* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक !

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२/१/२३

भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक !

भारतात हैदर-टिपू सुलतानाबरोबर झालेल्या युद्धात इंग्रजांना दोन नवीन गोष्टींचा शोध लागला होता.(अर्थात हे इंग्रजांनीच नमूद करून ठेवलंय) एक म्हणजे युद्धात वापरले जाणारे रॉकेट आणि दुसरं म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी.


इंग्रजांना सापडलेल्या ह्या प्लॅस्टिक सर्जरीचा इतिहास मोठा गंमतीशीर आहे.सन १७६९ ते १७९९ ह्या तीस वर्षांत हैदर अली-टिपू सुल्तान आणि इंग्रजांमध्ये ४ मोठ्या लढाया झाल्या.यांतील एका लढाईत इंग्रजांकडून लढणारा 'कावसजी' हा मराठा सैनिक आणि ४ तेलंगी बाजार बुणगे टिपूच्या फौजेच्या हातात सापडले. टिपू सुल्तानच्या फौजेने ह्या पाची जणांची नाकं कापून त्यांना इंग्रजांकडे परत पाठवले.


काही दिवसांनी एका इंग्रज कमांडरला,एका भारतीय व्यापाऱ्याच्या नाकावर काही खुणा दिसल्या.चौकशी केल्यावर कमांडरला समजले की,त्या व्यापाऱ्याने काही 'भानगड' केली होती म्हणून त्याचे नाक कापण्यात आले होते.परंतु त्या व्यापाऱ्याने एक वैद्याकडून आपले नाक पूर्वीसारखे करून घेतले.आश्चर्यचकित झालेल्या इंग्रजी कमांडरने त्या कुंभार जातीच्या मराठी वैद्याला बोलाविले आणि कावसजी व इतर चौघांची नाक पहिल्यासारखी करायला सांगितलं.


कमांडरच्या आज्ञेवरून पुण्याजवळ हे ऑपरेशन झाले.हे ऑपरेशन होताना दोन इंग्रजी डॉक्टर्स उपस्थित होते.त्यांची नावं- थॉमस क्रूसो आणि जेम्स फिंडले.या दोघांनी 'अज्ञात मराठी वैद्याने' केलेल्या ह्या ऑपरेशनचं सविस्तर वर्णन मद्रास गॅझेटमध्ये पाठवलं,जे छापून आलं. ह्या मद्रास गॅझेटमध्ये छापून आलेल्या लेखाचं पुनर्मुद्रण, लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'जंटलमन' ह्या मासिकाने ऑक्टोबर १७९४ च्या अंकात केलं. या अंकात 'बी. एल.' ह्या नावाने एका गृहस्थाने ही बातमी दिलेली आहे.लेखासोबत शस्त्रक्रियेसंबंधी काही चित्रेही दिली आहेत. या लेखापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडच्या जे.सी.कॉर्प ह्या तरुण सर्जनने याच पद्धतीने दोन शस्त्रक्रिया केल्या,ज्या यशस्वी झाल्या.हे ऐकून ग्रेफे ह्या जर्मन सर्जननेही याच धरतीवर प्लॅस्टिक सर्जरीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.आणि मग पाश्चात्त्य जगाला आणि विशेषतः इंग्रजांना 'प्लॅस्टिक सर्जरी'ची ओळख झाली.पहिल्या विश्वयुद्धात तर अशा शस्त्रक्रियांचा फारच उपयोग झाला.पाश्चात्त्य जगात 'एडविन स्मिथ पापिरस' ने सर्वप्रथम प्लॅस्टिक सर्जरीचा उल्लेख आढळतो.मात्र रोमन ग्रंथांमध्ये या शस्त्रक्रियेचा उल्लेख हजार वर्षांपूर्वीपासून मिळतो.


अर्थात भारतासाठी या शस्त्रक्रिया फार जुन्या आहेत.सुमारे पावणेतीन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत या शस्त्रवैद्यकाने या शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन ठेवली आहे.झाडाचे एक पान घेऊन ते नाकावर ठेवले जाते.नाकासारखा आकार त्याला दिला जातो.आणि नंतर त्या पानाला आवश्यक तिथे कापून,त्याच आकाराची कातडी गाल, कपाळ किंवा हात,पाय यातून काढली जाते. विशिष्ट औषधांचा लेप लावून ती कातडी आवश्यक तिथे बसवून तिला बांधले जाते. बसवलेली कातडी आणि काढलेली कातडी.या दोन्ही जागांवर ठराविक औषधांचा लेप लावला जातो.साधारण तीन आठवड्यांनी दोन्ही ठिकाणी नवीन कातडी येते आणि हे कातडीचे प्रत्यारोपण पूर्ण होते.याच माहितीच्या अनुसार त्या 'अज्ञात मराठी वैद्याने' कावसजीवर नाकाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.


नाक,कान आणि ओठांना व्यवस्थित करण्याचे तंत्र भारताला फार पूर्वीपासून अवगत होते.पूर्वी, टोचलेल्या कानात जड दागिना घातला की कानाची पाळी फाटायची.अशा कानाला ठीक करण्यासाठी तेथे गालाची कातडी बसवण्याची पद्धत रूढ होती.अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतात ह्या शस्त्रक्रिया वैद्यांद्वारे केल्या जायच्या.हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा तर अशा शस्त्र- वैद्यकांसाठी प्रसिद्ध होता. सं म्हटलं जातं की,कांगडा हा शब्दच मुळी कान+गढा (हिंदीत 'गढा' म्हणजे तयार करणे) यातून निर्माण झाला आहे.डॉ.एस.सी.अलमस्त यांनी या 'कांगडा मॉडेल' वर बरेच लिहून ठेवले आहे.ते कांगडा च्या 'दिनानाथ कानगढीया' ह्या नाक,कानाची शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला स्वतः भेटले. त्याचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.सन १४०४ पर्यंतच्या पिढीची माहिती असणारे हे 'कानगढीया',नाक आणि कानाची 'प्लॅस्टिक सर्जरी' करणारे कुशल वैद्य समजले जात. ब्रिटिश संशोधक सर अलेक्झांडर कनिंघम (१८१४ - १८९३) याने कांगडाच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या प्रक्रियेबद्दल विस्ताराने लिहून ठेवले आहे.


अकबराच्या काळात 'बिधा' नावाचा वैद्य कांगडामधे शस्त्रक्रिया करायचा हेही लिहून ठेवलेले आढळते.


सुश्रुतच्या सुमारे अकराशे वर्षांनंतर सुश्रुत संहिता आणि चरक संहितांचा अरबी भाषेत अनुवाद झाला.हा आठव्या शतकातच झाला.'किताब-ई- 'सुसरुद' ह्या नावाने सुश्रुत संहिता मध्यपूर्वेत पोहोचली.


पुढे ज्याप्रमाणे भारतातील गणित आणि खगोल शास्त्रासारख्या विज्ञानाच्या इतर शाखा अरबी लोकांच्या माध्यमातून युरोपात पोहोचल्या, तशीच ही माहितीही युरोपात पोहोचली.


चौदाव्या पंधराव्या शतकांत,ह्या शस्त्रक्रियेची माहिती अरब - पर्शिया (इराण) - इजिप्त ह्या मार्गाने इटलीला पोहोचली.या माहितीच्याच आधारे इटलीमधल्या सिसिली बेटावरचा ब्रान्का परिवार आणि गास्परे टाग्लीयाकोसी यांनी कर्णबंध आणि नाकाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या.मात्र चर्चच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना त्या थांबवाव्या लागल्या.आणि म्हणूनच एकोणिसाव्या शतकापर्यंत युरोपियनांना प्लॅस्टिक सर्जरी अज्ञातच राहिली.


ऋग्वेदातील आत्रेय उपनिषद हे अति-प्राचीन उपनिषदांपैकी एक समजले जाते.ह्या उपनिषदात गर्भातील मूल कसे तयार होते,याचे वर्णन आहे.त्यात असे म्हटले आहे की,गर्भाच्या अवस्थेत प्रथम तोंडाचा काही भाग तयार होतो. नंतर नाकाचा,मग डोळे,कान,हृदय इत्यादी अवयव तयार होत जातात.आजच्या आधुनिक शास्त्राचा आधार घेऊन,सोनोग्राफी वगैरे करून बघितलं तर ह्याच अवस्थांमधून मूल तयार होत जाते.आता हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना कुठून मिळाले..?


त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरी भारतात किमान अडीच ते तीन हजार वर्षांपासून अस्तित्वात होती याचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.शरीरशास्त्राचे ज्ञान,त्यावरील उपचार हे भारताचे वैशिष्ट्य होते. आपण आपल्या जुन्या ज्ञानातून तयार केलेल्या गोष्टी म्हणजे जुनाट कल्पनांना कवटाळणे.. अशा चुकीच्या समजुतीपायी आपण आपल्याच समृद्ध वारशाला नाकारत आलो आहोत..


१८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..