साधारण दीड वर्षांपूर्वी,म्हणजे नक्की सांगायचं तर एप्रिल,२०१६ पासून मध्यप्रदेशाच्या उज्जैनमधे सिंहस्थ कुंभमेळा भरला.किमान २ ते ३ कोटी माणसं उज्जैन- सारख्या लहानशा शहरात महिना / दीड महिन्याच्या कालावधीत आली,त्यांनी क्षिप्रेत स्नान केलं अन् पुण्य गाठीशी बांधलं.याच उज्जैनमधे एक इतिहासकालीन आश्चर्य उभे आहे.ते म्हणजे - वेधशाळा.कुंभमेळ्याच्या भाविकांपैकी किती जणांनी ह्या वेधशाळेला भेट दिली,कोणास ठाऊक.पण ही वेधशाळा म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञानाची किंचित खुली झालेली कवाडं आहेत.आणि ते ज्ञान आहे खगोलशास्त्राचे..!
सन १७३३ मध्ये राजस्थानातील आमेरचा राजा सवाई जयसिंग (द्वितीय) याने ही वेधशाळा बांधली.तेव्हा तो माळव्याचा सुभेदार होता. उज्जैन व्यतिरिक्त दिल्ली,काशी,मथुरा आणि जयपूरमधेही ह्या राजा जयसिंगने वेधशाळांची निर्मिती केली.त्याने पहिली वेधशाळा बांधली ती दिल्लीची.सन १७१० मध्ये बांधून झाल्यावर त्या वेधशाळेतील आकड्यांचे विश्लेषण केले आणि ते बरोबर आहेत असं समजल्यावर इतर चार वेधशाळा उभारल्या.
हा सवाई जयसिंग खगोलशास्त्राचा चांगलाच जाणकार होता.संस्कृतवर त्याचं प्रभुत्व होतं.
त्याचबरोबर,मोगलांबरोबर राहून त्याने अरबी आणि फारसी भाषाही शिकल्या होत्या.गंमत म्हणजे याला मराठी सुद्धा चांगली येत होती.याचा बराच काळ औरंगाबाद,दौलताबाद,नगर इत्यादी ठिकाणी गेला होता.संभाजीला परास्त करून,हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी औरंगजेब जी चतुरंग सेना घेऊन महाराष्ट्रात शिरला,त्या सेनेत सामील व्हायचं सवाई जयसिंगाला फर्मान सुटल.त्या वेळी त्याचं वय होतं अवघं १४ वर्षं. त्याने बरीच टाळमटाळ केली.शेवटी औरंगजेबाचे दूत आमेरपर्यंत आले,तेव्हा जयसिंगाला जावंच लागलं.
असं म्हणतात,सवाई जयसिंगाने महाराष्ट्रातल्या त्या धामधुमीच्या काळातही,तिथल्या ग्रंथांचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातून बरेच ग्रंथ गोळा करून नेले.
या जयसिंगाला खगोलशास्त्रात निपुण करण्याचं श्रेय जातं मराठी माणसाला.पंडित जगन्नाथ सम्राटाला.नावात सम्राट असलं तरी हा राजा जयसिंगाला वेद शिकविण्यासाठी नेमलेला ब्राम्हण होता.मात्र या जगन्नाथ पंडिताचा खगोलशास्त्राचा दांडगा अभ्यास होता.याने 'सिद्धांत कौस्तुभ' या ग्रंथाची रचना केली होती. आणि युक्लीडच्या भूमितीचा अरबीमधून संस्कृतमधे अनुवादही केला होता.
सम्राट जगन्नाथाच्या नेतृत्वाखाली सवाई जयसिंगने वेधशाळा बांधताना कुठेही धातूचा उपयोग केलेला नाही.
युरोपमधील वैज्ञानिकांनी धातूची उपकरणं वापरल्याने आणि धातूंमध्ये मोसमाप्रमाणे आकुंचन / प्रसरण होत असल्याने अनेकदा गणना चुकते.मात्र सवाई जयसिंगांच्या पाचही वेधशाळांमधे चुना विशिष्ट आकारात घडवलेले दगड,यांच्याच मदतीने सर्व यंत्रं उभारली आहेत.
दुर्दैवाने ह्या पाच वेधशाळांपैकी उज्जैन आणि जयपूरच्याच वेधशाळा आज ही काम करतात.मथुरेची वेधशाळा तर नष्टच झालेली आहे.तर काशीची अत्यंत जर्जर अवस्थेत आहे.उज्जैनच्या वेधशाळेत सम्राट यंत्र,नाडी वलय यंत्र,दिगंश यंत्र,भित्ति यंत्र आणि शंकु यंत्र बनलेले आहेत.ही वेधशाळा बांधण्याचा काळ हा मराठ्यांच्या माळव्यात प्रवेश करण्याआधीच्या काही वर्षांचा आहे.पुढे १९२५ मधे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी ह्या वेधशाळेची डागडुजी केली होती.
सवाई जयसिंगाच्या पाच वेधशाळांपैकी उज्जैनच्या वेधशाळेचं महत्त्व का..? तर पूर्वी, म्हणजे
इसवी सनाच्या चारशे वर्षं पूर्वीपर्यंत अशी मान्यता होती की पृथ्वीची देशांतर रेषा (मध्यान्ह रेषा) ही उज्जैनमधून. जाते. शिवाय कर्कवृत्त रेषा ही देखील उज्जैनवरून जात असल्याने उज्जैनला भारतीय खगोलशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे..
आपल्या महाराष्ट्रातलं वाशीम म्हणजे जुन्या काळची वाकाटकांची राजधानी 'वत्सगुल्म'.ह्या वाशीममधे एक मध्यमेश्वराचे मंदिर आहे.असं मानतात की,प्राचीन काळी कल्पना केलेली पृथ्वीची देशांतर रेषा ही त्या मध्यमेश्वराच्या पिंडीच्या मधून जाते.गंमत म्हणजे पृथ्वीच्या वक्राकार पद्धतीने बघितलं तर वाशीम आणि उज्जैन ही दोन शहरं एकाच रेषेत येतात. भास्कराचार्यांनी त्यांच्या 'लीलावती' या ग्रंथात ह्या देशांतर रेषेचा उल्लेख केला आहे. ह्या उल्लेखाप्रमाणे उज्जैन (ग्रंथामधे उज्जैनला 'अवंती' ह्या जुन्या नावानेच संबोधलेलं आहे) आणि आज हरियाणामधे असलेल्या रोहतकमधून ही कल्पित देशांतर रेषा जाते.
उज्जैनची ही वेधशाळा म्हणजे प्राचीन खगोलशास्त्राचे किलकिले झालेले दार आहे.ह्या वेधशाळेने नवीन काहीच प्रस्थापित केलेले नाही. पण त्याचबरोबर,ज्या ग्रंथांच्या आधारे ही वेधशाळा उभी राहिली,त्या ग्रंथांची एक झलक आपल्यासमोर उभी राहते आणि आपण थक्क होऊन जातो.
वेधशाळा ही गोष्ट जगाला नवीन नाही किंवा त्याचे अप्रूपही नाही..सवाई जयसिंगने भारतात पाच वेधशाळा बांधण्याच्या काहीशे वर्षं आधी, म्हणजे तेराव्या शतकात इराणच्या मरागामधे क्रूरकर्मा चंगेज खानच्या नातवाने,हलागू खानने,विशाल वेधशाळा बांधलेली आढळते.जर्मनीच्या कासलमधे सन १५६१ मधे वेळ दाखवणारी वेधशाळा बनवली गेली होती.
मात्र भारतातल्या वेधशाळांचं महत्त्व हे की,त्या अत्यंत पद्धतीने,खगोलशास्त्राची विविध अंगं सांगणाऱ्या वेधशाळा आहेत.
उज्जैनच्या वेधशाळेत सेकंदाच्या अर्ध्या भागापेक्षा कमी फरकाने वेळ बघता येते.
मग हे ज्ञान आपल्याजवळ आलं कोठून.. जगन्नाथ सम्राट आणि राजा सवाई जयसिंग यांनी हे सर्व कुठून शोधून काढलं.. ? तर त्यासाठी आपल्याला बरंच मागं जावं लागेल.
आपल्या खगोलशास्त्राचे सर्वांत प्राचीन उल्लेख सापडतात ते लगध ऋषींच्या 'वेदांग ज्योतिष' या ग्रंथात. याच्या शीर्षकात जरी 'ज्योतिष' असा उल्लेख आला असला तरी हा ग्रंथ खगोलशास्त्राचेच विवेचन करतो. इसवी सनापूर्वी १३५० वर्षं हा लगध ऋषींचा कार्यकाल मानला जातो.या ग्रंथात 'तीस दिवसांचा एक महिना' ह्या मानकाचा उल्लेख आहे.अर्थात आजपासून साधारण ३३०० वर्षांपूर्वी भारतात खगोलशास्त्राचे बरेच ज्ञान होते.कदाचित याआधीही असेल.कारण लगध ऋषींचा हा ग्रंथ, आपण काही नवीन शोधून काढलं,असं कुठेही म्हणत नाही.म्हणजेच त्याआधीच्या काळातील आपल्याजवळ असलेल्या खगोल शास्त्रासंबंधीच्या ज्ञानाला हा ग्रंथ लिपीबद्ध करतोय.
दुर्दैवानं भारतात प्राचीन ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.मुस्लीम आक्रमणाच्या काळात अनेक महत्त्वाचे ग्रंथ नष्ट झाले. त्यानंतरही जे ग्रंथ शिल्लक उरले,त्यांच्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ इंग्रज शासनाच्या काळात युरोपियन अभ्यासक घेऊन गेले.
असाच एक ग्रंथ आहे,खगोलशास्त्रावरील नारदीय सिद्धांताचा.भारतात हा मिळत नाही. पण बर्लिनच्या प्राचीन पुस्तकांच्या संग्रहालयात 'नारद संहिता' हा खगोलशास्त्रीय ग्रंथ सापडतो. (Webar Catalogue No 862),तसंच खगोलशास्त्रावरील धर्मत्तारा पुराणातील सोम - चंद्र सिद्धांतावरील दुर्मीळ ग्रंथही ह्याच पुस्तकालयात उपलब्ध आहे (Webar Catalogue No 840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.
सूर्य सिद्धांताशी मिळत्या-जुळत्या ह्या सिद्धांताचा ग्रंथ भारतात मिळत नाही..मात्र यातील संदर्भ कोटमब्रूक्स आणि बेन्टले (जॉन बेन्टले: १७५० - १८२४) ह्या खगोलशास्त्रज्ञांच्या ग्रंथात अनेक जागी येतात.
विष्णुचंद्र ह्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाची गणितीय संकलने ह्या वसिष्ठ सिद्धांतावर आणि आर्यभट्टच्या ग्रंथावर आधारित आहेत.जर हा ग्रंथ उपलब्ध नाही,तर कोटमब्रूक्स आणि बेन्टले यांना ह्यातील संदर्भ कुठून,असा प्रश्न पडल्यावर शोध घेतला असता हा ग्रंथ 'मेकॅजी संग्रहात विल्सन कॅटलोगमध्ये१२१ व्या क्रमांकावर मिळाला.बेन्टलेने आर्यभट्टच्या कार्यावर आधारित दोन शोधग्रंथ लिहिले आहेत.पहिला आहे,'आर्य सिद्धांत' आणि दुसरा आहे 'लघु आर्य सिद्धांत' इसवी सनाच्या पाचव्या शतकात झालेल्या आर्यभट (प्रथम) च्या 'आर्य अष्टक शतः' (ज्यात ८०० श्लोक आहेत) आणि दश गीतिका' (दहा सर्ग) ह्या दोन ग्रंथांना बेन्टले अनेकदा उद्धृत करतो.हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिन पुस्तकालयात वेबर कॅटेलॉग क्र. ८३४ मध्ये उपलब्ध आहेत..!
पाश्चात्त्यांनी आपल्या हिंदू खगोलशास्त्रावर बरंच अध्ययन केलेलं आहे.१७९० मधे स्कॉटिश गणितज्ञ जॉन प्लेफेयरने हिंदू पंचांगावरील माहितीच्या आधारे (जी माहिती युरोपात १६८७ ते १७८७ ह्या कालावधीत पोहोचली) हे ठाम प्रतिपादन केले की,हिंदू कालगणनेची प्रारंभिक तिथी (किंवा जिथपर्यंत उपलब्ध ग्रंथांच्या आणि गणनेच्या आधारे जाता येते) ही इसवी सनापूर्वी ४,३०० वर्षं आहे..!
गंमत म्हणजे अठराव्या शतकातच,युरोपियन खगोलशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं होतं की, प्राचीन हिंदू खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रह-ताऱ्यांची जी दिशा आणि जे चलन होतंय त्यात एका मिनिटाचीही चूक नाही.
त्या काळात सेसिनी आणि मेयर यांनी ४५०० वर्षांपूर्वीच ताऱ्यांचे जे तक्ते आधुनिक पद्धतीने तयार केले ते प्राचीन हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी केलेल्या तक्त्यांप्रमाणेच होते..!
प्लेफेयर,बेली आणि वर्तमान काळात 'नासा'मधे काम करणारे प्रो. एन. एस. राजाराम ह्यांनी हे प्रतिपादित केलंय की चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी तयार केलेले तक्ते हे प्रत्यक्ष ग्रह-ताऱ्यांच्या पाहणीवर आधारलेले होते आणि त्या आधारावरच खगोलशास्त्राची गणितीय सूत्रे तयार केली गेली.
बेली आणि प्लेफेयर ह्यांनी एक अजून कुतूहल वाढवेल असं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे.
हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी सात ग्रह-ताऱ्यांची गुरू, मंगळ, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र) स्थिती आणि रेवती नक्षत्राच्या सापेक्ष त्यांचे स्थान,हे सर्व श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या वेळेस नोंदवून ठेवलं आहे. आजची अत्याधुनिक साधनं तिथी काढली तर ती येते १८ फेब्रुवारी इसवी सनापूर्वी ३१०२. याचा अर्थ बेली आणि प्लेफेयर लिहितात की, त्या काळातील लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे फार चांगले ज्ञान होते आणि प्रत्यक्ष निरीक्षणे नोंदवण्याची पद्धत त्या काळी होती. गंमत म्हणजे त्या काळात नोंदवलेल्या चंद्राच्या स्थितीत आणि आजच्या गणनेप्रमाणे केलेल्या चंद्राच्या स्थितीत अंतर आहे फक्त ३७ अंश,अर्थातच नगण्य..!
हे सर्व वाचून / बघून थक्क व्हायला होतं. प्राच्य खगोलशास्त्रातल्या अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की,भारतीय ग्रंथांमधे आढळलेल्या कालगणनेनुसार इसवी सनाच्या ११००० वर्षापर्यंत माहिती मिळते.म्हणजे आजपासून तेरा हजार किंवा त्याही पूर्वीपासून आपल्या पूर्वजांना अवकाशाचं हे ज्ञान असेल.मग मूळ प्रश्न शिल्लकच राहतो,हे असं अत्याधुनिक अद्ययावत ज्ञान,इतक्या हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांकडे कुठून आलं..?
३० जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..