आज दुपारी गरगरीत बासुंदी पुरीचं जेवण मनसोक्त तुडुंब करुन,दही बुत्ती खाऊन,मस्तपैकी लावून आणलेले पान तोंडामधे धरुन,हातामधे पुढारी घेऊन,बाहेरच्या खोलीत तक्क्याला टेकून निवांत बसलो होतो.
अंगणामधे बऱ्यापैकी ऊन पसरलेलं होतं... समोरच्या रस्त्यावर दुपारची शांतता पसरलेली... एखाद दुसरी गाडी किंवा रिक्षा ये जा करत होती..
समोरच्या घराच्या नारळाच्या झाडाच्या सावलीत एक भंगारवाला आपली हातगाडी लावून तिथेच हातगाडीवर फडक्याची पुरचुंडी सोडून भाकरी आणि कसली तरी भाजी खात होता... हातगाडीवर तेल,डालडा,पावडरीचे रिकामे डबे, बियरच्या रिकाम्या बाटल्या त्याने गोळा केलेल्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या...
आणखी एका घरासमोर एक बोहारीण बसलेली... समोर ती डबे-भांड्यांची टोपली ठेवलेली आणि शेजारी जुन्या कपड्यांचे गाठोडे ठेवलेले... डोक्यावरची चुंबळ तशीच डोक्यावर होती... थकली भागली जर्मनच्या तपेलीतले पाणी गळ्यातली गोटी खालीवर करत घटघट पीत होती... पदराने चेहेरा पुसत होती...
दुपारची गरम शांतता होती ती !
तेवढ्यात कानांवर आवाज आला... "जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी... "
जांभळं म्हटल्यावर ताड्कन् कॉटवरुन उठलो आणि अंगणात आलो... त्या मावशीला हांक मारली... आत बोलावले... अंगणात आली... ती दोघं होती... ती आणि तिचा नवरा ! त्याने डोक्यावरची जांभळाची पाटी जमिनीवर उतरवली आणि पाटीला बांधलेले कापड सोडले... आईशप्पथ... पाटीभर काळीभोर, टप्पोरी जांभळं ! प्युअर डायरेक्ट रानातून आलेली... दर विचारला...
मावशी म्हणाली ," १०० रु. किलो..."
आई आतून आली, "७५ ला किलो दे... तेवढ्यात मिळतायत... "
मावशी..."न्हाय ओ आज्जी... ७५ ला न्हाय मिळत आता आसली जांभळं... १०० चा दर हाय बघा... "
मी तिथेच बाजूला अंगणात सावलीत मांडी घालून बसलो होतो.हे संभाषण ऐकून मी मधे पडलो, "द्या मावशी एक किलो... आणि दोन चार जांभळं उचलून खायला सुरुवात केली... तोवर आई घरामधे पातेलं आणायला गेली, आणि तेवढाच चान्स घेऊन मी मावशीच्या हातात १२५ रु. टेकवले आणि पट्कन तिला खुणावून लपवायला सांगितले.., तिने पण ते पट्कन लुगड्याच्या केळ्यात लपवले...
आई पातेलं घेऊन आली... ते तराजू मी हातात घेतला आणि अर्धा अर्धा किलोचे दोन वेळा वजन करुन एक किलो जांभळं वजन करुन पातेल्यात ओतली... मी अजून सहा सात जांभळं हातामधे घेतली आणि मस्तपैकी अंगणातच मांडी घालून खात बसलो.
आई पातेलं आत ठेवायला गेली तेवढ्यात मावशी म्हणाली, "दादा, वाईच दोन घास खाऊन घेतो इथं बाजूला सावलीत बसून !"
"बसा ओ मावशी... घ्या जेवण करुन निवांत !"
सैय्याला सांगून त्यांना छोट्या कळशीतून पाणी दिले... आईने दोन वाट्या बासुंदी आणि चार पाच पुऱ्या आणून दिल्या.
मावशीने तिची ती फडक्यात बांधलेले दुपारचे जेवण सोडले... मस्तपैकी तीन चार दशम्या दिसल्या मला... त्यात छानपैकी तेलात भिजवलेली लसणाची चटणी... तो तेलसर लाल रंग भाकरीच्या तलम पापुद्र्यावर पसरलेला... दुसऱ्या एका छोट्या डब्यातून तिने वांग्याची रस भाजी काढली... दोघांच्या मधे तिने ते कापड पसरले दोन भाकऱ्या नवऱ्याला आणि एक स्वतःसाठी घेतली... दोघांनीही काही सेकंद डोळे मिटून नमस्कार केला आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली... जेवण झालं... मावशींनी सगळं आवरलं... जिथे ते दोघे जेवले तिथल्या फरशीवर पाणी शिंपडून जागा स्वच्छ केली... पाण्याची कळशी विसळून दरवाज्यात ठेवली... बासुंदी पुरी दिलेला वाट्या आणि ताटली स्वच्छ करुन कळशीला टेकवून ठेवली आणी घटकाभर अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली तसेच बसून राहिले...
तिच्या नवऱ्याने चंची उघडली... अडकित्त्याने सुपारी कातरुन मला दिली आणि स्वतःही तोंडात टाकली... पाच सहा नागवेलीची पाने हातामधे घेऊन तळव्यावर पसरुन ठेवली... अंगठ्याची नखुली पानांच्या शिरांवर हळूवार फिरवत त्याने शिरा मऊ केल्या... केशरी चुना अंगठ्यावर घेऊन छानपैकी पानांवर लावला आणि पानाची घडी माझ्याकडे सरकवली... आपणही खाल्ली... वर काथाचे तुकडे दिले आणि नंतर छानपैकी काळी तंबाखू लयदार मळून चिमूटभर मला देऊन आपणही तोंडात डावीकडे बारीक गोळी ठेवली. मस्त समाधान उतरलं !
पाचदहा मिनीटानंतर ती दोघेही निघायला उठली... तिने आईला हांक दिली, "आज्जी... आमी जातोय हं !"
आईने आतून,"थांब गं जरा दोन मिंटं !" सांगून थांबायला सांगितले.
आई बाहेर आली. आईच्या हातामधे हळदकुंकवाचा करंडा आणि छोटा स्टीलचा डबा होता. आईने तिला हळद-कुंकू लावले,तिनेही आईला लावले आणि आईने हातातला स्टीलचा डबा तिला देत सांगितले, "यात बासुंदी आहे वाडीची ! संध्याकाळी घरी गेल्यावर तुझ्या मुलांना दे खायला !"
ती नको नको म्हणत असताना आईने तो डबा तिच्या पाटीमधे ठेवला.
ती दोघेही पुढे आली आणि वाकून आईला नमस्कार केला... "माऊली... माऊली..." असं काहीसं पुटपुटले !
आई आतमधे गेली... ती दोघे माझ्याकडे आली, "दादांओ...!" म्हणत खाली वाकली माझ्या पायाला स्पर्श केला !
मी थोडा दचकलो... पट्कन् मी ही वाकून त्यांच्या पावलांना स्पर्श करत असताना नकळत पणे माझ्या तोंडातून बाहेर आले, "माऊली... माऊली !"
त्याने खिशात हात घालून छोटी कागदाची पुडी काढली, उघडली ! आत मधे बुक्का होता... चिमटीत बुक्का घेत त्याने माझ्या कपाळावर टेकवला आणि म्हणाला, "दादा, लै शिरीमंत हायसा बगा तुमी ! आवो,माऊली नांदतीया तुमच्या घरात... !" नंतर त्याने दरवाजाच्या उंबऱ्यावर डोकं टेकवले आणि मागे वळून पाटी उचलून मावशीच्या डोक्यावर ठेवली,पिशवी हातामधे घेतली... आणि गेट उघडून दोघेही मला पाठमोरे होऊन लांब लांब जायला लागले... वाऱ्यावर विरत जाणारा मावशींचा आवाज येत होता कानांवर...
"जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी..
लेखक - अनामिक
कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी ही कथा मला पाठवून जतन करायला सांगितली.