माझ्या तरुणपणातले दिवस होते.डोंगरापल्याडच्या
शांत वनराईत भटकताना एका संतपुरुषाची भेट झाली.बोलता बोलता आमच्या संभाषणात सद्गुणाविषयी काही बोलणं निघालं.तेवढ्यात डगरीवरून एक पुंड लुटारू लंगडत,धापा टाकत येताना आम्हाला दिसला.आम्ही होतो तिथं तो आला.त्या संत पुरुषासमोर गुडघे टेकून म्हणाला,"महाराज,माझ्या जिवाची बेचैनी शांत करा.माझी पापं मला छळत आहेत."
संतपुरुष म्हणाला,"माझी पापंदेखील मला छळत आहेत.'पुंड म्हणाला,"महाराज,मी चोर आहे,दरोडेखोर आहे.'
संतपुरुष उत्तरला,"मीही तसाच आहे रे.'
चोर बोलला,"मी खुनी आहे.कित्येकांची हत्या मी केली आहे.त्यांच वाहून गेलेलं रक्त माझ्या कानांत घोंगावत आहे.'
संतपुरुष म्हणाला,"मीसुद्धा तसाच खुनी आहे आणि पुष्कळांची हत्या माझ्या मानगुटीवर बसलेली आहे.'
पुंड म्हणाला,'सांगता येणार नाहीत इतके गुन्हे मी केले आहेत.संतपुरुष म्हणाला, 'माझं तरी काय? मीही तसाच गुन्हेगार आहे.'
इतकं झाल्यावर तो लुटारू उभा राहून संतपुरुषाकडे टक लावून पाहू लागला.त्याच्या नजरेत काही वेगळंच पाणी दिसत होतं.आमच्यापासून तो निघाला आणि उड्या टाकीत डोंगर उतरून गेला.
संतपुरुषाकडे वळून मी म्हणालो,
"न केलेल्या हत्यांचे आणि गुन्ह्यांचे आरोप तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतलेत?जाताना तो कसा गेला ते बघितलंत ना?तुमच्या बोलण्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही.'
"खरंच आहे.माझ्यावर विश्वास नसेना का,पण जाताना त्याची बेचैनी पुष्कळ कमी झाली होती."
त्या क्षणी,दूर अंतरावरून त्या लुटारूच्या तोंडून निघणाऱ्या गाण्याच्या लकेरी आमच्या कानी आल्या.त्यांच्या पडसादांनी त्या दरीत उल्हास भरून आला.
खलील जिब्रान यांच्या द प्रॉफेट या पुस्तकातून
'संत' भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख
मधुश्री पब्लिकेशन