* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आणि माणूस म्हणून 'मी' शहारलो..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आणि माणूस म्हणून 'मी' शहारलो.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आणि माणूस म्हणून 'मी' शहारलो.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२९/१२/२२

… आणि माणूस म्हणून 'मी' शहारलो..

प्रवास व मानवी जीवन हे संलग्न आहे.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण प्रवास करतच असतो.यातूनच नवीन नवीन शोध लागत गेले आणि माणूस माणसाच्या जवळ आला.असा हा मानवाचा प्रवास अविस्मरणीय व उत्कंठावर्धक आहे.


१४ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक जहाजाची दुर्घटना घडली.त्यानंतर बरोबर ३२ वर्षांनी म्हणजेच १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत एक भयंकर घटना घडली.ही घटना इतकी भयंकर होती,की त्यातून सावरायला कैक वर्षं लागली. खरंतर त्याला दुर्दैवी योगायोगच म्हणता येईल. झालं असं : २४ फेब्रुवारी १९४४ रोजी 'एस. एस.फोर्ट स्टिकाईन' (SS Fort Stikine) हे जहाज इंग्लंडमधल्या बरकेनहेडहून कराचीमार्गे बॉम्बेला (आताचं मुंबई) यायला निघालं.


 या जहाजात सुमारे १४०० टन स्फोटकं आणि दारूगोळा,कापसाच्या हजारो गाठी,करोडो रुपयांचं ३१ लाकडी खोकी भरून सोनं आणि सुमारे १००० लुब्रिकेटेड ऑइलची पिंप,मासे,लाकूड अशा जवळपास सगळ्याच ज्वालाग्राही वस्तू भरल्या होत्या.हे प्रचंडच धोकादायक ठरू शकतं याची जहाजाचा कप्तान अलेक्झांडर नेस्मिथला (Alexandar Neismith) चांगलीच कल्पना होती.त्यानं तशी तक्रारही केली होती,पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. १२ फेब्रुवारी १९४४ रोजी हे जहाज व्हिक्टोरिया डॉक (आताचं मुंबई पोर्ट ट्रस्ट)ला पोहोचलं.

पण त्यातलं सामान उतरवायला सुरुवात झाली ती तब्बल ४८ तासांनंतर ! दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जहाजातून अचानक धूर निघत असल्याचं लक्षात आलं आणि काही कळायच्या आतच जहाजाला आग लागली. ही आग इतकी झपाट्यानं पसरली की जहाजातले ज्वलनशील पदार्थ बाहेर काढायला वेळच मिळाला नाही. सुमारे ९०० टन पाणी फवारलं गेलं तरीही आग आटोक्यात आली नाही.सगळीकडे काळ्याकुट्ट धुरामुळे काहीच दिसत नव्हतं.४ वाजून ०६ मिनिटांनी एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला आणि काही वेळातच दुसरा महाभयंकर स्फोट झाला.पहिल्या स्फोटानंतर बॉम्बे पोर्टवरच्या टॉवरवर लावलेलं घड्याळ बंद पडलं होतं

आणि ते वेळ दाखवत होतं ती ४.०६ ! कोणालाच काही कळत नव्हतं.त्या वेळी दुसरं महायुद्ध सुरू असल्यानं काहींना तर हा जपाननं केलेला हल्ला तर नाही ना असा संशय आला


त्यातून झालेलं नुकसान प्रचंडच मोठं होतं.नुसतं या जहाजाचंच नाही,तर जहाजाच्या आसपासच्या इमारती आणि बंदरात उभी राहिलेली इतर जहाजं यांचंही नुकसान झालं. ८००० टनांपेक्षा जास्त वजन असलेल्या या जहाजाचे अक्षरशः दोन तुकडे झाले आणि ते उडून जमिनीवर पडलं.या स्फोटाचा आवाज ८० किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.१२ चौरस किमी अंतरावरच्या दारं-खिडक्यांच्या काचा फुटल्या.एवढंच नाही तर तब्बल १७०० किमी दूर असलेल्या सिमल्यातल्या भूकंपमापक यंत्रामध्येसुद्धा या स्फोटाची नोंद झाली ! १२०० हून अधिक लोक यात मृत्युमुखी पडले होते. या मृतकांमध्ये ६६ अग्निशमन दलाचे जवानही होते. या स्फोटामुळे आजूबाजूची १५ हून अधिक जहाजं छिन्नविच्छिन्न झाले. २५०० हून अधिक नागरिक यात जखमी झाले तर सुमारे ८०००० हून अधिक लोक बेघर झाले.आजूबाजूच्या ५०००० टनांहून अधिक राडारोडा पसरला होता. जहाजातल्या ३१ खोक्यांमध्ये सोनं होतं.२५ किलोची एक याप्रमाणे ४ विटा प्रत्येक खोक्यात होत्या.त्यासुद्धा शहरात अनेक ठिकाणी उडून पडल्या.त्यापैकी काही विटा तर अगदी अलीकडे म्हणजे २०११ मध्ये सापडल्याचं म्हटलं जातं.तसंच स्फोटात ५०००० टनांहून अधिक अन्नधान्यही झालं.या स्फोटाची बातमी पहिल्यांदा जपानमधल्या सैगॉन रेडिओ केंद्रानं दिली असं म्हटलं जातं.दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळे आणि बातम्यांवर बंधनं असल्यानं ही बातमी देण्याची परवानगी वार्ताहरांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिळाली. 'टाइम मॅगेझीन' मध्ये तर ती २२ मे १९४४ रोजी छापली गेली तोपर्यंत बाहेरच्या जगाला याबद्दल फारसं माहीतही नव्हतं! 


या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ६६ अग्निशमन दलाच्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थं १४ ते २१ एप्रिल हा आठवडा 'नॅशनल फायर सेफ्टी वीक' (National Fire Safety Week) म्हणून साजरा केला जातो.तसंच मुंबईतल्या भायखळा इथल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात या जवानांचं स्मारकसुद्धा बनवलं आहे.


भारताला हादरवणारी आणखीन एक मोठी घटना १९४७ साली घडली.१७ जुलै १९४७ रोजी भारतातली सर्वात भयंकर जहाज दुर्घटनांपैकी एक असलेली रामदास या बोटीची दुर्घटना घडली.देश तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर उभा होता आणि महिनाभरात देशाला स्वातंत्र्य मिळालंसुद्धा.या सर्व धामधुमीत ही दुर्घटना काहीशी दुर्लक्षित राहिली.सुमारे ११०० फुटांपेक्षा लांब आणि ४०० टनांपेक्षा जास्त वजन असलेली ही बोट स्कॉटलंडमध्ये बनवली गेली होती आणि १९४२ नंतर तिची मालकी 'इंडियन स्टीम नेव्हिगेशन कंपनी कडे होती.


१७ जुलै १९४७ रोजी ही बोट रायगड जिल्ह्यातल्या रेवस इंथं जाण्यासाठी सकाळी ८ वाजता भाऊच्या धक्क्यावरून रवाना झाली.त्या दिवशी दीप अमावास्या (ग्रामीण भाषेत गटारी अमावास्या) होती.मुंबईतले अनेक चाकरमानी अलिबाग,मुरुड अशा आपापल्या गावी निघाले होते.सकाळी निरभ्र असणारं आभाळ बोट समुद्रात ८-९ किलोमीटरवर जाईपर्यंत भरून आलं आणि थोड्याच वेळात वादळी वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.त्यावेळी ही बोट मुंबईजवळच काश्याच्या खडकाजवळ होती.समुद्रात महाकाय लाटा उसळल्या आणि बोटीत पाणी शिरून ती कलंडली.ज्यांना पोहता होतं ते किनाऱ्याच्या दिशेनं पोहायला लागले.काहींच्या हाताला सेफ्टी बोट लागली.पण अनेक दर्दैवी लोक बुडून मृत्युमुखी पडले.काही वेळानं मासळी भरलेल्या मच्छीमारांच्या नौका रेवसहून मुंबईकडे निघाल्या तेव्हा त्यातल्या मच्छीमारांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले.

तरीही बोटीत असलेल्या अंदाजे ७५० लोकांपैकी सुमारे ६९० लोकांना जलसमाधी मिळाली.


'रामदास बोट दुर्घटना' ही काही भारतातली एकमेव बोट दुर्घटना नव्हती.त्याआधी सुमारे २० वर्षांपूर्वी अशीच एक हादरवून टाकणारी दुर्घटना घडली होती. ११ नोव्हेंबर १९२७ रोजी 'एस. एस. जयंती' आणि 'एस. एस. तुकाराम' या दोन बोटींचा एकाच दिवशी एकाच वेळी आणि एकाच मार्गावर लागोपाठ अपघात झाला होता.


याआधी ८ नोव्हेंबर १८८८ रोजी जुनागढ जवळ असाच एक बोटीचा अपघात झाला होता. मुंबईतल्या दहिसरमध्ये राहणाऱ्या हाजी कासम या जमीनदाराच्या मालकीची 'एस. एस. वैतरणा' ही बोट गुजरातमधल्या कच्छ भागातल्या मांडवीमधून सुमारे ५२० प्रवासी घेऊन निघाली. त्यानंतर द्वारकेला अजून काही प्रवासी बोटीत चढले.१०००च्या आसपास प्रवासी या बोटीत असल्याच म्हटलं जातं.त्यात १३ लग्नाची वऱ्हाडं आणि मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईला जाणारे अनेक विद्यार्थीसुद्धा होते.

'विजली ' या टोपणनावानं ओळखलं जाणारं हे जहाज एका भीषण वादळात सापडलं आणि त्यातल्या सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली!


प्रत्येक जहाजाच्या नावाच्या सुरुवातीला 'एस.एस.',

'पी.एस','आरएमएस','एचएमएस' अशी अक्षरं जोडलेली असतात हे नेमकं काय आहे? यांना 'प्रीफिक्स' असं म्हणतात. या प्रीफिक्सेसमधून त्या जहाजाचा प्रकार कळतो. म्हणजे पूर्वी वाफेच्या इंजिनाची जहाजं असायची, त्यांच्यात 'एस.एस.' म्हणजे 'स्टीम शिप',

'पी.एस.'म्हणजे 'पॅडलर शिप', 'एम. व्ही' म्हणजे 'मर्चंट व्हेसल्स','आर.व्ही.' म्हणजे 'रीसर्च व्हेसल्स',

'एम.एस.व्ही.'म्हणजे 'मल्टिपर्पज व्हेसल',

'एच.एम.एच.एस' म्हणजे 'हर / हिज मॅजेस्टिज हॉस्पिटल शिप','आर.एम.एस.' म्हणजे 'रॉयल मेल शिप' वगैरे कामाप्रमाणे आणि जहाजाच्या प्रकार यांच्यानुसार नावं दिली जातात.तर अनेक देशांनुसारही हे प्रीफिक्सेस दिली जातात.उदा.,अल्जेरिया- 'ए.एन.एस.' म्हणजे 'अल्जेरियन नेव्ही शिप',फिनलंड - 'एफ.एन.एस.' म्हणजे 'फिनलंड नेव्ही शिप', भारत- 'आय.सी.जी.एस.' म्हणजे 'इंडियन कोस्ट गार्ड शिप' आणि 'आय.एन.एस.' म्हणजे 'इंडियन नेव्हल शिप' वगैरे.


जाणून घेवू 'प्रवास' या पुस्तकातील आपल्याला उत्क्रांत करणारा प्रवास…


लेखक - 

अच्युत गोडबोले 

आसावरी निफाडकर 


मधुश्री पब्लिकेशन

प्रकाशक - शरद अष्टेकर