जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल कोणतं,असा प्रश्न विचारला की साधारणपणे त्याचं उत्तर हे व्हेटिकन सिटीमधलं एखादं चर्च / बेसिलिका किंवा स्पेनमधलं चर्च किंवा मस्कतची मशीद वा मक्का यांसारखी उत्तरं समोर येतात.पण जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल हे हिंदूंचं मंदिर आहे हे अनेकांना माहीत नसतं.आणि हे मंदिर भारताबाहेरचं आहे ही माहिती तर बहुतेकांना नसतेच !
कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर असलेलं 'अंगकोर वाट' हे मंदिर म्हणजे जगातील सर्वांत मोठे पूजास्थल आहे.दक्षिणपूर्व आशियात 'वाट' चा अर्थ 'मंदिर' होतो.कित्येक मैल पसरलेल्या ह्या मंदिरात बांधलेली एक भिंतच मुळी साडेतीन किलोमीटर लांब आहे.मेरू पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे बनविलेल्या ह्या मंदिराच्या आतील बांधकामाची लांबी-रुंदी दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे.ह्या मंदिराचा एकूण परिसर चारशे चौरस किलोमीटर पसरलेला आहे.
ह्या मंदिराचं महत्त्व किती आहे? तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजात ह्या हिंदू मंदिराला जागा दिलेली आहे.हे मंदिर आपल्या देशाच्या हद्दीत रहावं म्हणून काही वर्षांपूर्वी कंबोडिया आणि थायलंड ह्या देशांमध्ये भलं मोठं युद्ध भडकणार होतं.युनेस्कोने ह्या मंदिराचा 'जागतिक वारशांच्या यादीत' समावेश केलेला आहे.आणि जगभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.
इसवी सन अकराशेच्या प्रारंभीच्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झाले आणि अकराशेच्या मध्यावर ते पूर्ण झाले.त्या काळात हा प्रदेश 'कंबोज प्रांत' म्हणून ओळखला जात होता.
जावा,सुमात्रा,मलाया,सुवर्णद्वीप,सिंहपूर हा संपूर्ण प्रदेश हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता.कंबोजचा तत्कालीन राजा सूर्यवर्मा (द्वितीय) ने ह्या विष्णू मंदिराचे निर्माण केले. मुळात हे एक मंदिर नाही,तर हा मंदिरांचा समुच्चय आहे.संस्कृतमधे 'अंगकोर'चा अर्थ होतो - मंदिरांची नगरी.मंदिरांचा भव्य परिसर एका चौकोनी कालव्यामुळे किंवा खंदकामुळे सुरक्षित राहील अशी रचना केलेली आहे.ह्या खंदकावरचा पूल पार करून आपण मंदिरात प्रवेश करू लागलो की,एका एक हजार फूट रुंदीच्या,अक्षरशः भव्य-दिव्य अशा प्रवेशद्वाराने आपले स्वागत होते.ह्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातले प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. समुद्रमंथनाचे अद्भुत दृश्य अनेक मूर्तीच्या मदतीने साकारलेले आहे.अंगकोरचे जुने नाव यशोधपुर होते.नंतर मात्र ह्या विशाल मंदिरांमुळे ते अंगकोर झाले.
ह्या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि संपूर्ण मंदिर परिसराची रचना बघून मन थक्क होतं.
सुमारे ९०० ते १,००० वर्षांपूर्वी इतके अचूक बांधकाम करणे त्या काळच्या हिंदू स्थापत्यकारांना कसे शक्य झाले असेल? ह्या मंदिराची केंद्रीय संरचना बघून हे अनुमान निश्चित काढता येतं की,त्या काळी मंदिर बांधण्यापूर्वी,ह्या मंदिर परिसराचे नकाशे काढले गेले असतील.त्यात 'सिमेट्री' साधली गेली असेल,अन् त्याप्रमाणेच नंतर निर्माणकार्य झाले असेल.इजिप्त आणि मेक्सिकोच्या स्टेप-पिरामिडप्रमाणे ही मंदिरं,जिन्यांच्या पायऱ्यांवर उठत गेली आहेत.ह्या मंदिरांवर पूर्णपणे चोल आणि गुप्तकालीन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो.विशेषतः रामायणाचे प्रसंग ज्या नजाकतीनं दाखविले आहेत,ते बघून आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत राहतात.
दुर्दैवाचा भाग इतकाच की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजात जगातले सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे,त्या देशाशी भारताने आजवर कसे संबंध ठेवले ? तर अगदीच कोरडे.हे जगप्रसिद्ध मंदिर बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.पण त्यात भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य असते.पण मूळ मुद्दा तसाच राहतो,तो असा की भारतीय (किंवा त्या काळात म्हटल्या गेल्याप्रमाणे हिंदू) स्थापत्यशास्त्राची ही कमाल भारताबाहेर प्रकटली तरी तिचे मूळ किती जुने आहे...? म्हणजे स्थापत्यशास्त्रात आपण भारतीय किती काळापासून पुढारलेले आहोत ?
भारतातील अनेक देवळे विदेशी आक्रमकांनी आणि विशेषतः मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केली. त्यामुळे दोन / तीन हजार वर्षांपूर्वीची स्थापत्यकला आपल्याकडे दिसणं हे तसे दुर्मीळच.मात्र त्या कलेचे अंश झिरपत आलेले आहेत.
त्यामुळे अगदी हजार / दीड हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देवळांमध्येही स्थापत्यशास्त्राचे अद्भुत चमत्कार दिसतात.विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हम्पी'ला होती.या साम्राज्याला तीन मुसलमान पातशाह्यांनी मिळून पराभूत केल्यानंतर त्या सर्वांनी ह्या समृद्ध हिंदू साम्राज्याला मनसोक्त लुटले.अनेक मंदिर फोडली,नष्ट केली.मात्र जी काही उरली ती आजही स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत खुणा मिरवताहेत.
हम्पीच्या एका मंदिरात प्रत्येक खांबामधून संगीताचे सा, रे, ग, म. असे वेगवेगळे सप्तसूर निघतात.
हे त्यांनी कसं केलं असेल ? यासंबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही.असेल तरी ते आक्रमकांनी नष्ट केलंय.इंग्रजांनी ह्या स्थापत्य चमत्काराचे गूढ शोधण्यासाठी त्या संगीतमय सुरावटीतला एक खांब कापला (त्याचा क्रॉस सेक्शन घेतला). तो खांब पूर्ण भरीव निघाला..! त्याला बघून इंग्रजांचंही डोकं चालेना.अगदी एकसारख्या दिसणाऱ्या खांबांमधून संगीताचे वेगवेगळे सूर कसे उमटत असतील ? जगाच्या पाठीवर भारत सोडून इतरत्र कोठेही ही अशी खांबांमधून उमटणाऱ्या स्वरांची गंमत आढळत नाही.
फक्त इतकंच नाही,तर भारतातलं एकेक मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचं एक एक बुलंद उदाहरण आहे.ह्या मंदिरांचा वास्तुविशारद कोण, बांधकाम- प्रमुख कोण होता,ही मंदिरं कशी बांधली,ह्या सर्वांबद्दल काही म्हणता काहीही माहिती मिळत नाही.
मंदिरातील स्थापत्यशास्त्राविषयी आणि त्यातील विज्ञानाविषयी तसं अनेकांनी लिहिलंय.पण पुण्याच्या श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे ह्या दम्पतीने दुचाकीवर फिरत महाराष्ट्राच्या अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित मंदिरांमधील 'स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आणि विज्ञानाचे अधिष्ठान'उजेडात आणले आहे.
ग्रीनविच ही पृथ्वीची मध्य रेषा आहे असे इंग्रजांनी ठरविण्याच्या बरेच आधी भारतीयांनी पृथ्वीचे अक्षांश/ रेखांश आणि मध्यरेषा यांची व्यवस्थित कल्पना केलेली होती.ती मध्यरेषा तेव्हाच्या 'वत्सगुल्म' (म्हणजे आताच्या वाशीम) मधील मध्येश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीतून जाणारी हीच रेषा पुढे उज्जयिनीत जात होती, जिथे मोठी वेधशाळा बांधण्यात आली.आजही उज्जैन आणि वाशीम हे एका सरळ रेषेत येतात.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात विशिष्ट दिवशी सूर्याच्या किरणांचा प्रकाश सरळ देवीच्या मूर्तीवर पडतो हेही ह्या स्थापत्यशास्त्राच्या परफेक्शनचं उदाहरण.
स्थापत्यशास्त्रात आपण किती पुढारलेले होतो? तर ज्या काळात कम्बोडियात अंगकोर मंदिर बांधलं जात होत,त्याच काळात चीनच्या बीजिंग ह्या राजधानीची नगररचना एक हिंदू स्थापत्यशास्त्री करत होता..! होय,बीजिंग शहराचं आर्किटेक्ट हे एका हिंदू माणसाचं आहे. त्याचं नाव बलबाहू.सध्या नेपाळमधे असणाऱ्या पाटणचा हा रहिवासी.
पाटण हे कांस्य आणि इतर धातूंच्या ओतकामाबद्दल प्रसिद्ध होतं.या शहरातील लोकांनी घडविलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तीना तिबेट आणि चीनमधे मागणी होती.बाराव्या शतकाच्या मध्यावर चिनी राजाने केलेल्या मदतीच्या विनंतीला मान देऊन पाटणमधील ऐंशी कुशल कामगार चीनकडे निघाले.त्यांचं नेतृत्व करत होता,बलबाहू,जो तेव्हा फक्त १७ वर्षांचा होता.
पुढे चीनमधे बलबाहूचे आरेखन आणि बांधणीतले कौशल्य बघून चीनच्या राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचे काम दिले. बलबाहूने ते सफलतापूर्वक करून दाखवले.
चिनी संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या, उतरत्या टोकदार,डौलदार व एकाखाली एक छपरांची परंपरा बलबाहूनेच सुरू केली.
चीनमधे बलबाहू 'आर्निको' नावाने ओळखला जातो. चिनी शासनाने १ मे सन २००२ मधे बलबाहू (आर्निको) च्या नगररचनेमधील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीजिंगमधे त्याचा मोठा पुतळा उभारलाय.
२६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..