* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कथा माणुसकीचा 'पोऱ्या'

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

कथा माणुसकीचा 'पोऱ्या' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा माणुसकीचा 'पोऱ्या' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७/३/२३

कथा माणुसकीचा 'पोऱ्या'

"ए पोऱ्या पाणी आण"

"ए पोऱ्या अरे कचोरी आण ना"

"ए पोऱ्या दोन मिसळ आण.वरुन दही टाक" पोऱ्या..


हाँटेलमधला एकमेव वेटर असलेला १४-१५ वयाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता. प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब आँर्डर हवी होती.तोही कुणाला नाराज करत नव्हता.


तहसील कचेरीसमोरचं ते हाँटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं.आमचा चहा,नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं.चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस त्यामुळे त्या छोट्याशा हाँटेलात कायम गर्दी असायची.आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.


ग्राहक कधी कधी त्याला रागवायचे,त्याच्यावर चिडायचे पण याचा आवाज कधी चढायचा नाही."हो काका " "हो मावशी आणतो" "फक्त दोन मिनिट,आता आली तुमची मिसळ"असं सांगून तो ग्राहकांना शांत बसवायचा.


एक दिवस दुपारच्या वेळेस हाँटेलमध्ये फारसे ग्राहक नसतांना मी त्याला बोलावलं.

"नाव काय रे तुझं"

"दिलीप"

"कुठला तू?"

त्यानं बावीस कि.मी,वरच्या गावाचं नांव सांगितलं.

"शाळेत जातोस?"

"नाही.४ थी नंतर सोडली.

"का?"

"गावात दुष्काळ पडला. कामं मिळेना.अण्णांनी (त्याच्या वडिलांनी) इथं पाठवून दिलं"

"किती पगार मिळतो?"

"खाऊन पिऊन पाचशे रुपये"

"काय करतो पैशांचं?"

"गावी पाठवतो अण्णांकडे"

"पुढं शिकावसं वाटत नाही?"

"खुप वाटतं,पण काय करणार?नाईलाज आहे."

तेवढ्यात ग्राहक आल्याने संवाद संपला.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप सर्वात मोठा मुलगा,एक लहान भाऊ आणि एक बहीण,आईवडील शेतमजूर,अर्थातच घरची गरीबी त्यामुळे शाळेत हुशार असुनही दिलीप शिकू शकला नाही.दिलीप हाँटेलमध्येच झोपायचा. बाहेरच्या नळावर अंघोळ करायचा.

एकदा चार पाच दिवस तो दिसला नाही.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप गावी गेला होता.त्याचा लहान भाऊ डेंग्यूने आजारी होता. गावात इलाज झाले नाहीत.

जिल्ह्याच्या गावी नेण्याइतके पैसे नव्हते.शेवटी तो तिथंच वारला.त्याच्या अत्यविधीचा खर्चही हाँटेलमालकाने केला.


परतल्यावर तो गंभीर असेल अशी माझी कल्पना.पण हा पठ्ठ्या हसतमुखच! मी छेडल्यावर म्हंटला"साहेब किती दिवस दुःख करणार?गरीबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं रहावंच लागतं." त्यानंतर माझी आणि दिलीपची दोस्ती जमली.मी त्याला गोष्टीची,ज्ञानवर्धक पुस्तक आणून द्यायचो.तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्त मिसळ,जास्त भजी द्यायचा.आचाऱ्याला माझा चहा जास्त स्पेशल बनवायला सांगायचा.

एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता. बाहेरचं विश्व काय असतं हे दिलीपने बघावं म्हणून मी त्यालाही बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं.पण सायंकाळी खुप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला.मी हाँटेलमधून निघालो तसं त्याने मला थांबवलं.मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्यावेळाने परतला तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं.

"साहेब मी तर येऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरीबाची भेट"

"अरे याची काय गरज होती?तू आला असतास तर खुप बरं वाटलं असतं "

"असू द्या साहेब"म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं.

रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढ्या सगळ्या गिफ्ट्स मध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं.पाचशे रुपये पगार कमवणाऱ्या त्या पोराने चक्क तीनशे रुपयाचं गिफ्ट दिलं होतं.मला एकदम गहिवरून आलं.त्या गरीबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं.

त्या घटनेला आज दोन वर्षे झालीत.आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे. खटपट करुन एका फाऊंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपुर्ण खर्च उचलायला राजी केलं आहे आणि दिलीप ऐवजी त्याच्या आईवडिलांना पाचशे रुपये मी दरमहिन्याला पाठवतोय.त्याबदल्यात दिलीपने चांगली नोकरी लागली की शेतमजूरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवावं असं मी त्याच्याकडून वचन घेतलंय.


ही कथा "कथा माणुसकीच्या "दीपक तांबोळी यांच्या कथासंग्रहातील आहे.