ग्रीकांना व रोमनांना उत्क्रांतीचे तत्त्व अज्ञात नव्हते,हे आपण एपिक्यूरसवरील प्रकरणात पाहिलेच आहे.पण ख्रिश्चन धर्म येताच उत्क्रांतीचा विसर पडून बायबलमधील सृष्टीच्या उत्पत्तीची कल्पित कथा खरी मानली जाऊ लागली.गॅलिलीच्या कल्पनाप्रिय कोळ्यांच्या संगतीत मानवजात जणू शास्त्रीय दृष्टी विसरून गेली,गमावून बसली ! ती शास्त्रीय दृष्टी परत येण्यास व तिला गती मिळण्यास अठराशे वर्षे लागली.जगन्निर्मितीबाबतच्या सुडो-ख्रिश्चन कल्पनेने पाश्चिमात्य जगावर इतका परिणाम केला होता की,
डार्विनने आपली उत्क्रांतीची कल्पना उत्क्रांतीची उपपत्ती मांडली,तेव्हा तो सृष्टिनिर्मात्या ईश्वराचा खून करीत असल्यासारखा भासला.
लोकांना तो खुनी वाटला.मनुष्याच्या अमर आत्म्याच्या मनोहर कथेचा डार्विन जणू वध करीत होता.!ते मधुर काव्य तो मातीस मिळवीत होता.! प्रत्येक जण आपला तिरस्कार करीत हे डार्विनने अपेक्षिलेच होते.
हार्वर्ड येथील स्नेही प्रोफेसर असाग्रे यांना लिहिलेल्या पत्रात डार्विन म्हणतो,
"मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की,रूढ कल्पनेहून वेगळ्या निर्णयाप्रत मी आलो आहे.निरनिराळे प्राणी अलग अलग निर्माण करण्यात आलेले नसून ते सारे परस्परावलंबी आहेत.हे वाचून तुम्ही माझा तिरस्कार कराल हे तर खरेच;पण तुमच्यापासून माझा निर्णय लपवीन तर मी प्रामाणिक कसा राहू शकेन?"
त्याच्या प्रतिभेने व बुद्धीने लावलेला शोध सर्व जगाला ज्ञात करून देईतो त्याचा प्रामाणिकपणा त्याला स्वस्थ बसू देईना..
'Origin of spices' हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी वीस वर्षे म्हणजे १८३९ सालीच त्याने उत्क्रांतीची चालचलाऊ उपपत्ती लोकांपुढे मांडली होती.त्या रूपरेषेचा विस्तार करून १८४२ साली त्याने पस्तीस पृष्ठांचा निबंध लिहिला व तोच पुढे वाढवून १८४४ साली २३० पृष्ठांचा केला. हा सर्व काल व पुढील पंधरा वर्षे ही मीमांसा पारखून व पडताळून पाहण्यात व तिच्यातील दोष काढून टाकण्यात खर्चून जे नवे निर्माण निघाले,त्यांचे तो पुन्हा पुन्हा पर्यावलोकन करीत होता.
डार्विन स्वतःच स्वतःचा निर्भीड टीकाकार असल्यामुळे विरोधकांचे आक्षेप आधीच कल्पून त्यांना बिनतोड उत्तरे देण्यास तयार होता.
१८५८ साली डार्विन आपल्या संशोधनाला शेवटचे स्वरूप देत असता अकस्मात एके दिवशी त्याला दिसून आले की,दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने नकळत आपली सारी विद्युत चोरून घेतली.जूनच्या अठराव्या तारखेस त्याचा मित्र आल्फ्रेड रसेल बॅलेस याने उत्क्रांतीवरचा एक स्वतंत्र लेख डार्विनकडे पाठवला व 'मी मांडलेल्या उपपत्तीवरील तुमचे प्रामाणिक मत कळवा,तिच्यावर मनमोकळी टीका करा' असे
त्याला कळवले.बॅलेस अमेरिकेत होता.डार्विन वीस वर्षे प्राण्याच्या उत्पत्तीचे संशोधन करीत होता हे त्याला माहीत नव्हते.त्यामुळे 'उत्क्रांतीच्या उपपत्तीचा संशोधक' म्हणून जगाला आपली ओळख करून देण्याबद्दल त्याने डार्विनला विनंती केली.अशा परिस्थितीत डार्विनने काय करावे? त्या विषयावरील आपल्या संशोधनाच्या व लिखाणाच्या अगदी बरहुकूम बॅलेसचे संशोधन,तसेच लिखाणही होते.हे पाहून सुप्रसिद्ध भूगर्भशास्त्रवेत्ता डॉ. लायल यास डार्विनने लिहिले,
'असा योगायोग मी कधीच पाहिला नाही. किती आश्चर्यकारक योगायोग ! १८४२ साली मी लिहिलेले हस्तलिखित बॅलेसजवळ असते,तर याहून अधिक संक्षिप्त सारांश त्याला काढता येणे अशक्य होते.एकदा तर सारे श्रेय बॅलेसलाच द्यावे असे त्याला वाटले.'क्षुद्र वृत्तीने मी वागलो अशी शंकाही कोणाला येऊ नये म्हणून माझी सर्व हस्तलिखिते जाळून टाकावीसे मला वाटते.'
असे त्याने लायलला लिहिले.त्यावर लायलने उत्तर दिले,
'तुम्ही आपले सर्व विचार ताबडतोब प्रसिद्ध करा.स्वतःच्या बाबतीत अन्याय नका करून घेऊ.
आपल्या आधी वीस वर्षे डार्विनने ही उपपत्ती अजमावली होती हे ऐकून बॅलेसला वाईट न वाटता आनंदच होईल.' शेवटी लिनयिन सोसायटीसमोर आपले व वॅलेसचे संयुक्त संशोधन म्हणून ही उपपत्ती मांडण्याचे त्याने ठरवले.तथापि,
उदारपणात आपणही मागे नाही हे, 'ज्या उपपत्तीचे संपूर्ण श्रेय वस्तुतः डार्विनचे आहे तिच्या श्रेयात मलाही भाग मिळावा हे माझे केवढे सुदैव !'
असे जाहीर करून वॅलेसने दाखवले.अशा रीतीने ही सुप्रसिद्ध चर्चा थांबली. प्रत्येकाने आपल्या कीर्तीचा प्रश्न बाजूस सारून दुसऱ्याचे नाव मोठे व्हावे म्हणून मोठे मन दाखवले.
शास्त्रज्ञांसमोर आपली उपपत्ती मांडल्यानंतर ती छापून काढण्यासाठी डार्विन आपले हस्तलिखित झपाट्याने तयार करू लागला. २३ नोव्हेंबर १८५६ रोजी पुस्तकाची पहिली आवृत्ती तयार झाली.पुस्तकाला 'नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा जीवनार्थ कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीचे टिकून राहणे'असे लांबलचक व अवजड नाव देण्यात आले होते.
ज्या शास्त्रीय पुराव्याच्या महापुराने अँडम व ईव्ह यांची गोष्ट,स्वर्गातील बाग वगैरे सारे पार वाहून गेले.त्याचा थोडक्यात गोशवारा असा,
या जगात जिवंत प्राणी सारखे अमर्यादपणे वाढत असतात.पण अन्नपुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादितच असल्यामुळे सर्व सजीव प्राण्यांत जीवनार्थ कलह अहोरात्र चाललेला असतो.
परिस्थितीशी झगडण्यात अधिक समर्थ असणारे टिकतात. बाकीचे मरतात.
उत्क्रांतिवादी याला 'समर्थ असतात ते टिकतात' असे म्हणतात.पण आजूबाजूची परिस्थितीदेखील बदलत असतेच.समुद्र असतो तिथे जमीन होते,जमीन असते तिथे समुद्र येतो.पर्वत जाऊन त्यांच्या जागी दऱ्या येतात.बर्फ असते तिथेच एकदम उष्णता पुढे येते.आजूबाजूच्या नैसर्गिक जगात हे फरक होत असल्यामुळे प्राण्यांनाही स्वतःमध्ये व स्वत:च्या राहणीत बदलत्या परिस्थितीत जगता यावे म्हणून फेरफार करावे लागतात.
हे फरक कधी कधी क्रांतिकारक होतात.एका प्राण्याहून दुसरेच प्राणी जन्माला येतात.असे करूनच ते जगू शकतात.ज्या पद्धतीने ही उत्क्रांती होत जाते,तिला दुसरे चांगले नाव सापडत नसल्यामुळे 'नैसर्गिक निवड' हे नाव देण्यात येत असते.नैसर्गिक निवड म्हणजे, ज्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी फरक करावे लागले व ते ज्यांनी केले तेच जगावेत, टिकावेत,असेच जणू निसगनि ठरवले.त्या फरकांची जगण्याला सक्षम म्हणून निसर्गाने निवड केली व नवीन परिस्थितीत जरूर व राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचेही निसर्गाने नक्की केले.
उत्क्रांतीची उपपत्ती थोडक्यात अशी आहे. जीवनाची अमर्याद वाढ होत असल्यामुळे जीवनार्थ कलह सुरू असतो व त्यात अधिक सक्षम व समर्थ असणारे टिकतात.बाकीच्या प्राण्यांच्या जाती नष्ट होतात.एकीतून दुसरी उत्पन्न होते.'
या उपपत्तीप्रमाणे आपण जे अगदी खालचे प्राणी म्हणून समजतो,त्यांच्यापासून मानव फार दूर नाही.त्यांचीच पुढची पायरी म्हणजे मानवप्राणी.ही पुढची पायरी डार्विनने 'मानवाचा अवतार' या पुस्तकात प्रतिपादिली आहे.मानवप्राणी माकडापासून उत्क्रांत झाला. या उपपत्तीचे श्रेय वा अश्रेय सामान्यतः डार्विनला देण्यात येत असते.पण खरोखर पाहिल्यास डार्विनने असे काही एक म्हटलेले नाही.त्याने जास्तीत जास्त इतकेच सांगितले की,
मानव व वानर हे एकाच पूर्वजापासून केव्हा तरी जन्मले.
हा प्राचीन प्रागैतिहासिक पूर्वज आज अस्तित्वात नाही.म्हणजेच वानर हा आपला आजोबा नसून भाऊ आहे.
डार्विनच्या मते,प्राण्यांतील परमोच्च विकास मानवात झाला आहे.सर्वांत जास्त विकसित प्राणी म्हणजे मानव समर्थांचे अस्तित्व' या कायद्याप्रमाणे त्याने इतर प्राण्यांवर प्रभुत्व मिळवले आहे.समर्थ व सक्षम या शब्दांचा डार्विनचा अभिप्रेत अर्थ 'अती बलाढ्य किंवा अती निर्दय असा नाही.खालच्या प्राण्यांत कोणी टिकावयाचे व कोणी नष्ट व्हायचे हे बलाबलानेच (शारीरिक झटापटीनेच) ठरते. पण मानवांच्या बाबतीत वैयक्तिक झगडा नष्ट होऊन सर्व मानवप्राण्यांचे सामाजिक सहकार्यच संरक्षणाचे साधन बनते.स्वार्थी आक्रमणशीलता जाऊन तिच्या जागी हळूहळू अन्योन्य साह्य व सहकार्य यांचे तत्व रूढ होते. मानवी जीवनाला अतः पर जंगलाचा कायदा लावणे बरे नाही.व्यक्तीचे जीवन नीट राहायला पाहिजे असेल,तर सर्व मानवजातीने नीट जगावे यासाठीच खटपट केली पाहिजे.सर्व मानवांच्या जीवनार्थ झटण्यातच व्यक्तीच्याही संरक्षणाचा परमोच्च मार्ग आहे.ही गोष्ट हळूहळू का होईना,पण आपण शिकत आहोत.
म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही.तो पडलेला अधोगत देवदूत नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशू आहे.रानटी मानव आहे.त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे.तो अधिक खाली नाही जाणार.या
जगात जे जे सजीव आहे,जे जे जीवनार्थ धडपडत आहे.त्याच्या त्याच्याशी मानवांचा संबंध आहे.
त्यामध्ये पशुत्वाचे व लाखो,करोडो प्राण्यांचे अंश आहेत.जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्यापि एक प्राणी म्हणूनच म्हणावे लागेल.पण प्रेमाची अपरंपार,अनंत शक्यता असणारा हा प्राणी आहे
खुद्द डार्विनचेच जीवन त्याच्या उपपत्तीचा सबळ व उत्कृष्ट पुरावा आहे.त्याची प्रेमशक्ती सारखी वाढत होती.त्याच्या उपपत्तीसाठी त्याच्या टीका,निंदा,शिव्याशाप यांची लाखोली वाहण्यात आली,तरी त्याने निंदकांविरुद्ध एकही कटू शब्द उच्चारला नाही.आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचा एक नम्र साहायक म्हणून तो वागे.त्याने त्यांच्यावर कधीही वरचष्मा गाजवला नाही.ज्यांची नावेही कोणाला माहीत नसत अशा प्रयोगशाळेतील कामगारांविषयी व माहिती गोळा करून देणाऱ्यांविषयी तो फार कृतज्ञता दाखवी.
ते अमोल मदत देत.डार्विन त्यांना विज्ञानशास्त्रातील हमाल म्हणे.प्राणी कितीही क्षुद्र असला तरी तो त्याचा तिरस्कार करीत नसे.प्राणी मात्र त्याला पवित्र वाटे.बुद्धाला साऱ्या विश्वाविषयी अपार प्रेम वाटे.तसाच थोडासा डार्विनचा प्रकार होता.तो बुद्धाच्याच जातीचा होता.त्याला सारे जीवन पवित्र वाटे. सजीव प्राण्याविषयी बोलावे तसे तो झाडेमाडे, तृणवेली वगैरेंविषयीही बोले.त्याने लावलेल्या एखाद्या झाडाचे अगर गवताचे रोवलेले पान वर आले की त्याची ती हुशारी पाहून तो म्हणे,"अरे लबाडा,वर आलास? मी अडकवून,डांबून ठेवले तरी वर डोके काढलेसच अं?"अशी त्यांची प्रेमाने खरडपट्टी काढून तो त्यांच्यावर रागवायचा.काही बीजांकुरांवर प्रयोग करता करता तो चिडून म्हणे,"ही भिकारडी चिमुरडी मला पाहिजे,त्याच्या नेमके विरुद्ध करतात.! चावट कोठची!"प्रत्येक रोपटे त्याला जणू व्यक्तित्वसंपन्न पवित्र व्यक्तीच वाटे.
फुलांचे सौंदर्य पाहून त्याची जणू समाधी लागे. फुलांपासून मिळणाऱ्या निर्दोष व निरूपम आनंदाबद्दल तो सदैव कृतज्ञता प्रकट करी.तो फुलांच्या पाकळ्यांना अगदी हळुवारपणे स्पर्श करी. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत एखाद्या संताचे अपरंपार प्रेम वा एखाद्या बालकाचे निष्कपटी कुतूहल दिसे.
त्याचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता.तरीही त्याचा स्वभाव मात्र ख्रिस्तासारखा होता.तो म्हणे,"ईश्वराने कोणाला एखादा ग्रंथ दिला, यावर माझा तरी विश्वास बसत नाही."तो अज्ञेयवादी होता.अपरंपार दुःखाने भरलेल्या या जगाची रचना एखादा ज्ञानी ईश्वर करणे शक्य आहे का,असे तो विचारी.तो लिहितो,'या जगाच्या पाठीमागे काही कल्याणावह योजना तर नाहीच नाही;पण मुळी योजनाच असेलसे वाटत नाही.' पण तो केवळ नास्तिक नव्हता. तो जपून जाणारा होता.तो या निर्णयाप्रत आला की, 'हा सारा विषय मानवी बुद्धीच्या अतीत आहे.मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले.'
डार्विनच्या मते,त्याचे स्वतःचे कर्तव्य आमरण सारखे श्रम करीत राहणे हे होते.आपल्या बांधवांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी अविरत झटणे हे त्याचे कर्तव्य होते.पण श्रम करताना त्याला वरचेवर दोन अडथळे येत.तो सुखी व संपन्न असल्यामुळे त्याला फार श्रमण्याची सवय नव्हती.प्रकृती बरी नसल्यामुळे काबाडकष्ट करणे त्याला अशक्यच होई.पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने या दोन्ही अडचणींवर जय मिळवला. सुखासीनतेची सवय त्याने सोडून दिली. पत्नीच्या प्रेमळ सेवापरायणतेमुळे शारीरिक व्यथेची व आजाराची अडचण दूर झाली. डार्विनची पत्नी अत्यंत दयाळू व फार थोर स्त्री होती.डार्विनने तिला 'अत्युत्तम व अती प्रेमळ' असे संबोधून अमर केले आहे.अशी पत्नी लाभल्यामुळेच मी ताण सहन करू शकलो व शेवटपर्यंत नीट धडपड चालवली.असे डार्विनने लिहिले आहे.
डार्विन नेहमी आजारी आजारीच असायचा. त्याच्या पत्नीने त्याच्या या प्रकृतीला अनुरूप असे शांत जीवन ठेवले.कधी आदळआपट नाही,कधी रागवारागवी नाही.ती त्याला उत्साह देई; पण टोचीत नसे. 'भराभरा आटपा' असे ती कधी म्हणत नसे.त्याच्या प्रयोगांशी ती परिचित राही.प्रुफे तपासण्याच्या कामी त्याला मदत करी व त्याला शारीरिक वेदना होत तेव्हा त्याची इतक्या प्रेमळपणे व कनवाळूपणे शुश्रूषा करी की तो म्हणे, "तुझ्याकडून शुश्रूषा करून घेण्यासाठी आजारी पडणेही बरे."
एम्माचे डार्विनवर जितके प्रेम होते तितकेच डार्विनचे एम्मावरही होते.दोघांचे हे अन्योन्य प्रेम त्यांच्या मुलांच्या स्वभावात पूर्णपणे उतरले होते.पूर्णपणे विकसित अशा जीवांचे हे कुटुंब होते.त्यांचे संवर्धन फारच उत्कृष्टपणे झाले होते.ती मुले आनंद,सौम्यता व अन्योन्य-आदर अशा वातावरणात वाढली होती.आदरभाव म्हणजे काय ? दुसऱ्यांच्या भावनांची सहानुभूतीपूर्वक जाणीव.सानुकंप विचार म्हणजेच सद्भाव,आदरभाव.डार्विनच्या चारित्र्याची ही मुख्य किल्ली आहे.वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्याने लंडनला शेवटची भेट दिली.आपल्या एका मित्राच्या घरात शिरत असता त्याला घेरी येऊ लागलीसे पाहून त्याचा मित्र बाहेर गेलेला होता तरी आचाऱ्याने त्याला 'आत या ना', असे म्हटले.पण बटलरला कशाला उगीच त्रास या भावनेने डार्विन आत न जाता धडपडत बाहेर गेला व गाडी पाहू लागला.पुढे तीन महिन्यांनी,म्हणजे १८८२ सालच्या मार्चच्या सातव्या तारखेस तो मरण पावला.त्याला मरणाची यत्किंचितही क्षिती वाटली नाही.तो मरण्यास तयारच होता. त्याच्या अधार्मिक मतांसाठी त्याच्या शत्रूंनी त्याला नरकाचा धनी ठरवले.पण एका धर्मशील स्त्रीच्या मते,'तो इतका चांगला होता की,तो खात्रीने स्वर्गासच गेला असला पाहिजे. डार्विनचे ईश्वराशिवाय चालेल,पण त्या सर्वशक्तिमान प्रभूचे डार्विनशिवाय कसे चालणार?'
शेवटचा पुर्ण भाग..
५ मार्च २०२३ या लेखामधील पुढील भाग.