सॅमोसचा ॲरिस्टार्कस Aristarchus of Samos
(इ. स. पूर्व ३१०-२३०)
ग्रीक खगोलविज्ञानामध्ये ऑरस्टार्कसचे स्थान फार महत्त्वाचे आहे. ग्रीसमधील सॅमोस या गावच्या ॲरिस्टार्कसने आकाशातील ताऱ्यांचा वेध घेत आपली निरीक्षणे नोंदविली. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' असे सांगणारा हा पहिला खगोलविंद.अनेक प्रकारची गणिते करून त्याने पृथ्वीपासून चंद्र आणि सूर्याचे अंतर शोधून काढले. 'सूर्य चंद्रापेक्षा अठरापट दूर असला पाहिजे' हा त्याचा तर्क,तसेच 'सूर्य चंद्रापेक्षा ५८३२ पेक्षा अधिक तर ८००० पेक्षा कमी पटींनी मोठा असला पाहिजे' हा त्याचा निष्कर्ष,
वस्तुस्थितीपेक्षा त्याचे निष्कर्ष वेगळे असले तरी दूरच्या वस्तूंचा वेध कोणत्याही साधनसामग्री अभावी घेणे आणि ते मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण असल्या निरर्थक निरीक्षणांचा आपल्या जीवनाशी,रोजीरोटीशी काय संबंध?असे वाटणारा वर्ग पूर्वी होता.आजही आहे आणि पुढेही तो असणार आहे. ग्रहमालेचा केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे.हे त्याच्या सिद्धांताचे मुख्य सूत्र होते.त्याने आपल्या 'On the Sizes and Distances of the Sun and Moon या ग्रंथात नोंदविलेली निरीक्षणे आजही विचार करायला लावणारी आहेत.चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो तो स्वयंप्रकाशित नाही.यासारखी त्याची निरीक्षणे आज जरी फार नावीन्यपूर्ण वाटत नसली तरी इसवीसनापूर्वीच्या त्यांच्या कल्पनाशक्तीची जाणीव निश्चितच करून देणारी आहेत.अपोलो १५ यान चंद्रावर ज्या विवराजवळ उतरलेले होते त्या विवराला ॲरिस्टार्कसचे नाव देऊन त्याच्या स्मृती चिरंतन करून ठेवलेल्या आहेत. या विवराचा व्यास आहे ४० किलोमीटर आणि खोली आहे ३.७ किलोमीटर..
सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे