पुढे जेव्हा रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली,तसा बिबळ्या सरपटत घाणेरी आणि इतर काटेरी झुडुपांच्या भरगच्च गचपणात शिरला होता.आम्ही रांगत किंवा सरपटत गेल्याशिवाय त्यात शिरणं अशक्य होतं. रानडुकरांच्या जा-ये करण्यानं तयार झालेली एक चिंचोळी वाट या गचपणातून जात होती. बिबळ्याही याच वाटेनं गेला होता,कारण या वाटेवर आम्हाला बरंच रक्त सांडलेलं आढळलं.
आम्ही वाकून त्याच वाटेनं जाऊ लागलो.माझी ४०५ विंचेस्टर रायफल कुठल्याही क्षणी गोळी झाडायला सज्ज होती व ती मी माझ्यापुढे धरून बिबळ्याच्या मागावर रांगत चाललो होतो.डाव्या उजव्या बाजूनं किंवा मागून हल्ला झाल्यास बचाव करायला आल्फी माझ्यामागून येत होता. असे आम्ही सत्तर-पंचाहत्तर यार्ड गेलो असू,पुढे वाटेला एक वळण होतं.
कुठलीही पूर्वसूचना नाही,आवाज नाही,धोक्याचा इशारा नाही,अचानक एका क्षणी त्या वळणावर दबा धरून बसलेला बिबळ्या माझ्यावर झडप घालायला झेपावत आला आणि तो जेव्हा आला,तेव्हा तो माझ्यापासून रायफलच्या नळीची जेवढी लांबी असते तेवढ्या अंतरावर होता.ती जागा एवढी चिंचोळी होती आणि अंतर एवढं कमी होतं, की नेम चुकणं केवळ अशक्य होतं.मी झाडलेली गोळी त्याच्या कवटी आणि मेंदूला भेदून आरपार गेली आणि तो माझ्या रायफलच्या नळीच्या पुढच्या टोकाशी मरून पडला.
आम्ही पुढचे दहा दिवस बिरूरला राहिलो. त्या दहा दिवसांत फक्त एक गाय मारली गेली,तीही सातव्या दिवशी दुपारी,येमेडोड्डीपासून सहा मैलांवर.ती बातमी आम्हाला कळून आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तिचा फडशा पाडला होता,कारण गाईला झाकून ठेवण्याची तसदी कोणीही घेतली नव्हती.ते उरले सुरले अवशेष जिथून दिसू शकतील,असं एक झाड सुमारे चाळीस यार्डावर होतं.
आल्फी त्या झाडाच्या दुबेळक्यात मध्यरात्र उलटून जाईपर्यंत बसला,पण वाघ काही आला नाही.त्यापुढे मात्र काहीच घडलं नाही.अकराव्या दिवशी सकाळी आम्ही बंगलोरला परत गेलो.
त्यानंतर काही दिवसांनी एका अंधाऱ्या रात्री लिंगडहल्ली - बिरूर रस्त्यावरून ज्यांना आम्ही 'कारशिकारी' म्हणतो,
अशी एक चौकडी निघाली.यांना कारशिकारी म्हणायचं कारण, यांना जंगलाचं सौंदर्य,सावजाचा माग काढण्यातला थरार,मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचं शास्त्र यात काडीमात्रही रस नसतो आणि त्याची पर्वाही नसते.हे रात्री कार काढून निघतात, यांच्याकडे स्पॉटलाईट असतात.ते या स्पॉटलाईटचे झोत टाकत जंगलरस्त्यानं फिरतात आणि या प्रकाशझोतात जो कोणी प्राणी दिसेल किंवा ज्या कोणाचे डोळे चमकलेले दिसतील, त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून मारायचं असा त्यांचा एकमेव छंद असतो.ते जनावर नर आहे का मादी,वयानं लहान आहे का मोठं,ते गोळी लागून जखमी झालंय का मेलंय - या कुठल्याही गोष्टीचा त्यांना विधिनिषेध नसतो आणि ते त्याची खात्री करायचीही तसदी घेत नाहीत.किंबहुना कारमधून फिरताना मध्ये कुठेही ते खाली उतरून जमिनीवर पायही ठेवत नाहीत.हे वर्तन सर्व नियमांच्या विरुद्ध आहे;परंतु अशा घटना घडतात,ही वस्तुस्थिती आहे.
तर झालं असं,की हे कारशिकारी रात्री निघाले. बिरूरपासून चारेकमैल अंतरावर स्पॉटलाईटच्या प्रकाशझोतात त्यांना रस्त्याच्या कडेच्या बांधावरून वर येणाऱ्या एका वाघाचे डोळे चमकलेले दिसले. दोन गोळ्या झाडल्याचा आवाज घुमला.तो वाघ उडी मारून नाहीसा झाला.त्याच्या जबड्याच्या खालच्या बाजूला गोळी लागली होती,
दुसरीचा मात्र नेम चुकला होता.ह्या कारशिकाऱ्यांनी थांबून,आपण झाडलेल्या गोळ्यांचं काय झालं,याचा काहीही तपास केला नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. जखमी वाघाचा माग काढावा,जमलं तर त्याला मारून वेदनामुक्त करावं,असा विचारही ह्या लोकांच्या मनात आला नाही.
त्या जखमी झालेल्या वाघानं दोन महिने तरी अत्यंत वेदना सोसल्या असाव्यात आणि जखम भरून येताना त्याचा जबडा वेडावाकडा जुळून आला असावा,ज्यामुळे तो त्याचं नैसर्गिक खाद्य मिळवू शकला नसावा आणि त्याची उपासमार झाली असावी.
त्यानंतर साधारण तीन महिन्यांनी जंगलात चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांच्या कळपाजवळ अतिशय सावधगिरी बाळगत दबक्या पावलांनी जाऊन एका वाघानं एका धष्टपुष्ट शेळीवर झडप घातली.वाघ जनावराला मारताना त्याची मान मोडतात,तसं न करता त्यानं त्या शेळीला पुढच्या पंजाचा एक जोरदार तडाखा दिला होता.नेमका गुराखी जवळच होता.त्यानं धाडसानं आपल्या हातातली काठी त्या वाघाला फेकून मारली.ती त्या वाघाला ओझरती लागली,त्यामुळे चिडून वाघ त्या गुराख्यावर धावून आला.त्याच्या पंज्याच्या एका फटक्यात त्या माणसाच्या डोक्यावरची त्वचा संपूर्ण फाटली.घाबरून व वेदनेनं त्यानं फोडलेली किंकाळी वाघाच्या पंज्याच्या दुसऱ्या तडाख्यानं बंदच झाली,कारण एखादं अंडं फुटावं तसा त्याच्या कवटीचा चेंदामेंदा झाला होता.
तो माणूस खाली कोसळला.आता वाघापुढे दोन बळी होते.एक ती शेळी व दुसरा माणूस त्या वाघाची व्दिधा मनःस्थिती झाली.त्यानं फुटलेल्या कवटीतून वाहणारं रक्त चाटून पाहिलं,जणू तो चवीचवीतला फरक तपासून पाहात होता.नंतर त्यानं त्या शेळीच्या मानेला धरून तिला उचललं व तो जंगलातल्या झुडुपांकडे जाऊ लागला.पण अचानक काय झालं कोण जाणे,आपल्या तोंडातली शेळी खाली टाकून तो वळला आणि त्या गुराख्याच्या खांद्याला तोंडात धरून तो जंगलात निघून गेला.
येमेडीच्या नरभक्षकाची भीतिदायक कारकीर्द सुरू झाली.त्यानंतर साधारण अडीचशे चौरस मैल परिसरात पडलेले बळी हे या वाघाच्या खात्यावर मांडले गेले.
बिरूर,लिंगडहळ्ळीहून उत्तरेकडे भागवतकट्टे,तिथून पश्चिमेला बाबा बुडान पर्वतरांगेतील सांतावेरी,तिथून खाली दक्षिणेस आयरन कोटे तलाव आणि बिरूर एवढी या भीतीग्रस्त परिसराची व्याप्ती होती.
एकापाठोपाठ एक सातत्यानं माणसं मारली जाऊ लागली.हे बळी पडण्यात एक सुसूत्रता होती,ती म्हणजे ते ठरावीक वाटांवर पडत होते व प्रत्येकजण जबड्यानं चावा घेतल्यानं न मरता पंज्याच्या जबरदस्त तडाख्यानं मारला गेला होता.तसेच मारले गेलेल्यांच्या प्रेताची तपासणी केल्यावर असं दिसलं,की सर्व प्रेतांवरचं मांस वाघानं आपल्या ताकदवान पंजांच्या नखांनी ओरबाडून काढून खाल्लं होतं.याचा निष्कर्ष असा निघत होता,की
वाघाच्या खालच्या जबड्याला दुखापत झाल्यानं त्याला त्याचा वापर करता येत नव्हता.
या नरभक्षकाचं आगमन झालं आणि पूर्वी,मी येमेडोड्डी व लिंगडहळ्ळीला गाईगुरं मारणाऱ्या एका जवान वाघाचा उल्लेख केला होता,त्या वाघाचा उपद्रव एकदमच थांबला.
हा तोच वाघ होता,जो नरभक्षक झाला होता,असं मानायला जागा होती.कारशिकाऱ्यांनी केलेला उपद् व्याप
बरेच दिवस कोणाला माहीत नव्हता;परंतु त्यातल्या एकानं आपण बिरूर लिंगडहळ्ळी रस्त्यावर एका - वाघावर गोळी झाडून त्याला जखमी केल्याची गोष्ट,मोठी फुशारकी मिरवत सांगितली आणि सर्व चित्र स्पष्ट झालं.
या वाघाचा संचार साचेबद्ध मार्गावरून होता.मी वर सांगितलेल्या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावातली आणि वस्त्यांवरची माणसं हा सातत्यानं मारायचा.वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचून,
माझ्याकडे असलेल्या या भागाच्या नकाशावर,वाघाच्या हालचाली कुठे व कशा होतायत ते,आणि त्यानं माणसं मारलेल्या ठिकाणांची नावं व तारखा यांची नोंद ठेवायला मी सुरुवात केली...
या सर्व परिसराच्या केंद्रस्थानी 'होगारखान' नावानं ओळखला जाणारा आणि साधारण ४५०० फूट उंच असलेला डोंगर होता.याच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या घनदाट जंगलानं भरलेल्या होत्या.इथे मनुष्यवस्ती जवळजवळ नव्हती.माझ्या अंदाजानं,याच भागात या वाघाचं वास्तव्य होतं आणि इथूनच तो मनुष्यवस्तीत येऊन सातत्यानं मनुष्यबळी घ्यायचा.माझ्या नकाशावरच्या नोंदींवरून असं दिसत होतं,की साधारण दर तीन महिन्यांनी,त्याची आधीच्या ठिकाणी परत फेरी व्हायची.या वाघानं घेतलेल्या बळींची संख्या आता सत्तावीसवर पोहोचली होती.
या वाघाला मारायला मी होगारेहळ्ळी नावाच्या खेड्यात मुक्काम करायचं ठरवलं.हे खेडं बिरूर आणि लिंगडहळ्ळीच्या मध्यावर होतं आणि होगारखान डोंगराच्या पायथापासून जेमतेम साडेतीन मैलांवर होतं.हा भाग खुरट्या झुडुपांनी व्यापलेला होता.मी हे ठिकाण निवडायची दोन कारणं होती.एक म्हणजे हा परिसर व इथलं जंगल माझ्या पूर्ण परिचयाचं होतं आणि इथले रहिवासीही माझ्या परिचयाचे असल्यानं त्यांच्याकडून मला बऱ्यापैकी सहकार्य मिळेल, अशी मला आशा होती,या वाघाचं वास्तव्य होगारखान डोंगराच्या पायथ्याला असावं,याची मला खात्री होती.आणि सर्वात महत्त्वाचं कारण हे,की वाघाची पुढची फेरी सुरू झाली,की इथे हमखास बळी घेतला जायचा.
या वाघाचा फेरा साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा या गावातून जाईल,अशा अंदाजानं,त्याच्या सहा आठवडे आधी,मी त्या गावात दाखल झालो.त्यामुळे मला लोकांशी संवाद साधायला मिळाला.एवढे बळी कुठे व कसे पडले,
याची माहिती तर मला मिळालीच;परंतु तो पुन्हा या भागात जेव्हा येईल,तेव्हा काय योजना करावी, हेही ठरवायला वेळ मिळाला.
होगारेहळ्ळी हे गाव जुनं होतं.इथे मजबूत बांधणीची दोन सुरेख पुरातन मंदिरं होती.गाव तसं मोठं होतं,परंतु लोकवस्ती मात्र फार नव्हती. इथली घरं इथेच मिळणाऱ्या,
लालसर रंगाच्या दगडात बांधलेली होती.याच्या दक्षिणेकडे विस्तीर्ण असा एक सुंदर तलाव होता.त्यात पाणपक्षी आणि बदकं मुबलक प्रमाणात होती. या गावाच्या आग्नेयेला नारळी आणि पोफळीच्या बागा होत्या.इथली जमीन जरा खोलगट होती आणि या बागांमुळे ती कायम ओलसर असायची.इथल्या पोफळींचे सरळसोट शेलाटे बुंधे त्यावर वाढलेल्या नागवेलींनी पूर्णपणे वेढून टाकले होते.संपूर्ण भारतात लोक जी पानं खातात,ती ह्या नागवेलीची पानं असतात,ह्या पानांना चुना लावून त्यात कात आणि सुपारी घालून ती खाल्ली जातात.
गावाच्या पूर्व व उत्तर दिशांना काही भाताची शेतं आणि कोरडवाहू जमिनी होत्या.पश्चिम आणि वायव्य दिशांना मात्र होगारखानच्या दिशेनं जाणारं खुरट्या झुडुपांचं दाट रान होतं.
तुम्हाला आता लक्षात आलं असेलच,की या खुरट्या झुडुपांच्या रानातच सर्वात जास्त बळी पडले होते.दोन बळी नारळी-पोफळीच्या बागांमध्ये पडले होते.बाकीचा सर्वसाधारण उजाड भाग मात्र हा वाघ कटाक्षानं टाळायचा. जेव्हापासून हे बळी पडू लागले,तेव्हापासून गावकरी अंधार पडायच्या आत घरात जाऊन दारं बंद करायची खबरदारी घेऊ लागल्यानं आता बळी दुपारी पडू लागले होते.गावाच्या वेशीच्या आसपास बरेचदा वाघाचे ठसे आढळले होते,पण पक्की बांधलेली घरं व मजबूत लाकडी दारांमुळे तो कुठल्याही घरात निदान आत्तापर्यंत तरी शिरू शकला नव्हता..
एकंदर परिस्थिती लक्षात घेता वाघाला मारण्यासाठी काही योजना बनवणं अवघड होतं आणि मला हे माहिती होतं,की वाघानं इथे एखादा माणूस मारला,की पुढचे तीनचार महिने तो होगारेहळ्ळीला परत येणार नव्हता आणि त्यानंतर,कुठेतरी अजून एखादा माणूस मारला जाईपर्यंत ह्या वाघाचा ठावठिकाणा समजणं केवळ अशक्य होतं.
आता मला एकच पर्याय सुचत होता, खरंच सांगतो,तो मला अजिबात रुचलेला नव्हता,तो पर्याय म्हणजे मीच आमिष म्हणून वाघाला आकर्षित - करायला बसायचं !
मला होगारेहळ्ळीला येऊन एक आठवडा होऊन गेला होता. मी वाघांबद्दल मिळेल तेवढी सर्व माहिती घेतली होती. जिथे जिथे बळी पडले,त्या सर्व जागी मी स्वतः जाऊन कशा पद्धतीनं आणि परिस्थितीत हे बळी पडले,हे जाणून घेतलं.आता तो नरभक्षक कधीही इथे येणं अपेक्षित होतं आणि ताबडतोब काहीतरी ठरवणं आवश्यक होतं.
खुरटी झुडुपं असलेल्या परिसरात सर्वात जास्त बळी जे पडले होते,ते एकतर लाकूडतोडे होते किंवा गुराखी होते.या परिसरात बिबळ्यानं एखाददुसरी गाय मारली होती,पण या वाघानं एकाही गुराला साधा ओरखडाही काढला नव्हता.तेव्हा मला जी कल्पना सुचली, ्ती एवढी कमाल होती,की मी स्वतःचीच पाठ थोपटली.मी त्या परिसराच्या अर्धा मैल आत एका झाडावर पंधराएक फूट उंचीवर,जिथे वाघाची उडी पोहोचणार नाही,अशा एका फांदीवर एक खुर्ची चढवून बसवली.त्यानंतर मी एक सहा फूट लांबीचा आणि तीन इंच व्यासाचा एक लाकडाचा ओंडका घेतला,त्याच्या एका टोकाला एक मजबूत दोर बांधून मी तो वरच्या एका फांदीला असा लटकावला,की त्याचं खालचं टोक हे माझ्या खालच्या एका फांदीपर्यंत येईल.नंतर मी त्या दोराच्या दुसऱ्या टोकाचा फास करून तो माझ्या बुटाच्या पुढच्या भागात अडकवला.आता मी खुर्चीत रायफल घेऊन आरामात बसून माझं पाऊल वरखाली केलं,की तो ओंडका वर उचलला जाऊन खालच्या फांदीवर आपटणार होता आणि रानात लाकडं तोडताना लाकूडतोड्यांचा जसा आवाज येतो, तसा आवाज होणार होता.ही दोरी मी थोडी लांबच ठेवली होती,याचं कारण,पाऊल दमलं, तर मी ती हातानं खालीवर ओढून आवाज करू शकलो असतो.दुसरं म्हणजे ती दोरी जरा जास्त वर ओढून खाली केली,तर तो ओंडका जोरानं फांदीवर आपटून मोठा आवाज आला असता. मला ऊन लागू नये,म्हणून माझ्या डोक्यावरच्या फांद्याच मी जरा डोक्यावर ओढून घेतल्या.
आता मला आखडून बसायची काहीच आवश्यकता नव्हती.मी आरामात बसून खाऊपिऊ शकणार होतो,धूम्रपान करू शकणार होतो आणि खोकलो तरी चालणार होतं,कारण मी आमिष म्हणूनच बसलो होतो. वाघ जवळपास आला,तर माझ्याकडून झालेल्या आवाजानं तो निश्चितच माझ्याकडे आकर्षित होऊन लपतछपत माझ्यावर हल्ला करणार होता आणि मलाही तेच हवं होतं..
होगारेहळ्ळीचा सरपंच मुदलागिरी गौडानं मला पूर्ण सहकार्य केलं.मी त्याला माझी योजना समजावून सांगितली आणि हेही बजावून सांगितलं,की ज्या दिवसापासून मी माझी योजना अमलात आणून झाडावरच्या खुर्चीत बसायला सुरुवात करीन,त्या दिवसापासून त्या नारळीपोफळीच्या बागांमध्ये किंवा खुरट्या झुडुपांच्या रानात कोणीही फिरकता कामा नये. त्यानंही मला भरवसा दिला,"ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे,आता ती अंमलात आणायचं काम माझं." वाघाला त्या परिसरात कोणी आढळलंच नसतं,तर तो माझ्याकडे आकृष्ट होण्याची शक्यता वाढली असती.त्या सरपंचानं दवंडी पिटून सर्व गावकऱ्यांना ही गोष्ट कळवली आणि वेळप्रसंगी दमदाटी करूनही, दुपारनंतर त्या खुरट्या झुडुपांच्या रानात,दोन तीन आठवडे फिरकायचं नाही,अशी सक्त ताकीद त्यानं गावकऱ्यांना आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनाही दिली.
तिथल्या गुरांना तीन आठवडे चरता येईल एवढं गवत गावाच्या जवळपास होतं,एवढ्या काळात वाघ येईल अशी मला आशा होती,वाघाचा फेरा इथे येण्याची शक्यता असल्याचा आगाऊ इशारा गावकऱ्यांनाही मिळाला होता.आता हे दोन-तीन आठवडे कुठेही बाहेर न जाता आळसात घालवायचे,म्हणून गावकरीही मनातून खूश झाले.मी होगारेहळ्ळीला आल्यापासून बरोबर दहाव्या दिवशी दुपारी बाराच्या आत पाण्याची बाटली,थोडे सँडविच,माझा ओढायचा पाईप आणि अर्थातच माझी ४०५ विंचेस्टर रायफल घेऊन मी झाडावर बैठक मारली.तो माझा पहिला दिवस.थोड्याच वेळात पाऊल वरखाली करून तो ओंडका आपटत राहणं नुसतंच कंटाळवाणंच नाही,तर थकवणारंही होतं,हे मला चांगलंच कळलं.त्यात भरीस भर म्हणून दुपारच्या कडक उन्हात चहूबाजूला त्या झुडपांच्या दाट जंगलाकडे बघताना माझे डोळेही शिणले.
उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण )
नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन
अनुवाद - संजय बापट