म्हैसूर प्रांतातल्या कडूर जिल्ह्यामध्ये,येमेडोड्डीचं जंगल येतं.'बाबाबुडान' नावानं ओळखल्या जाणाऱ्या साडेसहा हजार फूट उंच पर्वतराजीच्या पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा या येमेडोड्डीच्या जंगलाच्या सभोवती आहेत.याच्या सीमेवर 'मडुक' नावाचं चहुबाजूंनी जंगलानं वेढलेलं एक अतिशय सुंदर सरोवर आहे.या सरोवरापासून पाण्याचा एक अरुंद पाट निघून,तेवढ्याच अरुंद जंगलवाटेसोबत ईशान्येकडे दहा मैल जाऊन, बिरूर नावाच्या एका छोट्या शहराच्या उत्तरेला तीन मैलांवरच्या एका छोट्या तलावाला मिळतो.
ह्या सर्व परिसरात वन्य प्राण्यांचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे,इथे गाईगुरांचे कळपही बरेच आहेत.
त्यांना सकाळी चरायला नेऊन संध्याकाळी परत आणलं जातं.असं असल्यावर इथे भरपूर वाघ नसतील, तरच नवल. इथे मुबलक आढळणारी रानडुकरं,सांबर व चितळ हे खरं वाघाचं मुख्य खाद्य,परंतु शिकारीपेक्षा गुरांना मारणं सोपं असल्यानं हे वाघ कालांतरानं गुरांची शिकार करू लागतात,आणि वाघ गुरं मारणारच,म्हणून गुराखीही फारशा गांभीर्यानं त्याची दखल घेत नसत.
दररोज एखादी तरी गाय किंवा बैल मारला जायचा.
बिबळे वासरं,शेळ्या आणि गावातली कुत्री मारायचे.बिरूर गावातली ही नित्याचीच बाब होती.
वाघांपेक्षा बिबळे संख्येने कमी होते व वाघांच्या भीतीनं,ते वाघांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी न राहता,सहसा गावाच्या वेशीच्या आसपासच असायचे.
१९४६ च्या सुरुवातीला एक लहान नर वाघ इथे दिसू लागला.संध्याकाळी गाईगुरं परत येताना, बिरूरच्या वेशीवरच,त्यानं वासरं,शेळ्या,मेंढ्या उचलायला सुरुवात केली.
वाघ जनावरं मारताना त्यांची मान मोडतात,
कधीकधी मोठ्या आकाराचे बिबळे,ज्यांना स्थानिक भाषेत 'तेंदू' म्हणून ओळखलं जातं,तेही याच पद्धतीनं शिकार करतात,त्यामुळे हे काम बिबळ्याचंच असावं असा समज होता परंतु एकदा एका जवान गाईला मारताना त्याला एका गुराख्यानं पाहिलं आणि तो वाघच असल्याचं स्पष्ट झालं.
हा वाघ कुठल्याही देशी किंवा विदेशी शिकाऱ्याच्या गोळीला बळी न पडता झपाट्यानं वाढत गेला,
त्याचबरोबर तो अधिकच धाडसी आणि धूर्त बनला.
पुढच्या अठरा महिन्यांत त्यानं दर आठवड्याला दोन किंवा कधीकधी तीन गुरं मारली.हा तिथल्या गुराख्यांची मोठी डोकेदुखी होऊन बसला होता.
ह्या वाघाच्या उपद्रवाच्या बऱ्याच बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या.१९४८ सालच्या अखेरीस माझा मित्र आल्फी रॉबर्टसन लवकरच इंग्लंडला परत जाणार होता.
त्याला भारतातील एक आठवण म्हणून वाघाचं एखादं कातडं मिळालं तर हवं होतं.आम्ही बिरूरला काही दिवस राहिलो,तर त्या उपद्रवी वाघालाही मारता येईल आणि आल्फीला कातडंपण मिळेल असा विचार करून मी मित्रांबरोबर - येमेडोड्डीला जायचं ठरवलं.
बंगलोरहून आम्ही निघालो.आम्हाला १३४ मैल अंतर जायचं होतं.त्या दिवशी नेमका मला ऑफीसमधून निघायला वेळ लागला आणि आम्ही संध्याकाळी उशिरा निघालो.रस्ते बरेच खराब होते.बंगलोरपासून ८६ मैलांवर तिपतूर इथे आमच्या गाडीला एक अपघात झाला. आम्ही माझ्या मित्राच्या गाडीनं जात होतो, गाडीही तोच चालवत होता.एका सपाटशा दगडावरून गाडीचं चाक गेलं,ते दगडाच्या पुढच्या भागावरून जाताना त्याचा मागचा भाग उचलला गेला आणि गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोलच्या टाकीवर तो खाड्कन आपटून टाकीला चांगली नऊ इंचांची चीर गेली. टाकीतलं आठ गॅलन पेट्रोल गळून रस्त्यावर सांडलं आणि गाडी जागेवर बंद पडली. आमच्याजवळ जादाचं पेट्रोल नव्हतं,पण प्रायमस स्टोव्ह होता आणि त्याला लागणाऱ्या पॅराफिन तेलाच्या दोन बाटल्या होत्या,शिवाय फुटपंपही होता.आम्ही त्या पंपाच्या नळीचं एक टोक एका बाटलीत घातलं, तोंडानं दुसऱ्या टोकातून तेल ओढून घेत ते कॉरबुरेटरला जोडलं व गाडी चालू करून तिपतूरमध्ये पोहोचलो.तिथे किरकोळ दुरुस्ती करणारा एकच माणूस होता.त्याला आम्ही उठवलं.एका घराबाहेर आम्हाला एक पॅराफिनचा रिकामा डबा मिळाला.त्या डब्याच्या पत्र्यानं त्या पेट्रोलच्या टाकीची चीर आम्ही झाकून दुरुस्त करून घेतली.तिपतूरच्या एकमेव पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेल्यावर आम्हाला कळलं,की तिथलं पेट्रोल संपलं आहे आणि नवीन साठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत येईल.आम्ही चांगलेच अडकलो होतो.दुसरा पंप सोळा मैलांवरच्या आर्सीकेरी गावात होता.तिथपर्यंत जाण्यापुरतं पेट्रोल मागायला आम्ही एकदोन ट्रक ड्राइव्हरनाही उठवलं.त्यांना अवाच्यासवा पैसेही देऊ केले, पण "आमच्याही गाड्यांमधलं पेट्रोलही संपलंय आणि आम्ही पण उद्या येणाऱ्या पेट्रोलच्या गाडीची वाट बघतोय," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
आता मात्र आम्ही आमची सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा गुंडाळून ठेवला.आम्ही तो मघाचचा डबा आणि एक रबरी नळी घेतली आणि तिपतुरच्या निद्रिस्त रस्त्यांवरून लपतछपत निघालो.एका गल्लीत आम्हाला एक फोर्ड गाडी उभी दिसली.त्या गाडीचा मालक जागा झाल्यास त्याच्यावर नजर ठेवायला मी आल्फीला सांगितलं आणि आवाज न करता हळूच त्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं. रबरी नळीचं एक टोक टाकीत घालून दुसऱ्या टोकातून तोंडानं पेट्रोल ओढून मी ते माझ्या मांडीत धरलेल्या डब्यात जमा केलं.असं पुन्हा एकदा करून जमा झालेलं पेट्रोल घेऊन आम्ही घाईनं गाडीशी आलो.पेट्रोल आणि उरलेलं पॅराफिन एकत्र करून आम्ही गाडी सुरू केली आणि आसंकिरीला आलो.
या सगळ्या गोंधळामुळे बिरूरला पोचायला आम्हाला सकाळचे साडेसात वाजले.गावातून आम्ही जंगलाच्या दिशेनं साधारण दोन मैल गेलो असू,रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत आम्हाला बरीच गिधाडं जमलेली दिसली.माझा मित्र फोटो काढू लागला, तोपर्यंत मी ती गिधाडं जमण्याचं कारण बघायला गाडीतून उतरलो.एक तरुण बैल तिथे मरून पडला होता.
त्याच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खुणा बघून,हे काम बिबळ्याचं आहे,हे स्पष्ट होतं.त्याच्या मानेचे मणके मोडलेले असते,तर तो वाघानं घेतलेला बळी आहे,असं नक्की झालं कारण
वाघांची जनावर मारायची पद्धत तशी असते.
दुसरं म्हणजे बैलाच्या पोटाकडचा भाग खाल्लेला होता आणि आतडी तशीच आत होती.म्हणजे बैलाला बिबळ्यानंच मारलं होतं.वाघ स्वच्छतेचे भोक्ते असतात.खाणं सुरू करायच्या आधी ते जनावराच्या पोटातील घाण खाण्यात मिसळू नये म्हणून,त्याचा मागचा भाग फाडून त्याची आतडी काढून ती दहाएक फूट अंतरावर नेऊन ठेवतात.
इतक्या लगेच आमचं नशीब उघडलं,म्हणून आम्ही खूश झालो.गिधाडांपासून संरक्षण करण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या झुडुपांमधून आम्ही काही फांद्या तोडून तो मेलेला बैल झाकला आणि त्या झुडुपांमध्येच आम्हाला लपून बसता येईल,अशी एक छान जागा तयार केली. आता संध्याकाळी हा बिबळ्या नक्की सापडेल आणि गाडीमुळे रात्री झालेल्या त्रासाची भरपाई होईल,या विचारानं आल्फीलाही बरं वाटलं.
तिथून काही अंतरावर जाऊन आम्ही खाल्लं. रात्री जागरण करायचं असल्यानं झोप काढली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या मेलेल्या बैलाशी आणि आम्ही केलेल्या लपणाशी आलो. त्या बैलावर झाकून ठेवलेल्या फांद्या आम्ही बाजूला केल्या.आल्फी रायफल,
टॉर्च,पाण्याची बाटली आणि ब्लॅकेट घेऊन लपणात शिरला.मी गाडी घेऊन बिरूरला परत जायच्या बेतात होतो, तेवढ्यात एक गुराखी धापा टाकत तिथे आला आणि अर्ध्या तासापूर्वी,मैलभरापेक्षा कमी अंतरावर,
वाघानं आपली दुभती गाय मारल्याची खबर त्यानं दिली.
वाघाला मारून त्याचं कातडं मिळवायचं,का बिबळ्याला मारून त्याचं - हा निर्णय मी आल्फीवर सोपवला.आम्ही केलेली तयारी बघता बिबळ्याला नक्की मारता येणार होतं,वाघाला मारता येईलच याची खात्री नव्हती;परंतु आल्फीनं वाघाला मारायचं ठरवलं.आम्ही लपण करायला वापरलेलं सर्व साहित्य काढून गाडीत भरलं आणि वेगानं गाडी चालवत निघालो. जाताना त्या गुराख्यालाही आम्ही सोबत घेतलं. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही गाडीतलं लपणाचं सर्व साहित्य बरोबर घेतलं आणि गाय जिथे मारली होती,तिथे चालत निघालो.
आम्हाला फार लांब जायला लागलं नाही. जेमतेम तीन फर्लांगावर ती मेलेली गाय पडली होती.तिची मान मोडली होती आणि नाकातून अजूनही फेसाचे बुडबुडे येत होते.गुराख्यामुळे किंवा गाईंबरोबर जवळच चरत असलेल्या म्हशींमुळे असेल,वाघ एक लचकाही न तोडता निघून गेला होता.
सहा वाजले होते व झपाट्यानं अंधार पडू लागला होता.दुर्दैवानं जवळपास एकही झाड किंवा लपून बसता येईल अशी जागा नव्हती. आमच्यापुढे दोनच पर्याय होते.एकतर गाईला इथंच सोडून परत जायचं,नाहीतर जमिनीवरच कुठेतरी बसून,वाघ परत येईल,तेव्हा त्याच्यावर गोळी झाडायची जोखीम पत्करायची.
आल्फीला काहीही करून इथेच थांबायचं होतं. शेवटी आम्ही गुराख्याच्या मदतीनं आजूबाजूच्या काही फांद्या व आमच्याजवळचं साहित्य घेऊन एक ओबडधोबड लपण तयार केलं आणि साडेसहा वाजता आम्ही सगळेच त्यात घुसलो.
आता जवळजवळ पूर्ण अंधार पडत आला होता. पंधरा मिनिटांतच पंचवीस यार्डावरची ती मेलेली गाय दिसेनाशी झाली.अमावस्येची अंधारी रात्र होती.चांदण्यांच्या मंद प्रकाशात आम्हाला अगदी जवळचंच,जरा जरा दिसत होतं;पण गाय मात्र दृष्टीस पडत नव्हती.
एक तास गेला आणि साधारण अर्ध्या मैलावरून एका कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली.तो विचित्र आवाजात ओरडत होता.कोल्हे सहसा टोळीनं गावाच्या किंवा शहराच्या वेशीजवळ आढळतात. रात्री ते वस्तीत शिरून,काही खायला मिळतंय का,हे बघतात.रात्री होणारी त्यांची कोल्हेकुई सर्व भारतीयांना ओळखीची आहे.
असा एकटा फिरणारा कोल्हा मात्र,जरा वेगळ्या आवाजात ओरडतो.अशा एकट्या कोल्ह्याबाबत बरंच काही लिहिलं गेलं आहे आणि बरेच काही समज,आख्यायिका,अंधश्रध्दा आहेत.यातल्या दोन महत्त्वाच्या समजांपैकी एक म्हणजे - हा कोल्हा वाघ किंवा बिबळ्या,जास्त करून वाघाबरोबर असतो तो आपल्या विचित्र ओरडण्यानं वाघाला शिकार कुठे असेल,याची जाणीव करून देतो व त्याचा मोबदला म्हणून, वाघाचं खाणं झाल्यावर,त्यातला वाटा मिळवतो.
दुसरा समज म्हणजे - एका ठरावीक वाघाबरोबरच हा जोडी जमवतो.त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहात तो आपल्या खाण्याची सोय करतो.यातलं काहीही खरं असलं तरी, एका कोल्ह्याची कोल्हेकुई म्हणजे वाघ किंवा बिबळ्या जवळपास असल्याचं चिन्ह आहे,हा अनुभव मी भारतातल्या अनेक जंगलांमध्ये घेतला आहे.
म्हणून त्या रात्री तो कोल्हा ज्या पद्धतीनं ओरडला,
त्यावरून आम्हाला गाईला मारणाऱ्या वाघाची वर्दी मिळाली.त्यानंतर दहाच मिनिटं गेली असतील,त्या गाईच्या पलीकडच्या बाजूनं 'ओऊंघ' 'ओऊंघ' असा वाघाच्या ओरडण्याचा आवाज आला. वाघ खरंच आला होता. मी आल्फच्या मांडीला हलकेच ढोसले,पण तोही तयारच होता.थोडा वेळ गेला आणि झुडुपात किंचित खसफस झाली. त्यापाठोपाठ एक धप्पसा व काहीतरी ओढल्याचा आवाज आला.
आल्फीने टॉर्चचे बटण दाबले,परंतु सभोवतालच्या अंधारात दुर्दैवानं टॉर्चचा प्रकाशझोत मेलेल्या गाईवर नेमका पडायच्या ऐवजी गाईच्या डावीकडे पडला.तेवढा इशारा त्या वाघाला पुरेसा होता.गुरगुर करत एका क्षणात तो उडी मारून झाडीत नाहीसा झाला.
वाघ आता परत येणार नव्हता आणि तिथे थांबणं व्यर्थ होतं,हे माहीत असूनही आम्ही तासभर तिथे थांबलो.
त्यानंतर मैलभर अंतरावरच्या डोंगराच्या माथ्यावरून आम्हाला वाघाच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज आला. आम्ही जरा निराश होऊन आवराआवर केली आणि गाडीपाशी आलो,तर आल्फीला गाडीची किल्लीच सापडेना.ती सापडेपर्यंत रात्रीची लिंगडहळ्ळीहून बिरूरला जाणारी बस आम्हाला ओलांडून पुढे गेली.
आम्ही तिच्यामागोमाग जात बिबळ्याला मारण्यासाठी जे लपण केलं होतं, तिथपर्यंत आलो.तेव्हा,समोर आम्हाला जे दृश्य दिसलं,ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. बसच्या दिव्यांच्या उजेडात,आपण मारलेल्या बैलाला खात बसलेल्या बिबळ्याचे डोळे चमकत होते.बसच्या ड्रायव्हरनं ते पाहून करकचून ब्रेक मारत बस थांबवली.
बस थांबताना उडालेल्या धुरळ्यात मी आणि आल्फी गाडीतून खाली उतरून धावत बसच्या पुढे आलो.
आम्हाला तो बिबळ्या पलीकडचं शेत अर्ध ओलांडून जाताना दिसला.आल्फीनं गोळी झाडली. बिबळ्या जोरात 'गर्रर्र' आवाज करत हवेत उसळला आणि अतिशय वेगानं ते शेत ओलांडत नाहीसा झाला.
आम्ही चूक केली होती,पण आता त्याचा विचार करून काही फायदा नव्हता... आम्ही आल्फीला खाली उतरवून बसच्या मागोमाग गाडी घेऊन तिथून निघून जायला हवं होतं.दोन्ही गाड्या निघून गेल्याचं पाहून काही मिनिटातच तो बिबळ्या भक्ष्यावर परत आला असता आणि सहजपणे आल्फीच्या गोळीला बळी पडला असता.खरंतर माझ्याकडूनच योग्य सल्ला दिला गेला नव्हता आणि आता बिबळ्याही जखमी होऊन पळाला होता.ते अत्यंत धोकादायक होतं.
जे घडून गेलं,त्याचा जास्त विचार न करता आम्ही बिरूरला टूरिस्ट बंगल्यावर परत आलो. सकाळी उठून आम्ही परत त्या ठिकाणी गेलो.जरा आजूबाजूला हिंडून पाहिल्यावर आम्हाला एक पुसटसा रक्ताचा माग सापडला.
शेत संपून झुडुपांचं गचपण सुरू झालं,तसा रक्ताचा माग जास्त स्पष्टपणे दिसू लागला.पण आता आमच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी राहिली.बिबळ्याच्या एका बगलेत गोळी लागली होती,त्यातून रक्त वाहू लागायला थोडा वेळ लागल्यानं सुरुवातीचा माग अस्पष्ट होता.
उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण )
नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन
अनुवाद - संजय बापट