* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अमेरिका न शोधणारा कोलंबस…!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

अमेरिका न शोधणारा कोलंबस…! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अमेरिका न शोधणारा कोलंबस…! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९/२/२३

अमेरिका न शोधणारा कोलंबस…!

१४४२ च्या जुलै महिन्यात ज्यू स्पेनमधून हाकलले गेले.त्याच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यात कोलंबसने अमेरिका शोधून काढली;पण शोधून काढली असे म्हणण्याऐवजी त्याने पुन्हा शोधून काढली असे म्हणणे अधिक सोयीचे होईल. 


कारण पाचशे वर्षांपूर्वीच अमेरिका लीफ एरिक्सन याने शोधून काढली होती.तो मोठा धाडसी दर्यावर्दी होता. (Viking Captain होता.) ज्याला आज आपण 'नोव्हास्कोशिया' म्हणतो,त्याच्या किनाऱ्यावर त्याचे गलबत वादळाने जाऊन लागले होते.त्या देशात खूप द्राक्षे आढळल्यामुळे त्याने त्याला 'व्हाईनलँड' असे नाव दिले.


तो तिथे सर्व हिवाळाभर राहिला.परत घरी आल्यावर त्याने आईसलँडमधील काही पिल्प्रिम फादरांना अमेरिकेत जाण्यास आग्रहाने सांगितले. इ.स. १००३ मधील ही गोष्ट.ही वसाहत वसविली गेली;पण तेथील इंडियन लोकांच्या वैरभावामुळे ती मोडली.आणि हे भटके यात्रेकरू पुन्हा स्वदेशी परत आले.


 नॉर्समन लोकांच्या प्राचीन बखरीतून लीफ एरिक्सन व हे दर्यावर्दी लोक यांचे हे पराक्रम वर्णिले आहेत...


तरुणपणी कोलंबस आइसलंडमध्ये गेला होता.पेरू देशाचे प्रोफेसर लुई उल्लेआ म्हणतात की, "कोलंबस त्या वेळी ग्रीनलँडपर्यंत गेला होता.अमेरिकेच्या जमिनीवरही त्याने त्यावेळी पाय ठेवले असावेत.या त्याच्या जलपर्यटनाचा उद्देशच केवळ चाचेगिरी हा होता.प्रोफ़ेसरसाहेबांचा हा अंदाज बरोबर असेल तर कोलंबसाची १४९२ मधील ती सुप्रसिद्ध अमेरिकन सफर पहिली नसून दुसरी असली पाहिजे."


पण हा सारा तर्क आहे.कारण का कोणास माहीत,पण कोलंबस स्वत:च्या पूर्वचरित्राविषयी फारसे कधी सांगत नसे.म्हणून त्याच्या पूर्वचरित्रातील रिकामे भाग भरून काढण्यासाठी अनेक दंतकथा निर्मिल्या गेल्या.

इतिहासकारांनी कोलंबसविषयी लिहिलेले सर्व जर आपण खरे मानू लागलो,तर निरनिराळ्या प्रकारचे शंभर तरी परस्परविरोधी कोलंबस आपणास पाहावे लागतील! त्याचा जन्म अनेक शहरी करावा लागेल,त्याला ज्यू,स्पॅनियर्ड,इटालियन म्हणावे लागेल;कधी त्याला विद्वान म्हणावे लागेल,तर काहीच्या मतानुसार त्याला अगदी 'ढ' म्हणावे लागेल;कोणी म्हणतात की,तो 'सरदारपुत्र होता, तर कोणी म्हणतात,तो एका खानावळवाल्याचा मुलगा होता.कोणी त्याला 'ध्येयवादी' मानतात, तर कोणी त्याला दांभिक ' म्हणतात.कोणी त्याला कविहृदयाचा 'गूढवादी' म्हणतात,तर कोणी त्याला भावनाशून्य धंदेवाला समजतात. कोणी त्याला 'देशभक्त' म्हणतात,तर कोणी त्याला 'देशद्रोही' म्हणतात;कोणी तो अत्यंत दारिद्रयात मेला असे म्हणतात,तर कोणी म्हणतात की,मरणकाली तो संपत्तीत लोळत होता ! कोणी त्याला उत्कृष्ट व कुशल नावाडी म्हणतात,तर कोणी म्हणतात की,त्याला नौकानयनविद्येचा गंधही नव्हता !.


स्वतःच्या आयुष्याच्या ज्या भागाविषयी कोलंबस मौन पाळतो,तो भाग आपणही सोडून देऊ या. अज्ञात भूतकालाच्या धुक्यातून पुढे आलेला असा तो आपणास कुठे बरे दिसतो ? पोर्तुगाल देशाचा राजा दुसरा जॉन याच्याकडे तो गेला असता अटलांटिक महासागरामधून एक मोठी सफर योजावी व तिचा प्रमुख म्हणून आपणास नेमावे,असे तो राजास सांगत होता.राजाचे मन तो असा सफरीसाठी वळवीत होता.


त्या काळात पोर्तुगीज लोक दर्यावर्दी म्हणून जगप्रसिद्ध होते.व्हेनिसचे तसेच जिनोआचे व्यापारी जवळच्या भूमध्यसमुद्रात व्यापार करीत असता पोर्तुगीज लोक अज्ञात व अगाध अशा अटलांटिक महासागरात धाडसाने शिरत होते! आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने तसेच दूर मदिरा व कॅनरी बेटांपर्यंत ते जात.


काही धाडसी पोर्तुगीज दक्षिण आफ्रिकेस वळसा घालून हिंदुस्थानला पोहोचू पाहत होते. १४९३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टॅटिनोपल घेऊन युरोपचा आशियातील अतिपूर्वेकडील देशांजवळचा खुष्कीचा मार्ग तोडून टाकल्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना जलमार्ग शोधून काढणे भाग झाले.


आणि या सुमारास तो अज्ञात साहसी ख्रिस्तोफर कोलंबस पुढे आला व म्हणाला,"नीट पश्चिमेकडे जाऊन मी पूर्वकडचा रस्ता शोधून काढतो.पृथ्वी वाटोळी आहे आणि ज्यांच्याविषयी आपण इतके ऐकतो ते पूर्वेकडचे राजे आपल्या पायाखाली पाताळात आहेत.मला जर माणसे व गलबते मिळतील,तर मार्को पोलोने स्वप्नातसुद्धा कधी पाहिली नसेल इतकी संपत्ती मी पोर्तुगालमध्ये आणीन आणि पैशाहूनही अधिक महत्त्वाची किंवा निदान तितक्याच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मी साऱ्या हिंदूंना पोर्तुगीज राजाच्या नावाने ख्रिश्चन करीन."


हे ऐकून जॉन राजाच्या तोंडाला पाणी सुटले. कारण स्वार्थ व धर्मप्रसार या दोन्ही गोष्टी साधणार होत्या.पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट काही कोलंबसानेच प्रथम नाही सांगितली.

ख्रिस्त पूर्व.चौथ्या शतकातला ॲरिस्टॉटल म्हणतो, 


"पृथ्वी वाटोळी आहे असे पूर्वीपासून बरेचजण म्हणत आले आहेत."

ॲरिस्टॉटलच्याही काळी ही गोष्ट - हा शोध - जुनाच होता. 


मध्ययुगात या बाबतीत मोठमोठे पंडित वाद करीत असत.जॉन राजाच्या दरबारात येण्यापूर्वी कोलंबसानेही ही गोष्ट पुष्कळदा चर्चेत ऐकली असेल.जॉन राजाने इटलीतील प्रसिद्ध ज्योतिर्विद टॉस्क्नेली याला पत्र लिहून 'युरोप व हिंदुस्थान यांच्यातला सर्वांत जवळचा रस्ता कोणता?'असे विचारले होते,ही गोष्ट तर प्रसिद्धच आहे.टॉस्क्लेलीने उत्तर दिले,"पृथ्वी नि:संशय वाटोळी आहे.अर्थातच अटलांटिक ओलांडून पश्चिमेकडे जाता जाताच हिंदुस्थानचा रस्ता सापडेल." तो पुढे म्हणतो; "पण या देशांना मी पश्चिमेकडे म्हणतो,याचे आश्चर्य वाटू देऊ नये. कारण,जे समुद्रमार्गाने सारखे पश्चिमेकडे जात राहतील,त्यांना हे प्रदेश साहजिकच पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आढळतील."


टॉस्क्नेलीचे हे निश्चित मत कळल्यावर जॉनने कोलंबसास न समजू देता आधीच एक तुकडी पाठवून देण्याचा प्रयत्न केला.कारण,कोलंबस पोर्तुगीज नव्हता व एका विदेशी माणसाकडे या टोळीचे प्रमुखत्व जावे ही गोष्ट जॉन राजास नको होती.पण जॉन राजाने पाठविलेल्या तुकडीतील खलाशांनी बंड केले,त्यामुळे त्या तुकडीच्या कप्तानाला परत यावे लागले.


जॉन राजाचा हा लपंडाव पाहून कोलंबस चिडला,विटला व स्पेनच्या राजाकडे गेला.या वेळेस स्पेनच्या गादीवर फर्डिनंडइझँबेला ही होती.ती कोलंबसाच्या म्हणण्याकडे लक्ष देईनात.त्यांचे लक्ष मुसलमानांबरोबरच्या लढायांत होते.ज्यूविरुद्ध चाललेल्या दुष्ट कारवायांत ती मग्न होती.त्यामुळे कोलंबसच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यास त्यांचे मन तयार नव्हते.

कोलंबसाने निराश होऊन आपला भाऊ बार्थो लोमो यास इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याच्याकडे पाठविले.तो स्वत: ही फ्रान्सच्या राजाकडे जाणार होता;पण इतक्यात अकस्मात १४९२च्या वसंत ऋतूत स्पेनच्या दरबारातून त्याला मदत मिळाली.पश्चिम युरोपातील मुसलमानांच्या हातचे शेवटचे मजबूत ठाणे ग्रॅनाडा हे स्पॅनिशांच्या हाती पडले.ज्यू लोक देशातून हाकलले गेले होते व जग आता ख्रिश्चन धर्मीयांसाठी सुरक्षित झाले होते.अर्थातच, कोलंबसाच्या योजना ऐकायला फर्डिनंड व इझँबेला यांना आता फुरसत होती.हिंदूंना फसवून ख्रिश्चन करण्याची,तशीच त्यांना लुटण्याची कोलंबसाची योजनाही त्या स्वार्थी व रानटी राजाराणींना पसंत पडली.

राजाराणीचे उत्तेजन मिळाले.पॅलास शहरातल्या काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी मदत केली आणि तीन लहान गलबते घेऊन कोलंबस आपल्या ऐतिहासिक सफरीवर निघाला. 


त्या दिवशी शुक्रवार होता,ऑगस्टची तिसरी तारीख होती.त्याच्याबरोबर अठ्याऐंशी खलाशी होते.ते बहुतेक कैदी व कायदेबाह्य असे लोक होते.कोणीही प्रतिष्ठित नावाडी कोलंबसाच्या साहसात सामील व्हायला तयार नव्हते.कारण,आपण असेच पुढे गेल्यास पृथ्वीवरून खाली एकदम खोल खड्ड्यात पडू असे त्यांना वाटे.


पर्यटन सुरू झाले;प्रवासात रोमांचकारी प्रसंग फारसे नव्हते;हवा चांगली होती;खलाशांनीही बंड वगैरे काही केले नाही.ते समाधानात होते. महासागराच्या पलीकडे अपरंपार संपत्ती मिळेल या आशेने ते उत्साही होते.काही रसवेल्हाळ इतिहासकारांनी खलाशांनी कोलंबसाविरुद्ध बंड केले वगैरे कल्पित कथा दिल्या आहेत.पण तसे काही एक झाले नाही.ऑक्टोबरची नववी तारीख उजाडली.त्या दिवशी मंगळवार होता.त्या दिवशी रात्रभर डोक्यावरून पक्षी जाताना त्यांना दिसले व दुसरे दिवशी पाण्यावर तरंगत येणारी एक झाडाची फांदी दिसली. ऑक्टोबरच्या अकराव्या तारखेला उजाडता-उजाडता ते एका बेटावर उतरले.हे बेट जपानच्या बाह्य सीमेवर असावे असा कोलंबसाचा तर्क होता.पण फ्लॉरिडाच्या दक्षिणेस असणाऱ्या वेस्ट इंडिज बेटांपैकी ते एक होते.पृथ्वी वाटोळी आहे हा त्याचा तर्क खरा ठरला.पण पृथ्वीचा आकार त्याने फारच लहान कल्पिला होता.जिथे अमेरिका आहे तिथे हिंदुस्थान,जपान वगैरे पूर्वकडचे देश असतील असे त्याला वाटले.


मरेपर्यंत कोलंबसाची अशीच समजूत होती की आपण एखादे नवीन खंड शोधलेले नसून आशियालाच जाऊन पोहोचलो.


कोलंबस अज्ञात प्रदेशाच्या शोधास का प्रवृत्त झाला? त्याची महत्वा द्विविध होती;धनार्जनाची व विधर्मीयांस स्वधर्मात आणण्याची वेस्ट इंडिज बेट उतरल्यावर आपल्या दोन्ही महत्त्वाकांक्षा आता सफळ होणार असे त्याला वाटले.ऑक्टोबरच्या बाराव्या तारखेस तो आपल्या रोजनिशीत लिहितो,"हे इंडियन चांगले ख्रिश्चन होतील,चांगले गुलाम होतील." या लोकांना सहज फसविता येते हे पाहून तो आनंदला. शतो लिहितो,"या लोकांना ख्रिश्चनधर्मी करून त्यांचा उद्धार करावा अशी इच्छा मला होती;पण त्यांना बळजबरीने ख्रिश्चन धर्म देण्यापेक्षा प्रेमाने ख्रिश्चन करून घ्यावे असे मला वाटते.त्यांचा सद्भाव, विश्वास लाभावा म्हणून मी त्यांना लाल टोप्या दिल्या,काचेचे मणी दिले.फुटलेल्या आरशांचे तुकडे व फुटलेल्या चिनी मातीच्या भांड्याचे तुकडे घेऊन ते सोने देत.एका टाकाऊ पट्ट्याबद्दल एका खलाशास अडीच कॅस्टेलान्स वजनाचे सोने मिळाले तेव्हा ही फसवणूक असावी असे कोलंबसाला प्रथम वाटले व हा असमान व्यापार,ही विषम देवघेद बंद करण्याचे त्याने ठरविले.पण असे वाटण्याच्या मुळाशी न्यायबुद्धी नव्हती,तर इंडियनांचा विश्वास संपादून व त्यांची सदिच्छा मिळवून मग त्यांना गोडीगुलाबीन ख्रिश्चन करता यावे;व नीट लुटता यावे,असा त्याचा डाव होता.त्याने राजाला लिहिले,"एकदा यांचा विश्वास मला संपादन करू द्या,की मग यांना सहज ख्रिश्चनधर्मी करता येईल व जिंकता येईल.'


इंडियनांना ख्रिश्चन करणे व नंतर धनकनकसंपन्न होणे या दोन इच्छा त्याच्या मनात होत्या.या दोन गोष्टी त्याच्या रोजनिशीतील उताऱ्यांत निरनिराळ्या वेळी पुन्हा दिसतात.इंडियनांमुळे स्वर्गाला आध्यात्मिक फायदा मिळेल व आपणाला ऐहिक वैभव मिळेल,या दोन गोष्टी पुन्हा पुन्हा त्या रोजनिशीत लिहिलेल्या आहेत. तो नि:संकोचपणे राजाला लिहितो,"ही बेटे चीन व हिंदुस्थान यांच्या उंबरठ्यात आहेत.या दोन्ही देशांत अगणित संपत्ती आहे.हिरे-माणिके,मोती व सोने यांना तर अंतच नाही! तुम्हाला हवे असेल तितके सोने मी आणून देईन.तुम्हाला हवे असतील तितके गुलाम गलबतांत भरून पाठवीन." तो पुढे लिहितो,"या गोष्टीचा साऱ्या ख्रिश्चनधर्मी राष्ट्रांस आनंद वाटला पाहिजे.त्यांनी महोत्सव करावेत,प्रभूचे आभार मानावेत.लाखो लोकांना आपणास आपल्या धर्मात घेता येईल. केवढी उदात्त गोष्टी ! ही जी कृतकृत्यता,तीबद्दल प्रभूचे आभार..


अशा रीतीने कोलंबस पौर्वात्यांना सक्तीने व प्रेमाने ख्रिश्चन धर्मी व गुलाम करण्यासाठी निघाला होता पण ती गोष्ट दूरच राहून 'अमेरिकेचा संशोधक' ही पदवी त्याला आकस्मित मिळून गेली.


कोलंबस काही बाबतींत मोठा मनुष्य होता यात शंकाच नाही.विज्ञानाच्या बाबतीत तो आपल्या काळाच्या फार पुढे होता.त्याचे धैर्य व त्याची चिकाटी ही अतुलनीय होती.तो स्वप्नसृष्टीत वावरणारा एक अज्ञात मनुष्य होता.पण आपले स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत आणले जावे म्हणून त्याने राजाचे मन वळविले.अज्ञात महासागराच्या पृष्ठावर साहसाचे नवीन महाकाव्य लिहिणारा तो महाकवी होता.तो धर्मांध,संकुचित,डामडौली, स्वार्थी व अहंकारी होता.दैवाचे वैभव व सुवर्णाचा लखलखाट या दोन गोष्टींसाठी त्याने आपले सारे जीवन वाहिले होते;पण त्याचीच कसोटी लावून पाहिले तर त्याचे जीवन विफल झाले,असेच म्हणावे लागेल.त्याला परधर्मीयांस ख्रिश्चन धर्म देता आला नाही की स्पेनमध्ये सोनेही आणता आले नाही..स्पॅनिश लोकांनी इंडियनांस वाईट रीतीने वागविले.इंडियनांनीही त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले.त्यांनी जशास तसे केले.एका हातात क्रॉस व एका हातत चाबूक घेऊन येणाऱ्या या पाहुण्यांविषयी इंडियनांना विश्वास वाटेना.स्पेनमध्ये थोडे दिवस राहून कोलंबस वेस्ट इंडिज बेटांत परत आला,तेव्हा मागे ठेवलेल्या शिबंदीतील एकही मनुष्य जिवंत नाही,असे त्याला आढळून आले!


अमेरिकेत तो एकंदर चारदा आला.तो पुन्हापुन्हा सोने व हिरेमाणके शोधीत होता.पण त्याचा सारा शोध फुकट गेला.राजा फर्डिनंड अधीर झाला. कोलंबस खूप सोने आणून देईल अशी राजाची अपेक्षा होती.पण प्रत्यक्ष सोने मिळण्याऐवजी सोन्याची फक्त अभिवचनेच मिळत.

वस्तुस्थिती काय आहे,सोन्याच्या मार्गात कोणते विघ्न आहे हे पाहण्यासाठी राजाने बोबॅडिला नावाचा एक दरबारी सरदार पाठवला.बोबॅडिला आला व बेटांचे संशोधन केल्यावर त्याला असे आढळून आले,की जो प्रदेश कोलंबसाने शोधला होता, तो भिकार होता.

कोलंबसाने अपराध केला होता.त्याने राजाला फसविले होते.म्हणून त्या सरदाराने कोलंबसाला कैद करून फर्डिनंड राजासमोर कैदी म्हणून उभे केले.त्याचे हे करणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पॅनिश न्यायनीतीचा जो प्रकार होता,त्याला अनुरूपच होते.


कोलंबस अज्ञात जन्मला व अज्ञातपणेच मेला. त्याने जगाला नवीन खंड दिले:जगाने त्याला शृंखला लेववून कृतज्ञता दाखविली ! त्याच्या शोधाचे महत्त्व त्या काळी कोणालाही समजले नाही.


इ.स.१५०३मध्ये अमेरिगो व्हेस्पुस्सी नामक इटॅलियन साहसिकाने 'नवीन जग' म्हणून एक वृत्तांत प्रसिद्ध केला.हे नवीन जग आपण १४९७ मध्ये शोधले असे तो म्हणतो.पण ती सारी असत्यकथा होती.

तथापि,त्याच वेळेस एक जर्मन प्रोफेसर जगाचा भूगोल छापीत होता,त्यात त्याने या नव्या खंडाला 'अमेरिका' असे नाव दिले.अमेरिगोने जे खोटेच सांगितले,ते खरे मानून त्याचेच नाव या नव्या खंडाला त्या जर्मन प्रोफेसराने दिले.


इतिहासातला हा केवढा विरोध आहे की,ज्याने खरोखरच प्रथम इ.स.१००० मध्ये अमेरिका शोधली त्याचे नावही कोणास माहीत नाही ! ज्याने पुन्हा दुसऱ्यांदा (१४९२मध्ये) ती शोधली त्याला अमेरिकेचा पहिला शोधक मानण्यात येते!!आणि ज्याने मुळीच काही न करता सन १४९७ साली आपण अमेरिका शोधली अशी नुसती थाप मारली,त्याचे नाव त्या नव्या जगास मिळून अमर झाले!!! घोडचुका करणारी आपली ही मानवजात खरोखरच्या कर्तृत्वाबद्दल मानसन्मान कसे वाटत असते,याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.


मानवजातीची कथा - हेन्री थॉमस

अनुवाद - सानेगुरुजी

मधुश्री पब्लिकेशन - शरद अष्टेकर