विचार,विचार आणि विचार! प्रत्येक क्षणाला व गोष्टीला जी माणसे विचारांनीच उत्तर देतात, अशी माणसे वास्तवाचे नेमके आकलन करू शकत नाहीत. ती सदैव भासचित्रात वा खोट्या कल्पनेत जगत राहतात आणि म्हणूनच सदैव अडचणीत येतात.
- अँलन वॅट्स
होल्डन कॉलफिल्ड हे लेखक जे.डी.सॅलिंजर
कादंबरीतील एक पात्र आहे.आपल्याच विश्वात ही व्यक्तिरेखा विलक्षण गुंग असते. अवतीभोवतीच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅनहाटनच्या रस्त्यावरून हिंडणारा तरूण - होल्डन कॉलफिल्ड !
उतावीळपणा,भीती,आणि लाज या तीन गोष्टींतून असमाधान आपल्याला घेरून टाकत असते.खरे तर,हे तिन्ही पाहुणे न बोलवताच आपल्या घरी येत असतात.दुःखातून वा समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण सदैव उतावीळ होत असतो.
जे. डी. सॅलिंजर या लेखकाच्या 'द कॅचेस ऑफ राय' या कादंबरीचा नायक शाळेच्या वातावरणात गुदमरलेला आहे.मोठे होण्याची भीती त्याच्या मनात दडलेली आहे.मुळात सॅलिंजर हा लेखक न्यूनगंड आणि अपरिपक्वता यांनी ग्रासलेला होता आणि हे त्याच्या आत्मचरित्रावरून लगेच लक्षात येते.
जॉन फॅन्टेच्या 'बंदिनी' कादंबरीतील अँरटूरो गर्बिअल बंदिनी ही मुख्य व्यक्तिरेखा देखील अल्टर ईगोने ग्रासलेली आहे.या पात्राला मोठा लेखक बनायचे आहे. त्या प्रयत्नात तो भेटणाऱ्या प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
प्रचंड अहंकार आणि असुरक्षिततेच्या तीव्रतम भावनांवर मात करण्यासाठी जॉन फँटेला प्रचंड झुंजावे लागले. त्याच्या मार्गात सर्वत्र धुके पसरले होते.त्यातून तो नैराश्यात गेला. या निराशेच्या भरात त्याने आपल्या लेखनाचे सर्व हक्क एका प्रकाशकाला नगण्य भावात विकले. पुढे त्याचा त्याला पश्चात्ताप झाला.मुख्य म्हणजे, आयुष्याच्या शेवटी तो आपल्या न्यूनगंडातून बाहेर पडला.
वॉकर पर्सीच्या आपल्या 'मुव्ही गोर' या कादंबरीचा नायक चित्रपटांचा शौकिन असतो. खोट्या कल्पनाचित्रात भासचित्रात रमणारा नायक वास्तवतेपासून फारकत घेऊन,आपल्याच कोशात स्वतःला गुरफटून घेतो.
वरील सर्व पात्रे ही न्यूनगंडाने ग्रासलेली आणि एकसूरी आयुष्य जगणारी आहेत.ते आपल्या विचारचक्रातून बाहेर पडूच शकत नाही.अर्थात या कादंबऱ्यांच्या लेखकांनी आपल्या अहंगंडावर वा न्यूनगंडावर तारुण्यात जर मात केली असती, तर त्यांच्या कलाकृतींनी अगदी वेगळे वळण घेतले असते.
बालकलाकार शेर्ली टेंपल हिने आपल्या आत्मचरित्रात,
आपल्या आयुष्याचा सच्चा वृत्तांत लिहिला आहे.आयुष्यात तिची झालेली फसवणूक,तिची झालेली चुकीची ऑपरेशन्स, तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार,या साऱ्या गोष्टींचा साद्यन्त वृत्तांत,तिच्या या आत्मचरित्रात आहे.इतकेच नव्हे तर,तिला अनेक क्षणी न्यूनगंडानी ग्रासल्याचेही तिने लिहिले आहे. त्यामुळे त्या अपराधीगंडामुळे ती स्वतःला घरात कोंडून घेत असे!
तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवता न आल्यास तुमच्यात अपराधीपणाची भावना आकाराला येते.
अपराधीपणाची भावना ही अहंकाराचाच एक भाग आहे.ती अहंकाराशी केवळ संबंधितच आहे असे नाही तर ती अहंकाराच्या आत आहे. वाढत्या वयात व्यक्तीला अनेक समस्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागते.
कधी कधी आयुष्य हीच समस्या बनते.त्यातून मग अधीरपणा आणि नैराश्य वाढीस लागते.
प्लेटो म्हणतो:काही माणसे ही आपल्या विचाराच्या भोवऱ्यातच अडकलेली असल्यामुळेच पुढे ती न्यूनगंडानी ग्रासली जातात.
अहंगडमध्ये आपल्यातला 'मी' सतत पुढे जात, स्वतःला मिरवायला बघतो.त्यात प्रदर्शनाचा मोठा भाग असतो.'मी'ला मिरविणे,सतत 'मी'चे कर्तृत्त्व व कौतुक,
मोठेपणाचा हव्यास या गोष्टी अहंगडात येतात,तर न्यूनगंडातला 'मी' मात्र सतत मागे मागे आपल्या स्वतःच्या कोशात राहण्याचा प्रयत्न करतो.सतत स्वतःला दोष देत राहणे,कमी लेखणे तसेच स्वतःला झाकून ठेवणे, स्वतःला व्यक्त करण्यास घाबरणे... या सारख्या गोष्टी न्यूनगंडात येतात.
एक आत्मसंतुष्ट नेतृत्त्व म्हणून सिव्हिल वॉर जनरल जॉर्ज मॅकलीन यांचा नेहमीच उल्लेख केला जातो.स्वतःच्या कल्पनाविश्वात जॉर्ज मग्न राहिल्यामुळे तो आपल्या भूमिकेवर व धोरणांवर नेहमी खूष रहायचा! यातही प्रत्यक्ष नेतृत्त्व करण्याची वेळ जेव्हा त्याच्यावर आली,तेव्हा त्याच्या गाडीची चाके चिखलात रुतून बसली. एकूणच,आपल्या विचारांची तटबंदी तोडून बाहेर पडत,प्रत्यक्ष कृती त्याच्या हातून कधी घडली नाही.
परिणामतः त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
जॉर्जला वाटायचे की,आपल्या शत्रूचे सैन्यबळ वाढत चाललेले आहे.खरे तर तसे काहीही नव्हते.वस्तुतः तीन वेळा त्याला शत्रूवर मात करण्याची संधी लाभली होती,पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही.दुसरे असे की, राजकीय विरोधक आपल्याविरुद्ध कट-कारस्थाने करीत असल्याचे जॉर्जला सतत वाटायचे! हे विरोधक एक दिवस आपल्यावर मोठ्या आक्रमकतेने आक्रमण करतील,असे त्याला वाटायचे! वास्तविक तसे काही नव्हते! हे सारे त्याच्या कल्पनांचेच खेळ होते.
भ्रम-भामकता,खोटी स्वप्ने यात रमणाऱ्या जॉर्जला वाटायचे की,एक परिपूर्ण नियोजन आणि एक निर्णायकी मोहिम आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे.आपली मोहिम यशस्वी होऊन आपण मोठा विजय प्राप्त केला आहे,अशी स्वप्ने त्याला पडत असत! असा विजय प्राप्त केल्याबद्दल तो स्वतःचेच अभिनंदन करायचा! आपल्या धारणा,खोट्या कल्पना-विचार यात जॉर्ज इतका अडकला होता की,प्रत्यक्ष कृती त्याने कधीच केली नाही. इतकेच नाही तर, वाट्याला जर अपयश आले, तर त्याचे खापर तो आपल्या सहकार्यांवर
काढत असे कोणा वरिष्ठानी जाब विचारला,तर तो एखाद्या चिडखोर मुलाप्रमाणे चिढायचा, आकांडतांडव करायचा! त्याच्या भ्रमिष्ठ वर्तनाला सारेच होते.धरसोड वृत्तीमुळे जॉर्ज आपल्या आयुष्यात कधी यशस्वी होऊ नाही.
जार्ज मॅकलीनचा अहंकार विराट असल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे.त्याचा फाजिल आत्मविश्वास अगदी हास्यास्पद ठरला, स्वतःच्या कर्तृत्वाचे खोटे रिपोर्टस तयार केले होते.अर्थात पुढे ते सारे उघडकीस आल्यामुळे जॉर्जची मोठी नाचक्की झाली.
आपण कोणीतरी असामान्य आहोत,आपले कर्तृत्त्व देदिप्यमान असून आपण विलक्षण बुद्धिमान आहोत,असा अनेकांचा गोड गैरसमज असतो.त्यामुळे अशी माणसे अनेकदा तोंडावर आपटतात.तसे पाहता आपण सारे जण हे नैराश्य,उदासीनता,अधीरता,संशय,नपुंसकता, दुःख,वेदना,लहरीपणा,क्रोधविवशता यांनी या ना त्या प्रकारे ग्रासलेले असती.इतकेच नाही तर, आपण सारे वय वाढल्यानंतरही पौंगडावस्थेतील तरुणाप्रमाणे वागत राहतो.अर्थात याला काही अपवाद असू शकतात.
पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था चमत्कारिक होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन,समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू शकते.स्वतःचे व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे कल वाढू लागतो.काही मुलामुलींच्या चेहऱ्यावर विशिष्ट पुळ्या (तारुण्यपीटिका) उठू लागतात.मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंड निर्माण होऊ शकतो.आपल्या आवडीनिवडीवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा या वयात मुलेमुली झुगारून देऊ शकतात.
सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व नैतिक अशा विषयांवर चर्चा होऊन मुलेमुली स्वतःची मते धीटपणे मांडायला लागतात.त्यांची कामाची व अभ्यासाची क्षमता वाढते,मात्र काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद,चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणे दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा,हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता,
न्यूनगंड,लैंगिक व्याधी,अस्थिरता इ.परिणाम दिसून येतात.
काही माणसे ही रस्त्याने चालत असताना अद्भुत कल्पना रम्य कल्पनात गुंगलेली आढळतात. कानात हेडफोन घालून आपल्याच विश्वात गुंग असतात.
अवतीभवती काय घडते आहे याचे त्यांना थेंबभर देखील भान नसते.भोवताली घडणाऱ्या गोष्टीत सहभागी न होता ते आपल्या डोक्यातील विचार चक्रात कैद होऊन गेलेली असतात.परिणामतः कमालीचे मुडी,संशयी, भयगरस्थाने आणि सामान्यता यांनी वेढलेली राहतात.
जनरल मार्शल यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डायरी लिहिण्याची विनंती अनेकांनी विनंती केली होती,पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली होती.डायरी लिहिणे हे एकप्रकारे, आपण किती मूलगामी व महत्वाचे काम करीत आहोत,आपले कर्तृत्त्व,आपल्या भूमिका, आपली तत्त्वे,विजयाकडे व शिखराकडे जाणारी आपली वाटचाल,वाट्याला आलेल्या वेदनेवर सहजपणे आपण कशी मात केली... या आणि अशा गोष्टींचे नोंदणीकरणच असते. प्रत्यक्षात त्याचा तसा उपयोग नसतो. कोणीही आपल्या पराभवाची,नैराश्याची,वैगुण्याची तसेच आपल्यातील अहंगडाची वा न्यूनगंडाची कहाणी मांडत नाही,अहंगंडाला ठेच लागून आपण कसे शहाणे व समंजस झालो,असे कोणीही लिहिताना मला तरी दिसले नाही.
भ्रामक कल्पनांचे खेळ आपल्याला सर्वांनाशाच्या दरीत लोटू शकतात.म्हणूनच आपण भासचित्रातून वा खोट्या कल्पनातून वेळीच बाहेर पडले पाहिजे.स्वतःचे नेमके आकलन करून घेत वास्तवतेचा आपण सन्मान केला पाहिजे.अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीत सहभागी व्हा!
आकलनातील वैभव व समंजसपणा
दिवसागणिक वाढवत न्यायला हवा!स्वच्छ मोकळेपणासह संपूर्ण वर्तमानात जगणे,
यासाठी मोठे ध्येय लागते.तेही मोठ्या निर्मितीक्षमतेने शहाणपणात वाटचाल करत राहणे,नेहमीच मूल्यवान ठरते.
इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलिडे
या पुस्तकातून सन्मानाने
गोयल प्रकाशन