मनुष्याला फक्त स्वतःचा किनारा माहीत होता आणि त्याला समुद्र पार करण्याची नव्हती गरज..!
भूक लागलेली नसताना केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नग्रहण करून आनंद मिळवलेला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडायची नाही. यासाठी माणसे अन्नांच्या खमंग चवीला जबाबदार धरतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर,पदार्थाच्या चवीने मला त्या पदार्थाची अनुभूती घेता येते त्यासाठी मी चवीचा अत्यंत ऋणी आहे. चव भुकेसाठी प्रेरणादायी आहे आणि भुकेने मला प्रेरणा मिळते. माझ्या बुद्धिमत्तेच्या वाढीमध्ये व प्रतिभा स्फुरण्यामागे जंगलातील डोंगरांमध्ये वेचून खाल्लेल्या बेरींचाही वाटा आहे हे सांगण्यास मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आपला अंतरात्मा त्याचा स्वतःचा गुलाम नाही त्यामुळे होते काय, आपण बघतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने दिसत नाही. आपण ऐकतो पण आपल्याला ऐकू येत नाही. आपण खातो पण आपण त्याचा आनंद घेत नाही. जो माणूस चवीने खातो तो खादाडखाऊ होऊच शकत नाही आणि जो अन्नाचे सेवन चवीने करीत नाही तो खादाडखाऊ शिवाय दुसरा काही होत नाही. मॅथ्यू यांच्या वाचनामध्ये थोडासा बदल करून सांगितलं गेलं आहे. की तुम्ही ग्रहण करीत असलेल्या अन्नाने तुम्हाला कधीच अपचन होत नाही.तुम्ही ते किती भूक असताना खाता यावर ते अवलंबून असते. किती अन्न खाता आणि कुठल्या प्रतीचे खाता यावर काही अवलंबून नाही. ते तुम्ही किती श्रध्देने, आनंदाने खाता यावर त्याचे पचन- अपचन अवलंबून आहे. थोडक्यात काय,अन्न हे पूर्णब्रह्म आहे यावर तुमची श्रद्धा हवी.
पृथ्वी म्हणजे काही इतिहासाचा एक उडालेला टवका नाही ना दगड मातीचे एकमेकांवर रचलेले थर, जशी पुस्तकांची पाने एकमेकांवर रचलेली असतात. शास्त्रज्ञ आणि साहित्यिक या टवक्याचा आणि पानांचा अभ्यास करतीलही पण पृथ्वी म्हणजे एक जिवंत काव्य वृक्षांच्या पानांसारखे जी फळाफुलांच्या आधीच फांद्यांवर फुटतात. पृथ्वी म्हणजे काही जिवाष्म नव्हे. पृथ्वी सजीव आहे;किंबहुना पृथ्वीचे आयुष्य पाहता मला तर वाटते त्यावरील सर्व जीवसृष्टी ही एक बांडगुळच आहे.अशा या पृथ्वीला वेदना दिल्या तर तिच्या एका हुंदक्या सरशी तिच्यात गाडली गेलेली मढी एका झटक्यात बाहेर पडतील. तुम्ही धातूच्या सुंदर मूर्ती ओताल,मला त्याही आवडतात पण या वाहणाऱ्या वाळूत जे मला आकार व कला पाहायला मिळतात तेच मला भावतात व ते पाहून मी अगदी खूश होऊन जातो.नुसते आकारच नाही तर तो निसर्ग ही कुंभाराच्या हातातील माती प्रमाणे त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, किंवा घेऊ शकतो त्याची मला जास्त मजा वाटते.
हेन्री डेव्हिड थोरो निसर्ग म्हणूनच जगलेला माणूस
('वॉल्डन' जयंत कुलकर्णी यांच्या पुस्तकातील) थोरोने मनस्वीपणे जगलेले हे जीवन वर्णन..
पाऊस व मानवी जीवनातील स्थित्यंतर
सुमारे साडेसात कोटी वर्षांपूर्वी एकपेशीय सजीव (पहिला जीव पाण्यात जन्माला आला.) या सजीवांनी जीवन जगत असताना केलेल्या संघर्षातून अनुभव घेऊन आपला चतुरपणा गाठला, तेव्हा प्रथम वनस्पती आणि प्राण्यांसारखे बहुपेशीय सजीव अस्तित्वात आले.हे सुरुवातीचे बहुपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय सजीवांचे, एकमेकांशी सैलसरपणे जोडलेले मोठे समूहच होते.सुरुवातीचे असे हे समूह केवळ शेकडो किंवा हजारो पेशींचे, तुलनेने लहानच असे समूह होते. मात्र सातत्याने असे एकमेकांशी जोडून राहण्याचे उत्क्रांतीच्या दृष्टीने होणारे फायदे या चतुर पेशींना काही काळातच समजले आणि या ज्ञानाचा उपयोग करत,या पेशींना,लक्षावधी,कोट्यावधी आणि अगदी अब्जावधींचे समूह करत, एकमेकांची सामंजस्यपूर्ण व्यवहार करणाऱ्या पेशींच्या संस्था उभारल्या. एका पेशीचा आकार अतिसूक्ष्म,मानवी डोळ्यांना न दिसणारा असला, तरी पेशींनी चतुरपणे जमवलेल्या या समूहांचा आकार डोळ्यांना न दिसणार्या एखाद्या ठिपक्यापासून ते एखाद्या मोठ्या कातळाएवढा असू शकतो.मानवी डोळ्यांना या सुस्थापित पेशीसमूहांचे जसे आकलन होते, त्यानुसार जीवशास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण केले जसे की,हा उंदीर,तो ससा,तो हत्ती.मानवी डोळ्यांना ससा,हा 'एक' सजीव म्हणून दिसत असला,तरी तो प्रत्यक्षात, अत्यंत सुसंगत आणि कार्यक्षम रीतीने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या अब्जावधी पेशींचा समूहच असतो.अशा उत्क्रांतीची उपयुक्त माहीती 'जादूई वास्तव' रिचर्ड डॉकिन्स,अनुवाद - शंतनु अभ्यंकर या पुस्तकात वाचण्यास मिळते.
मृगाआधी पाऊस पडतो रोहिणीचा, भावाआधी पाळणा हाले पाठच्या बहिणीचा..."
अशी एक म्हण आहे ते आपल्या पूर्वजांनी अनुभवानी, प्रत्यक्ष निरीक्षणातून निर्माण केलेली आहे.
पाऊस सर्व जिवांना जीवंत ठेवणारा अविभाज्य घटक, निसर्गाचे संवर्धन,जिवांना जीवाची माणसांना माणसाची ओळख करून देणारा..!
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप गावातील मी रहिवासी लहानपणापासून पाऊस बघत आलेलो, त्यात भिजत आलेलो. जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजेतील महत्त्वाची गरज हा पाऊस पूर्ण करतो. साधारणतः १९८० ते १९९० च्या दशकात त्यावेळी मी लहान होतो. काही वयोवृद्ध लोकांच्याकडून पावसात बद्दल ऐकत होतो. पाऊस साधारणता त्यावेळी वेळच्यावेळी व नक्षत्राच्या अनुषंगाने पडत होता. मुबलक प्रमाणात पिके यायची लोकांच्या चेहऱ्यावरती व जीवनात आनंद ओसंडून वाहत होता.
वयोवृद्ध माणसं सांगत होती.त्याकाळी दहा-बारा दिवस सलग अहोरात्र पाऊस पडायचा. बाहेर जाताच येत नसायचं. मग आम्ही घरात बसून शेतीच्या मशागतीच्या अनुषंगाने लागणाऱ्या अवजारांची निर्मिती व डागडुजी करीत असायचो. पाऊस 'मी' म्हणायचा या पडणाऱ्या पावसामुळे घरातील सर्वच सदस्य शेती हा मुख्य जीवन जगण्याचा स्तोत्र असल्याकारणाने पावसाळ्यामध्ये शेतामध्ये काहीच काम नसायचं. मग आम्ही घरातील सर्वजण एकत्र बसून चर्चा विनिमय करायचो. या विषयांमध्ये आजारपण,सामाजिक,आर्थिक, शिक्षण, अध्यात्म, नीतिमत्ता, माणसाशी माणसासारखं वागण्याची मूल्य यावरती सुसंवाद व्हायचा.पाऊस कमी झाल्यानंतर शेतीची मशागत करण्याच्या अनुषंगाने काय करता येईल. हा विषय ही प्रामुख्याने असायचा.
पावसासंदर्भात निसर्गाकडून काही संदेश मिळायचे जसे की,कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार.आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही.आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.
यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली,यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकातील नोंदी सत्य असल्याची ग्वाही द्यायचे.
मी त्या वेळेला सातवीला शाळेला होतो. त्यावेळच्या पावसामध्ये सर्व ओढे,वेगळी तुडुंब भरून वाहत असायचीत. मग मी व माझ्यासारखी काही उनाड पोरं वेताळमाळाच्या पलिकडे 'घोलामध्ये' फिरण्यासाठी,उनाडक्या करण्यासाठी जात असू. पावसात भिजल्यानंतर कपडे बदलणे वगैरे काही प्रकार नसायचेत. पाऊस असल्यामुळे ते उन्हात वाळवण्याचा प्रश्नच नव्हता.आम्ही कधी कधी सहजच झाडावर चढायचो.ही झाडे कुणाच्यातरी मालकीची असायचीच.झाडावर मजा म्हणून चढण्यासाठी परवानगी आम्ही घेतच नव्हतो. ती कधी मिळालीच नसती. मग आम्ही ते झाड आमच्या मालकीचे समजून झाडावरती चढून दंगा करायचो. मग हे सर्व करत असताना. मग आमचा दंगा ऐकून झाडाच्या मालकांकडून शिव्या सोबत मार ही मिळायचा. पण लहान असल्यामुळे मन निकोप निर्मळ होते. त्यामुळे राग व अपमान असा कधी आम्हाला वाटलाच नाही. कदाचित त्यावेळेला पावसात भिजून मिळालेले ते ज्ञान असाव. शाळेत असताना पावसामध्ये वनभोजनाचा कार्यक्रम आनंदाने साजरा केला जायचा. अभ्यास नाही, पाठांतर नाही, शिक्षकांचा मार नाही.फक्त निसर्गाच्या सोबत मनमोकळं जीवन जगणं, निसर्ग समजून घेणं हाच त्यामागचा हेतु असायचा.
पावसात भिजण बंद झालं हळूहळू पाऊसही कमी झाला. आणि मनातील निकोप, निर्मळ, संवेदनशील प्रेमळ भावनिक जागा स्पर्धेने,इर्षेने घेतली.
मग काही वर्षांनी फक्त नुसताच मोठा झालो. कारण वडीलधारी सांगतील तेच ऐकावं लागायचं. पावसात भिजून खेळले जाणारे सर्व खेळ बंद झाले. त्याचं कारण विचारलं असता घरात एकच सांगण्यात आलं. तू आता घोडा झाला आहेस. बारक्या पोरांसारखे काय खेळतोयस? आमच्या जीवनातून जसा पाऊस कमी झाला. आमचं निर्मळ भिजणं कमी झालं. तसंच मोकळ व मुक्त जगणंही संपलं.
बौद्धिक परीक्षा देण्यासाठी अभ्यासक्रमातील पुस्तके व शाळा यांच्याशी जोडला गेलो. निसर्ग नियमानुसार वाढ व विकास होत होता. पण अजूनही जाणीवेतून जगणं जमत नव्हतं. किंवा तसा कधी विचार केला नव्हता. मग ती बौद्धिक परीक्षा देण्यासाठी असणारी पुस्तके व शाळा सोडली. जशी प्रत्येकाला कधी ना कधी शाळा सोडावी लागते.'मी शाळा सोडून फार वर्षे झालेली आहेत. पण शाळेने अजूनही मला सोडलेले नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आम्ही जोडलेले आहोतच'.मग घरची जबाबदारी आली. पाऊस पडतच होता. पावसाळ्यामध्ये जवळपास घर पावसाने गळते.आमचे घर जरा जास्तच गळत होते. त्यामुळे मला फार दुःख व्हायचे. पाऊस पडायला नको असं वाटायचं. असा वरवरचा विचार करत मी तरुण झालो.
असं म्हणतात घराशिवाय खिडकी नाही. आणि पुस्तकाशिवाय प्रकाश नाही. आणि पुस्तक माझ्या आयुष्यात आले.
जुनी पुस्तके!
जुनी पुस्तके,
उनाड स्वतंत्र पुस्तके,
विस्थापित पुस्तके!
पक्षांच्या थव्यासारखी माझ्या दारी अवतरली.
रंगबिरंगी पिसे असलेली विविध पुस्तके!
त्यांचे प्रकार वेगळे नावे वेगळी!
ग्रंथालयातील शिष्ठ आणि माणसाळलेल्या
पुस्तकात यांची मजा नाही.
या अचानक गवसलेल्या पुस्तकांमध्ये
एखादा जिवापाडाचा मित्र मिळून जातो
आयुष्यभर सोबत करण्यासाठी.
- व्हर्जिनिया वुल्फ
(जसे मला वॉल्डन मिळाले!)
- जयंत कुलकर्णी.
आणि मी न थांबता अविरतपणे वाचत राहिलो. आणि पुस्तक वाचत असताना. एका ठिकाणी पुस्तकांने मला थांबवले.'चाकोरी व थडगं यातील फरक फक्त काही फुटांचा असतो.असे थोरो यांनी म्हटलेले वाक्य वाचले आणि मी अचंबित झालो. आणि एका क्षणी खलील जिब्रानला झालेली जाणीव मलाही जाणवू लागली.'झाडाचं एक जरी पान सुकून पिवळं झालं तरी त्यामागे समग्र वृक्षाचं मौन जाणतेपण उभं असतं.' (द प्रॉफेट) आणि मी संपुर्ण हादरलो. दररोज सूर्य उगवतो व मावळतो. त्यामध्ये नावीन्य असं काही नसतं. पण सूर्य उगवताना व मावळताना हेन्री डेव्हिड थोरो तिथे नेहमीच थांबायचेत. मग मी ही पुस्तकांच्या सोबत निसर्गाला समजून घेऊ लागलो.आता मी तरुण झालो.
''तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकू शकत नाहीत;तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरूप बदललेलं असतं.'' - हेरॅक्लिटस' मी वयाने अनुभवाने मोठा होत होतो. दरवर्षी पाऊस येतच होता. पण आता पावसाची मला भीती वाटत नव्हती. मी दुःखी होत नव्हतो. निसर्गाचेही न बदलणारे नियम असतात. हे मी आतापर्यंत स्वीकारलं होतं.जो पाऊस मला लहानपणी माझ्यासारखाचं उनाड व लहान वाटायचा. तोच पाऊस मला आता तरुण जबाबदार वाटत होता. पावसात भिजल्यानंतर खूप मनापासून आनंद व्हायचा. पाऊस पडत असताना जमिनीवर, झाडावर होणारा आवाज मनाला एक प्रकारची शांतता देऊन जायचा. पाऊस निसर्ग, झाडांशी, पाना फुलांशी, सर्व सजीव निर्जीव सर्वांशीच सुसंवाद साधायचा. एक मनस्वी व आनंदी जीवन जगण्याचा मार्ग पावसाने दाखवला होता.आपण आपलं काम अविरतपणे करत राहायचं.हे आता मनापासून पटलं होतं.
माणूस जगत असताना त्याच्या होणार्या अवस्था पावसाची मैत्री केली की समजतात.
"माणसाच्या तहानेला जी चव असते. तीच चव पाण्याला असते." लहानपणापासून मी पाण्याला बघत आहे. पाणी बदललेलं नाही मीच बदललेलो आहे.
आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात ते कळल्यावर श्वास घेणे हा शब्दशः श्वास रोखून धरणारा अनुभव ठरतो. जादू या पुस्तकातील अनुभवावर आधारित एक वाक्य..!
मी आता आयुष्याच्या मध्यावर आलेलो आहे. या जीवनाने निसर्गाने मोकळ्या हाताने दिले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी वाचना बरोबर चिंतन मनन ही आवश्यक आहे.कारण "कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे."
असं नोम चोम्स्की याने सांगितले आहे.
गर्दीच्या रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना एकमेकाचे धक्के लागतात, पण त्याहीपेक्षा दाटीने उडताना पक्षी कधी एकमेकांवर आदळताना दिसत नाहीत. कारण गर्दीत असूनही प्रत्येकाने आपले वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते. त्या क्षेत्रात दुसरा पक्षी घुसखोरी करत नाही. कळपात उडत असताना प्रत्येकाला आपल्या पुढच्या, मागच्या, बाजूच्या पक्षाचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे कळपाने वेग वाढवला वा कमी केला तरी प्रत्येक जण त्यांच्याशी जुळवून घेतो, त्यामुळे तो कळप एकसंध उडतो हे जाणवते. आपल्या पुढच्या व आजूबाजूच्या पक्षातील गतिबदल अल्पांशात शेजाऱ्याला कळतो. त्यामुळेच मोठ्या कळपातील उडतानाची लहर १५ मिलीसेकंदापेक्षा कमी वेळा हाललेली दिसते. पक्षिगाथा या पुस्तकाने मला वैयक्तिक क्षेत्र जपायला सांगितले व मी तसा प्रयत्न करत आहे.
कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो. आपल्याला ही माणूस म्हणून निसर्गाचे नियम पाळावेत लागतील. निसर्ग आपल्याला जपतो. आपणही निसर्गाला जपलं पाहिजे.
गेली दोन-तीन वर्षे पाऊस महापुराचे दर्शन घडवत आहे. हवामान खात्याचा अंदाज रक्तदाब वाढवत आहे. जीवाची घालमेल होत आहे. हे सत्य आहे. पण सर्व जीव जगण्यासाठी पाऊस अविरतपणे पडत आहे. व मानवी संवेदनशील भावना जपत आहे. पाऊस हा पडत असताना आपण आनंदी जीवन कसं जगावं ह्याबद्दल सांगत आहे. मी ते कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत आहे.
आता पाऊस पडतो. महापूर येतो नदीच्या पात्रातील पात्राबाहेर आलेले पाणी पाहून आपल्याला जगवणाऱ्या पाण्याचे हे रौद्ररूप बघून मनाला भीती वाटते. पूर्वीच्या नक्षत्राप्रमाणे 'हमखास' लागणारा पाऊस लागत नाही. मग विचार केला.पुर्वी कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो. पण आता पूर्वीसारखी झाडचं राहील नाहीत तर कावळा आपली घरटी कुठून बांधणार..!
पूर्वी पडणाऱ्या पावसावर शेती उत्तम प्रमाणात माणसाला जगवत होती. सध्या माणूस धोक्यात आहे. कारखान्यामध्ये वापरणारे पाणी हे वापरून झाल्यानंतर सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. पण या सांडपाण्यामुळे इतर जीव नामशेष होत आहेत. "सांडपाणी पिल्यामुळे बिचार्या मधमाशांना आपलं झाडावरील घर सापडत नाही.कारण मेंदू मधील 'लक्षात' ठेवण्याच्या ठिकाणावर हे सांडपाणी काम करत व ते घर त्यांच्या लक्षात राहत नाही."
अलीकडे पाऊस पडून महापुर मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूसोबत,पाळीव प्राण्यांचे मृत्यू, जन्मभर काबाडकष्ट करून उभा केलेल्या अनेक स्वप्नातील घरांमध्ये पाणी जात आहे. लहानपणी पाऊस लागत होता. इतक्या प्रमाणात महापूर येत नव्हता. म्हणजेच कोणत्याही नदीचे पाणी पात्राबाहेर येत नव्हते. पण अलीकडे नदीच पाण्याखाली जात आहे. याचे बारकाईने निरीक्षण केले. काही जुन्या जाणत्या लोकांना विचारलं तर यातून एकच निष्कर्ष निघतो. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण केलेला हस्तक्षेप, वाळू उपसा केल्यामुळे नदीचे पात्र वाढलं. त्या नदीच्या जवळच आपण घर बांधलीत. आपण नदीतच राहायला गेल्यामुळे नदीच सहज आपल्या घरात राहायला येते.
आपला एक स्वभाव आहे पाणी नदीत चांगलं दिसते. कधी कधी ते नदीच्या थोडं बाहेर आले तरी चालते. त्या ठिकाणी आपण पिकनिकला जाऊ शकतो. कधी कधी आपण सहज म्हणून पावसात भिजायला जातो धबधब्याखाली त्यावेळी आपण मजा करायला गेललो असतो. पण हेच पाणी जेव्हा नदी सोडून आपल्या घरात येतं. त्यावेळेला आपल्याला ते पाणी व तो पाऊस नको असतो. पाऊस सगळ्यांनाच हवा आहे. पण तो माणसानी सांगेल तेव्हा व तेव्हडाच ...
या जमीनीवर जे पाणी आहे त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे.१ टक्के जमीनीत २ टक्के जमीनीवर नदी,विहीर या स्वरुपात यातीलही थोडं पाणी गढुळ आहे.
पाऊस कमी जास्त पडण्यामागे नैसर्गिक कारण आहे.का मानवी कारण आहे. याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.ग्लोबल वार्मिंग हे तर आपल्याकडेच बोट दाखवते. झाडे लावा झाडे जगवा असा सुंदर सुविचार लिहिलेल्या. ट्रकामध्येच झाडे तोडून लाकडे भरलेली असतात. हा जो वागण्यातील व बोलण्यातील विरोधाभास आहे. तो एक दिवस आपला कपाळ मोक्ष करणार !
झाड लावली पाहिजेत झाड व जगवली पाहिजेत.पुर्वीची जी आहेत ती झाडे तोडली नसली पाहिजेत.
अलीकडेच एक गवा आमच्या गावाच्या आसपास फिरत होता. तो एक दिवस आमच्या गावांमध्ये आला होता. माणसं भिऊन गप गुमान घरात बसलेली आहेत. त्याच्या नावानं बोटं मोडत आहेत.पण तो आपला कुटुंबापासून कळपापासून बाजूला झाल्यामुळे निराश व बिथरलेला आहे. केव्हातरी रात्री त्याला जंगलाच्या दिशेने त्याच्या आधिवासात सोडण्याचे प्रयत्न वनविभाग,रेस्क्यू टिम व पोलीस मिळून करत होते. तो आज ना उद्या आपल्या कुटुंबात परत जाईल. आपण पुन्हा मोकळा श्वास घेऊ. पण माणसांनी जंगल तोडून जंगलात घर बांधली. तर जंगलातले प्राणी जाणार कुठे?
काही गोची व्हायची असेल तर ती होतेच' हा मर्फीचा मजेशीर नियम जगप्रसिद्ध आहे."लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस नेमका लोण्याच्या बाजूलाच जमिनीवर पडतो", हाही मर्फी चा आणखी एक नियम
शेवटी जादूई वास्तव या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे निसर्गात भलंबुरं जे जे घडतं तेते साधारण समप्रमाणात घडत या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव,ना व्यक्तिमत्व.त्यामुळे तुम्हाला व्यक्तीश: खुश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात, त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्या चांगल्या-वाईट कशाही वाटोत, आपल्या वाटण्यामुळे घटितांची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदान ची कल्पना गोंजारायला खूप खूप सोयीची आहे. पण दुर्दैवाने या विश्वाला तुमच्या सोयीशी काही सोयरसुतक नाही.
तुम्ही संध्याकाळी तुमच्या बागेत बसता आणि सूर्यास्त पाहता. त्यावेळी तुम्हाला आकाश रंगीबेरंगी दिसतं आणि ते तुम्हाला आवडतं. आता हे रंग कशामुळे उद्भवतात, तर हवेच्या प्रदूषणामुळे, जितकी हवा प्रदूषित तितके सूर्यास्ताच्या वेळी जास्त रंग दिसतात. मानवाने आपले उद्योग असेच सुरू ठेवले तर आपली पृथ्वी आपल्याला याहूनही जास्त रंगाची उधळण असलेले सूर्यास्त दाखवेल,हे नक्की.
'द बायोलॉजी ऑफ बिलीफ' हे पुस्तक वाचत असताना वरील सत्य वास्तव डोळ्यासमोर उभे राहिले.
इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय,पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत-निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.
निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी..! पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प ( किंवा जास्त ) असावे. सुज्ञ माणुस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो. औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे. अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो.
प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतः कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो.थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो. आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा, पाऊस पाडणारा इंद्र असलो काय, काहीच फरक पडत नाही.
निसर्ग हा एक शिक्षित आणि नि:पक्षपाती शिक्षक आहे, असा शिक्षक जो मूलभूत विचार देतो आणि कुठल्याच मताची री ओढत नाही; निसर्ग ना जहालवादी आहे ना पुराणमतवादी. चंद्रप्रकाश सुसंस्कृत असतो आणि त्यावेळी जंगलीही असतो.
हेन्री डेव्हिड थोरोचे हे विचार,विचार करायला लावणारे व मानवी संवेदना जागे करणारे आहेत.
"ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत." 'संन्यासारखा विचार करा' म्हणून सांगणारे हे
पुस्तकातील जीवनतत्त्व बरचं काही सांगून जातं.
पावसाला समजून घेणे म्हणजे स्वतःला स्वतः समजून घेणं.मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये होणारे चढ - उतार,क्लेश, दुःख, नैराश्य, त्याचबरोबर आनंद,सौख्य, समाधान या मानवी भावभावना आहेत. या सर्व भावना पावसाशी जोडलेल्या आहेत. कारण पावसानं आपलं संपूर्ण जीवन भरून टाकलेलं आहे.
आत्ताच तुम्ही श्वास घेतलात त्यातला नायट्रोजनचा अणू कधीतरी एका छोट्या डायनोसोरने नाकावाटे सोडला होता.' द गॉड डिल्यूजन रिचर्ड डॉकिन्स' या पुस्तकातील वैज्ञानिकता सिध्द करणार हे वाक्य हेच सांगत आहे.कि पहिला पडलेला पाऊस ही आपली ओळख आहे.व ही ओळख पाऊस चिरंतन आपल्या सोबत बाळगत राहील. आपलं आणि पावसाचं हे जीवाभावाच नातं फार पुरातन आहे
"इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो.आपला इतिहास हा 'पाऊसच' आहे."
"जलसंवाद मासिक सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्व संपादकीय मंडळाचे आभार व धन्यवाद..!