केईएममध्ये घडलेली घटना पंचवीशीचा एक तरुण रुग्ण होता.त्याला हर्निया होता.शस्त्रक्रियेसाठी घेतलं,
तर त्याच्या पोटात गर्भाशय सापडलं.शस्त्रक्रियेनं ते काढल.तो
'युटराइन हार्निया सिंड्रोम' होता... जन्मतःच बाळाच्या वाढीत काही हार्मोनल गुंतागुंत झालेली असते.पुरुष बाळात स्त्री हार्मोन्स थोडी जास्त असतात.आणि त्यामुळे त्याचं गर्भाशय आणि त्याआसपासचे काही अवयव तयार झालेले असतात.अर्थात,पुरुष हार्मोन्स अधिक असल्यामुळे त्यांची पूर्ण वाढ होत नाही,पण मुलगा मोठा झाला की त्याला हार्नियाचा त्रास सुरू होतो आणि मग हे लक्षात येतं.क्वचित घडणारी गोष्ट आहे.
ही,पण पुरुषाच्या पोटात गर्भाशय आहे हे
कुटुंबाला समजून घ्यायला फार कठीण जातं.सुदैवाने आम्ही ज्याची शस्त्रक्रिया केली होती,त्या तरुणाची पुरुषाची इंद्रियं नॉर्मल होती आणि त्यामुळे तो पुढचं आयुष्य नीट जगू शकला.आमच्यासाठी ही एक सायंटिफिक केस होती नि ती आम्ही पुढे प्रसिद्ध केली.त्यावर एक पेपरही लिहिला.
अठरा वर्षांचा एक मुलगा १९९५-९६ मध्ये आला होता.त्याच्या पोटात मोठा गोळा होता, उपचारासाठी तो आला होता.त्याचं सीटी स्कॅन केलं तर ते मृत अर्भक होतं!
याला 'फीटस इन फिटू' म्हणतात.जन्मतः तो जुळा असेल,पण दोन स्वतंत्र,सुटे गर्भ तयार होण्याऐवजी एकात एक दोन बाळं तयार झाली.हे इतकी वर्षं कळलंच नाही.त्याची शस्त्रक्रिया करणं तसं जिकिरीचं होतं.तरी आम्ही ते यशस्वीरित्या केलं.तो रिपोर्ट आम्ही पब्लिशही केला.त्याच्या आजाराचं 'निदान' ऐकून त्याचे नातलग आठवडाभर फिरकलेच नाहीत.ते आल्यावर त्यांना समजावलं.खूप प्रयत्नांनंतर त्यांनी ते स्वीकारलं.
अशा अनेक केसेस केईएममध्ये पाहिल्या. अनेकांवरच्या शस्त्रक्रियांमध्ये सहभागी झालो, अनेक शस्त्रक्रिया स्वतः केल्या.अनेक रुग्ण माझ्या लक्षात राहिले,त्यांच्या मी लक्षात राहिलो. आमच्यात एक छान नातं निर्माण झालं... ते अजूनही आहे.
'सर्जनशील' या पुस्तकातील हा अभ्यासपूर्ण उतारा…
लेखक -डॉ.अविनाश सुपे
ग्रंथाली प्रकाशन