मग एक श्रीमंत सावकार म्हणाला,'दानाविषयी आम्हाला काही सांग.' त्यावर अल् मुस्तफा बोलू लागला :
तुमच्या धनदौलतीतलं तुम्ही देता तेव्हा तुम्ही काहीच दिलं नाही,असं होतं.तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं.कारण तुमची दौलत म्हणजे काय असतं? तर,आज ना उद्या गरज पडेल त्यावेळी ताब्यात असाव्यात अशा वस्तूंचा तुम्ही परिग्रह केलेला असतो.त्या संचयामागे त्यांना गमावण्याचं भय असतं.
'उद्या',म्हणजे तरी काय? पवित्र दिव्यनगरीच्या यात्रेकरूंना वाळवंटात सोबत करीत असलेला एखादा अतिशहाणा कुत्रा वाळूखाली हाडकं पुरून ठेवत चालला तर भविष्यात त्याचा निर्वाह होईल काय ?
एखाद्या गरजेचं भय ही देखील नड आणि गरजच की!तुमची विहीर भरलेली असताना तहानेचं भय तुम्हाला पडेल तर तुमची तहान शमेल कशी? प्रचंड धनदौलतीतला नगण्य हिस्सा काहीजण दानार्थ देतात,त्यांना नावलौकिक हवा असतो.त्यांच्या या छुप्या वासनेनं त्यांचं दान निःसत्त्व होऊन जातं.
काहीजण परिग्रहशून्य असतात,तरी जवळचं सर्व काही देऊन बसतात.त्यांची जीवनावर आणि विश्वंभर चैतन्यावर श्रद्धा असते.त्यांची तिजोरी कधीच रिती पडत नाही.कित्येकांना दान करण्यानं आनंद होतो.आनंदात त्यांचा परितोष असतो.
काहींना दान करताना दुःख होतं.त्या दुःखात नवजीवनाची दीक्षा असते.काहीजण असे असतात की देताना दुःख होत आहे याचीही त्यांना जाणीव नसते,की आनंद मिळवावा ही धडपड नसते.आपण पुण्यकृत्य करीत आहोत,याचीही त्यांना वार्ता नसते.
दूरच्या डोंगरदरीत मर्टल् ची शुभ्र फुलं अवकाशात आपला परिमळ विखुरतात,तशी ती माणसं असतात.त्यांच्या हातांमधून ईश्वराची वाणी ऐकू येते.त्यांच्या डोळ्यांतून तो या धरणीवर स्मित करीत वावरतो.
कुणी याचना केली असता दान द्यावं हे चांगलंच, पण अ-याचकालाही उमजून द्यावं हे अधिक चांगलं.मुक्तहस्तांनी खैरात करणाऱ्याला,दान न करताच आपल्याकडून कुणी काही घेतलं तर फार आनंद होतो..
तसं बघितलंत तर देण्याला हात आखडावा असं आपल्यापाशी काय असतं?
आपलं ज्याला म्हणतो ते सर्वच्या सर्व एके दिवशी विसर्जित होणार असतं.म्हणून म्हणतो की द्यायचं ते आताच द्या.तुमच्या वारसदारांना ती संधी
कशासाठी ?
तुमच्या नेहमी बोलण्यात येतं:दान देईन,पण केवळ पात्र असणाऱ्याला.तुमच्या फळबागेतली झाडं असं कधी म्हणतात काय? तुमच्या कुरणांवर चरणारे मेंढ्यांचे कळप असं कधी म्हणतात काय ?
सर्वस्व - दान हे त्यांचं जीवन असतं.दान आखडून धरावं यात मृत्यू असतो.
दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची विश्रांती ज्याला बहाल झाली आहे,तो कोणीही असो,तुमच्या दानाला पात्र समजा.
या जीवन-महासागराचे घोट घेण्यास जो पात्र आहे तो तुमच्या ओहोळातून प्याला भरून घेण्यास योग्य नसेल काय ?
ज्या धीरानं,विश्वासानं आणि उदारपणानं दान स्वीकारलं जातं,ते खरं तर मेजवानीनंतरच्या मुखशुद्धीहून फार थोर असतं काय ?
माणसांनी आपलं अंतःकरण उघडून ठेवावं, स्वाभिमान उचकटून दाखवावाअसे तुम्ही कोण आहात ?त्यांची योग्यता आणि त्यांची अस्मिता उघडीनागडी पाहावी अशी तुमची कोणती पात्रता?दान देण्यास किंवा दानाचा बटवडा करण्यास तरी आपण पात्र आहोत का,याची पारख करा.
खरं तर,चैतन्य ज्याच्या स्वाधीन होतं तेही चैतन्यच असतं.दान देतो म्हणवणारे तुम्ही,दानाचे फार तर साक्षी असता.
बंधुजनहो बंधु तुम्ही सर्वचजण दान ग्रहण करणारे आहात.घेतलेल्या दानाला उपकार समजून ओझं मानू नका.मानाल तर,स्वतःच्या आणि दानकर्त्याच्या जिवाला जोखडाखाली घालाल.
दानकर्त्यानं दिलेल्या दानावर तुम्ही दोघेही एकजुटीनं उभे व्हा... दोन्ही पंख उघडून आकाशगामी व्हा...
घेतलेलं दान कर्ज आहे असं सारखं समजत राहणं म्हणजे दात्याच्या औदार्याविषयी शंका घेणं होय.मुक्त हातांनी प्रदान करणारी धरणी त्याची आई आहे आणि ईश्वर त्याचा पिता आहे,हे विसरू नका.
खलील जिब्रान यांच्या 'द प्रॉफेट या पुस्तकातून..