एका श्रीमंत माणसाला साक्षात अनुभवाविषयी विलक्षण आकर्षण असते.एके दिवशी तो एका सुंदर बेटाची आपल्या राहण्यासाठी निवड करतो.तिथे तो अनेक वर्षे राहतो.निसर्गाच्या सहवासात आपण इथे खूप वर्षे राहिलो,आता आपण आपल्या मुळ ठिकाणी परत जायला हवे असे त्याला वाटायला लागते.खरे तर तो त्या बेटावर तब्बल तीस वर्षे राहिलेला असतो.जेव्हा तो परत आपल्या मूळ स्थानी येतो. तेव्हा निरनिराळ्या माध्यमातील लोक-पत्रकार त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर येतात. ज्या बेटावर तो श्रीमंत वास्तव्याला असतो, ते बेट खरोखरीच अप्रतिम असते, सगळे त्याला विचारायला लागतात..ते निसर्गरम्य बेट कसे आहे? तीस वर्षाच्या या बेटावरील अनुभवाविषयी सविस्तर सांगा ना? या बेटावरील जंगली जनावरांचा तुम्हाला काही अनुभव आला का? या बेटावरचे पर्यावरण व ऋतूचक्र कसे होते? बदलत्या हवामानाचा तुम्हाला त्रास झाला नाही का? इतकी वर्षे तुम्ही या बेटावर राहिलात, त्या बेटाच्या वैशिष्ट्यांविषयी, निसर्गसौंदर्यांविषयी विस्ताराने सांगा ना? असे एक ना अनेक प्रश्न लोकांनी त्या श्रीमंत माणसाला विचारले. त्याने ते सगळे प्रश्न ऐकले आणि तो म्हणाला - अरे देवा, इतके ते बेट निसर्गरम्य व सुंदर होते, मी हे जर आधी जे ऐकले असते, तर त्या बेटाचा, तिथल्या निसर्गाचा-बदलत्या ऋतुचक्राचा मी अधिक मनापासून अनुभव घेतला असता.!
पत्रकार जेव्हा त्याला सारे प्रश्न विचारतात,तेव्हा त्याला त्या बेटाविषयी कुतूहल वाटायला लागते. मग त्याच्या लक्षात येते की, आपण त्या बेटावर तीस वर्षे राहिलो खरे, पण प्रत्यक्षात आपले त्या बेटाशी काहीच नाते नव्हते,आपण तसे काहीच पाहिले नाही,ना कुठला विशिष्ट अनुभव घेतला. आपण फक्त ऋतुचक्र ढकलत, तिथे जगत राहिलो.
पुस्तकातील ही एक छोटी गोष्ट जीवनातील मोठी गोष्ट सांगून जाते.आपल्या बाबतीतही असं होतं का?
चला जरा आपण विचार करू..।
नाही तर 'चांदण्यात भिजायचं राहून जायचं..'