* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वानरांची शेकोटी…।

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

वानरांची शेकोटी…। लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वानरांची शेकोटी…। लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८/१०/२२

वानरांची शेकोटी…।

 पंचतंत्रात एका ठिकाणी वानरं गुंजा जमा करून त्याभोवती शेकत बसल्याचा उल्लेख आहे.


कोणा पर्वतातील जंगलात वानरांचा कळप राहात होता.थंडीच्या दिवसांत तेथे अति शीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यांतील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्यांभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सूचिमुख नावाच्या पक्ष्याने पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अरे मूर्खानो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल असल्या,तरी त्यामुळं तुम्हांला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरिकंदरं यांचा आश्रय घ्या."


नागपुरात धंतोली भागात राहणारे वनस्पतीचे गाढे अभ्यासक आप्पासाहेब बुटी यांची ओळख १९९० साली माझे ग्रंथप्रेमी मित्र लक्ष्मणराव सोनी यांनी करून दिली. ते आप्पासाहेबांच्या शेजारीच राहतात.


आप्पासाहेब तरुणपणी चंद्रपूर, गडचिरोली इथं आणि पंचमढीजवळच्या सातपुडा पर्वतात शिकारीच्या निमित्तानं खूप भटकले आहेत. एके काळचे ते नामांकित शिकारी,परंतु शिकारीपेक्षा त्यांना वनौषधींच्या संशोधनात अधिक रस होता. अशा अरण्यभ्रमंतीत वनवासी लोकांकडून त्यांनी खूप माहिती गोळा केली आहे. त्याविषयी ते तासन् तास बोलतात. वन्यप्राण्यांचंदेखील त्यांनी जवळून निरीक्षण केलं आहे.


एकदा आप्पासाहेबांचा वनस्पतिशास्त्रावरील दुर्मीळ ग्रंथसंग्रह पाहात असता ते म्हणाले,


"चितमपल्लीसाहेब, तुम्ही कधी ऐकलंय का, जंगलातील वानरांचा कळप थंडीच्या दिवसांत शेकोटी करतो ?"


मी म्हणालो,

" परंतु वानरं तर आगीला भितात!"

ते म्हणाले,

"ऐका तर खरं,ते काटक्यांची शेकोटी रचतात, परंतु ती पेटवीत नाहीत." मी पंचतंत्रातील सूचिमुख पक्ष्यानं वानरांना विचारलेला प्रश्न आप्पासाहेबांना केला,


"मग त्यांना ऊब कशी मिळत असेल ?"

"ते मला सांगता येणार नाही!"


"तुम्ही ती शेकोटी कधी पाहिलीय्?" "मी पाहिली नाही. जळगाव जिल्ह्यातील माझ्या एका नातेवाईकानं पाहिल्याचं ते सांगत होते. "

मी लगेच म्हणालो,

"त्यांच्याकडे चौकशी करायला जायचं का? कारण वानरांविषयी मी गेली अनेक वर्षं अभ्यास करतोय.परंतु त्यांच्या या सवयीविषयी मी पहिल्यांदाच ऐकतोय. वन्यप्राणिशास्त्रावरील कुण्या नव्या किंवा जुन्या ग्रंथात याचा उल्लेख नाही.भेटी अंती सारा काही खुलासा होईल. वाटल्यास त्यांच्याबरोबर जंगलात जाऊन शेकोटीचं निरीक्षणही करता येईल!" यावर ते म्हणाले,

"असं करू या. पुढच्या म्हणजे मे महिन्यात तेच माझ्या घरी येणार आहेत. तेव्हा त्यांची ओळख करून देतो. त्यांना काय ते सविस्तर विचारा.' "


परवा रावेर तालुक्यातील विवरे गावचे श्री. अनंत रामकृष्ण कुलकर्णी यांची भेट झाली. आप्पासाहेब बुटी यांचे ते नातेवाईक. बुटी यांनीच त्यांची ओळख करून दिलेली होती.


मी शेकोटीविषयी विचारताच ते सांगू लागले :


"१९५२ सालची गोष्ट. सातपुड्याजवळ पालच्या एका शेतकऱ्यानं मला एक माकडाचं पिलू पाळायला आणून दिलं. बोलण्याच्या ओघात त्या शेतकऱ्यानं वानरं आणि माकडं शेकोटी करीत असल्याचं सांगितलं. माझा त्यावर विश्वास बसेना. म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्या शेतकऱ्याबरोबर सातपुड्याच्या जंगलात गेलो. ते थंडीचे दिवस होते. जंगलात बराच वेळ वानरांच्या शेकोटीच्या शोधात आम्ही भटकत राहिलो. शेवटी एका ठिकाणी वानरांचा कळप शेकोटीभोवती बसलेला दिसला. शेतकरी म्हणाला, " हीच ती शेकोटी".

"आम्ही त्यांच्या नजीक जाताच ती वानरं पळून गेली. मी त्यांच्या शेकोटीचं निरीक्षणं केलं. जंगलातील सुकलेल्या काटक्या-कुटक्या गोळा करून ती शेकोटी रचलेली होती.' 


मी माझ्या सोबतीच्या शेतकऱ्याला विचारलं,

"शेकोटी पेटलेली नसताना वानरांना ऊब कशी मिळते?"

त्याला ह्या गोष्टीचा खुलासा करता येईना; परंतु तो म्हणाला "या काटक्या तुम्ही पेटवून पहा. या अजिबात जळणार नाहीत. "

" मी लगेच खिशातील आगपेटी काढून त्या काटक्या पेटविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी पेट घेतला नाही. शेवटी मी त्या घरी आणल्या. त्यावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. वरवरचं रॉकेल जळलं,परंतु काटक्या मात्र जळल्या नाहीत. "

मी नंतर कुलकर्णी यांना विचारलं,

"काटक्या न जळण्याचं कारण काय असावं ?" ते काही क्षण विचार करीत म्हणाले,

"काष्ठात अग्नी असतो, हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यातील अग्नितत्त्व वानरांनी आपल्या नजरेनं खेचून घेतलं असावं!"

मी मनात म्हणालो, "हे तर अतिच झालं. वानरांना योगी म्हणायचं की काय ?"

परंतु पातंजलीनं मात्र वन्य प्राणी हे खरोखरीचे सिद्धयोगी असतात,असं विधान केलं आहे. विज्ञानाच्याही पलीकडं पाहायची आपल्या प्राचीन भारतीय विचारवतांजवळ जी दृष्टी होती. तिचा अभाव आता जाणवत आहे.


" पाखरमाया - मारुती चितमपल्ली "

यांच्या पुस्तकातून..