* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मुंगी उडाली आकाशी !!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

मुंगी उडाली आकाशी !! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुंगी उडाली आकाशी !! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२५/१२/२२

….मुंगी उडाली आकाशी !!

"अगं आई,सांग ना मोंटूला,आम्ही सर्व मुलींनी आज एकत्र येऊन एक छान कार्यक्रमाचा बेत आखलाय तर ती यायला नाही म्हणतेय."


मोंटू,जा बाळ.मोठ्या बहिणींचं ऐकावं आणि नुसती पोरांबरोबर हुंदडत असतेस.त्यापेक्षा जावं अशाप्रकारच्या मुलींच्या कार्यक्रमाला."


" मी नाही जाणार असल्या कार्यक्रमाला.मला असले मुलींचे कार्यक्रम आवडत नाहीत.आज तर मी,विदुनं आणि भय्यानं जायचं ठरवलंय सायकलवरून.आज आम्ही त्या मोठ्या चिंचेजवळ असलेल्या घसरतीवर शर्यत लावणार आहोत.बघ आज दोघांना कशी हरवते ते."


अर्थात मोंटू स्वतःला वाटते तेच करणारी असल्यानं तिच्या आईचा आणि मोठ्या दोन्ही बहिणींचा तिच्यासमोर नाईलाज असायचा.


पंजाबमधील कर्नाल या गावातील श्री.बनारसीलाल चावला नावाच्या शीख व्यक्तीच्या कुटुंबातील ही गोष्ट.१९४७ सालच्या भारत-पाक फाळणीत होरपळून निघालेले हे कुटुंब. पाकिस्तान शेहुपुरात पिढ्यान् पिढ्या काढलेल्या या सधन कुटुंबाला शेवटी वाचवत निर्वासितासारखा कर्नालमधील एका पडक्या मशिदीमध्ये आश्रय घ्यावा लागला.


बनारसीलाल,त्यांची पत्नी संयोगिता,सुनीता आणि दीपा या दोन मुली,मुलगा संजय आणि शेंडेफळ असलेली कल्पना अर्थात मोंटू अशा पाच जणांच्या कुटुंबाच्या जीवनाला नव्याने सुरुवात झाली आणि लहानमोठे व्यवसाय करत बनारसीलाल यांचा हळू हळू जम बसू लागला.


मुले मोठी होऊ लागली.पण यांच्यातली कल्पना लहानपणापासूनच जरा हूड होती.आपल्या बहिणींपेक्षा तिचे आपल्या भावाशी जास्त जमायचे आणि त्याच्याप्रमाणेच तिचे सर्व खेळ मुलांचे असत.त्याचे ऐकणे,अनुकरण करणे हे तिला लहानपणापासून आवडे.बहिणींबरोबर घरात राहण्यापेक्षा संजयबरोबर बाहेर धांगडधिंगा घालणे हे तिला अधिक आवडायचे. कर्नालमधील टागोर बालनिकेतन शाळेमध्ये कल्पना जात असे आणि एक हुशार मुलगी म्हणून ती शिक्षकवर्गात प्रिय होती.जशी ती अभ्यासात हुशार होती,तशी ती खेळातही पुढे होती.शाळेमध्ये ती भरतनाट्यम् बरोबर कराटेही शिकली होती.अशा या हरहुन्नरी कल्पनाचे शालेय शिक्षण संपले आणि तिने इंजिनिअर व्हायचे ठरविले.

कर्नालमध्येच असलेल्या 'दयालसिंग कॉलेजमध्ये तिने पदवीपूर्व वर्गाचे दोन वर्षे शिक्षण घेतले आणि गुणवत्तेवर चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.


घर सोडून वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेणे कल्पनाच्या पालकांना पसंत नव्हते,पण कल्पनाच्या इंजिनिअर होण्याच्या तीव्र इच्छेसमोर त्यांना नमावे लागले आणि वसतिगृहात राहण्याऐवजी तिच्या आईने चंदीगडला तिच्याबरोबर राहण्याचा पर्याय निवडला.अशाप्रकारे इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकारू लागले.कल्पनाला इंजिनिअरिंगसाठी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल हा विषय सुचवण्यात आला.पण तिच्या मनामध्ये एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे आपण एरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचे.कॉलेजच्या प्राचार्यांना आणि विभागप्रमुखांना तिने ठामपणे सांगितले की,या विषयाला जर तुम्ही मला प्रवेश दिला नाही तर मी माघारी जाईन.इथेदेखील तिची तीव्र इच्छा आणि निश्चयाकडे पाहून त्यांनी तिला प्रवेश दिला.

एरोनॉटिक्स हा विषय घेऊन इंजिनिअरिंग करणारी ती त्या कॉलेजमधील एकमेव मुलगी होती.


खरं तर हे एरोनॉटिक्सचे भूत कल्पनाच्या मानगुटीवर अगदी लहानपणापासून बसले होते. कारण तिच्या भावाला आपण पायलट व्हावे, असे लहानपणापासून वाटायचे आणि त्याचे अनुकरण करायला कल्पनाला आवडायचे. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कल्पनाच्याही मनामध्ये विमाने भरारी घेऊ लागली होती आणि पुढे एरोनॉटिक्स हा विषय घेऊन ही मनातली विमाने प्रत्यक्षात उडविण्याची तिची प्रक्रिया सुरू झाली.


इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परीक्षेत तिने देदीप्यमान यश मिळविले आणि आसमंतामध्ये भरारी घेण्यासाठी कल्पनाचे पंख उघडू लागले. तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते आणि म्हणून तिने तेथील अनेक विद्यापीठात अर्ज पाठविले होते.

टेक्सासमधील विद्यापीठात तिला एरोनॉटिक्समध्ये उच्च पदवी घेण्यासाठी प्रवेश मिळाला.यावेळीदेखील तिच्या घरच्यांचा तिच्या या निर्णयाला पाठिंबा नव्हता.पण कल्पनाच्या इच्छेपुढे त्यांचा विरोध टिकला नाही आणि कल्पनाने अमेरिकेकडे भरारी मारली.


अमेरिकेत पोचल्यावर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अर्लिंग्टन इथे कल्पनाने एरोस्पेस इंजिनिअरिंग याच विषयात आपल्या पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात केली.


याच वेळेस तिच्या आतमध्ये दबून राहिलेली तिची विमान उडविण्याची इच्छा उफाळू लागली आणि तिने विमान उडवायचे प्रशिक्षण घ्यायचे ठरविले.या निमित्ताने तिचा परिचय तिचा प्रशिक्षक असलेल्या जीन पियरे या तरुणाशी झाला आणि विमान उडवता उडवता त्यांची मनेही उडून एकमेकांमध्ये जाऊन बसली.त्या दोघांनी लग्न करायचे ठरविले.कल्पनाच्या घरातून पुन्हा कडाडून विरोध झाला,पण तिचा हट्ट (तीव्र इच्छा) करण्याचा स्वभाव सर्वांना परिचित होता,त्यामुळे विरोध केला तरीही कल्पना आपल्या मनाप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही,याची जाणीव घरच्यांना झाली आणि कल्पनाच्या लग्नाला हिरवा कंदील दाखवला गेला.१९८४ तिचा आणि जीन पियरे हॅरिसन या मूळच्या फ्रेंच पण अमेरिकेचे नागरिकत्व मिळविलेल्या युवकाचे लग्न झाले.


यानंतर मात्र तिच्या विषयात ती अधिकाधिक प्रगत होत गेली आणि यशाच्या एक एक पायऱ्या चढू लागली.

टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आल्यानंतर तिने मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आणि त्यानंतर तिने कोलोरॅडो विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग,म्हणजे अवकाशात जाणाऱ्या वस्तूंसाठी लागणारे तंत्रज्ञान यातील विषय आपल्या डॉक्टरेटसाठी निवडला.१९८८ साली तिने आपली डॉक्टरेट मिळविली आणि त्यानंतर अवकाशात जायच्या प्रयत्नांची आखणी करायला सुरूवात केली.


अवकाशयात्री बनण्यासाठी अतिशय कणखर आणि संतुलित वृत्ती लागते.सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळी मानसिकता या पेशासाठी गरजेची असते.कोणत्याही प्रसंगी विचलित न होता चटकन योग्य निर्णय घेण्याची क्षमता या व्यक्तींकडे लागते.या सर्व गोष्टी कल्पना चावलाकडे जन्मजात होत्या.त्यामुळे तिला अवकाशयात्री होण्याचा मार्ग सुकर झाला.या वेगळ्या मानसिकतेबद्दल कल्पनाला विचारल्यावर ती म्हणते की,


 'अवकाशयात्री बनण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता आणि कौशल्ये तुम्ही प्रशिक्षणामुळे आणि सरावामुळे अंगामध्ये बाणवू शकता.पण आकाशात,अवकाशात विहार करायचे स्वप्न मात्र तुमच्याकडे उपजत असावें लागते.'पुरुषांची मक्तेदारी मानलेल्या या क्षेत्रामध्ये शिरकाव करून त्यात प्रावीण्य मिळविण्यात कल्पना यशस्वी झाली होती.


अवकाशात विहार करायचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग खडतर आहे,पण अशक्य नाही.लहान शहरातून येणाऱ्या भारतीय मुलीसाठी अवकाश स्वप्ने अशक्यप्राय गोष्ट असली तरी तिने ती साध्य करून दाखवली आणि अनेक मुलींसाठी आदर्श निर्माण करणारी ती एक रोल मॉडेल ठरली.


'नासा'मध्ये दाखल झाल्यानंतरचा तिचा प्रवास अवकाशयानाप्रमाणेच वेगवान होता.तिने आपल्या कामाच्या पध्दतीने,नम्र स्वभावाने, सतत दुसऱ्यांना मदत करण्याच्या वृत्तीने, प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या वरिष्ठांचीही मने जिंकली.


तिच्या या गतीमुळेच तिला १९९७ मध्ये कोलंबिया यानामधून अवकाश मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली.तिचा हा अंतराळ प्रवास सोळा दिवसांचा झाला.या दरम्यान कल्पना कोलंबिया यानात अंतराळात होती. कल्पना चावला 'पहिली अंतराळवीर स्त्री' म्हणून प्रसिद्धीस आली.


याबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिला विचारले असता ती म्हणते,


"तुमच्या अंतर्मनात सतत जागी ठेवलेली स्वप्ने सत्यामध्ये उतरवण्याचा मार्ग अस्तित्वात असतो.फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवे."


कल्पनाची घोडदौड चालूच होती.दोन हजार साली 'एस.टी.एस.१०७' या कोलंबियाच्याच आणखी एका अवकाशयात्रेसाठीही तिची निवड झाली. ही यात्रा २००३ साली ठरवण्यात आली होती. त्यासाठी कल्पनाला पुन्हा आणखी प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करावे लागले.


कल्पनाने आपल्या दुसऱ्या उड्डाणाची तयारी सुरू केली.

यावेळी तिला विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.कारण या यात्रेची ती 'कमांडर' होती. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर 


१६ जानेवारी,२००३ या दिवशी कोलंबिया अवकाशात झेपावले.अंतराळ यानातून पृथ्वीकडे बघताना कल्पनाला ती फारच मोहक वाटत होती.एखादी तलम ओढणी घेऊन नटलेली पृथ्वी तिला अतिशय कोमल आणि कोवळी दिसत होती.या ठिकाणाहून पृथ्वीकडे पाहताना आपण कोणा एका देशाचे आहोत हे भानच नाहीसे होते,असा अनुभव तिला आला.आपण सर्व पृथ्वीशी बांधील आहोत याची जाणीव तिला होत होती..


सोपविलेले काम पुरे करून कोलंबिया आणि अर्थात कल्पनाही परतीच्या प्रवासाला लागली. १ फेब्रुवारी २००३ च्या सकाळी ९ वाजता आपल्या हृदयामध्ये जोपासलेल्या स्वप्नांची पूर्ती करीत ती पृथ्वीवर उतरणार होती. अवकाशयात्रेची आणि तिच्या वैयक्तिक यशाची गुढी आता अमेरिकेबरोबर भारतातही उभी केली जाणार होती.सायकलवरून तोंडावर वारे घेऊन वेगाने जाणारी मोंटू आता एक अंतराळयान घेऊन पृथ्वीच्या दिशेने वेगाने कूच करीत होती. वेगाशी अतूट नाते असलेल्या कल्पनाच्या जीवनालाही आता अतिप्रचंड वेग आला होता. कल्पनाची वाट बघणाऱ्यांची उत्कंठा प्रत्येक क्षणाला वाढत होती.पहाटे पहाटे आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या पक्ष्यांची घरट्यांमध्ये परत येण्याची वाट जशी संध्याकाळी त्यांची बाळे बघत असतील अगदी त्याचप्रमाणे कर्नालच्या टागोर बालनिकेतन शाळेतील लहान मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत आणि जीन पियरेपासून ते तिच्या आई-वडील,इतर कुटुंबीय,सहकारी आणि मित्रमंडळीपर्यंत प्रत्येक व्यक्ती कल्पना पुन्हा घरी येण्याची वाट बघत होती.कोलंबिया पृथ्वीच्या कक्षेमध्ये आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.... आता अर्ध्या तासात कल्पना येणारच....


"आता पंचवीस मिनिटे लागतील हं "


यावेळी मात्र घड्याळ अतिशय संथ गतीने आपले काटे पुढे सरकवत असल्यासारखे वाटत होते....झाली. अठरा मिनिटं राहिली.


सतरा...


सोळा .....


आणि घड्याळ थांबलं......


पृथ्वीपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर असताना कोलंबिया कल्पना आणि इतर अंतराळवीरांसह पंचमहाभूतामध्ये विलीन झालं. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं.कल्पना आपली पुढची स्वप्नं साकार करण्यासाठी पृथ्वीवर पोहोचू शकली नाही.कदाचित् ईश्वराला त्याचाच अंश असलेल्या या मुंगीनं घेतलेली ही अवकाशभरारी इतकी भावली असेल की, त्यानेच तिला आपल्यामध्ये सामावून घेतलं असेल आणि अशातऱ्हेने आकाशी उडालेली ही मुंगी स्वतःच आकाश होऊन राहिली.


भरारी ध्येयवेड्यांची

डॉ. प्रदीप पवार