मानवजात जणू एकाच कुटुंबाची आहे.एकाच कुटुंबाच्या अनेक शाखा सर्वत्र पसरल्या आहेत. आकाशातील इतर तेजोगोलांच्या मानाने पृथ्वी ही फारच लहान आहे;आणि लहानशा पृथ्वीवरील हे मानव कुटुंब म्हणून फारच लहान वाटते.आणि या सर्व विश्वपसाऱ्यात पृथ्वीवरीलमानवासारखा प्राणी अन्यत्र नाही.असे आजचे ज्ञान तरी सांगत आहे.सर्व विश्वात अपूर्व व अद्वितीय असा हा मानव आहे.
त्याच्या जातीचा प्राणी विश्वात अन्यत्र नाही.
मानवजातीचे सारे सभासद परस्परांशी प्रेमाने व बंधुभावाने वागतील,असे वाटणे स्वाभाविक आहे.
परंतु आश्चर्य वाटते,की दोन मानवजाती जर एकत्र आल्या,तर त्यांचा परस्परांत पहिला परिचय जो होतो,तो मारामारीच्या रूपाने होतो.या मानवात काहीतरी विचित्र वेडेपणा आहे असे वाटते.
हा मानवी वेडेपणा आपण इजिप्तमध्ये,मेसापोटेमियामध्ये
व पॅलेस्टाईनमध्ये पाहिला.हा वेडेपणा दूर करू पाहणाऱ्या काही संस्फूर्त अशा दैवी पुरुषांचे प्रयत्नही आपण पाहिले.
आता आपले लक्ष पृथ्वीच्या दुसऱ्या एका भागाकडे देऊ या.हिमालयाच्या खिंडीतून जे लोक हिंदुस्थानाच्या मैदानात उतरले,त्यांनी ऐतिहासिक जीवनाची पहिली
मंगलप्रभात कशी सुरू केली, ते जरा पाहू या.
कित्येक शतके हिंदुस्थान जगापासून अलगच होता!एका बाजूस हिमालय,दुसऱ्या बाजूस अपरंपार सागर या दोन मर्यादांमध्ये त्या हिमयुगात आलेले काही खुजे कृष्णवर्ण लोक येऊन राहिले होते.हे रानटी काळे लोक सदैव भटकत असत.आपले कळप बरोबर घेऊन त्यांना चारीतचारीत ते सर्वत्र हिंडत हळूहळू त्यांनी ओबडधोबड अशी दगडी हत्यारे शोधली. पुढे काही हजार वर्षांनंतर त्यांनी तांब्याचा शोध लावला.मेसापोटेमिया व इतर पाश्चिमात्य देश यांच्याशी थोडाफार दर्यावर्दी व्यापार त्यांनी सुरू केला.
जवळजवळ दहा हजार वर्षे मूळच्या हिंदुस्थानी लोकांनी हे प्राथमिक जीवन चालविले.
परंतु हिमालयापलीकडे दुसरी एक उत्साही मानवजात वाढत होती.हे लोक उंच, गौरवर्णी व सामर्थ्यसंपन्न होते.
आशियाच्या वायव्य दिशेस कास्पियन समुद्राजवळ हे प्रथम राहत होते.पाच हजार वर्षांपूर्वी त्याच्यांत एक प्रकारची अस्वस्थता व प्रक्षुब्धता पसरली.त्याच्यांत एकदम चैतन्य संचरले.ते पृथ्वीच्या सर्व भागांत पसरू लागले.काही मध्य आशियातील इराणात आले.आणि म्हणून या सर्वांनाच 'इराणियन' किंवा 'आर्यन' असे नाव मिळाले.
आंतरिक प्रेरणेने हे आर्य सर्वत्र पसरले आणि बहुतेक सर्व युरोपियन राष्ट्रांचे पूर्वज बनले.तसेच मेडीस,इराणी व हिंदू यांचेही ते पूर्वज होते.हिंदू व युरोपियन हे एकाच पूर्वजांपासून जन्मलेले आहेत हे स्पष्टपणे दाखविण्यासाठी काही इतिहासकार 'आर्य' या शब्दाऐवजी 'इंडायुरोपीय जात' असा शब्द वापरतात.
हे इंडोयुरोपियन किंवा आर्य जेव्हा पर्वत ओलांडून हिंदुस्थानात येऊ लागले,तेव्हा या देशात राहणाऱ्या त्या खुजा व कृष्णवर्णी लोकांकडे ते तुच्छतेने पाहू लागले.या मूळच्या रहिवाश्यांना ते 'दस्यू' म्हणत.ते त्यांचा निःपात करू लागले.पुष्कळांना त्यांनी गुलामही केले.
अशा रीतीने हिंदुस्थानात जातिभेद प्रथम जन्माला आला.नवीन आलेले आर्य हे वरिष्ठ वर्ग बनले.आणि येथील जित लोकांना त्यांनी अस्पृश्य केले.आर्यांमध्ये माणसा-माणसांत हे उच्चनीच भेद मानण्याची जी मूर्ख पद्धती होती,ती अद्यापही तशीच आहे.तशीच आहे. हिंदुस्थानात नव्हे;तर
युरोपात व अमेरिकेतही वरती ब्राह्मण व खाली तळाला अस्पृश्य असे प्रकार आहेत.ब्राह्मण
व अस्पृश्य दोघेही मेल्यावर निःपक्षपाती किड्यांना सारखीच गोड मेजवानी देतात,ही गोष्ट दिसत असली,तरीही हे मूर्खपणाचे भेद केले जातच आहेत.
परंतु सध्या प्राचीन हिंदुस्थानाकडे पाहावयाचे आहे.
ख्रिस्त शतकापूर्वी सुमारे दोन हजार वर्षांच्या सुमारास आर्य हिंदुस्थानावर स्वारी करू लागले. आर्यांची ही स्वारी कित्येक शतके सारखी सुरू होती.हे आर्य हिंदुस्थानात आले.त्यांनी ठायीठायी राज्ये स्थापिली.या नव्या देशात निरनिराळी सोळा राज्ये त्यांनी स्थापिली,प्रत्येक जण आपापल्या राज्यात गुण्यागोविंदाने राहात होता. हत्तीची,वाघाची शिकार करीत,भूमीचे येणारे विपुल उत्पन्न उपभोगीत,एक प्रकारचे सुखी व निश्चित असे जीवन ते कंठीत.त्यांचे ते जीवन जणू स्वप्नमय होते.ते प्रत्यक्षापेक्षा कल्पना सृष्टीतीलच जणू भासे.देश उष्ण होता.जमीन सुपीक होती,विपुल होती,आणि थोड्याशा श्रमाने भरपूर पिके.फारसा वेळ काबाडकष्टात दवडावा लागत नसे.भव्य महाकाव्ये रचायला व तत्त्वज्ञाने गुंफायला त्याना भरपूर वेळ होता.पऱ्यांच्या गोष्टी लिहायला व जीवनाच्या गूढतेचा शांतपणे विचार करायला त्यांना वेळ होता.अशा या वातावरणात त्या ज्यू प्रेषिताच्या,जेरिमियाच्या,जन्मानंतर पन्नास वर्षांनी बुद्ध जन्माला आले.
बुद्धांचे मूळचे नाव शाक्यमुनी सिद्धार्थ,शाक्य कुळात त्यांचा जन्म झाला.हिमालयाच्या छायेखाली उत्तर हिंदुस्थानाच्या एका भागात त्यांचा जन्म झाला.लहानपणी त्या हिमालयाकडे त्यांनी अनेकदा पाहिले असेल.बर्फाची पांढरीशुभ्र पागोटी घालून शांतपणे उभ्या असलेल्या महाकाय देवांच्या जणू मूर्तीच अशी ती हिमालयाची शिखरे बुद्धांना आकृष्ट केल्याशिवाय कशी राहिली असतील ? हिमालयाची ती उत्तुंग,धवल शिखरे खालच्या मुलांचे चाललेले खेळ मोठ्या करुणेने पाहात असतील व म्हणत असतील,'किती पोरकट यांचे हे पोरखेळ!'
बुद्धांचा पिता शाक्य जातीचा राजा होता. राजवाड्यात सुखोपभोगात हा बाळ वाढला. बुद्ध अत्यंत सुंदर होते.राजवाड्यातील महिलांचा तो आवडता होता.राज्यात भांडणे नव्हती. लढाया व कारस्थाने नव्हती.
खाणेपिणे,गाणे, शिकार करणे,प्रेम करणे,मजा करणे म्हणजेच जीवन,वाटले तर स्वप्नसृष्टीत रमावे.हिंदूंसारखे स्वप्नसृष्टीत रमणारे दुसरे लोक क्वचितच असतील एकोणिसाव्या वर्षी गौतमाचे लग्न झाले.पत्नीचे नाव यशोधरा.सुखाचे,गोड असे सांसरिक जीवन सुरू झाले.
कशाचा तोटा नव्हता.एखाद्या पऱ्यांच्या गोष्टीतील राजाराणीप्रमाणे दोघे स्वप्नसृष्टीत जणू रंगली. मानवजातीपासून जणू ती दूर गेली.अशी दहा वर्षे गेली.अद्याप मूलबाळ नव्हते.तीच काय ती उणीव होती.गौतम सचित झाला.ईश्वराने सारे दिले.परंतु मुलाची सर्वोत्तम देणगी त्याने का बरे दिली नाही,असे मनात येई.अत्यंत सुखी अशा जीवनात विफल आशा का बरे असाव्यात ? दुधात मिठाचे खडे का पडावेत ? हे जीवन जगण्याच्या लायकीचे तरी आहे का ?
एके दिवशी रथात बसून तो हिंडायला बाहेर पडला होता.सारथी छत्र होता.रस्त्यावर एक जीर्णशीर्ण म्हतारा मनुष्य त्यांना आढळला.त्याचे शरीर गलित झाले होते.जणू सडून जाण्याच्या बेतात होते.त्याचा सारथी म्हणाला,'प्रभो,जीवन हे असेच आहे.आपणा सर्वांची शेवटी हीच दशा व्हायची आहे.'पुढे एकदा रोगग्रस्त भिकारी त्यांना आढळला.सारथी म्हणाला,"हे जीवन असेच आहे.येथे नाना रोग आहेत." गौतम विचारमग्न झाला इतक्यात न पुरलेले असे एक प्रेत दिसले.ते प्रेत सुजलेले होते,विवर्ण झाले होते.घाणीवर माशांचे थवे बसावेत,त्याप्रमाणे प्रेताभोवती माशा घोंघावत होत्या.
सारथी छत्र म्हणाला, "जीवनाचा शेवट असा होत असतो."
(मानवजातीची कथा - हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,साभार)
इतके दिवस गौतम राजवाड्यातील सुखांत रंगलेला होता.
अशी दुःखद दृश्ये त्याने पाहिली नव्हती.परंतु आज जीवनातील दुःख;क्लेश त्याने पाहिले.या जीवनाची शेवटी चिमूटभर राख व्हायची,हे त्याने जाणले.जीवनाचा हा केवढा अपमान! साऱ्या खटाटोपाची का अशीच इतिश्री व्हायची ? त्या ज्यू प्रेषितांप्रमाणे बुद्धांनीही निश्चय केला.मानवी दुःखावर उपाय शोधून काढण्याचे त्यांनी ठरविले.ज्यू धर्मात्मे
'मनुष्यप्राणी मूर्ख ओरडत होते.'परंतु बुद्ध एक पाऊल पुढे गेले.
ईश्वराच्या दुष्टपणाविरुद्ध बुद्धांनी बंड आरंभिले.
अति सुखामुळे गौतम उदासीन झाले होते.त्या सुखाचा त्यांना वीट आला होता.आपल्या या उदासीनतेतून अधिक उच्च व उदात्त असे सुख शोधण्यासाठी ते उभे राहिले.परिवाज्रक यती व्हावयाचे त्यांनी ठरविले.सर्वसंगपरित्याग करून बाहेर पडण्याचे त्यांनी ठरविले.चिंतनाने,उपवासाने मानवी भवितव्याचे कोडे सोडवता येईल असे त्यांना वाटत होते.
इतक्यात आपल्याला मुलगा झाला आहे असे त्यांना कळले.नवीन एक बंधन निर्माण झाले; परंतु ती सारी कोमल व प्रेमळ बंधने निग्रहाने तोडण्याचे त्यांनी नक्की केले.
एके दिवशी पुत्रजन्मानिमित्त मेजवानी होती. बुद्धांच्या पित्याने खास सोहळा मांडला होता.आणि
त्याच दिवशी मध्यरात्री निघून जाण्यासाठी बुद्धांनी सिद्धता केली.सारी मंडळी दमून भागून झोपलेली होती.बुद्ध उठले.पत्नीकडे त्यांनी शेवटचे पाहिले.
लहान बाळ तिथे आईच्या कुशीत होते.बुद्धांच्याच जीवनातील जीवनाने ते सुंदर सोन्याचे भांडे भरलेले होते.त्या मायलेकरांचे चुंबन घ्यावे असे त्यांना वाटले.परंतु ते जागे होतील या भीतीने त्यांनी तसे केले नाही.ते तेथून निघाले.त्यांनी आपल्या सारथ्याला दोन वेगवान घोडे तयार करण्यास सांगितले.त्या घोड्यांवर बसून दोघे दूर गेले.सर्व प्रेमळ बंधने तोडण्यासाठी त्यांना लांब जाणे भाग होते. जीवनाचे रहस्य शोधण्यासाठी जो मार्ग त्यांना घ्यावयाचा होता,तो मार्ग अनंत होता.पाठीमागे एकदाही वळून न पाहता सकाळ होईपर्यंत ते खूप दूर गेले.
आता उजाडले होते.आपल्या पित्याच्या राजाच्या सीमांच्या बाहेर ते होते,एका नदीतीरी ते थांबले. बुद्ध घोड्यावरून उतरले.त्यांनी आपले ते लांबसुंदर केस कापून टाकले.अंगावरचे रत्नालंकार त्यांनी काढले.ते छत्राला म्हणाले,"हा घोडा,ही तलवार ही हिरेमाणके,हे सारे परत घेऊन जा." छत्र माघारी गेला.बुद्ध आता एकटे होते.ते पर्वतावर गेले.तेथील गुहांतून ऋषिमुनी जीवन-मरणाच्या गुढाचा विचार करीत राहात असत.वाटेत स्वतःची वस्त्रेही एका भिकाऱ्या जवळ त्यांनी बदलली.
त्यांच्या अंगावर आता फाटक्या चिंध्या होत्या.
राजवैभवाचा त्यांना वीट आला होता.ज्ञानशोधार्थ बुद्ध आता एकटे फिरू लागले.
ते त्या ऋषिमुनींच्या सान्निध्यात गेले.तेथील एका गुहेत ते राहिले.प्रत्यही ते खालच्या शहरात जात. हातात भिक्षापात्र असे.ते भिक्षा मागत,पोटासाठी अधिक कष्ट करण्याची जरुरी नव्हती.तेथील आचार्यांच्या चरणांपाशी बसून गौतम त्यांची प्रवचने ऐकत.जन्म मरणाच्या फेऱ्यांतून जीव कसा जात असतो,आणि शेवटी हा जीव अत्यंत मधुर अशा शांत निर्वाणाप्रत कसा जातो,हे सारे ते ऐकत.
जीवन मालवणे हे अंतिम ध्येय प्राप्त व्हावे म्हणून शरीराला अत्र पाणी देऊ नये, शरीर- दंडनाने स्वर्गप्राप्ती होते,असे त्या ऋषिमुनींचे मत होते.जणू शरीरदंडाच्या जादूने सर्व सिद्धी मिळतात.
या तामसी व रानटी विचारांची मोहिनी काही दिवस बुद्धांच्या मनावर राहिली.
हळूहळू त्यांनी आपले अन्न कमी केले.शेवटी तर केवळ चार शितकण ते खात.
त्यांच्या हातापायांच्या केवळ काड्या झाल्या. शरीर सुकले.केवळ हाडे राहिली.मरण जवळ आले.परंतु सत्य अद्याप दूरच होते.मरणाची छाया जवळ आली;तरी सत्यप्रकाश प्राप्त झाला नव्हता.उपासतापास,ही शरीरदंडना म्हणजे ज्ञानाचा मार्ग नव्हे,जीवनाच्या अर्थाचा शोध अशा उपायांनी लागणार नाही,असे बुद्धांना कळून आले.ते पुन्हा अन्नपाणी घेऊ लागले.शरीर पुन्हा समर्थ झाले.ते एका झाडाखाली विचार करीत बसले.
एके दिवशी सर्व रात्रभर ते ध्यानमग्रच होते.सारे जग त्यांच्या पायापाशी झोपलेले होते.आणि तिकडून मंगल उषा आली आणि त्याबरोबरच जीवन-मरणाचे कोडेही सुटले.मानवी दु:खांचा निरास करण्याचा मार्ग सापडला.ते झाले बुद्ध म्हणजे ज्यांना ज्ञान प्रकाश मिळाला आहे,असे अतःपर ते बुद्ध
उर्वरित भाग पुढील भागात..