" ऐक बेटा! मला तुला काही सांगायचंय.तू गाढ झोपेत आहेस.तुझा इवलासा हात तुझ्या सुकुमार गालाखाली दबलाय आणि तुझ्या घामाने भरलेल्या कपाळावर कुरळे केस विखुरले आहेत.मी तुझ्या खोलीत गुपचुप शिरलो आहे एकटाच,नुकताच मी जेव्हा लायब्ररीत वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप झाला.म्हणूनच मी अर्ध्या रात्री तुझ्याजवळ उभा आहे,एखाद्या अपराध्यासारखा!
ज्या गोष्टींबद्दल मी विचार करीत होतो त्या अशा आहेत बेटा.मी आज तुझ्यावर खूप रागावलो. जेव्हा तू शाळेत जायला तयार होत होतास तेव्हा मी तुझ्यावर खूप चिडलो.तू टॉवेलऐवजी पडद्याला हात पुसले होतेस.तुझे जोडे घाणेरडे होते,यावरूनसुध्दा मी तुला रागावलो.तू जमिनीवर इकडे तिकडे पसारा करून ठेवला होतास,त्यावरूनसुध्दा मी तुला खूप वेडंवाकडं बोललो.
नाश्ता करताना मी तुझ्या एका मागोमाग एक चुका दाखवत गेलो.तू टेबलावर खाणं सोडून दिले होतेस.खाताना तू मचमच आवाज करीत होतास.टेबलावर तू हाताची कोपरं टेकवली होतीस.तू ब्रेडवर खूप सारे लोणी चोपडले होतेस.एवढेच नव्हे,तर मी ऑफिसमध्ये जात होतो आणि तू खेळायला जात होतास तेव्हा तू वळून हात हलवून "बाय बाय,डॅडी "
म्हणाला होतास अन् मी भुवया उडवून तुला टोकले होते,'तुझी कॉलर नीट कर.
संध्याकाळीदेखील मी हेच सगळे केले. ऑफिसातून परतल्यावर तू मातीत मित्रांबरोबर खेळत होतास हे मी पाहिले.तुझे कपडे मळलेले होते,तुझ्या मोज्यांना भोके पडली होती.मी तुला पकडून घेऊन गेलो आणि तुझ्या मित्रांसमोर 'मोजे महाग आहेत.जेव्हा तुला विकत घ्यावे लागतील तेव्हा तुला त्याची किंमत कळेल'असं म्हणून तुला अपमानित केले.जरा विचार करा, एक बाप आपल्या मुलाचे मन यापेक्षा अधिक कसे दुखावू शकेल ?
तुला आठवतेय का,जेव्हा मी लायब्ररीत वाचन करत होतो तेव्हा तू माझ्या खोलीत रात्री आला होतास,एखाद्या घाबरलेल्या हरणाच्या पाडसासारखा,तुला किती दुःख झाले आहे हे तुझ्या डोळ्यांवरून कळून येते होते आणि मी वर्तमानपत्रावरून तुझ्याकडे बघत माझ्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल आता काय हवंय,कधी तरी आरामात बसू दे मला!' असं म्हणत तुला झिडकारुन टाकले होते.त्या वेळी तू दारातच थबकला होतास.
तू काहीही न बोलता,फक्त लाडात येऊन माझ्या गळ्यात हात घालून माझे चुंबन घेऊन "गुड नाइट" म्हणून निघून गेला होतास.
तुझ्या छोट्या छोट्या हातांच्या मिठीवरून असे कळून येत होते की तुझ्या अंत:करणात ईश्वराने प्रेमाचे असे फूल लावले आहे जे इतक्या उपेक्षेनंतरही मरगळले नाही... मग तू जिन्यावर खट-खट आवाज करीत निघून गेलास.
तर बेटा,या घटनेनंतर थोड्याच वेळाने माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडले आणि मला खूपच हताश वाटू लागले.हे मला काय होत आहे? दोष काढण्याची,धाकदपटशा दाखवण्याची सवय होत चालली होती मला,आपल्या मुलाच्या बालिश चुकांचे हे बक्षीस मी त्याला देत होतो.असं नाही
बेटा,की मी तुझ्यावर प्रेम करीत नाही,पण मी एका लहान मुलाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करत होतो.मी तुझं वागणं आपल्या वयाच्या तराजूनं तोलून बघत होतो.
तू इतका लोभस आहेस,इतका चांगला आणि
खरंच,तुझे छोटेसे हृदय इतके विशाल आहे जशी की पर्वतांच्या मागून उगवणारी पहाटच!
तुझी महानता यावरूनच दिसून येते की दिवसभर वडिलांकडून बोलणी खाऊनही त्यांना रात्री गुड नाइट किस द्यायला तू आलास. आजच्या रात्री इतर काहीच महत्त्वाचे नाही बेटा. मी या अंधारात तुझ्या उशाशी आलोय आणि इथे गुडघे टेकून शरमिंदा होऊन बसलोय.
हा एक कमकुवत पश्चात्ताप आहे.मला माहीत आहे की जर मी तुला जागं करून हे सगळं सांगितलं तर कदाचित तुला हे काहीच समजणार नाही.पण उद्यापासून मी नक्कीच तुझा लाडका बाबा बनून दाखवेन.मी तुझ्याबरोबर खेळेन,तुझ्या मजेदार गोष्टी मन लावून ऐकेन,तुझ्यासह खळखळून हसेन आणि तुझ्या दुःखात सहभागी होईन.यापुढे जेव्हा कधी मी तुला रागवायला तोंड उघडेन,त्याआधीच मी माझी जीभ दातांखाली दाबून धरेन.मी एखाद्या मंत्रासारखं असं वारंवार म्हणेन, "तो तर अगदी छोटासा आहे... छोटासा मुलगा !"
मला याचे दुःख होते की मी तुला मुलगा नव्हे तर मोठा माणूस समजलो होतो.पण आज जेव्हा मी तुला पाय पोटाशी घेऊन झोपलेला,थकलेला पाहतोय तेव्हा बेटा,मला असं वाटत आहे की तू अजून छोटाच तर आहेस! कालपर्यंत तू आपल्या आईच्या कुशीत होतास,तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होतास.मी तुझ्याकडून किती अवास्तव अपेक्षा केली होती,किती तरी जास्त !
लोकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.आम्ही हे शोधून काढायला हवे की ते जे काही करतात ते का बरे करतात.हे टीका करण्यापेक्षा अधिक रोचक आणि लाभदायक होईल.एवढेच नव्हे,तर त्यामुळे सहानुभूती,सहनशक्ती आणि दयाळूपणाचे वातावरण निर्माण होईल.सर्वांना
समजून घेण्याचा अर्थ आहे सर्वांना क्षमा करणे.'
डॉ.जॉन्सननी म्हटलंय,
"ईश्वर स्वतःमानवाच्या मृत्यूआधी त्याचा निर्णय घेत नाही."
तर मग तुम्ही आणि मी असे करणारे कोण ?"
फादर फरगेट्स
(प्रत्येक पित्याने हे लक्षात ठेवावे) -
डब्लू.लिव्हिंगस्टोन लार्नेड
मंजुल पब्लिशिंग हाऊस
मित्र जोडा-डेल कार्नेगी मधून..