मृत्यू सुंदर आहे?
मृत्यू फक्त नकारच नाही. मृत्यू त्यापेक्षा भरपूर काही आहे,हे कधी तरी समजून घ्यावं लागेल !
मृत्यूला सुंदर म्हणता येईल? त्याला सुंदर करता येईल?
हे प्रश्न तसे अवघडच. पण ते आपणाला आपल्या हृदयावर झेलावे लागतीलच! हे प्रश्न गडद करण्यापेक्षा त्यांच्या उत्तरासाठी सुरुवात तर करावी लागेल !
हे पुस्तक कदाचित निर्णायक उत्तर देणार नाही,पण निर्धारक सुरुवात मात्र निश्चितच करेल.
हे पुस्तक मृत्यू मांडते,जगणंही मांडते.
भयमुक्त मृत्यूसाठी मृत्यूसाक्षरता,मृत्यूजागरूकता आवश्यक असते.ह्या पुस्तकाचा जन्म खरं तर त्या दिशेने चालण्यासाठी आहे,एवढे मात्र निश्चितच या पुस्तकाबाबत सांगता येईल."मराठीतले या विषयावर हे पहिले वहिले पुस्तक...!
या पुस्तकातील शेवटाचे मलपृष्ठ जगण्याबाबत सांगणार व त्याचबरोबर न चुकता मृत्यू ही आनंदी करणारं..!
मी लहान असताना एका इमारतीचे बांधकाम सुरू होते.या इमारतीवर काम करणार्या मजुरांची लहान लहान मुले दररोज सकाळी जरा लवकरच आगगाडीचा खेळ खेळायची त्या खेळाचा आवाज यायचा,सिग्नल देण्याचा आवाजही न चुकता जोडीला असायाचा.असा हा खेळ दररोजच रंगात यायचा.या खेळाचं निरीक्षण एक चिकिस्तक व्यक्ती करत होते.सात दिवस त्यांनी हा खेळ पाहिला आठव्या दिवशी ते त्या मुलांना भेटायला गेले.तर या खेळामध्ये बदल व्हायचे.तो बदल म्हणजे आज जो मुलगा डब्बा आहे.तो उद्या इंजिन व्हायचा प्रत्येक मुलगा आळीपाळीने इंजिन व्हायचा पण एकच मुलगा असा होता जो डब्बा होता नव्हता आणि इंजिनही होत नव्हता.तो नेहमीच सिग्नल माणुस असायचा.ती व्यक्ती या सिग्नल मुलग्या जवळ गेली व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. 'बाळ तू सोडून बाकी सर्व मुले आळीपाळीने रेल्वेचा डब्बा व इंजिन बनतात.तुला डबा किंवा इंजिन बनायला आवडत नाही का ?' त्या मुलाने जीवन जगण्याचे एक तत्व सांगितले.तो मुलगा म्हणाला,"
रेल्वेचा डबा किंवा इंजिन बनण्यासाठी अंगामध्ये शर्ट असावा लागतो.त्या शर्टाला धरूनच इंजिन किंवा डबा होता येत.आणि माझ्याकडे शर्टचं नाही?"
हे उत्तर देताना त्याचे डोळे लकाकले व तो नम्रपणे म्हणाला,माझ्याकडे शर्ट नाही पण या खेळातील सर्व आनंद घेतो.कारण माझ्या परवानगीशिवाय संपूर्ण आगगाडी जाग्यावरुन हलूच शकत नाही.उद्या माझ्याकडे भरपूर शर्ट असतील पण तरीही मी सिग्नल माणूसच होणार.कारण हे मला मनापासून आवडतं हे उत्तर ऐकून त्या व्यक्तींने त्याचे आभार मानले .
प्रत्येकाचे लहानपणं हे संघर्षातून जात असते. त्यातूनच जीवन जगण्याची उर्मी जागृत होते.जीवनावर श्रद्धा बसते.मग आपण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करतो.
कष्ट करून घाम गाळून जीवनामध्ये उभं राहावं लागतं.शारीरिक कष्टाचे कामे करीत असताना.दम लागतो,वेदना होतात.तरीही आपण जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न करतो.
अशी काम करत असताना आपला श्वास या भूतलावरील सर्वात मूल्यवान श्वास आहे याची कधी जाणीव झालीच नाही.
परवा मृत्यू सुंदर आहे? या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांना भेटण्याचा व यांच्याशी बोलण्याचा योग आला.आमच्या भेटीतून संवादातून जीवन,
जीवनातील हेतू,आपलं या पृथ्वीतलावरील स्थान,अशा गहन व जटिल जीवनातील चढ उतारांवर चर्चा झाली.
या चर्चेतून डॉक्टर साहेबांनी केलेला अभ्यास, चिंतन-मनन,स्वतःला स्वतःकडून नियंत्रित करणारे व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो.
धीर गंभीर नेहमीच शुन्यामध्ये विचार करणारे पण प्रेमाने सोबत घेऊन सत्य सांगणारे,व्यक्तीच्या सोबत जाणारे त्याला कधीही एकटे न सोडणारी ही व्यक्ती मला जगावेगळी वाटली.यावेळी त्यांनी मला मृत्यू सुंदर आहे? हे पुस्तक प्रेमपूर्वक भेट स्वरूप दिले.
जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आपण मरणारच हे मी लहानपणापासून ऐकत आलो आणि वाचत आलो.एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली.दुःखद प्रसंग घडला.शारीरिक वेदना वाढली. तरी या सर्वातून सुटका होण्यासाठी अस्वस्थतेतून मरण आलं तर बरं होईल.असं काही वेळा सुद्धा बोललं जातं.मृत्यू न समजून घेता यावर भाष्य केलं जातं.
बऱ्याच महिन्यापूर्वी मला निमोनिया झाला होता.शारीरिक दुःख, रक्तदाब वाढलेला त्यात सोबत आसपास पाहिलेले जिवंत मृत्यू,झोप लागायची बंद झाली.आणि मीही मरणार ही भीती वाढीला लागली.यादरम्यान मी जगण्यापेक्षा मृत्यूचा विचार जास्त करायला लागलो.मी मेलो म्हणजे सगळंच संपलं.हताश झालो,बरा झालो घरी काही दिवस विश्रांती घेतली.कामावर रुजू झालो.पुन्हा मृत्यू चा विसर पडला. पुन्हा मागील पानावरील जीवन पुढील पानावर घेतले.पुस्तक वाचत होतो.जीवन पुन्हा नव्याने समजून घेत होतो.
मृत्यू सुंदर आहे हे पुस्तक वाचायला घेतले.या ठिकाणी बुद्ध म्हणाले,
तुम्ही स्वतः च स्वतःला शरण जा आणि स्वतः प्रज्ञा-व्दिप बना. कुणावरही विसंबून राहू नका.नाहीतर तुम्ही शोक आणि निराशा यांच्या भोवऱ्यात सापडाल.
माझ्यासाठी हे पुस्तक हा विषय अतिशय वेगळा होता,चौकटीच्या बाहेर नेणारा होता,मृत्यूकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास भाग पाडणारा हा वाचन प्रवास सुरू झाला होता.अतिशय उच्च कोटीचे तत्त्वज्ञान,सत्य शोधण्यासाठी केलेले प्रयास या सर्वांची मनापासून जाणीव होत होती.
मरण माझे मरोन गेले | मज केले अमर ||
पुसिले बुड पुसिले वोस | वोसले देहभाव ||
आला होता गेला पूर || धरिला धीर जीवनी ||
तुका म्हणे बुनादीचे | जाले साचे उजवणे ||
- तुकाराम ( तु.गा.२३३८)
वाचत असताना पुस्तक अवघड जात होते. वेळच्या वेळी लेखकांना फोन करून चर्चा करत होतो.डॉक्टर साहेब ही मनापासून मला समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगत होते.म्हणूनच हे पुस्तक समजून घेण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
शारीरिक इजा वेदना झाली की मला मृत्यू आठवायचा,पण हे पुस्तक वाचत असताना माझ्या मध्ये सूक्ष्म पण अमुलाग्र बदल होत होता.
पान नंबर ६७ व ६८ वाचत असताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
चुंदाच्या घरी घेतलेल्या भोजनानंतर त्या रात्री बुद्धांच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्या रात्री त्यांना शांत झोप येऊ शकली नाही. त्या रात्री ते तडफडत राहिले. त्या तशा अवस्थेतही त्यांनी कुशिनाराच्या दिशेने प्रवास सुरु केला.पोटात भयानक वेदनांचा महाकल्लोळ आणि त्यातच अतिसारामुळे शरीर कोरडे,शुष्क झालेले. त्यामुळे वाटेतच एका वृक्षाखाली विश्रांती घ्यावीच लागली.अतिसारामुळे शरीर कोरडे पडलेले; प्रचंड तहान लागलेली.त्यामुळे अस्वच्छ असलेले पाणी त्यांना प्यावे लागले. पाणी प्राशन केल्यानंतरही त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे बुद्ध पुन्हा तिथे आडवे होतात.जीर्ण वस्त्र बदलण्यासाठी त्यांना आनंदचा आसरा घ्यावा लागतो.ही सर्व वर्णने त्यांच्या देहाला किती पीडा होत होती, त्याची साक्ष देतात.
त्या तशा अवस्थेतही ककुथ नदीवर ते स्नान करतात आणि पुन्हा पाणी पिऊन घेतात. त्यानंतर त्यांना पुन्हा विश्रांती घ्यावी लागते. या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख करायचे कारण म्हणजे शरीर आजारी असताना,तेही अतिसाराने,बुद्ध प्रचंड पायपीट करतात.
यातनांनी,वेदनांनी शरीर पोखरले असतानाही समस्त लोकांवरील अमाप मायेपोटी महाकरूणेपोटी त्यांना 'देशना' देत राहतात. आयुष्याचे शेवटचे काही क्षण शिल्लक असताना ते हे करतात हे विशेष महत्त्वाचे !
एकमेकांत गुंतलेली ही दृश्य,नजरेसमोरून हटणार नाहीत ही दृश्ये;त्यांना क्रमांकही देता येणार असे क्षण,प्रचंड घालमेलीचे पण तसेच मनाला सुंदर बनवणारे क्षण ! एकाच वेळी आनंद आणि दुःख देणारे महाक्षण !
... बुद्धांच्या आयुष्याची सायंकाळ आणि त्या वेळी त्या आसमंतात उभी ठाकलेली सायंकाळ.कुशीनाराच्या सुंदर मनात,फुललेल्या त्या दोन साल वृक्षांच्यामध्ये वेदनांनी घायाळ होऊन सुद्धा,शरीर शुष्क होऊन गेलयं तरी,
मुखावरचे मंदस्मित पांघरलेला बुद्ध नजरेसमोरुन हटत नाही.सोबत संपत चाललेले आयुष्य आणि कोमजते शरीर यांच्या साथीने बुद्ध त्या सालवृक्षाखाली बहरत चाललेत. ते बहरणे शरीराचे की मनाचे ? माहित नाही. कदाचित ते बहरणे दोन्हीचेही.
बुद्ध नावाच्या दृष्टीला आणि द्रष्ट्याला वसंत ऋतु येण्यापूर्वीच साल वृक्ष बहरलेले दिसतात. त्या साल वृक्षांच्या पाकळ्या तथागत आणि भिक्खुंचे चीवर यांच्यावर शिडकाव करत आहेत.सूर्याची सुंदर लालिमा,साल वृक्षांच्या फांद्यांमधून गात्रे शीतल करणारी मंद हवा,तथागतला हे प्रिय आहे,आनंदी करणारे आहे.. असे असंख्य उद्गार बुद्धांच्या मुखातून,दुःखाच्या गडद छायेत हळवे बनवून बसलेला भिक्खू संघ,वरील उद्गार एकूण त्यांच्या मनाचे त्यांच्या हृदयाचे काय होत असेल? तेही फुलत होते की आणखी काय होत होते? तिथे उमटलेल्या त्या दृश्यांचे वर्णनच करता येणार नाही..
कोमजलेल्या बुद्धांचे फुलत चाललेले दृश्य एकीकडे आणि त्या तिकडे वृक्षांच्या गर्दीत दडपून,कोमेजून गेलेले;बुद्धांची आत्तापर्यंत सावली असलेले भन्ते आनंद रडत आहेत.. ते रडणे खरे रडणे आहेच.
मानवी संवेदनशील मनाला पिळ पाडणारा तसाच हा आक्रोश ! उजेडाचा अंधार होतानाची ती घालमेल,ती धास्ती सुंदरतेचा शेवट हृदय पिळवटणारा असतोच. आनंदाचे तेच झालेय..
आनंद दिसत नाही,कुठे आहे तो ? तथागताची नजर व्याकुळ बनतेय,आनंदासाठी.आनंदांना त्यांनी आरपार बघितलंय.त्यांची बलस्थाने, त्यांची मर्मस्थाने त्यांना माहीत आहेत.भूतकाळ आणि भविष्यकाळातील कोणत्याही संबोधी प्राप्त गुरुला आनंदापेक्षा अधिक प्रतिभासंपन्न आणि निष्ठावंत सहाय्यक मिळू शकणार नाही,असा आनंदाचा बुद्ध गौरव करतात.त्याची मुक्तता व्हावी,अर्हपतपद प्राप्त व्हावे यासाठी बुद्धांचे सम्यक मनसुद्धा अपार चिंताक्रांत आहे..
... समजावणारे बुद्ध आणि त्यांचा योग्य अर्थ समजणारे आनंद.त्यांना नव्याच व्यथेने ग्रासलेय. मातीने बनविलेल्या झोपडींचा एक छोटासा कसबा असलेल्या कुशनगरीत तथागतांनी शरीराचा त्याग करू नये,असे त्यांना वाटते. त्यासाठीही ते व्याकूळ आहेत.त्यांना समजावतानाचे बुद्धांचे उद्गार ही लाजवाब.
आपल्या अंगावर पडणारी साल वृक्षाची फुले.. हे दृश्य तथागत आनंदांना दाखवताहेत.
सुंदरता ही कुठल्या ठिकाणांवर अवलंबून असत नाही.सुंदरता छोट्या गोष्टीत सुद्धा असते...
त्या छोट्या कसब्यात सौंदर्य शोधणारे तथागत म्हणूनच मनाला व्यापून राहतात !
अश्रुंनी डबडबल्या डोळ्यांनी घेतलेल्या या 'स्व' अनुभवांनी मृत्यूवर असणारे प्रेम,गुरू-शिष्याच्या या नात्याला शिर साष्टांग दंडवत घालून माझ्या जीवनावर अज्ञानाच्या दृष्टिकोनातून मृत्यूवर पडलेला अंधार प्रकाशमय झाला.
एखाद्या झोपडीमध्ये उद्याच्या अन्न मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा विचार करणारी व्यक्ती असो,सध्या सुरू असणाऱ्या युद्धाचा मानवी आयुष्यात होणाऱ्या बदलावर विचार करणारी व्यक्ती असो, किंवा सर्वार्थाने सुखसोयी उपलब्ध असणारी श्रीमंत व्यक्ती असो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.सर्व सुख-सोयी असतानाही जर दाड दुखत असेल तर त्या व्यक्तीला आपली दाढ व त्याची वेदना हीच महत्वाचे वाटते.इतर सर्व गोष्टी गौण वाटतात.
आपलं जीवन जितकं साधं सरळ,आनंदी,सुखी असेल.आपल्या मृत्यू ही तसाच असेल.जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मध्ये जो कालावधी आहे त्याला जीवन म्हणतात.व तेच जीवन सुखी आनंदी कसं जगायचं न चुकता हे पुस्तक सांगतं.शरीर आहे त्यासोबत वेदना संवेदना आहेतच. पण हे पुस्तक वाचल्यामुळे या वेदणेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.
परवाच एक घटना घडली.माझी दाढ दुखत होती.असह्य वेदना होत होत्या.परवाच मी ती दाढ काढून घेण्यासाठी गेलो होतो.त्या ठिकाणी रिसर्च सेंटर असल्याकारणाने शिकाऊ डॉक्टर होते.त्यांनी माझी संपूर्ण चौकशी केली विचारपूस केली. त्यांनी माझे संपूर्ण दात मोजले.आणि त्यांनी मला प्रश्न विचारला,'तुम्ही कधी तुमची अक्कल दाढ काढली आहे का यापूर्वी ? मी नाही म्हणून सांगितले. ते म्हणाले बरं झालं तुम्हाला तीनच 'अक्कल' दाढा आहेत.हा संवाद होत असताना दाढ प्रचंड प्रमाणात दुखत असतानाही मला हसू आले.मी म्हणालो अक्कल दाढा किती असतात.ते म्हणाले वर दोन खाली दोन अशा चार दाढा असतात.तसा विचार करा गेलं तर या दाढांचा आपल्याला काही उपयोग होत नाही.' ते म्हणाले,पण या दाढा काढताना त्या हाडांमध्ये असल्याकारणाने खूप त्रास होतो. मी म्हणालो,आपण तर म्हणता या दाढांचा आपल्याला काही उपयोग नाही. मग तयार करणाऱ्याने हे उगीचच केले नसेल.याचाही आपण विचार करावा. मी म्हणालो,चला मला तीनच अक्कलदाढा आहेत. येथे आलेला हा एक फायदा झाला. दाढ काढत असताना होणार्या वेदनेमध्येही मी आनंदी होतो.
धर्म कोणताही असो,त्यातल्या माणसांनी आपल्या धर्मातल्या मयत माणसांची 'शवशरीरे' स्नान घालून,फुले वाहून;पेटीला,तिरडीला फुलाचे हार घालून आजही सजवत ठेवली आहेत.दुसऱ्या,तिसऱ्या,बाराव्या,तेराव्या दिवशी ( दिवसाचा आकडा कोणताही असू दे ) गोड पदार्थ करून आजही शेवट गोड केला जातोय. तथागतांच्या महापरिनिर्वाणाचेच हे कदाचित संचित असेल; त्याचाच हा कदाचित संस्कार असेल.युरोप- अमेरिकेतल्या काही प्रांतात मयत माणसाला निरोप देण्यासाठी नातलग, मित्रमंडळी नटून-थटून येतात.हसत-खेळत त्याला निरोप देतात.प्रेत सजवतात, सुगंधी द्रव्य त्यावर शिंपडतात आणि त्याद्वारे त्या मयताचा मृत्यू सोहळा साजरा करतात.हा सोहळा म्हणजे मला जणू जीवनाचे केलेले हे स्वागतच वाटले.
असाच परवा व्हाट्सअप वरती डॉ.रवींद्र श्रावस्ती आदरणीय लेखकांचा संदेश पडला.बोलायचं आहे वेळ आहे का? एवढा थोर माणूस पण उच्च कोटीची नम्रता पाहून मी नतमस्तक झालो. त्यांनी या पुस्तकाची निर्माण कथा सांगितली. हे पुस्तक लिहिण्यासाठी,विचार करण्यासाठी,चिंतन करण्यासाठी,मनन करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्षे लागली. हे पुस्तक लिहिलं पण लोकं हे पुस्तक स्वीकारतील का ? हा प्रश्न त्यांना रात्रंदिवस भंडावून सोडत होता. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाची सामग्री एका कोपऱ्यात ठेवून दिली. लेखकांच्या आदरणीय सासुबाईचे निधन झाले.आणि त्यावेळी सर्वप्रथम सर्व लोकांच्या समोर मृत्यू सुंदर आहे ? यास अनुषंगाने ते बोलले. त्यांचं ते बोलणं ऐकून बऱ्याच जणांनी सांगितलं आपले हे मृत्यूबाबतचे सुंदर विचार ऐकून आमची ही मृत्यूबाबतची भीती कमी झाली.आपण या विषयावर पुस्तक लिहावे. मग त्या नंतर पुन्हा अभ्यास सुरू झाला.अनेक संदर्भ ग्रंथ,रात्रीचा दिवस करून त्यांनी या मृत्युला सुंदर बनवले आहे.अशाच एका कार्यकर्त्याचा धडधाकट भाऊ मृत्यू पावला.त्याला होणारा त्रास,
जीवनातील क्षणभंगुरता,या सगळ्यांचा विचार करता लेखकांच्या एका डॉक्टर मित्रांनी हे पुस्तक त्या कार्यकर्त्याला भेट म्हणून दिले. त्यानी ते वाचावयास सुरू केले. व तीन दिवसांनी थेट लेखकांना फोन केला.आपले पुस्तक वाचून मी पूर्णपणे सावरलो आहे. मृत्यू हे जीवनातील सत्य मी मनापासून स्वीकारले आहे. आपला व आपल्या पुस्तकाचा मी मनापासून आभारी आहे. ही सत्य कथाच या पुस्तकाचं महात्म्य अधोरेखित करते.
या पुस्तकामध्ये मृत्युचे सौंदर्यशास्त्र मांडणारी कथा आहे.प्रभा व अश्वघोष ही कथा जीवन मृत्यू यामधल्या बदलांची जाणीव करून देणारी,सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जीवन जगून, जीवनातील सत्य समजून घेण्यासाठी प्रभा ने केलेले आत्मदान हे खऱ्या प्रेमाची माहिती सांगते.
'वृक्ष बोला पत्ते से,सुन पत्ते मेरी बात |
इस घर की यह रीत है,एक आवत इक जात ||
_कबीर
हे जीवनातील सत्य समजून घेतले
मृत्यु नसता तर या जगाचे वैराण वाळवंट झाले असते ! माणसातले प्रेम आटले असते; माणसे जनावरेच राहिली असते.खरे तर मृत्यूने जगण्याचे भान दिले,नैतिकता दिली.
मृत्यू सुंदर जगण्याची प्रेरणा देतो.मानवी जीवनाचे मांगल्य तगवून ठेवणारे निसर्गाचे विनाशकारी रूप म्हणजे मृत्यू ! मृत्यू तर असणारच आहे. तो येण्यापूर्वी आपले छान आयुष्य जगवून घेतलं पाहिजे.
चला, सुंदर माणसे तयार करूया,सुंदर माणसे होऊया ! मग मृत्यूचे काय बिशाद आहे
माणसांना ' ठार ' मारण्याची !
इतक्या प्रगल्भ,गुंतागुंतीच्या जीवनाची उकल साधी-सोपी करण्यामध्ये लेखक यशस्वी ठरले आहेत.
अस्तित्वा संदर्भातील काही सुक्ष्म पैलू डॉ.बंदिष्टे यांच्या भाषेतच बघूया.
प्रत्येक अस्तित्व बदलत असते.व्यक्तीच्या प्रत्येक गोष्ट म्हणा किंवा संपूर्ण विश्व म्हणा, प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. काही अस्तित्वे (उदा. घड्याळातील वर्ष दाखविणारा काटा) अगदी हळूहळू बदलत असतात,तरी इतर काही गोष्टी लवकर लवकर बदलतात व त्या बदलत आहेत,हे दिसतेसुध्दा ( उदा. नदीचे पाणी,घड्याळाचा सेकंद दाखवणारा काटा आदी ) एकूण निष्कर्ष असा, ती प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. अस्तित्व ( वास्तव ) = बदलणे, असे असेल तर बदलणाऱ्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड असतो व त्या प्रवाहाचा आकारसुद्धा जवळजवळ एकसारखाच असतो.म्हणून जी वस्तू आपण पाहतो आहे,ती पूर्वीची वस्तू आहे,असा आभास पाहणाऱ्यांना होतो.असे वाटते,की त्याच वस्तू व प्राणी पुष्कळ वेळेपर्यंत टिकून राहतात.म्हणून आपण अमुक माणसाला,झाडाला किंवा इमारतीला पुष्कळ वर्षानंतर पाहतो आहे,अशी भाषा वापरतो. पण,खरे पाहिली तर कोणतीच गोष्ट दोन क्षणसुद्धा न बदलता राहत नाही.वेळेच्या दृष्टीने प्रत्येक अस्तित्व क्षणिक आहे.
बुद्धांच्या या भूमिकेला म्हणतात.
'क्षणिकवाद'.आपण पुष्कळदा असे म्हणतो,की हा तोच माझा मित्र आहे,जो मला पाच वर्षानंतर भेटतो आहे.परंतु आपण जर शांतपणे वास्तविकता पाहिली,तर आपल्याला असे दिसेल,की आपल्या त्या मित्राचा प्रत्येक कण क्षणाक्षणाला बदलत असतो; परंतु तो बदल सूक्ष्म व सतत होत असल्याने,तो आपल्या लक्षात येत नाही.
ही सगळी स्थिती 'एकाच नदी मध्ये कोणीही दोनदा अंघोळ करू शकत नाही'या वाक्याने दर्शविली जाते. ज्या नदीमध्ये आपण आधी कधी अंघोळ केली होती,ते पाणी कधीचेच वाहून गेले असल्याने 'त्याच'नदीमध्ये आपण दुसऱ्यांदा आंघोळ करू शकत नाही.आता तिथे दुसरे पाणी आहे.ही स्थिती लोक नीट पाहत नाही व अमुक नदीमध्ये मी चौथ्यांदा किंवा दहाव्यांदा अंघोळ करतो आहे,अशी वाक्य बोलत असतात.असो, या ठिकाणी आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते, ही नदी बदलते तशी अंघोळ करणारी व्यक्ती सुद्धा सतत बदलत असते.म्हणून मग जशी कोणी व्यक्ती कोणत्याही नदीमध्ये दोनदा अंघोळ करू शकत नाही,तसेच कोणीही,कोणत्याच खुर्चीवर सुद्धा दोनदा बसू शकत नाही. खरे पाहिले तर कोणीच माणूस कोणतीही गोष्ट दुसऱ्यांदा करू शकत नाही.ज्या गोष्टी सध्याचे विज्ञान म्हणते आहे,त्या अडीच हजार वर्षांपूर्वी ( २५०० ) बुद्धांनी म्हणाव्यात ही आश्चर्याची व कौतुकाची गोष्ट आहे.दिक् - काल - शक्ती यांच्या सतत भूतकाळापासून भविष्य कडे जात असणाऱ्या प्रवाहामध्ये कोणत्याच गोष्टीची कुठेच पुनरावृत्ती असू शकत नाही.अगदी सारख्या दिसणाऱ्या दोन गोष्टींमध्येही काही न काही (जागेचा,वेळेचा,
रचनात्मकतेचा) फरक अगदी हमखास असतो .
बुद्धांच्या या क्षणिकवादाचा अर्थ,प्रत्येक गोष्टीमध्ये होणारा बदल हा त्या गोष्टीमध्ये होत असणारा पूर्ण बदल असतो.वस्तूंमध्ये काय किंवा व्यक्तींमध्ये काय अपरिवर्तित राहणारे, न बदलणारे,नित्य असे कोणतेच तत्व नसते.
वाहत असणाऱ्या प्रवाहापेक्षा निराळी अशी नदी नसते;
क्रिया व कर्ता ही दोन भिन्न तत्वे नसतात.करणारा व क्रिया एकमेकांपासून निरनिराळ्या गोष्टी नाहीत.बदलत राहणे,परिवर्तित होत जाणे हा प्रत्येक अस्तित्वाचा,प्रत्येक वास्तवाचा स्वभाव आहे, धर्म आहे.
जग हे फक्त आपापल्या स्वभावानुसार सतत परिवर्तीत होत असलेल्या,परिवर्तन पाहणाऱ्या अगणित गोष्टींचा एक अखंड प्रवाह आहे.
डॉ.बंदिष्टे लिहितात,'प्रत्येक अस्तित्व बदलते याचा अर्थ एवढाच आहे,कि ते आपल्यासारख्याच आणखी एका क्षणिक अस्तित्वाला,वास्तवाला जन्म देते. प्रत्येक अस्तित्व आपल्यासारख्याच अस्तित्वाला निर्माण करू शकते; तेवढीच त्याची निर्माणशक्ती असते व तीच हमखासपणे तिच्या निर्माणशक्तीची दिशा असते.
तथागत गौतम बुद्ध त्यांनी कोणत्याही प्रकारचे कुंपण घातलेले नाही.याच अनुषंगाने लेखकांशी मी नेहमी बोलतो.बोलण्यातून वाचण्यातून मृत्यूबाबत प्रगल्भता वाढत आहे. त्यावेळी मी लेखक साहेबांशी बोलतो त्यांची ती समजावून सांगण्याची पद्धत माझ्या मनाला प्रेमाची फुंकर घातल्यासारखी वाटते.आता तर मी ठामपणे म्हणू शकतो डॉ.रवींद्र श्रावस्ती त्यांच्याशी बोलतो तेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या मृत्यूशी बोलतो.
जैन परंपरेत निर्वाण म्हणजे मृत्यू असे मानले जाते.बौद्ध परंपरेत निर्वाणाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे; निर्वाण जिवंत असतानाच प्राप्त करावयाची गोष्ट आहे,तर परिनिर्वाण हा मृत्यू आहे.
जैनांचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांचे इसवीसन पूर्व ५९९ साली अश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता 'पावापुरी' येथे निर्वाण झाले; त्यांनी मोक्ष मिळविला.जैन पुराणाचा आधार घेऊन असे सांगता येईल,की भगवान महावीरांच्या अनुयायांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद सोहळा म्हणून अमावास्येच्या अंधारात असंख्य दिवे लावले.दिवाळी किंवा दीपावली तेव्हापासुनच साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते.या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव'असेही म्हणतात.
सुफी संत शेख इब्न अल्-हबीब या़ंच्या नजरेतून मृत्यूला जाणून घेऊ हबीब म्हणतात-
रे माझ्या बंधू,
मृत्यूसाठी स्वतःला तयार कर
मृत्यू येणारच आहे,
त्यातून येणाऱ्या दुःखाने
हृदय त्रासले - संतापले
तरी आशा सोडू नकोस
निश्चयपूर्वक प्रयत्न कर
अधिकाधिक चांगली कामे कर
एक ना एक दिवस मृत्यू आम्हाला
विलग करणारच आहे
सुफी संत रुमी हा मोठा अवलिया संत.त्याची Death is our marriage with eternity हि रचना समजून घेऊ या.
'एक दिवस मी मरणार आहे
मला माझ्या थडग्याकडे नेताना
तू मेलास,
तू मेलास,असे म्हणत
अजिबात रडू नका
मृत्यू म्हणजे जाणं नव्हे
सूर्य मावळतो,चंद्र मावतो
पण ते कुठे जात नाहीत
मृत्यू म्हणजे चिरंतनाशी लग्नच
थडगं कैदखाना वाटतो
पण ती तर मुक्ती आहे
पाशातून मुक्त होऊ या
माझे मूख बंद होते अन्
त्यातून आनंदाची आरोळी उमटून
ताबडतोब ते पुन्हा उघडते !
अशा सर्वच धर्मानी,संतांनी मृत्यूबाबत सांगितलेले.जीवन सत्य आपणास मृत्यूसौंदर्यभान आणि धर्म यामध्ये वाचावयास मिळते.थक्क करणारे सर्वच आहे.
लोकायत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले,आयुष ग्राफिक्स कोल्हापूर यांची अक्षरजुळणी आहे. या सर्वच लोकांनी जीवन व मृत्यू सुंदर आहे. हे सांगण्याचे महान कार्य केलं आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
आपलं शरीर हे मूल्यवान आहेच.शरीरासोबत असणारा आनंद,वेदना संवेदना,भावनिक गुंतागुंत,बौद्धिक गुंतागुंत असणारच!
आपलं जीवन आपल्या जीवनात घडलेल्या घटना प्रसंग त्याला धैर्याने सामोरे जावे लागेल.जीवण जसं आहे तसं ते आनंदाने स्वीकारले पाहिजे.यामध्येच जीवनाचे इतिकर्तव्य आहे.
हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकांमध्ये मला दोन औषधांच्या 'मोकळ्या चिठ्या' मिळाल्या. या मोकळया चिठ्ठ्या मला सांगत होत्या.आयुष्य मोकळ्या मनाने जगा.जे नाविन्यपूर्ण असेल,नवीन असेल ते स्वीकारा ! आयुष्य अलगदपणे फुलासारखे जगा,फुल आपलं संपूर्ण आयुष्य अलगदपणे जगते.व ज्या झाडासोबत ते आयुष्यभर राहिले. ते झाड हि ते 'अलगदपणे' सोडते.यालाच मृत्यू सुंदर आहे असं म्हटलं जातं.
जाता - जाता
या पुस्तकाचे आदरणीय लेखक माझे परम मित्र फारच कमी काळामध्ये माझ्याशी व मी त्यांच्याशी घट्ट जोडले गेलो. त्यांचं व्यक्तिमत्व हे मला फार भावलं.सुंदर जीवन कसं जगायचं,आपला मृत्यू सुंदर कसा करायचा.हा विषय तर माझ्यासाठी फारच गुंतागुंतीची आणि अवघड होता. पण मी कधीही त्यांना फोन लावला.तरी कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता ते लगेच माझ्याशी बोलायचे.इतक्या शांतपणाने,सरळ साध्या सोप्या मला समजेल अशा सोप्या भाषेत ते निरंतर मला सांगत होते.'हे पुस्तक माझ्यासाठी सुंदर वाचन, अनोळखी प्रवास होता.या प्रवासामध्ये त्यांनी मला एक क्षणही 'वाऱ्यावर' सोडले नाही.आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात ही ते मला वाऱ्यावर सोडणार नाहीत. ह्या पुस्तकाने मला ही सर्वोत्तम अशी भेट दिली आहे.
हे पुस्तक वाचून माझ्यामध्ये लौकिक व अमुलाग्र असा बदल झाला आहे.आपलं जीवन जेवढं आनंदी,सुंदर असेल,तेवढाच आपला मृत्युही आनंदी व सुंदर आहे.याची मला मनस्वी जाणीव झाली. येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायचा,उत्साहात साजरा करायचा. तो मी करतच आहे करीत राहीन. मी या सुंदर जीवनावर प्रेम करायला शिकलो आहे. मृत्यू कोणत्याही वेळी जर मला भेटायला आला. याबद्दल माझ्या मनात कोणतीही भीती,अगर शंका नाही. हेच धाडस,सत्य मला या पुस्तक वाचनातून मिळालं.
या पुस्तकानं मला खरंच ' मृत्यू सुंदर आहे ? हे सांगितलं. प्रत्येक माणसानं जीवन आनंदी व मृत्यू सुंदर आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक वेळ नक्कीच वाचावं आपला दृष्टीकोन नक्कीच बदलणार..!