* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: in the world of books..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

in the world of books.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
in the world of books.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२३/१/२४

‘मॅट्रिक फेल’ विजय,पुस्तकांच्या विश्वात.. 'Matric Fail' Vijay,in the world of books..|

'गर्दीतून चालताना माणसांचा एकमेकाला धक्का लागतो;पण दाटीवाटीने भरारी घेणारे पक्षी एकमेकांना धडकत नाहीत.कारण,गर्दीत असूनही त्या प्रत्येकाने वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते.त्यात दुसऱ्यांकडून घुसखोरी केली जात नाही.थव्यानं भरारी घेताना प्रत्येकाला पुढच्या-मागच्या बाजूच्याचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे थव्याने वेग वाढविला वा कमी केला तरीही प्रत्येकजण एकमेकांशी जुळवून घेतात. म्हणून तो थवा एकसंध भरारी घेतो.यात आजूबाजूच्या पक्ष्यांमधील गती बदल अल्पांशात शेजाऱ्यांना समजतो,त्यामुळे मोठ्या थव्यातील पक्ष्यांची भरारी घेतानाची लहर १५ मिलिसेकंदापेक्षा कमी वेळा हललेली असते.ही दिगंबर गाडगीळ यांच्या 'पक्षीगाथा' पुस्तकातील  संशोधनात्मक मांडणी... अशा जगण्यातलं ज्ञान देणाऱ्या कित्येक

पुस्तकांमधील संदर्भ विजय गायकवाड यांना तोंडपाठ आहेत.


हातकणंगले तालुक्यातील टोप येथील या 'मॅट्रिक फेल'अवलियाला वाचनाचं प्रचंड वेड.वडील नेहमीच मोठ्यानं ग्रंथ वाचतात.ते कानावर पडत राहिल्यामुळे वाचनाला प्रारंभ झाला. त्यातच 'चौकट आणि थडगं यामध्ये काही फुटांचं अंतर असतं', हेन्री डेव्हिड थोरो यांच्या वाक्याने ते पुस्तकांशी अधिक जोडले गेले.


वाचनवेड्या विजय यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.नित्यनेमाने ते व्यायाम करतात.त्यानंतर आरशासमोर उभारून त्यातल्या प्रतिमेशी संवाद साधतात.'माझ्यातला मी माझ्यासाठी खूप काही करतो, हे जाणतो म्हणून त्याचे दररोज आभार मानतो.' त्यांना आलेली ही प्रचिती.त्यानंतर ते घराच्या मागे असलेल्या आडातून पाणी भरतात.तिथून पुढे एक ते दीड तास वाचन.साडेसातला ते शिरोली एम.आय.डी.सी.तील एका फौंड्रीमध्ये कामासाठी जातात.'बेभरवशाच्या नोकरीवर जातो,तेही भरवशाने.कारण,सोबत पुस्तकाने दिलेली ताकद असते.दिवसभर शारीरिक कष्टाचं काम करण्यासाठी.फौंड्रीतील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊनसुद्धा मी शांत आहे.कारण,माझ्या अंगात पुस्तकांनी शांतता भिनवलेली आहे.

( मानवी आयुष्यात शांतता महत्वाची असते.)

तुझ्यावर कोणाचाही प्रभाव असता कामा नये, तुझ्यावर केवळ तुझाच प्रभाव हवा.,'हे जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांना पुस्तकांनी दिलंय.


सिमेंटच्या पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घरात दाम्पत्यासह राहणाऱ्या विजय यांची राहणी साधी आहे.त्यांची खरी भूक आहे पुस्तक वाचनाची.महिन्याला तुटपुंजा पगार हातात पडतो.त्यातील दीड ते दोन हजार रुपये प्रतिमहिना ते पुस्तक खरेदीसाठी खर्चतात.असे करत करत आतापर्यंत त्यांच्या भांडारात ६० हजारांच्या पुस्तकांचा समावेश झाला आहे.सायंकाळी पाचपर्यंत ते कामावरून घरी येतात. तास - दीड तास ते पुस्तकात रमून जातात. पुस्तकं ही दिवसभर आलेला कामाचा शीण घालवून अंगात नवी ऊर्जा निर्माण करतात,असं त्यांचा अनुभव सांगतो.केवळ घेतलं पुस्तक आणि वाचून काढलं एवढंच न करता,ते त्यावर चिंतन करतात.त्यातील महत्त्वाचं साररूपात मोबाईलवर संग्रहित ठेवतात.त्यातून त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली.आजपर्यंत त्यांनी २५० ब्लॉग लिहिले असून,त्याचे १३,८८० फॉलोअर्स आहेत.तसेच ते विविध विषयांवर व्याख्यानेही देतात.

'मला केवळ एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही.' हे सॉक्रेटिसचे पुस्तकातील प्रेरणादायी वाक्य त्यांच्यात वाचनाची ऊर्मी वाढविते.


'मेंदू व वर्तनासंबंधी हादरा देणारे संशोधन करीत गोलमन दाखवून देतात की,जेव्हा उच्च बुद्धिमत्तेचे लोक अडखळतात त्यावेळी मानवी मेंदूत असे घटक कार्यरत होतात ज्यामुळे साधारण बुद्ध्यांकाची व्यक्ती आश्चर्यजनकरीत्या बाजी मारून नेते.ते घटक म्हणजे आत्मजाणीव किंवा सजगता,स्वयंशिस्त आणि समानुभूती.हुशारीचा वा चलाखीचा नवा अर्थ सांगणारे हे घटक जन्माच्या वेळी निश्चित होत नसतात.बालपणीचे अनुभव या घटकांना आकार देत असले तरी मोठेपणी भावनिक बुद्धिमत्तेची जोपासना करून तिला बळकट करता येते आणि तिचा तात्कालिक फायदा आरोग्य, नातेसंबंध आणि काम यासाठी करून घेता येतो.'डॅनिअल गोलमन लिखित 'इमोशनल इंटेलिजन्स' या पुष्पा ठक्कर अनुवादित 'भावनिक बुद्धिमत्ता' पुस्तकाच्या पहिल्या पानावरील हे वाक्य.विजय यांनी वाचनातून मेंदूत साठविलेलं जीवनाचं अनमोल तत्त्वज्ञान त्यांनी कथन करत रहावं,इतकं सफाईदारपणे ते याविषयी बोलत राहतात.त्यांनी आतापर्यंत पाश्चात्य लेखकांची अनुवादित पुस्तकं वाचनावर जास्तीत जास्त भर दिला आहे.या लेखकांच्या मांडणीत संशोधनात्मक आणि नावीन्य असते,त्यामुळे ते त्यांना आवडते.


हेन्री थोरो यांच्या जयंत कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेल्या 'वॉल्डन' या पुस्तकामध्ये जीवन कसं जगायचं आणि आपण कसं जगतो, यातील अंतर मांडले आहे.

थोरोंनी मांडलेल्या अशा कितीतरी विचारांचा पगडा विजय यांच्या मनावर पडला आहे.बेंझामिन फ्रँकलीन यांच्या 'मेल्यानंतर तुम्हाला भरपूर झोपायचे आहे. आतातरी जागे रहा,मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे,तो उपयोगात आणा,'या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे,असं विजय यांचं मत आहे.


संग्रहातील काही पुस्तके-इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे,इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,

दगड - धोंडे,वारूळ पुराण-नंदा खरे, मृत्यू सुंदर आहे? - डॉ.रवींद्र श्रावस्ती,अभिनव जलनायक-सतीश खाडे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,

शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स, सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस्.


- भरत बुटाले- (लेखक, 'लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Lokmat ePaper - http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_KOLK_20240121_18_7.


Dr. Deepak Shete: वाचनाचा दीपस्तंभ : विजय गायकवाड वाचनाच्या गोडीमुळे निर्माण होणारी सिद्धता दर्शवणारे माझे जिवलग मित्र विजय गायकवाड,टोप यांचा आज दै.लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला वाचनीय लेख आपणही वाचून वाचण्याची सवय अधिक वृद्धीगत करावी.ही विनंती.


- डॉ दिपक शेटे

- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार


आज रविवार,दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीच्या दैनिक लोकमत,कोल्हापूर आवृत्ती,पृष्ठ क्रमांक १८ वरती सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहूजी छत्रपती महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांचे वलय असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 'टोप' या गावचे आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय श्री.विजय गायकवाड साहेब यांचे पुस्तकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि पुस्तकांचे सखोल वाचन,चिंतन तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी केलेली भारदस्त भाषणे,रोज सकाळी सलगपणे ब्लॉग वर त्यांचे चिंतनशील लेखन यावर अत्यंत सखोलपणे भारदस्त असा लेख लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक श्री.भरत बुटाले साहेब यांनी लिहिलेला आहे.याबद्दल श्री.भरत बुटाले साहेबांचे मनःपूर्वक आभार खूप खूप अभिनंदन करावे वाटते.कारण आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेबांनी अतिशय संघर्षातून आपला पुस्तक वाचनाचा छंद तळमळीने,नित्य नियमाने जोपासलेला आहे हे साधेसुधे काम नाही.

वाचनाचा छंद,वाचनाचे वेड जोपासणे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. कारण त्यासाठी पुस्तक विकत घ्यावी लागतात, अनेक पुस्तके वाचून त्या पुस्तकांतून महत्वाच्या विषयांची विभागणी मोठ्या कौशल्याने करावी लागते.ते आदराने आपल्या मेंदूत कल्पकतेने जपून ठेवावं लागतं.कठीण विषय वाचून त्यासाठी आपल्या जीवनातील जादाचा वेळ काढावा लागतो.ते पुस्तक त्यातील संदर्भ, त्यातील महत्वाचे विचार, महत्त्वपूर्ण माहिती जपताना पुस्तक सातत्याने पुन्हा पुन्हा वाचावी लागतात.काही विषय इतके गूढ, चिंतनीय असतात की,ते वाचताना खूप वेळ द्यावा लागतो.

आपल्या दैनंदिन जीवनातून हा वेळ काढणे म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठे कष्टाचे काम झाले आहे.एकतर आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेब शारीरिक मेहनतीचे काम करुन सुद्धा थकून जात नाहीत तर पुन्हा नव्या जोमाने आपल्या वाचनाचे वेड मोठ्या कौशल्याने जपतात याबाबत त्यांचे मला खूप कौतुक वाटते.मी त्यांचा खूप आदर करतो.त्यांचे खूप खूप अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आमचे मार्गदर्शक श्री.विजय गायकवाड साहेब यांना त्यांच्या वाचनाचे वेड,वाचनाचा छंद जपण्यासाठी नैसर्गिक न्याय प्रचंड साह्य करो हिच मनापासून सदिच्छा आहे.धन्यवाद


आपला स्नेहांकित, 

शीतल खाडे सांगली.


मॅट्रिकला फेल असल्यामुळे 'मी नववी पास आहे' असं सांगणारा हा व्यक्ती. एका कंपनीत मजुरीचे काम करतो. दिवसभर प्रचंड शारीरिक श्रम केल्यामुळे शरीर थकून जाते. शरीराला आरामाची गरज असते.झालेली झीज भरून काढण्यासाठी ऊर्जेची गरज असते.

यावेळी विजय गायकवाड यांना पुस्तकातून ऊर्जा मिळते.पुस्तकातून मिळालेली ऊर्जा मनासोबत शरीर टवटवीत करत जाते.थकवा कुठल्या कुठे दूर पळून जातो.मनाभोवती विचार पिंगा घालू लागतात.त्यातून चिंतन घडतं,चिंतनातून लेखन घडतं.लेखनासोबत हा माणूस खूप छान बोलतोही.आजच्या काळात वेळेअभावी बोलणं कमी होत जाताना न चुकता, न थकता नित्यनेमाने अनेकांसोबत प्रेममय संवाद करत जातो.यांनी पुस्तक फक्त वाचली नाहीत तर ते पुस्तक आत मुरवली आहेत.पुस्तक समजून घेतली आहेत.पुस्तकं त्यांच्याशी संवाद साधू लागली आहेत.यांच्या धकाधकीच्या काळात पुस्तकं न वाचण्याची अनेक सशक्त कारणे असतानाही हा माणूस कोणतेही कारण न स्वीकारता 'पुस्तक वाचणे' एवढेच स्वीकारतो.ही खूप मोठी गोष्ट वाटू लागते. अनेक कारणांवर विजय मिळवून 'पुस्तक वाचणारा' हा विजय आगळावेगळाच वाटू लागतो.


साहेब,आजची पहिली नजर या शब्दावरून फिरली आणि डोळे भरून आले. मनाला खूप आनंद झाला.

सन्माननीय उपसंपादक बुटाले साहेबांचे खूप खूप आभार.चांगल्या योग्य व्यक्तीचा सन्मान केलात, यामुळे अनेकांना ऊर्जा मिळेल. अनेक पुस्तकांना नवीन विजय मिळतील. लोकमतचे मनःपूर्वक धन्यवाद.


सॉक्रेटिस ( माधव गव्हाणे )


अगदीच..एका व्यासंगीचा दखल ही घेतली गेलीच पाहिजे..एका बाजूला मोबाईलमध्ये वाहत गेलेली पिढी आणि दुसऱ्या बाजूला हा अवलिया.. जिथे लोकं पुस्तकं सोडून मोबाईलमध्ये रमू लागली त्याच युगात आपण पुस्तकांना आपलसं केले..ही पुस्तकं नक्की तुमचंही पुस्तकं लिहीतील हे त्रिकालाबाधीत सत्य आहे...! कवी,संतोष शेळके,पांढराशुभ्र काळोख,नेरळ,मुंबई


पुस्तकात रमनारी माणसं तिन्ही काळाचे सारथी अन् समन्वयक असतात.ज्ञानाच्या प्रकाश वाटेवर स्वप्रकशित होऊन समाजाला अतः दीप भवः होण्यास प्रेरक,पूरक आणि प्रेरणादायी ठरतात. मागील ३ वर्षात भेट न झालेले पण नियमित मोबाइलवर संपर्कात असणारे असणारे माझे कोल्हापूरचे मित्रवर्य श्री. विजय गायकवाड यांचा मागील महिन्यात प्रत्यक्ष भेटीचा योग आला अन् आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलो.. रोज लेखणीतून भेटणाऱ्या मित्राला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद लेखणीबद्ध करणे अशक्यप्राय.आज या पुस्तकं वेड्या अन् लेखन प्रिय मित्राची नोंद दै. लोकमतने घेतली फार आनंद झाला.. दादा अभिनंदन. खुप खुप अभिनंदन अन् मणभर शुभेच्छा..!


कवी श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर,

श्रावण सर.. संभाजी नगर


खुप खुप अभिनंदन सर,हा लेख वाचून मला अगदी गहिवरून आलं.तुमचा संघर्ष तुमचे पुस्तकावरील ते प्रेम `क्या बात'तुमच्या संपर्कात व मार्गदर्शनात असल्याचा अभिमान वाटतो....!!

पार्थ गाडेकर.. रायपुर


पुस्तके ही माणसाला काळाच्या महासागरातून सुरक्षित घेऊन जाणारी जहाजे आहेत.- विलास माने,पारगांव


तुमच्या सारख्या व्यक्तीचा सहवास असल्यावर माणुस कोणत्याही परिस्थितीत जीवनावर विजय मिळवेल कारण पुस्तक वाचन ही आपल्यातल्या यशाची पहिली पायरी आहे आणि सर्वात सोपा प्रगतीचा मार्गही आणि तो तुमच्याकडुन मिळतोय.. - -भारत गाडेकर,रायपुर


जीवन जगण्याचा  गुंता कसा सोडवायचा  हे सांगणार आणि सहज उपलब्ध असलेलं उत्तर म्हणजे पुस्तक...... एवढेच नव्हे तर मानवी आयुष्यातील प्रत्येक उत्कट व सौम्य भावना याचे वैचारिक पुरावे देणारा.... अथांग ज्ञानाचा महासागर म्हणजे पुस्तक.... व त्यातील प्रवासी म्हणजे आमचे विजयराव सर…!!

 - डॉ.संजय मोरे जीवशास्त्राचे प्राध्यापक,


वर्तमान पत्र वा पुस्तक 

अथवा असो कागद कोणताही,

मोगरा असो वा चाफा,

सुगन्ध दरवळावा दिशा चोही.!

 खूप शुभेच्छा साहेब 

दादासाहेब ताजणे,सेलू


दादा,आपण मला भेटलेला एक अनमोल हिरा आहात.आम्ही बालपणापासून पूस्तकांच्या सानिध्यात राहिलोत पण त्यांच्याशी सख्यत्व जमवू शकलो नाहीत. पण आपण अनेक वर्ष त्यांच्या प्रवासापासून दूर राहून सुध्दा त्यांचे सखा झालात. जीवनाच्या वाटेवरचा खरा अर्थ तुम्हांला कळाला.ग्रंथ हेच जीवन जगण्याचा आनंद देतात हे आपण सिध्द केल आहे.ग्रंथाच्या सहावासातून तुम्ही स्वतः च एक कधी न संपणारा ग्रंथ झालात.आपल्या ध्येयवेड्या वाचनाने मी प्रेरित झालो आहे.

विनम्र, सुभाष बाबाराव ढगे,परभणी

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


आमचे सन्मित्र,वाचनमित्र विजय गायकवाड,टोप यांच्या अफाट वाचनाची लोकमत या वृत्तपत्राने घेतलेली दखल…!

डॉ.रवींद्र श्रावस्ती.. मृत्यू सुंदर आहे?


मला केवळ एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही. सर जशी सॉक्रेटिसकडून तुम्हाला प्रेरणा मिळते तसीच आम्हाला विजय गायकवाड सरांकडून प्रेरणा मिळते.


दादासाहेब गाडेकर,रायपुर