गॅलिलिओचा मृत्यू झाला आणि त्याच वर्षी इंग्लंडमध्ये सतराव्या शतकातील एका महान वैज्ञानिकाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं आयझॅक न्यूटन
गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे सर्वमान्य असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने दोन शतकांपर्यंत गणित,पदार्थविज्ञान,
खगोलशास्त्र यात मौलिक अशी भर टाकली.
सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन बसला असताना,झाडावरून सफरचंद खाली पडले आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला.अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.सफरचंद खाली पडत असलेले न्यूटनच्या आधीही आणि न्यूटनच्या काळातही अनेकांनी पाहिलेले असणार.पण सिद्धांत सुचण्यासाठी लागणारी प्रगल्भता ही काही जणांकडेच असते.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याला १६६६ मध्ये सुचला आणि जवळपास १६८७ मध्ये 'प्रिन्सिपिया' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित केला.
'विश्वातील कोणत्याही दोन वस्तूतील आकर्षण हे त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाशी समप्रमाणात आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते' हा त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.
या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताने पदार्थविज्ञान आणि खगोलविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.
न्यूटनच्या गतीविषयक नियमांनी
खगोलविज्ञानाला चालना दिली.
'कोणतेही बाह्य बल कार्यरत नसेल तर स्थिर वस्तू स्थिर आणि गतिमान वस्तू त्याच गतीमध्ये राहते ' हा न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम.
सर्व ग्रह सूर्याभोवती का फिरतात याचे उत्तर या नियमामुळे मिळाले.ग्रहांची निर्मिती ज्यावेळेस झाली,त्यावेळेस त्यांना जी गती मिळाली त्या गतीने ते आजतागायत फिरताहेत.कृत्रिम उपग्रह,अंतराळ स्थानक,हबल दुर्बिण इतर मानवनिर्मित वस्तू न्यूटनच्या या पहिल्या नियमानुसारच अंतराळात फिरत आहेत.कृत्रिम उपग्रहांना फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही.
एका ठराविक उंचीवर पोहोचल्यानंतर त्यांना जी गती दिली जाते,त्याच गतीत ते कायमस्वरुपी फिरत राहतात.न्यूटनचा गतीचा तिसरा नियम दोन वस्तूमधील क्रिया- प्रतिक्रिया संदर्भात आहे.
'प्रत्येक क्रियेला समान आणि विरूद्ध अशी प्रतिक्रिया असते'
या नियमाच्या उपयोगानेच अवकाश संशोधनाचा पाया घातला होता.रॉकेट अंतराळात सोडण्यासाठी या नियमाचा उपयोग मानवाला करता आला.
टीव्ही,मोबाईलद्वारे संदेशवहन हे उपग्रहांच्यामुळेच आज शक्य झालेले आहे.मोबाईलवर तासन् तास बोलणारे न्यूटनचे या तंत्रज्ञानाबाबतीतील ऋण व्यक्त करण्यासाठी वेळ काढतील असं वाटत नाही.
७ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील भाग..