अँटलांटिक महासागरात फ्लोरिडा,बर्म्युडा आणि प्यूर्टोरिको या तीन ठिकाणांना जोडणारा एक भाग या समुद्रात आहे.त्रिकोणाकृती असलेल्या या भागाला 'बर्म्युडा ट्रॅगल' म्हटलं जातं.हाच भाग डेव्हिल्स ट्रेंगल या नावानंसुद्धा कुप्रसिद्ध आहे. त्याला कारणही तसंच आहे.या भागात अनेक विमानं तसंच मोठमोठी जहाज गायब झाली आहेत.त्यांचा तसंच त्यावरचे कर्मचारी तसंच प्रवासी यांचा नंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही.कित्येक वर्षं हे सगळं गूढ बनून राहिलं होतं.त्याविषयी विविध तर्कवितर्क केले अनेक अफवा उठल्या.समुद्री चाच्यापासून अगदी परग्रहावरच्या जिवांपर्यंत (एलियन्स) असे सर्व अंदाज लोकांनी बांधले.असं काय रहस्य होतं त्या भागात ?
'बर्म्युडा ट्रॅगल'ची ओळख तशी जुन्या काळापासून होती.अनेक दर्यावर्दींना या भागात काहीतरी रहस्यमयी आहे हे लक्षात आलं होतं. ५०० वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा पहिल्यांदा जगप्रवासाला निघाला तेव्हा त्यानं प्रथम याचा उल्लेख केला होता.१४९२ साली या भागातून जात असताना त्यान अद्भुत आणि भयावह असं काही तरी बघितलं.एका रात्री त्यानं या भागात आगीचा एक प्रचंड असा आगडोंब बघितला.त्याच्याकडचं होकायंत्र विचित्र प्रकारे दिशा दाखवत होते.वादळ नसतानाही प्रचंड मोठ्या लाटा तिथं उसळत होत्या.
१९१८ मध्ये 'यू.एस.एस.सायक्लोप्स' (USS cyclops) हे जहाज बार्बाडोसमधून 'मँगनीज' हे खनिज घेऊन निघालं.३०९ कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेलं हे जहाज रहस्यमयरीत्या अदृश्य झालं. नंतर त्या जहाजाचा आणि त्यावरच्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रोटिअस आणि नेरिअस ही दोन जहाजं तेच मँगनीज खनिज वाहून नेताना याच भागात बेपत्ता झाली आणि त्यांचाही पुढे शोध लागला नाही.५ डिसेंबर १९४५ रोजी या भागात घडलेल्या अजून एका गूढ घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं! अमेरिकन नौदलाची 'फ्लाईट १९' ही पाच 'टीबीएम अँव्हेजर (TBM Avenger) या बॉम्बर्स विमानांची तुकडी प्रशिक्षणासाठी या भागावरून जात होती.ही संपूर्ण तुकडी तिथं गायब झाली.त्या घटनेनंतर लगेचच या विमानांची शोधाशोध सुरू झाली.अनेक विमानं त्यासाठी रवाना झाली.त्यापैकी एक असलेलं 'पीबीएम मरीनर' (PBM Mariner) हे विमान त्यातल्या १३ कर्मचाऱ्यांसह याच ठिकाणी बेपत्ता झालं.यापैकी कोणत्याच विमानाचा शोध लागला नाही.
फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरच्या एका जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या वेळी आकाशात मोठे स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर तिथं मोठं वादळही आलं होतं.शेवटी वाट चुकल्यानं आणि वादळात सापडल्यानं ही विमानं अपघातग्रस्त झाली असावीत,असा निष्कर्ष अमेरिकन नौदलाकडून काढण्यात आला. बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या अथवा दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजं विमानांची यादी फार मोठी आहे. ७५ च्या आसपास विमानं तर १०० हून अधिक जहाजं इथं गायब झाल्याचं सांगितलं जातं.या भागातून जाणारी जहाजं किंवा विमानं अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता होतात आणि त्यांचा कुठंच शोध लागत नाही हे प्रत्येक घटनेनंतर सिद्ध होत गेलं.
अनेक वैज्ञानिक यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते.शतकानुशतकं हे प्रयत्न चालू होते.पण त्यांना यश न मिळाल्यानं यामागचं गूढ वलय आणखीनच दाट होत गेलं. भुताखेतांचा वावर,समुद्री चाच्यांची लूटमार, परग्रहावरचे जीव अर्थात एलियन्स,चक्रीवादळ, मानवी चुका,होकायंत्रात होणारे बदल तसंच या क्षेत्रात असलेलं मिथेन हायड्रेट्सचं जास्त प्रमाण अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. तरी खात्रीशीर असं कुठलंही कारण सापडत नव्हतं.अलीकडच्या काळात शास्त्रज्ञांच्या एका संशोधनादरम्यान मात्र हे रहस्य उलगडलं आहे. निदान तसा दावा तरी आहे.या दाव्याप्रमाणे त्या भागात षटकोनी ढगांची निर्मिती होते आणि हे ढग एखाद्या 'एअरबॉम्ब'सारखं काम करतात.या ढगांमध्ये मेकॅरोबर्स्ट तयार होऊन ते वेगानं समुद्रावर आदळतात.त्यामुळे तिथं २५० किमी प्रतितास यापेक्षाही अधिक वेगानं वारे वाहतात आणि प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे विमानं आणि जहाजं तिथून पुढे जाऊ शकत नाही आणि तिथंच गायब होतात असं या नव्या संशोधनात सांगितलं गेलं आहे.
'प्रवास' या पुस्तकातून अच्युत गोडबोले व आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन