* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: निराश न होता चालत रहा - डॉ.आ.ह.साळुंखे

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/६/२४

निराश न होता चालत रहा - डॉ.आ.ह.साळुंखे

मी निराश नाही,कारण प्रत्येक अयोग्य प्रयत्न टाळणे योग्य दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असते.- थॉमस एडिसन यांनी फार फार वर्षांपूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे.इतिहास आपली पुनरावृत्ती स्वतः करत असतो.

या पुस्तकातील ऐतिहासिक वाक्याचा अनुभव आम्हाला नुकताच आला कारण होते पुढील प्रमाणे..

तो दिवस,तो क्षण,ती घटना काही क्षणापुर्वी घडून गेल्यासारखी वाटते.


माझे मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (ज्यांना मी सॉक्रेटिस म्हणतो ) जिल्हा परिषद शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी शिक्षक म्हणून मुलांच्यात प्रसिद्ध असणारे,मुलांवर मुलांसारखे संस्कार घडवून त्यांना प्रगल्भ नागरिक करण्याचे (ज्याची सध्या फारच गरज आहे.) हे मुलुखावेगळे कार्य करणारे ज्यांचे विद्यार्थी हे तिसरी व चौथीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही आता पुढच्या वर्गात,शाळेत शिक्षण घेत आहेत.ज्यांनी काव्य संमेलनामध्ये कविता सादर केलेल्या आहेत बालभारतीच्या 'किशोर ' सारख्या अभ्यासपूर्ण मासिकामध्ये त्यांच्या कविता,अनुभव लेखन आणि चित्र प्रसिद्ध झालेले आहेत.ती लेकरं वाचलेल्या पुस्तकांवरती परीचयात्मक लेखन करतात.


पुस्तक वाचतात व संबंधित लेखकाशी संवाद साधतात.त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात.त्या पत्राला उत्तर म्हणून संबंधित लेखकांनी त्यांना पत्रेही पाठवलेली आहेत.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण 'मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असं त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं!अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या.पुस्तकं माणसाला उत्क्रांतीमध्ये एका महत्त्वाच्या केंद्रबिंदू ठिकाणी घेऊन आली.


फार वर्षांपासून डॉ.आ.ह.साळुंखे (तात्यांना) भेटण्याचे नियोजन चालले होते.(पुस्तकातून मनाच्या पातळीवरती आम्ही त्यांना भेटलो होतोच पण प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती.) संसारीक प्रापंचिक कामामुळे भेटीचा कालावधी पुढे जात होता…


काही वर्षे,दिवस,मिनिटे,सेकंद,गेली आणि दिनांक - ०४.०६.२४ या दिवशी तो भेटीचा योग आला.

'कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे ' नोम चोम्स्कीचा हा शोध पुस्तकाजवळ येवून थांबतो.


मी सकाळी शिरोली फाट्यावर त्या दोघांना घेवून येण्यासाठी माझा टोप गावतील एकमात्र मित्र संतोष पाटील यांना सोबत घेवून गेलो.त्यांच्यासोबत खास तात्यांना भेटण्यासाठी आलेले डॉ.नयन राठोड आले होते.नयन नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे.याचा अनुभव मला आला,तो पुढे येईलच.घरी आलो आवरलं सौ.मेघाने छान स्वंयपाक केला होता.रोजच्या पेक्षा जेवण आज वेगळे लागले.मित्रांची सोबत असल्याने ते तसे झाले होते.माणसांवर प्रेम करणारे भेटीच्या ओढीने आलेले मित्र सोबत असल्याने जेवण खूप रुचकर आणि आस्वादक वाटत होते.जेवण झाल्यानंतर साताऱ्यासाठी रवाना झालो.गाडी भारत बझारचे मालक चंद्रकांत कदम (आप्पा ) यांच्या घरी जावून लावली.एसटी ने प्रवास सुरू झाला.अनेकांना आपल्या आवडत्या लोकांना भेटवण्याचे महान काम ही एसटी करत असते.मानवी नात्याशी ती जोडलेली आहे.तात्यांचे चिरंजीव राकेश साळुंखे सरांचा फोन येतच होता.एसटीमध्ये आम्ही फक्त एकाच विषयावर चर्चा करत होतो की ज्यांना फक्त आजपर्यंत आपण पुस्तकात वाचलेलं आहे त्यांच्याशी आपण काय बोलायचं..एक प्रकारचा दबावच होता.आदर,प्रेम,

जिव्हाळा या सगळ्या भावना एकत्रित उचंबळून आलेल्या होत्या.काही सुचत नव्हतं इतका आनंद ओसंडून वाहत होता.


एकदाचा या पावन भुमीत पाय ठेवला.असाच पाय इतिहासात ठेवला होता.त्याची आठवण झाली.तो प्रसंग असा होता….


मला वाटतं,आमच्या कामाची दखल ही आतिषबाजीच्या एका तुकड्या पेक्षा दैनदिन कामावरून घेतली गेली तर 

ते आम्हाला जास्त आवडेल.हे शब्द होते चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग याचे..! ऑल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ वेळ रात्रीचे १० वाजून ५६ मिनिटं ! ईगल चंद्रावर अलगद उतरलं.तेव्हा यानात फक्त २५ सेकंद चालेल इतकंच इंधन शिल्लक होतं..! ईगलचे दरवाजे उघडले आणि आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा आपला डावा पाय चंद्रावर ठेवला.त्याच्या पायाचा ठसा उमटला.


(आतून बाहेरून शहारलो.आम्हाला घेण्यासाठी राकेश दादा व सागर शिंगणे मनमोकळे लेखक येत होते.काही वेळ वाट पाहीली..गाड्या येत होत्या,जात होत्या.आणि एका महत्त्वाच्या क्षणी नयन राठोड म्हणाले ही गाडी आपणास घेवून जाण्यासाठी आली आहे.मी म्हणालो कशावरून ते म्हणाले थोडं थांबा..

खरोखरच ती गाडी आली.मला आश्चर्यकारक प्रश्न पडला.व त्यांनी सहजच उत्तर दिलं.


माझं नाव नयन आहे.मी वेगळं काहीतरी बघू शकतो.त्यांच्या या सेन्स चे मला कौतुक वाटले.


एकदाचे घरी आलो.तर तात्या पलंगावर पहूडले होते,

मला तर ते बुद्ध भासले.शरीर थकलेले होते पण मन अविरतपणे करुणेने भरलेले होते.माधव गव्हाणे यांना ते जवळून ओळखत होते.'माधव'आले आहेत,हे दिसताच ते पलंगा वरुन उठले आणि कसे आहात?केव्हा निघाला होता? प्रवास कसा झाला.आदी प्रश्न विचारून आस्थेने चौकशी केली.हे सर्व अनुभवताना तात्यांच्या करुणामय दृष्टीने आम्ही चिंब भिजत होतो.


तात्यांची पुस्तक वाचता वाचता आम्हाला कसं जगायचं याचं ज्ञान प्राप्त झालं.त्या ज्ञान तपस्वी महान व्यक्तीला भेटत असतानाचा प्रसंग माझ्या आयुष्यात आला.

त्याबद्दल त्या प्रसंगाचा त्या क्षणाचा मी सदैव ऋणी आहे. 


त्यांचा तो मायेचा स्पर्श मला माझ्या आईची आठवण करून देत होता.प्रेम भरभरून देणं हेच त्यांचं व्यक्तित्व आहे.हा स्पर्श खूप खूप पुरातन आहे.हे सत्य मला गवसलं.आमच्याशी व्यवस्थितपणे बोलता यावं म्हणून पलंगावरुन उठून आमच्या समोर खुर्चीत बसले.शरीराने पूर्णपणे थकलेले आहे. त्यांना खूप त्रास होतो आहे हे बघून आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं.आमच्या अगोदर पासुनच तात्यांच्या छायेत असणारे सागर शिंगणे व शब्दशिवार दिवाळी अंकाचे संपादक,कवी इंद्रजित घुले यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली.माधव गव्हाणे यांनी तात्यांसाठी आणलेली त्यांच्याकडील गोड मिठाई (कलम) तात्यांनी आनंदाने दोन वेळा खाल्ली.


ती मिठाई खात असताना सॉक्रेटीस यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.जीवनाच्या सार्थकतेची ती खुण होती.


अनेक विषयावरती जीवनाच्या पैलूं वरती आम्ही सर्वांनी चर्चा केली.बराच वेळ बसल्यानंतर तात्यांना त्रास होऊ लागला.म्हणून ते विश्रांतीसाठी पलंगाकडे गेले.आमची चर्चा सुरूच होती.काही वेळानंतर परत तात्या म्हणाले की,मला तुमच्या मध्ये परत यायचं आहे आणि चर्चा करायची आहे.ते परत आमच्या मध्ये येऊन सामील झाले.नयन राठोड यांनी त्यांचे चुलते भिमनीपुत्र मोहन नाईक आणि त्यांचे बंधू अमोल राठोड यांनी लिहिलेली काही पुस्तके तात्यांना भेट दिली.त्यांनी आपली ओळख करून दिली.


तात्यांना खळखळून हसवणारा एक प्रसंग जो माधव गव्हाणे यांनी सांगितला.त्यांच्या घरी बुद्धांची मूर्ती आहे.पोस्टमन आल्यानंतर सही करून त्यांच्याकडून आलेलं साहित्य स्वीकारलं जातं.एक वेळ उघड्या दाराच्या फटीतून त्यांचं लक्ष बुद्धांच्या मूर्ती वरती पडलं.त्यावेळी आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं मला वाटत होते की तुम्ही (सर्वसाधारण प्रवर्गाचे) ओपनच आहात.या प्रसंगापासून त्यांच्या घरी काही जणांनी चहा घेण्याचं जवळजवळ टाळलेलं आहे.


मी त्यांना विचारलं आमच्यासाठी आपल्याकडून आशीर्वाद स्वरुप काही संदेश.. 


काही क्षण थांबून त्यांनी संदेश दिला.तो संपूर्ण मानव जातीसाठी आहे.'जे तुम्ही काम करत आहात ते अखंडपणे करत रहा आणि हे करत असताना अजिबात निराश होऊ नका'.हे वाक्यच आमचं जिवंतत्व बनलेलं आहे.


दुपारी तात्यांच्या घरी भोजन झालं.जेवण करत असताना राकेश दादांसोबत सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास आणि वैचारिक चर्चा झाली.नंतर काही पुस्तकांची खरेदी झाली आणि भरलेल्या मनाने आणि जड पावलांनी 'पुन्हा लवकरच भेटू ' असं सांगून आम्ही त्या वास्तूची परवानगी घेतली.घरी येईपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही.एक प्रकारचा तृप्ततेचा अनुभव आला होता.या अनुभावाचा अनुभव घेऊनही सूर्य अस्ताला गेला.पावसानेही आमचं स्वागत केलं आणि आम्ही घरी आलो.रात्री भोजन करून झोपी गेलो.त्या रात्रीची झोप ही आमच्या साठी खरोखरची झोप होती.सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद…


विजय गायकवाड..