'प्रेम'तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील.
प्रेमानं तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा.
त्याच्या पंखांत पोलादाची पाती लपलेली असतील. ती तुम्हाला जखमी करतील.
प्रेम तुमच्याशी संवाद करील तेव्हा त्यावर विश्वास ठेवा.
उत्तरेकडून येणारा वारा बगीचा उद्ध्वस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्नं उधळून लावील. कारण,प्रेम तुम्हाला राजवैभव देईल तसं सुळावरही नेईल.
तुमच्या अंतःकरणाच्या उंचीला ते पोहोचेल. सूर्यप्रकाशात थरथरणाऱ्या नाजूक डहाळ्यांना कुरवाळील,तसं ते तुमच्या मुळांपर्यंत जाईल आणि त्यांना गदगदून तुमची मनोभूमी थरकापवील.
धान्याचे पाचुंदे बांधावे तसं ते तुम्हाला तुमच्याशी आवळून धरील. झोडपून तुम्हाला नागवं करील. तुम्हाला दळून काढील. तुमचं पीठ करील. तुम्हाला तिंबील, खिळखिळं करील.
मग ते तुम्हाला ईश्वरी ज्वालेच्या निखाऱ्याशी नेईल, तेव्हाच त्याच्या पावन भोजनाचं खाद्यान्न तुम्ही व्हाल.
हे सगळं, प्रेम कशासाठी करील? तर त्यामुळं तुमच्याच अंतःकरणाची रहस्यं तुम्हाला उमजावीत आणि त्या जाणिवेनं ईश्वरी चैतन्याचा एक अंश तुम्ही होऊन जावं..
पण जिवलगांनो, भयाच्या आहारी जाऊन प्रेमाकडून शांतीची न् सुखाचीच आकांक्षा कराल तर आपलं नागवेपण झाकून प्रेमाच्या यातनाघराकडे तुम्ही पाठ फिरवावी हेच बरं. मग तुमचं जग ऋतुरंगहीन होईल.
तुम्ही हसाल, पण त्यात तुमचं सुखसर्वस्व नसेल. तुम्ही रडाल,पण त्यात तुमचं दुःखसर्वस्व नसेल. प्रेम काय देतं? तर केवळ स्वतःचंच दान देतं. प्रेम काय नेतं? तर केवळ स्वतःलाच विन्मुख करतं.
प्रेम तुम्हाला झडपणार नाही
की स्वतः ही झडपलं जाणार नाही
कारण प्रेम स्वयंपूर्ण आणि स्वयंतृप्त आहे.
तुम्ही प्रेम करता त्यावेळी म्हणू नका की ईश्वर माझ्या हृदयात आहे. म्हणा की मी ईश्वराच्या हृदयात वस्तीला आहे.
कधीही मनात आणू नका, की प्रेमाचा मार्ग मी आखून काढीन : तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हाला मार्गदर्शन करील.
आपण सिद्धीस जावं ही एकच वांछा प्रेमाला असते. प्रेम करीत असताना इच्छा आणि वासना तुमच्यापाशी असतील तर त्या कशा असाव्यात?
वितळलेल्या बर्फाच्या वाहत्या झऱ्यानं
रात्रीच्या प्रहरांना गाणी ऐकवावीत,
तशी तुमची इच्छा असावी.
नितान्त कोमल संवेदनांनी होणारं दुःख
जाणून घ्यावं,अशी तुम्ही इच्छा करावी. स्वतःमधील प्रेमजाणिवेनं जखमी व्हावं, स्वेच्छया रक्त वाहू द्यावं
आणि त्याचा आनंद मानावा,अशी तुमची
इच्छा असावी
पंख - फाकल्या चित्तानं पहाटेची जाग यावी, आणि प्रेमपूजनासाठी नवा दिवस उगवला याबद्दल तुम्ही ईश्वराचे आभार मानावे.
दुपारच्या निवान्त समयी
प्रेमाच्या निर्भरतेचं चिंतन घडावं
आणि कृतज्ञ अंतःकरणानं सायंकाळी तुम्ही घराकडे परतावं
हृदयस्थ प्रेयसीसाठी प्रार्थना करीत.
स्तवनगीत ओठांवर घोळवीत
तुम्ही झोपेकडे वळावं.
' जीवनातील सर्वोत्तम प्रेम या बद्दल दोन पाने…
' द प्रॉफेट - खलील जिब्रान '