* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: माणसाला माणसाची ओळख करून देणारा पुस्तकरूपी 'प्रवास' ..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

माणसाला माणसाची ओळख करून देणारा पुस्तकरूपी 'प्रवास' ..! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माणसाला माणसाची ओळख करून देणारा पुस्तकरूपी 'प्रवास' ..! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२/९/२२

माणसाला माणसाची ओळख करून देणारा पुस्तकरूपी 'प्रवास' ..!

माझा विश्वास आहे की,महान पुस्तके वाचण्याचा फायदा हा असतो की ती आपल्याला जीवनाच्या अधिकतर आव्हानांना आणि संधींना त्या यायच्या आधीच कसे हाताळायचे हे शिकवतात.ती तुम्हाला ही शिकवण देतात की, तहान लागण्याच्या आधीच विहीर खोदा आणि भूक लागण्याच्या आधीच बी पेरा - 

जॉन मेसन


अश्मयुगीन चाकांपासून ते मंगळावरच्या स्वारी पर्यंतचा..!


मानवी प्रगतीचा अविस्मरणीय,जिद्द,शोधामागील ज्ञिज्ञासा,जगाला जगाची ओळख करून देणारा हा प्रवास माझ्यासाठी उत्कंठावर्धक,वास्तववादी व सत्य कथन करणारा आहे.


प्रस्तावनेतील नोंद माणसाची प्रगती या शोधानंतर चांगलीच विकसित झाली. याची आपल्याला कल्पना आहेच‌.पण आमच्या मते, हा इतिहास फक्त यंत्राच्या निर्मितीचा आणि विकासाचा नाही; तर कल्पनांचा विकास, माणसाची धडपडी वृत्ती, वसाहतवाद, औद्योगिकीकरण, धार्मिक प्रसार, महिलांचं सबलीकरण, देशाचं अर्थकारण आणि सामाजिक बदल या सगळ्यांचा आहे. फक्त मोटार गाड्यांचा विचार केला तर मोठ्या गाडीच्या शोधाच्या प्रवासात लहान-मोठे असे किमान लाखभर तरी पेटंट्स आपल्याला आढळून येतील. असा प्रत्येक वाहनाच्या बाबतीत म्हणता येईल.


दर्यावर्दीच्या जहाजांचा ताफा कसा असायचा,

जहाजनिर्मितीची प्रक्रिया कशी असायची, प्रवासाला निघताना अन्न पाण्याची सोय कशी केली जायची, मुख्य खलाशी कोण कोण असायचे, या सगळ्या गोष्टी मजेदार आहेत. 'आपल्या जहाजाचा कॅप्टन हा जहाजाचा मुख्य माणूस असतो. हे आपल्याला माहीत आहे, पण मांजरही जहाजात मोठी भूमिका बजावतं हे वाचून गंमत वाटली.' प्रवासाला ठराविक काळासाठी लागणारा अन्नसाठा आणि पाणी जहाजांमधून नेलं जायचं. उंदराकडून त्या अन्नाची नासाडी होण्याचे किंवा अगदी जहाजालाही नुकसान होण्याचे प्रकार अनेकदा व्हायचे. 'त्यामुळे उंदरांना रोखण्यासाठी ' मांजर ' मुख्य खलाशांच्या यादीत असायचं..!' हे वाचून मी अक्षरशःअवाक झालो होतो.


आकाशातील ग्रह तारे खलाशांचे मित्र किंवा मार्गदर्शन बनायचे.अनेक तारे रात्रीच्या अंधारात तेजस्वी दिसतात आणि त्यांची जागा हलत नाही. त्यामुळेच हे तारे उत्तम मार्गदर्शक ठरायचे. त्यातला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे ध्रुव तारा‌ हा तारा कधीच आपली जागा सोडत नाही. हे आपल्याला माहित आहेच. रेखांशांचा अंदाज कसा काढायचा हे पहिल्यांदा इजिप्तच्या खलाशांनी शोधून काढलं.कुठले तारे आकाशात नेमके कुठे असतात,कोणत्या मोसमात ते आपली जागा कशी बदलतात अशा सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला होता आणि तोही हजारो वर्षापूर्वी..! वार्‍याची दिशा दाखवणार्‍या नकाशाला 'विंड रोझ' म्हंटल जायचं ग्रीसमधल्या अथेन्समध्ये 'टॉवर ऑफ विंड्स' या नावाचं एक टॉवर प्रसिद्ध आहे.या टॉवरच्या ८ बाजूंवर त्या त्या वार्‍याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.आधी 'विंड रोझ' मध्ये वार्‍याचे आठच प्रकार होते.ख्रिस्तपूर्व २५० मध्ये इजिप्तचा राजा टॉलेमी यानं त्यात अजून चार प्रकारांची भर टाकली.मला फक्त वारा माहीत होतां.या ठिकाणी तर वार्‍याचे १२ प्रकार दिसले.


कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो पक्षांचा स्वभाव आणि त्याची दिनचर्या यांचा अभ्यास केला तर ते ठराविकच पद्धतीने वागताना आपल्या लक्षात येते.उदा. ठराविक हंगामात काही पक्षी स्थलांतरित होतात.ठराविकच झाडावर आपलं घरटं बांधतात,अन्नाच्या वेळाही त्यांच्या साधारणपणे ठरलेल्या असतात. त्यांच्या या सवयीचा उपयोग आपल्याला दिशादर्शक म्हणून होऊ शकतो. ही कल्पना खलाशांना आली.आणि त्यांनी त्यांचा अभ्यास चालू केला. दिशादर्शकाचा असा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पक्षी हे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात ही कल्पना खरोखरच भन्नाट होती मुख्य म्हणजे विश्वासार्ह होती. 


समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता. आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं. तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा. पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.अशी नवीन व नाविन्यपूर्ण माहिती वाचत असताना मी गंभीरपणे चिंतन मनन करत होतो.


एकदा ग्रीस येथील ॲथेन्समध्ये सॉक्रेटिसला प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक पत्रकार आला. त्याने बरीच शोधाशोध केली. बऱ्याच लोकांना विचारलं पण प्रत्येकांनीच नाही म्हणून सांगितलं. निराश हताश होऊन तो बाहेर पडत असताना वाटेत त्याने प्रत्यक्ष सॉक्रेटिसला विचारले "मला सॉक्रेटिसला भेटायच आहे. त्यावेळी सॉक्रेटिसने मार्मिकपणे उत्तर दिले. मी ही सॉक्रेटिसला शोधत आहे. जर तो तुम्हाला सापडला तर मला नक्की सांगा.मलाही आनंद होईल व मी आपला आभारी असेन. या प्रसंगाची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण झाली.


पृथ्वीविषयी अनेक 'सत्य' समोर आली.आणि दूरदूरच्या देशांत वसाहती झाल्या.ख्रिस्तपूर्व १३८ मध्ये चँग चीन नावाच्या एका दर्यावर्दींनं मध्य आशियाचा दौरा केला होता.पण ख्रिस्तपूर्व ३९९ मध्ये फा सीन नावाचा एक भिक्खू आपल्या ३ साथीदारांसोबत भारतात आला,बुध्दिझम शिकला आणि ती शिकवण घेऊन तो श्रीलंका आणि जावा यांच्यामार्गे चीनला गेला.त्यानंतर मार्को पोलो,इब्न बतुता,वास्को द गामा, ख्रिस्तोफर कोलंबस,अमेरिगो वेस्पुची,जेम्स कुक,अशा अनेक दर्यावर्दींनी सर्वस्व अर्पण करुन जगाला ओळख देण्याचे महान काम केलं हे वाचत असताना मी अचंबित होतो.थक्क होतं होतो. अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला.पण अमेरिगो वेस्पुची यांचे नाव कसं लागलं हे वाचत असताना.सत्य स्वतःला उलगडून दाखवत होतं.


त्यानंतर जहाजांचे निर्माण,त्यामध्ये होत गेलेला बदल हे वाचणीय आहे.माझ्यासाठी जगणं किती अनोळखी आहे.याची जाणीव झाली.१९०९ साली ऑलिम्पिक, टायटॅनिक,आणि ब्रिटॅनिक यांच्या चित्तथरारक प्रवासांचे वर्णन वाचताना अंगावर शहारे आले.या अवाढव्य,समुद्रातील तरंगते राजमहलच जणू..! टायटॅनिकच्या अपघातानंतर अनेक वर्षांनी या जहाजाचे अवशेष मिळाले.संपूर्णपणे गंज चढलेल्या अवस्थेतही हे जहाज आपल्या सौंदर्याचा पुरावा देत होतं..!


अश्मयुगीन चाक आपल्याला १५ ते ७५ हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेवून जातो.बायसिकल - पहिलंवहिलं जनावरविरहित प्रवासी वाहनाचा व डनलप टायरचा लेखाजोखा खुपचं प्रभावी व दर्शनीय आहे.


चारचाकी वाहनांची सुरुवात १३३५ साली गुईडो वॉन विगेवानो या डच संशोधकाने विंडवॅगनचा कच्चा आराखडा तयार केला होता.हीच संकल्पना वापरून लिओनार्दो दा विंचींन एखाद्या भल्या मोठ्या घड्याळासारखी कार तयार केली होती. खरं तर त्याची ही कार म्हणजे पहिली स्वयंचलित वाहनाची सुरुवात होती. त्यानंतर अनेक आधुनिक बदल होत गेले. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नातून मोटारगाड्यांची निर्मिती झाली. कार्ल बेंज यानं पहिली मोटर गाडी कशी तयार केली, पण लोकांनी घाबरून त्याचा स्वीकारच केला नाही. मग लोकांची भीती कमी व्हावी यासाठी बेंझची बायको चक्क ती चालवत आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली हा प्रवास कसा केला तिला काय अडचण याला लोकांच्या कशा प्रतिक्रिया होत्या हे फारच मजेशीर आहे.आपल्या पतिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री शक्तीचा होती.हे वाचताना समस्त स्त्री शक्तीपुढे मी नम्र झालो.मला माझ्या पत्नीच्या असण्याची जाणीव झाली.ही भावनिक संवेदना अशीच जागी ठेवून मी पुढील प्रवासाला निघालो.


मर्सिडीज एमिल जेलिनिक या एका प्रतिष्ठित उद्योजकाच्या मुलीचे नाव 'मर्सिडीज' होते.


हेन्री फोर्ड यांनी १३ ऑगस्ट १९४१ रोजी एक भन्नाट कार प्रदर्शनात प्रदर्शित केली.स्टीलची प्रेम आणि १४ प्लॅस्टिक पॅनल्सनी बनवलेली ही कार वजनानं फारच हलकी होती.यासाठी सोयाबीनचा वापर केल्याचा दावा केला जातो. 


२७ सप्टेंबर १८२५ रोजी ४५० प्रवासी घेऊन डार्लिंग्टनवरुन ताशी १५ मैल एवढ्या वेगानं प्रवास करत ही रेल्वे २५ मैलाचं अंतर पार करत स्टॉकटनला पोहचली आणि थांबली.१६ एप्रिल १८५३ ! भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस याच दिवशी बोरीबंदर ( नंतरच बॅक्टरिया टर्मिनस आणि आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ) ते ठाणे या दोन स्थानकांदरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावली.सुमारे ३४ कि.मी.प्रवासादरम्यान १४ डब्यांत ४०० प्रवासी घेऊन ही गाडी रवाना झाली. त्यावेळी या गाडीला साहिब,सिंध,आणि सुलतान असे तीन इंजन्स लावले होते.हा आनंदी सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला...!


'पुढे धोका आहे' याची ट्रेन मधल्या प्रवाशाला माहिती असणार अर्थातच शक्य नसतं. पण भारतात मात्र एका प्रवाशालाच रेल्वे प्रवासादरम्यान हे समजलं होतं काय होतं.काय होता हा किस्सा ? रात्रीच्या भयाण अंधारातून एक ट्रेन धावत होती. आतमधले अनेक प्रवासी गाढ झोपेत होते.अचानक ट्रेन थांबली अचानक ट्रेन थांबल्यामुळे प्रवासी खडबडून जागे झाले. तोवर एका डब्यात रेल्वे कर्मचारी चढले एका तरुणानं ट्रेनमधली चेन ओढून ती थांबवल्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी त्याला या बद्दल विचारल्यावर त्यानं काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर एक फट आहे आणि त्यावरून जर ट्रेन गेली असती तर अपघात झाला असता असं सांगितलं.याची चाचपणी करायला रेल्वे कर्मचार्‍यांसकट अनेक प्रवासी धावले.बॅटरीच्या उजेडात काही अंतरावरच रुळावर एक मोठी फट होती. त्या तरुणाचं म्हणणं चक्क खरं निघालं होतं. पण त्याला इतक्या काळोखात तेही प्रवास करत असताना हे समजलचं कसं ? हाच प्रश्न सगळ्यांनी जेव्हा त्याला विचारला तेव्हा त्यानं अगदी सहजपणे याचं उत्तर दिलं इतर प्रवाशांसारखाच तोही झोपलेला होता. खिडकीला डोकं टेकवून तो झोपलेला असताना तो रेल्वे आणि रुळ यांचा आवाज ऐकत होता. अचानक रुळांच्या कंपनानं होणार्‍या आवाजामध्ये बदल त्याला जाणवले आणि तो सावध झाला. त्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला होता. कित्येक प्रवाशांचे जीव वाचले होते हा तरुण म्हणजे ज्यांची जयंती दरवर्षी 'इंजिनियर्स डे' म्हणून साजरी होते ते प्रसिद्ध भारतीय अभियंते डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या..! 


हा किस्सा आणि आपोआपच मी सलाम केला.


यानंतर फुगे ( हॉट एअर बलून्स) यामध्ये फुग्यांचा प्रवास ज्ञानात वाढ करणारा आहे.


ग्लायडर्स, विमान आणि हेलिकॉप्टर ख्रिस्तपूर्व चौथ्य शतकात महर्षी भारद्वाज यांनी 'वैमानिकशास्र' नावाचा ग्रंथ लिहिला होता.अनेक शास्त्रज्ञांनी जीवमोलाने या विमान शोधामध्ये आपलं योगदान दिले आहे.माणसाला माणसाची ओळख होण्यामध्ये हे खुपचं महत्त्वपूर्ण आहे.विल्बर व ऑर्व्हिल या राइट बंधूंचा जन्म मिल्टन राईट या चर्चच्या पाद्र्याच्या घरी झाला.विल्बर व ऑर्व्हिल मिळून एकूण ५ भावंडे होती.गंमत अशी की या पाचही भावंडांचा जन्म वेगवेगळ्या गावात झाला. अर्थातच याला कारणीभूत वडिलांची फिरस्ती होती हे होतं.विल्बर १८६७ साली अमेरिकेतल्या इंडियानातल्या मिलवाईल इथं जन्मला तर ऑर्व्हिलचा जन्म अमेरिकेतल्याच ओहयोमधल्या डेटन या गावात १८७१ साली झाला. ही दोन भावंड एकमेकांच्या जवळ होती.


राईट बंधूंना आपण जरी विमानाचे संशोधक मानत असलो तरी ते स्वतः मात्र तसं मानत नव्हते. विशेषतः विमानाचा शोध आपण स्वतःच लावला असा त्यांनी कधी दावाच केला नाही. त्यांनी १९०६ साली जे पेटंट घेतलं त्यातुनही आपल्याला हे जाणवतं." उडणाऱ्या यंत्रामध्ये आपण काही नवीन उपकरणं तयार केली आहेत.आणि त्यात काही सुधारणा केल्या आहेत अशा आशयाचं त्यांच पेटंट होतं. त्यांच्या पेटंटच शीर्षक होतं : न्यू अँड युजफुल इम्प्रुव्हमेंट्स इन फ्लाइंग मशिन्स..!


ऑर्व्हिल विमानाचे प्रात्यक्षिक करत असताना त्याचा जीव धोक्यात आला. या अपघातात तो जबर जखमी झाला. त्याच्या सोबत असणारा सेल्फ्रिज याचा मृत्यू झाला. त्या मानानं ऑर्व्हिल सुदैवी ठरला. या अपघातात त्याची हाडं मोडली होती.१२ वर्षानंतर त्याची अजून काही हाड दुखावली गेल्याचं लक्षात आलं होतं. यादरम्यान त्याच्या ( कॅथरीन ) या बहिणींनं त्याची भरपूर सेवा केली. शाळेत शिक्षिका असलेली कॅथरीन आपल्या भावांची बहीणच नाही तर त्यांची आईही होती. सेक्रेटरीही होती आणि सहकारीही ! या अपघातानंतर लष्करानं राईट बंधूना दिलेला करार मोडण्याचा निर्णय

जवळजवळ घेतलाच होता,मात्र कॅथरीननं तसं होऊ दिलं नाही. उलट हा करार अजून एका वर्षासाठी तिनं वाढवून घेतला.एकीकडे विल्बरनंही आपला लढा यशस्वीरित्या चालू ठेवला होता. राईट बंधूंच्या विमान संशोधनाच्या प्रवासात अनेकदा त्यांना कोर्टाच्या पायऱ्याही चढाव्या लागल्या होत्या. पण या सगळ्या चढ-उतारात त्यांच्या पाठीशी एक व्यक्ती भक्कमपणे उभी होती आणि ती म्हणजे त्याची बहीण कॅथरीन ! आई गेल्यापासून घराची सगळी जबाबदारी कॅथरीनचं सांभाळत होती. आई गेली तेव्हा ती १५ वर्षाचीच होती. आईच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या कॅथरीननं घरची अडचण समजून घेऊन लगेचच स्वतःला सावरलं आणि स्वतःहून घरातली सगळी जबाबदारी अंगावर घेतली. इतकंच नाही तर आपल्या दोन भावांच्या प्रयोगांदरम्यान तिची मोलाची साथ त्यांना लाभली. त्यांचे प्रयत्न चालू असताना तिने त्यांना नुसता पाठिंबाच दिला नाही तर तिनं त्यांना अनेकदा मदतही केली.तिनं आपल्या भावांनी तयार केलेल्या विमानातून हवाई उड्डाणही केलं होतं


हा विमान प्रवासा वाचत असताना मानव व मानवतेपुढे मी नतमस्तक झालो..!


पुढील घटना व प्रसंग वाचत असताना जीवाची घालमेल होत होती.


मला वाटतं, आमच्या कामाची दखल ही आतिषबाजीच्या एका तुकड्या पेक्षा दैनदिन कामावरून घेतली गेली तर तेआम्हाला जास्त आवडेल. हे शब्द होते चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग याचे..! ऑल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ वेळ रात्रीचे १० वाजून ५६ मिनिटं ! ईगल चंद्रावर अलगद उतरलं. तेव्हा यानात फक्त २५ सेकंद चालेल इतकंच इंधन शिल्लक होतं..! ईगल चे दरवाजे उघडले आणि आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा आपला डावा पाय चंद्रावर ठेवला. त्याच्या पायाचा ठसा उमटला. त्यांनी आपल्याबरोबर राइट बंधूंच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाच्या विमानाचा एक छोटासा भाग आणला होता. त्यांनी चंद्रावर अमेरिकेचा झेंडा रोवला आणि सोबत आणलेल्या एका फळ्यावर,'आम्ही मानव जातीच्या शांततेसाठी इथं आलोय' असं लिहून ठेवलं. त्या दोघांनी मग चंद्रावरचे नमुने गोळा कर, निरीक्षण कर, फोटो काढ, असं करत जवळपास १५० कि.मी.चा परिसर पालथा घातला.सुमारे २१ तास ३६ मिनिटं ते चंद्रावर होते.


आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन परत जायला सज्ज झाले आणि ईगलमध्ये बसले. पण त्यांच्या स्पेस सूटचा धक्का लागून ईगलमधल्या महत्वाच्या स्वीचचा भागच तुटला. हे स्वीच ईगलला वर उचलण्यासाठी महत्त्वाचं होतं. आता चांगलीच पंचाईत झाली. कारण ईगल वर उचललं गेलं नाही तर या दोघांना चंद्रावरच राहावं लागलं असतं. ही अडचण हॉस्टनच्या मिशन कंट्रोल ऑफिसनी सोडवली. त्यांनी चक्क बॉलपॉइंट पेंनच झाकन त्या स्वीचच्या तुटलेल्या भागात बसवायला सांगितलं.खरंच तर हा कोणालाही मूर्खपणा वाटेल. पण त्यावेळी हाच मुर्खपणा शहाणपणा ठरला.पेनचं झाकण बसल्यावर ईगल 'टेक ऑफ' साठी सज्ज झालं..! आणि माझा जीव भांड्यात पडला...!


भविष्यातली वाहन हे प्रकरण  या पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे. भविष्यात येणारी वाहन त्यांच्याकडून केली जाणारी काम अविश्वसनीय पण सत्याला धरून सत्य सांगणार हे प्रकरण,या पुस्तकाचा आवाका फार मोठा आहे. गंभीरपणे,चिंतन, मनन केल्यास गुंतागुंत असणारा हा विषय खूपच सुटसुटीत व सोपा करून सांगण्यामध्ये आदरणीय लेखकांना यश आलेले आहे. "माणूस म्हणून समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे." इतिहास वर्तमान भविष्य येणारा काळ त्यामध्ये असणारं माणसाचे स्थान..! इतिहासातील भूतकाळातील माणूस व येणाऱ्या काळातील माणूस यातील स्पष्टपणा सांगणारं हे पुस्तक सर्वांनी वाचावे..! हे पुस्तक म्हणजे अखिल मानवजातीसाठी 'प्रवास' करण्यासाठीचा महामार्ग आहे...!


शेवटी जाता..जाता..! 


एक म्हातारा माणूस त्याच्या नातवाला म्हणतो - 


" माझ्या मनात सदैव एक लढा चाललेला असतो. या भयंकर लढाईत दोन लांडगे लढत असतात. त्यातला एक लांडगा असतो दुष्टस्वभावी म्हणजे संतापी, हावरा, मस्तरी,उध्दट आणि भ्याड,तर दुसरा असतो सुष्टस्वभावी म्हणजे शांत, प्रेमळ, विनम्र, उदार प्रामाणिक आणि विश्वासू ! हे दोन लांडगे तुझ्याही मनात आणि सर्वच माणसांच्या मनात लढत असतात."


क्षणभर विचार करुन नातवाने विचारलं, " त्यातला कुठला लांडगा जिंकणार ? "

त्यावर म्हातारा हसून म्हणाला, " तु ज्याला खाऊ घालशील तो जिंकणार…


एके ठिकाणी वाचलेली ही वरील गोष्ट खुपचं काही सांगून जाते.


प्रवास हे पुस्तक संदर्भ सूची सहीत ५१५ पानांचे आहे,अच्युत गोडबोले,आसावरी निफाडकर यांनी लिहीलेले.व मधुश्री पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले आहे.