोडता कॅनॉलमध्ये सोडायचे. तेवढ्या काही अंतरात कॅनलची रुंदी व थोडी खोली वाढवायची. उपसा सिंचन योजना. त्यात पाणी पोहचवायचे आहे ७० किलोमीटर ह्या अंतरावर सत्तर मीटरवर चढवायचे आहे! चक्क दर सेकंदाला सहा लाख तीस हजार लिटर पाणी ७० मीटर उंचीपर्यंत पोचवायचे होते. खूप खूप आव्हानात्मक काम होते. यासाठी गुजरातच्या शासकीय अभियंते व प्रकल्प सल्लागार यांनी नेहमीचे हजारो पंप बसवण्यासंबंधी आराखडा बनवण्याचे चालले होते.पण किर्लोस्कर कंपनीने यात काम करायचे ठरवले.१०० सामान्य पंपाच्या जागी एकच कॉंक्रीट व्हॉल्यूट पंप बसवून हे काम करता येणे शक्य आहे. हे कंपनीच्या अभियंत्यांनी गुजरातच्या अभियंत्यांना व प्रशासनाला अशी कल्पना दिली. कंपनीच्या टीममध्ये रवींद्रजींना परत मध्यवर्ती भूमिका मिळाली. त्याची कारणे दोन तीन महत्त्वाची. म्हणजे काँक्रीट वोल्यूट पंपाची डिझाईन व उभारणी करण्याचा अनुभव आणि दुसरे म्हणजे रवींद्रजींना येत असलेली गुजराती भाषा, गुजराथमध्ये शिक्षण झाल्यामुळे अस्खलित आणि गुजराथ्यांच्या लहेजात! काही तांत्रिक आणि इंजिनिअरिंग सर्व सादरीकरण व पत्रव्यवहार गुजरातीतच करावा लागायचा... त्यामुळे तिथेही रविंद्रजी असायचे. असो. पुढे किर्लोस्कर कंपनीला हे काम मिळाले. 


या प्रकल्पाद्वारे पाणी आता पाच टप्प्यात उचलले गेले. प्रत्येक टप्प्यावर कॅनॉलची एक शाखा सिंचनाच्या पाण्यासाठी तर एक शाखा पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी काढण्यात आली. पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकी चार पंप बसवण्यात आले. ज्याची पाणी घेण्याची क्षमता प्रतिसेकंद पाच हजार लिटर इतकी होती. म्हणजे प्रत्येक सेकंदाला चार पंप मिळून वीस हजार लिटर पाणी खेचत असतात. तर शेतीसाठी जी सिंचन आहे,त्यासाठी पहिल्या टप्प्यावर १९ पंप असे आहेत की,त्यांची प्रत्येकाची पाणी खेचण्याची क्षमता प्रत्येक सेकंदाला २० हजार लिटर आहे. (म्हणजे एकूण पाणी खेचण्याचा ३ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) हे पाणी पुढे कॅनॉलमध्ये पडणार पुढे १२ किलोमीटर वाहात जाणार त्यातले काही पाणी ठिकठिकाणच्या फाट्यावरून सब कॅनॉलमध्ये जाणार व ते शेतीसाठी वापरले जाणार... तसेच दुसऱ्या टप्प्यावर १५ पंप तिसऱ्या टप्प्यावर १५ पंप चौथ्या टप्प्यावर ८ पंप व शेवटच्या टप्प्यावर ८ अशा प्रकारची रचना केली आहे.


काम वेगाने पूर्ण करून पहिल्या पंपिंग स्टेशनच्या सर्व टेस्टिंग पार पाडल्यानंतर २२ मार्च २००७ ला जागतिक जलदिनाला त्याचे उद्घाटन केले गेले.पाच हजारांपेक्षा अधिक लोक तिथे उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. रविंद्रजी व त्यांच्या टीमची गावकऱ्यांनी या निमित्ताने मिरवणूकही काढली... हे काम मिळाले तेव्हा किर्लोस्कर कुटुंबाने ह्या कामाबद्दल सर्व टीमचा घरी सत्कार समारंभ ठेवला. कौतुकही केले.... पाणी सौराष्ट्रात पोचले. ढोलीधजा धरणात पाणी पोहचले... बारा वर्षांनी धरणात पाणी आले होते... यापूर्वी तर धरण भरलेले पाहिल्याचे कुणालाच आठवतही नव्हते.... पण या पाण्याने मात्र ते पूर्ण भरले. या प्रकल्पामुळे सौराष्ट्राची खूप जमिन ओलीताखाली आली आहे.


ही कथा होती जळासी चालविता रवींद्र उलंगवार यांची या ठिकाणी हेन्री डेव्हिड थोरो यांचे वाक्य बरचं काही सांगून जाते.


'स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही.'



लोकांना मदत पुरवणे हा परोपकाराचा भाग नसून तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे मिळणारी मदत व सुविधा या चांगल्या दर्जाच्या व त्यांचा आत्मसन्मान येणाऱ्या हव्यात आहे त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. असे महत्त्वाचे सूत्र सांगतात.


'आपत्तीतील आधार - ॲक्वाप्लसचे राहूल पाठक 


जगात कुठेही वादळ, महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध, दंगली, समूहाची स्थलांतरे यासारखी मानवनिर्मित आपत्ती येतात,तेव्हा प्रचंड नुकसान होते. सर्वात जास्त समस्या उभी राहते पिण्याच्या पाण्याची... कारण अशा वेळी पाण्याचे सर्व स्त्रोत एक तर त्यांची मोडतोड झालेली असते किंवा त्याहीपेक्षा पाणी सर्वत्र घाण झालेले असते. मग लोक,स्थानिक यंत्रणा, शसरकार यांच्या माध्यमातून कुठेतरी आश्रय घेतात. या आपत्तीनंतर अधिक मोठी आपत्ती येते ती साथीच्या रोगांची! दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची साथ येऊन तेथील शेकडो-हजारो लोक रोगग्रस्त होतात.अशा वेळी जवळपास कुठेतरी उपलब्ध असलेले पाणी त्यांना पुरवले जात असते.तेही अपुरे असते,त्यात शुद्ध करण्यास वेळही नसतो,यंत्रणाही नसते. त्याबद्दल काही माहितीही नसते. अशा परिस्थितीत मिळेल ते पाणी मिळेल तसे द्यावे लागते. यातून अनेक लोक बळी पडतात,अधू होतात. समस्यांची मालिका सुरूच राहते. यासाठी आरोग्य यंत्रणा आणि इतर सरकारी यंत्रणेवर सुद्धा खूप ताण येतोच आणि यंत्रणा तोकडी पडते.तसेच त्यानंतर तो पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत होण्यासाठी शहर असो वा गाव पुढील काही आठवडे कधीकधी महिने लागतात. ही आपत्तीनंतरची आपत्ती अधिक आव्हानात्मक असते.


पण आपत्ती व्यवस्थापनात लगेचच पाणी शुद्ध करून देणारे तंत्र मिळाले,सहज हाताळता येणारे उपकरण / यंत्र / संयंत्र मिळाले तर पुढच्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत. याबद्दलचे विचार आणि कृती निदान भारतात तरी पहिल्यांदा कुणी केली असेल तर राहुल पाठक यांनी केली.ॲक्वाप्लस या कंपनीद्वारे आपत्तीग्रस्तांच्या समूहासाठी कुठेही घेऊन जाता येण्यासारखा,कुणालाही सहज जोडणी करता येऊ शकणारा आणि मुख्य म्हणजे कोणतीही किंवा इंधन न लागता मनुष्यबळावर सहज चालवणारा,तासाला सातशे लिटर ते पाच हजार लिटर पाणी शुद्ध करणारा मोबाईल फिल्टर त्यांनी सर्वप्रथम बनवला. त्या माध्यमातून पंधरा सोळा वर्षात कोट्यवधी आपदग्रस्तांना शुद्ध पाणी मिळण्याची सोय केली... मळलेल्या सोडाच कुठल्याशा पायवाटेवरूनही न चालता पहिल्यापासूनच स्वतःची वाट निर्माण करून त्याचा महामार्ग,राजमार्ग करणारे राहुल पाठक हे व्यक्तिमत्व इंग्रजीत याला आऊट ऑफ बॉक्स थिंकींग म्हणतात,तसं कायम विचार करणारे... पाण्यासारखं प्रवाही... खळखळणारं नितळ मन... प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची आणि काहीही करताना अत्युच्च गुणवत्तेची कास धरणारी ही व्यक्ती.... त्यांच्या कामाची सुरूवातच १९९४-९५ मध्ये झाली घरात वापरण्याच्या वॉटर फिल्टरच्या मार्केटिंगपासून ते अगदी ठरवून मार्केटिंग शिकले... तेही फिल्टरचे..!


पुढचा टप्पा ठरवलेला होताच,फिल्टर बनवण्याचा पुढे लवकरच फिल्टर बनवायला केली ही.पण घरातले फिल्टर न बनवता मोठे फिल्टर करायचे ठरवले.घरात सुरु वापरायचे फिल्टर आणि मोठ्या प्रमाणात पाणी शुध्द न् निर्जंतूक करणारे फिल्टर यांच्या तंत्रज्ञानात फरक होता.नुकतेच बाजारात मेम्ब्रेन फिल्टरचा वापर मोठ्या प्रमाणात या पाणी शुद्धीकरणासाठी होता. म्हणजे थोडक्यात मिनरल वॉटर बाटलीत मिळू लागलं होतं ना त्यावेळी त्या मिनरल वॉटर प्लांटमध्ये लागणारे फिटर्स ते पाठक बनवू लागले.


आता मग त्यातून इतर लोक हे फिल्टर बनवत आहेत ना, मग आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे... हे वेगळे काहीतरी डोक्यात घेणे हा त्यांचा स्थायीभाव! आजही तो कायम डोकावतोच कुठेना कुठे.


तर वेगवेगळ्या काही ना काही करण्याच्या विचारांमध्ये त्यांनी या वॉटर फिल्ट्रेशन या क्षेत्रात दोन वाटा सुरू करून त्यांचा महामार्ग केला.


पहिली वाट निवडली मोबाईल वॉटर फिल्टर बनवायची..कुठेही घेऊन जाता येईल असा वॉटर फिल्टर. त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले आणि तो बनवला देखील. अर्थातच मेम्ब्रेन फिल्टर !!


मेम्ब्रेन फिल्टर म्हणजे एक पातळ कागदासारखी दिसणारी गाळणी. याची छिद्र इतकी बारीक असतात की त्यातून बॅक्टेरिया पण जाऊ शकत नाही. इतकंच काय पण पाण्यातील क्षारांचे रेणू सुद्धा जाऊ शकत नाही इतकी सूक्ष्म छिद्र असलेली चाळणी म्हणजे मेंब्रन फिल्टर या फिल्टरमधे साधारण तीन प्रकार असतात. 


१) मायक्रोफिल्ट्रेशन ०.०२

मायक्रॉन यातून मातीचे कण व बॅक्टेरिया गाळले जातात.


 २) अल्ट्राफिल्टरेशन । मायक्रॉन यातून मातीचे कण,बॅक्टेरिया व व्हायरस गाळले जातात.


 ३) नॅनोफिल्ट्रेशन साईज ०.००१ मायक्रॉन यातून निवडक मिनरल्स गाळले जातात. 


४) रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) यातून ९९ टक्के क्षार गाळले जातात. 


कुठल्याही आपत्तीत जमिनीवरचे पाणी दूषित होते, मुख्यतः त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा संबंध नसल्याने या मोबाइल फिल्टरमधे अल्ट्रा फिल्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २००५ मध्ये भूकंप झाला होता.त्यांच्या कंपनीने त्वरित तिकडे

संपर्क साधला तर तेथील सर्व आपत्ती व्यवस्थापन भारतीय लष्कर सांभाळत होते. पाठक त्यांच्यापर्यंत पोहोचले.आम्ही व आमची कंपनी आपल्याला मोबाईल फिल्टर देतो,दान करतो पण तो तिकडे वापरा अशी विनंती केल्यावर लष्करी अधिकारी शाशंक मनाने तयार झाले.कारण असा मोबाईल फिल्टर भारतात पहिल्यांदाच बनला होता... पहिल्यांदाच उपलब्ध होता. तो प्लांट भारत पाकिस्तानच्या सीमेवरील उरी येथे बसवला गेला जिथे भारतीय लष्कराचा तळ आहे.लष्करी तळाबरोबरच उरी व टंगधार गावातील व परिसरातील लोकांना शुद्ध निर्जंतुक पाणी आपत्तीनंतर उपलब्ध झाले. हा दोन गोष्टींसाठी पहिलाच अनुभव होता एक म्हणजे Aqua Plus कंपनीचा हा पहिलाच आपत्तीनंतर ताबडतोब प्रतिसाद आणि दुसरे म्हणजे पहिल्यांदाच मोबाईल फिल्टर्स वापरला जात होता. हा मोबाईल फिल्टर प्लांट तिथे उरीला बरेच दिवस होता.


दरम्यान अनेक संस्था तिथे उरीला आपत्ती व्यवस्थापनात लष्कराला मदत करत होत्या. पैकी REDR (Ragistered Engineers for Disaster Relief) ही व्यावसायिक अभियंत्यांची अशी संघटना जे आपत्तीत आपली व्यावसायिक स्वयंसेवक म्हणून सेवा देतात. या जगव्यापी आपत्ती व्यवस्थापनात प्रसिद्ध असलेल्या संस्थेच्या नजरेस हा फिल्टर आला. ही संस्था आपत्ती व्यवस्थापनात विविध कामे करते. पण मुख्यत्वे दोन प्रमुख कामे करते. 


१) आपदग्रस्तांना आपत्तीस तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम आणि 


२) या व्यवस्थापनात उपयोगी ठरणाऱ्या विविध वस्तू,सेवा,संस्था,त्याला अर्थसहाय्य करणारे विविध घटक इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळवते व त्यांची माहिती जगाला उपलब्ध करण्यासाठी नोंदी ठेवते.पूर्वी रजिस्टरच्या स्वरूपात तर आता पोर्टलच्या स्वरूपात नोंदी ठेवते. थोडक्यात सर्वंकष माहिती संकलन !!


त्यांनी REDR च्या माहिती यादीत हा फिल्टर नोंदवला. पुढे ती माहिती वॉटर अँड सॅनिटेशन यात काम करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या OXFAM कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहिली. त्यांनी लगेच फिल्टरची ऑर्डर दिली. त्यांनी ० ते ४,००० लिटर प्रति तास इतके शुद्ध पाणी देणाऱ्या फिल्टरची ही मागणी केली. ह्या राहुल पाठक यांच्या  Aqua Plus कंपनीने तो बनवला.


या यशाबद्दल राहुल पाठक सांगतात,जगात सर्वात अवघड काय आहे? तर सर्वात सोपी सुविधा निर्माण करणे.फिल्टरच्या बाबतीतही आम्ही ते करताना १२ ते १४ वर्षे सतत उत्तमोत्तम गोष्टींचा ध्यास घेतला आणि जागतिक दर्जाचा सर्वसामान्य उपयोग होणारा प्रॉडक्ट तयार झाला.


शिक्षक दार उघडून देतो. पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो.एक चायनीज म्हण..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड