* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जगावेगळी कौतुकाचे थाप..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

जगावेगळी कौतुकाचे थाप.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जगावेगळी कौतुकाचे थाप.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७/२/२३

जगावेगळी कौतुकाचे थाप..

" जे लोक पराकोटीचे प्रेम करू शकतात, तीच लोक अपार वेदना सहन करू शकतात."  - टॉलस्टॉय


आम्ही लहान असताना खेळायला जात होतो. (तसं प्रत्येकजण कधी ना कधी खेळायला गेलेलं असतचं) पायात चप्पल नसायची अनवाणी फिरायचं.मग कधी कधी पायात काटा घुसायचा त्यावेळेला सुई वगैरे सोबत नसायची.मग काट्यानेच काटा काढला जायचा.पायातून काटा निघाल्यानंतर त्या काट्याला मी शिव्या द्यायचा. पण ज्या काट्याने काटा काढला असायचा त्याला मात्र मी प्रेमाने स्पर्श करायचा.त्यावेळी अधिक खोलात जाऊन कधी विचार करत नसायचा.पण आता मला माझ्या त्या वागण्याचं हसू येतं.कारण माझ्या पायात जो काटा मोडायचा आणि ज्याला मी शिव्या द्यायचा.तो काटा ज्या काट्याने मी तो काटा काढलेला असायचा,त्याचा भाऊबंदच असायचा.हा सर्व जीवनातील जगण्याचा,

अनुभवाचा पुस्तक वाचण्यातून आलेला समजूतदारपणा आहे.


' मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही.'अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन जगणाऱ्या सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष देण्यात आलं.सॉक्रेटिसने ते विष आनंदाने घेतले.याचा परिणाम मृत्यू असूनही ते त्याने आनंदाने स्वीकारले.


आपण साधं आजारी जरी पडलो तरी बरं होण्यासाठी ज्या गोळ्या खातो त्या गोळ्या खाताना आपण तोंड वेडे-वाकडे करतो.इंजेक्शनची भीती वाटते.कारण आपल्या कुणालाच वाटत नसतं आपण आजारी पडावं.पण तरीसुद्धा आपण आजारी पडतो.


पुस्तक नवीन विकत घेतलं असताना ते उघडून एकदा पूर्ण श्वास घ्या.त्या पुस्तकाचा सुगंध आपल्या फुफ्फुसात साठवून ठेवा.हा सुगंध म्हणजे जणू काही कोटी वर्षांपूर्वी पहिला जो पाऊस पडला होता त्या पावसावेळी मातीतून आलेला सुगंध याची आठवण करून देणारा असतो.


लेखक पांढऱ्या कागदांवरती काळ्या अक्षरांनी अंधारी जीवन प्रकाशमय करीत असतो.पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. अनेकांच्या आयुष्याचं फक्त कल्याणच करतात.


लेखक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आणि वाचक म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राचे सप्तरंगी छायाचित्र..


पुस्तक वाचत असताना लेखकाच्या जीवाची झालेली घालमेल,त्याची झालेली जीवाची तगमग,भावनिक गुंतागुंत,कमी जास्त झालेला रक्तदाब या सर्व भावनांशी एकरूप होऊन जो पुस्तक वाचतो तोच खरा वाचक..


लेखक हा नेहमीच पुस्तकांसोबत जोडलेला असतो नाही तो असावाच लागतो.लेखकाची व पुस्तकाची नाळ ही सदैव जोडलेले असावी.


पण बऱ्याच वेळेला पुस्तक संपल्यानंतर त्या लेखकाचा आणि पुस्तकाचा काही संबंध राहत नाही.पुस्तक त्या लेखकापासून दूर जातं.


माणसाच्या भावभावना सोबत घेऊन जगणारा लेखक आणि पुस्तक लिहून त्यापासून बाजूला होणारा लेखक यामध्ये फार संवेदनशील अंतर आहे.


काही लेखक फोन केल्यानंतर फोन उचलत सुद्धा नाहीत,आणि फोन उचलल्यानंतर फारच कामात आहे असं सांगून बोलणं थांबवतात. त्यांना जिवंत माणसाशी बोललेलं कदाचित आवडत नसावं..


पण याला सुद्धा अपवाद आहे आणि तो अपवाद जीवन आनंदाने जगण्यासाठी फारच अलौकिक आणि अविस्मरणीय असा आहे.


परवाच शिक्षणात्री या मासिकामध्ये फेब्रुवारी २०२३ या अंकामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा जागर करणाऱ्या महानुभावांच्या वाचन छंदा विषयी.. वाचन आवडी विषयी मा.बाबाराव मुसळे जेष्ठ कथाकार यांचा माझं वाचन,माझी वाचन प्रक्रिया या लेखामध्ये त्यांनी लेखक बनण्यामागची खडतर तपश्चर्या याबद्दल लिहिले होते..हा लेख वाचून मी त्यांना फोन लावला. यापूर्वी मी त्यांच्याशी कधीही बोललो नव्हतो त्याचा नंबर ही माझ्याकडे नव्हता.या लेखाखाली तो दिला होता.

पहिल्यांदा फोन लागला तेव्हा तो व्यस्त लागला.आणि थोड्यावेळाने त्यांचा मला फोन आला तब्बल वीस मिनिटे आम्ही बोललो. त्यांच्याशी बोलत असताना ते कोणी परके किंवा परग्रहावर राहणारे आहेत असं मला कधी वाटलंच नाही.त्यांच्याशी बोलत असताना आमचे काही ऋणानुबंध आहेत असंच वाटत होतं.पुलकी,प्रेम,जिव्हाळा,

नात्यातील पावित्र्यता या सर्व भावना व या भावनेला सोबत घेऊन विशाल मन बाळगणाऱ्या या लेखकांशी बोलताना ऊर भरून आला.आणि माझा चांगुलपणावरील विश्वास दृढ झाला.


यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला सॉक्रेटिसचे विचार आठवले.मला काहीच कळत नाही हे तरी कळतं.इतरांना तेही कळत नाही.


त्यानंतर त्यांनी लगेचच फेसबुक वरती माझा आणि त्यांचा झालेला मोबाईल वरील सुसंवाद पोष्ट केला.( ही पोस्ट वाचून प्राचार्य भास्कर गायकवाड यांचा मला फोन आला व त्यांनी माझी कौतुक केले.) पण त्याचबरोबर शिक्षणयात्री या मासिकामध्ये 'पुस्तकांसोबत जगताना.' एक विस्तृत अशी आशीर्वाद स्वरूप शब्दरूपी प्रतिक्रिया दिलेली आहे.फेसबुक वरील ती पोस्ट व माझा लेख वाचून दिलेली प्रतिक्रिया जशी आहे तशी खाली देत आहे.


असाही एक दर्दी वाचक।


परवा एक निनावी फोन आला,फोन निनावी आले तरीसुद्धा मी उचलतो.कारण कोण,कधी, कुठून,कसे कोणत्या विषयावर बोलेल याचा नेम नसतो,माझ्याशी असं बोलणाऱ्या माणसांची संख्या जास्त असते.उगीच काहीतरी आगाऊपणा म्हणून मला फार कमी फोन येतात.बरेच मान्यवर असे आहेत की ते निनावी फोन उचलत नाहीत.पण मी तसे करत नाही।


तर तो निनावी फोन मी घेतला,आणि पलीकडून एक व्यक्ती बोलू लागली,'सर,तुमचा एक लेख माझ्या वाचनात आला.त्या लेखातून तुम्ही लेखक बनण्या मागची तुमची जी खडतर तपश्चर्या आहे ती मांडली आहे,ती मला खूप भावली आहे,म्हणून फोन केला।'असं बरंचसं माझ्यासाठी उत्साहवर्धक वाटेल असं तो बराचवेळ बोलत राहिला.


त्या लेखाचे शीर्षक'लेखक होणे खरंच सोपे आहे का?असे असावे मध्यंतरी हा लेख औरंगाबादच्या दिव्य मराठी या दैनिकाच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला होता.तो लेख अनेकांना आवडला होता.त्यावेळी कित्येक फोन मला येऊन गेले होते.धुळे जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावावरून निघणाऱ्या एका मासिकात तोच लेख पुनर्मुद्रित झाला.तो विजय गायकवाड यांच्या वाचनात आला,हा लेख त्या मासिकात छापून आल्याबद्दल मला काहीही माहिती नव्हते.गायकवाड यांनी सांगितलेले मासिकाचे व संपादकाचे नावही माझ्या परिचयाचे नव्हते.

तरीही त्या मासिकाने हा वाचक मला मिळवून दिला यासाठी त्या संपादकाचे मला विशेष आभार मानावेसे वाटतात.


 तर हा वाचक नाव विजय कृष्णात गायकवाड, मुक्काम पोस्ट टोप,तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर फक्त नववा वर्ग शिकलेला.कोल्हापूरला कुठल्या कारखान्यात जेथे लोखंड वितळवून त्याच्या रसापासून मोटर्सचे पार्ट बनविण्यात येतात त्या कारखान्यात काम करणारा आहे.कामगार आणि तोही असा वाचक की ज्याच्याजवळ स्वतः विकत घेतलेली जवळपास दीडशे पुस्तके मला कौतुक वाटलं.ते सांगत होते,'सर,मला पुस्तक वाचल्याशिवाय चैन पडत नाही.हा तुमचा लेख वाचला,त्यात तुम्ही ज्या गोष्टी दर्शविल्या त्या मला भावल्या,आणि म्हणून तुम्हाला फोन करण्याची हिम्मत केली.'


मी माझ्याबद्दल त्यांना फारसं सांगत बसलो नाही कारण एरव्हीही मला कोणाहीसोबत माझ्याविषयी अधिक बोलणे हे मुळात आवडत नाही.तरीही मी त्यांना माझ्या दोन गोष्टी वाचायची शिफारस केली,एक माझा सहावीच्या वर्गात बालभारती पुस्तकात असणारा' बाकी वीस रुपयांचं काय?' हा पाठ कारण हे पुस्तक सहज उपलब्ध होते.आणि माझी 'हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी,ही कादंबरी मिळविण्यासाठी मी त्यांना मा.अनिल मेहता यांच्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी द्वारा जवळ असणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तक विक्री दुकानात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्याबद्दल सांगून तिथून विकत घ्यायला सांगितले.आणि ते त्यांना शक्य आहे असे ते बोलले.


असा वाचक भेटणे म्हणजे लेखकाला प्रचंड ऊर्जा स्रोत मिळणं होय.याआधी प्राचार्य भास्कर गायकवाड,

औरंगाबादचे नारायण कुडलीकर हे असेच थोर वाचक आहेत.त्यात आता भर पडली विजय कृष्णात गायकवाड यांची..



 'विजय' शिक्षण यात्री या मासिकात आलेला पुस्तकांसोबत जगताना हा तुमचा लेख वाचला आणि एक बऱ्यापैकी यशस्वी लेखक म्हणून मी मला समाधानी मानत असताना मी कुछ भी नही याची जाणीव मला या लेखाच्या व्यापक प्रसार पुस्तक व्यवस्थेतून दिसून आली.


तुम्ही ज्या अलेक्झांडरच्या नावाने असणाऱ्या वाचनालयाचा संदर्भ देता त्या वाचनालयात माझं पुस्तक जावो अशी जर मी अपेक्षा केली तर मी आणि ती वाचनालय यांच्यात कितीतरी योजने नव्हे तर काळही अंतरावर उभा आहे.कदाचित त्यासाठी मला लेखक म्हणून हजार वेळा जन्म घेऊनही मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही.


आज माझी अवस्था ही समुद्रातल्या वाळूच्या एका छोट्यातल्या छोट्या अशा कणासारखी आहे.मला वाटणारा माझा दुराभिमान एका अफाट पोकळीत भिरकावून दिलेल्या वाळलेल्या पानासारखा वाटतो.

माझ्या स्थिरावण्याने माझं अस्तित्व जगाला कळावे ही माझ्यासाठी दुर्मिळात दुर्मिळ अशी गोष्ट असेल.


मित्रा,केवळ तुमच्यामुळे या माझ्या वास्तव स्थितीची मला जाणीव झाली.त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.


 तुम्ही फेसबुकवर नाहीत याचा आनंद झाला आणि फेसबुकवर कधी येण्याचा प्रयत्न करू नका.कारण ते जग रिकामटेकड्यांचे आहे असे मला वाटते.मी त्या जगाचा सहप्रवासी जरूर आहे.पण माझ्या गरजेपुरता मी त्याचा वापर करतो.मला त्या जगात माझी वाचकांची संख्या वाढविण्याची संधी मिळते असं वाटते.पण ते सारं भ्रामक आहे.तिथे असणारे जे वाचकं ते टाइमपासवाले आहेत.

त्यातून फार क्वचित नामांकित असे वाचक मिळू शकतात नाही असे नाही.


पण तुमच्यासारखा आयुष्यातला फार थोडा वेळ वाचनासाठी खर्च करणाऱ्या सात्विक आणि सच्च्या वाचकाला पुस्तकं हीच योग्य साथ देऊ शकतात.


फेसबुक हे आभासी जग,आभासी माध्यम आहे.

त्यामुळे फेसबुकवर जाऊन तितकी मजा वाटत नाही.मी म्हणतो त्या पद्धतीचं लेखन जर तुम्ही विस्तारपूर्वक केलं तर तो या जगातल्या तुमच्यासारख्या काही निस्तं वाचनातून आनंद,

समाधान मिळवणाऱ्या वाचकांसाठी फार मोठी देणगी असेल.तुमचा अनुभव हा त्यांच्यासाठी फार मोलाचा ठरेल.हे तर खरंच पण त्या अनुभवाचा फायदा अनेकांना ते पुस्तक उपलब्ध असेल तोपर्यंत घेता येईल.


पुस्तकं ही मर्यादित आयुष्य लाभणारी गोष्ट आहे,

आपल्याकडे अलेक्झांडरच्या त्या लायब्ररीसारखी व्यवस्थाही नाही.त्यामुळे आपल्याकडची पुस्तकं किती काळ राहतात आणि पुस्तक नसले की तो लेखक किती लवकर विस्मृतीतही जाऊ शकतो.याचा पण विचार आवश्यक आहे.पण आता अलीकडे पुस्तकांच्या जगातही काही क्रांती होते आहे.पुस्तकांची ई-बुक्स तयार होत आहेत आणि ती नेटवर कधीही उपलब्ध आहेत.माझीही काही ई- बुक्स तयार झालेली आहेत.पण ती नेमकी मला शोधत येत नाहीत.जर तुम्हाला ती शोधता आली तर त्याचाही मला आनंद होईल.


प्राचार्य भास्कर गायकवाड सर हे उत्तम वाचक आहेत.

त्यांची स्वतःची अशी फार मोठी लायब्ररी आहे.

त्यांच्याजवळ मोठमोठे ग्रंथ आहेत.मी ते पाहिले आहेत.आजही ते मोठ्या पुस्तकांवर खर्च करतात.पण ते वाचल्यावर फारसे व्यक्त होत नाहीत,हा त्यांचा दोष आहे.

मी त्यांना तसे म्हणतही असतो.त्यामुळे ते तुमच्या संपर्कात आले.तुमच्याशी बोलले याचा मला आनंद होतो. 


खरं म्हणजे लेखकाचे जसे एक जग असते.तसं तुमच्यासारख्या वाचकांचे एक जग असावं त्यात तुमच्यासारख्या वाचकांचा एकमेकांशी परिचय ही तर बाब आहेच.पण तुमचेही दर वर्षातून एखादे संमेलन व्हावे.किमान तुम्ही एकमेकांना भेटावे,त्यातून विचार विमर्श व्हावा.त्यातूनही काहीतरी एक वेगळं असं रसायन बाहेर यावं.जे जगाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरू शकणार आहे.बघा काय करता येईल ? नारायण कुडलीकर यांनाही मी तुमचा नंबर देईन किंवा  त्यांचा नंबर मी तुम्हाला देईन त्यांच्याशी कसा संपर्क करता येईल 


मस्त वाचा,लिहा.तुम्हाला अनंत शुभेच्छा..


आदरणीय बाबाराव मुसळे ( नाना )

- जेष्ठ कथाकार


यांच्या एकूण १० कादंबऱ्या आहेत.बाकी वीस रुपयाचं काय ? इयत्ता सहावी बालभारतीमध्ये ही कथा आहे.दावणीचा बैल व हाल्या हाल्या दुधु दे ( कांदबरी ) विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.


हा लेख मी आता पूर्णविराम देऊन थांबवतो. तरीसुद्धा हा लेख तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना व विचारांना सोबत घेऊन चालत चालत राहील अखंडपणे कधीही न थांबण्यासाठी.


विजय कृष्णात गायकवाड