२४ मे पोलंड मधील टोरून येथे जन्मलेल्या या प्रतिभावंताने लॅटीन आणि ग्रीक भाषेत आपले शिक्षण पूर्ण केले. इटलीतील बोलोन्या विद्यापीठात त्यांनी गणित,पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केला.कोपर्निकसचे इटलीतील प्रमुख विद्यापीठांशी,चर्च तसेच चर्चचे प्रमुख पोप यांच्याशी सौहार्दाचे संबंध होते. या संबंधाचा त्याला जसा फायदा झाला तसाच तोटाही सहन करावा लागला. 'सर्व विश्वाचा मध्यबिंदू पृथ्वी की सूर्य ?' हा एक वादाचा मुद्दा कोपर्निकसने चर्चेत आणला होता. सॅमोस येथील अरिस्टार्कस याने मांडलेला 'सूर्यकेंद्रित' म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत मागे पडलेला होता.सन १५०० सालापर्यंत 'पृथ्वीकेंद्रित' टॉलेमी-ॲरिस्टॉटलचा सिद्धांत धर्माच्या छायेखाली टिकून होता.
टॉलेमीपासून चालत आलेली पृथ्वीकेंद्रित सिद्धांताची कल्पना कोपर्निकसला अपुरी वाटत होती. त्याच्या विचारांची दिशा प्रथमपासूनच प्रचलित
मतांविरुद्ध,पृथ्वीकेंद्रित सिद्धांताविरुद्ध होती.अनेक वर्षे त्याने आपल्या मतप्रणालीवर निरीक्षणपूर्वक चिंतन केले. सूर्य स्थिर असून पृथ्वीसह इतर सर्व ग्रह त्याभोवती फिरतात हे त्याने १५१० साली एका लेखाद्वारे मांडले. सदर लेख 'कॉमेंटरी ऑलस' या लहान टीकात्मक पुस्तकातून पुढे आला. हे पुस्तक १५१४ च्या आसपास प्रसिद्ध झाले. सदर पुस्तक पोप क्लीमेंटच्या निदर्शनास आल्यावर हा संपूर्ण सिद्धांत प्रसिद्ध करावा म्हणून त्याने सूचना केली. त्याचप्रमाणे प्रोटेस्टंट पंथातल्या फॉन लॉखन अर्थात ऱ्हेटिकस यानेही कोपर्निकसला संपूर्ण पुस्तक लिहिण्यास गळ घातली. पण आपले मत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासंदर्भात कोपर्निकसला उत्साह वाटत नव्हता. राजसत्ता, धर्मसत्ता आणि पोप यांची भीती त्याला सतावत होती.
कोपर्निकस हा धर्मनिष्ठ होता. प्रस्थापित मतांना एकदम धक्का द्यावा असे त्याला वाटत नव्हते. पण सत्य लपवून ठेवावे हेही त्याच्या मनात येईना. शेवटी हेटिकसने पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम हौसेने अंगावर घेऊन छपाईचे कामही चालू केले. दरम्यान जुलै १५४० मध्ये ॲड्रियस ओसियांडर या आपल्या मित्राला पत्र लिहून कोपर्निकसने पुस्तक प्रसिद्ध करण्यासंदर्भात सल्ला विचारला. सिद्धांत सत्य असल्याचा दावा न करता गृहितक मानले तर टीकेला तोंड देता येईल असे ओसियांडरचे मत होते. पण कोपर्निकसला आपला सिद्धांत सत्य असल्याची खात्री असल्यामुळे अशा तऱ्हेची तडजोड त्याला मान्य होण्यासारखी नव्हती. पुस्तकाची छपाई सुरु असताना कोपर्निकस मात्र अंथरूणावर खिळून होता.
इ. स. १५४३ मध्ये 'ऑन द रिव्होल्यूशन्स ऑफ द सेलेस्टीअल ऑब्जेक्टस' (On the Revolutions of the Celestial Objects) ही स्वतःच्या पुस्तकाची प्रत हातात आली तेव्हा कोपर्निकसला धक्काच बसला. असे म्हणतात की, आपल्या सिद्धांताला विरोधी प्रस्तावना पाहून १५४३ मध्ये काही तासातच कोपर्निकसचा मृत्यू झाला. हे खळबळजनक पुस्तक पोपला समर्पित केलेले होते.कोपर्निकसच्या मृत्यूनंतर या पुस्तकाची प्रस्तावना एक चर्चेचा विषय ठरली. कारण प्रस्तावनेत सूर्यकेंद्रित सिद्धांत ठामपणे मांडलेला नव्हता तर एक गृहितक म्हणून वापरावा,ज्यायोगे गणितातील निष्कर्ष काढणे सोपे होईल एवढेच त्यात म्हटलेले होते.
गेल्या शतकाच्या शेवटी प्रागमध्ये कोपर्निकसचे स्वतःचे हस्तलिखित सापडले. त्याला शीर्षक नाही, प्रस्तावना नाही. किंबहुना हस्तलिखित आणि प्रकाशित आवृत्तीमध्ये अनेक बदल झालेले होते. हे बदल करण्यामध्ये हेटिकस अथवा ओसियांडरचा हात होता हे निश्चितच. प्रस्तावना बदलली म्हणून एखाद्याचे विचार मात्र कोणीही बदलू शकत नाही. कोपर्निकसच्या या क्रांतिकारी सिद्धांताने त्याच्या मृत्यूनंतर सोळाव्या आणि सतराव्या शतकात धर्मामध्ये खळबळ उडवून दिली. त्याच्या सिद्धांताला धर्ममार्तंडांनी विरोध तर केलाच पण काही खगोल वैज्ञानिकांनीही विरोध केला.अर्थात दोहोंच्या विरोधामध्ये गुणात्मक फरक होता. खगोलवैज्ञानिकांचा विरोध हा निरीक्षण आणि पुराव्याशी निगडीत होता.
सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे
नागनालंदा प्रकाशन इस्लामपूर