" पांढराशुभ्र काळोखामधून जाणारा प्रकाशमय प्रशस्त राजमार्ग "
असामान्य लोकांच्या सहवासात राहण्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ती चुकती करा.
माईक मरडॉक - द लीडरशिप सिक्रेट्स ऑफ जीजस या पुस्तकाच्या लेखकाच्या विचारानुसार मी नेहमीच जगत असतो.
परवा सहजच व्हाट्सअपवरील स्टेटस पाहत असता. एका स्टेटसजवळ येऊन मी थांबलो. तो स्टेटस ठेवला होता आमचे परममित्र शरद ठाकर यांनी व तो स्टेटस होता. 'पांढराशुभ्र काळोख' मी हबकलो. क्षणाचा विलंब न लावता दादांना फोन लावला. त्यांनी सांगितले सचिन शिंदे यांनी त्यांच्या मित्रांचा संतोष ए.शेळके यांचा हा काव्यसंग्रह मला व माधव गव्हाणे साहेब ( सॉक्रेटिस ) यांना भेट स्वरूप दिलेला आहे. मी सचिन शिंदे जे माझे जिगरी दोस्त आहेत. त्यांच्याकडून फोन नंबर घेऊन आदरणीय संतोष शेळके साहेबांना फोन केला. व त्यांच्याकडून या काव्यसंग्रहाची मागणी केली. त्यांनीही प्रेमाने मैत्रीपूर्ण भावनेने मला भेट स्वरूप पाठवून दिला.
असं म्हणतात आपल्याला भेटणारा माणूस,आपल्याला येणारा कॉल,आपण वाचत असलेले पुस्तक, पुस्तक वाचत असताना उलगडलेले पान अचानकपणे आपल्या जीवनामध्ये अलौकिक व अकल्पनीय बदल करू शकते.
एका दमात बसल्या बैठकीला हा काव्यसंग्रह मी वाचून संपविला. तो आता हळु हळु जीवनात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. हा काव्यसंग्रह खरोखरच सृजनाचा मळा फुलविणारा आहे.
मुखपृष्ठ काळोख व कंदील यांचं नातं सांगणार आहे. मलपृष्ठ या संग्रहाचा आरसा आहे. एकूण ७० कविता आहेत. एकूण पाने ९५ आहेत. प्रकाशक व मुद्रक स्वयं प्रकाशन यांचे आहे.
पांढराशुभ्र काळोख
माझी आई दिवसभर
थकून झोपलेली असते
अन् मला ऐकू येतो
ती कण्हत असल्याचा आवाज..
तेव्हा मी कविता करत असलेल्या
कागदावरची शाई फिक्कट होऊन
त्या कागदावर मला दिसतो
" पांढराशुभ्र काळोख "
मनाचा ठाव घेणारी ही निर्मिती
जुन्या दिवसाची आठवण काढत असताना भरून आलेलं मन बरच काही सांगून जाते,सत्य कथन करतं.हे सत्यकथन करत असताना काही नाही हो,काल मॉलमध्ये,अनाठायी पैसा उधळून,जीवनाची चंगळ करताना,आजच्या माझ्या या आयुष्यासाठी, त्यांनी खाल्लेल्या खस्ता आठवूण, डोळे पाणावले बाकी काही नाही..! हे वास्तव मात्र प्रखरपणे मांडले आहे.
शेतकऱ्यांची जीवन गाथा सौदा या कवितेमध्ये सत्याला तसूभरही हलू न देता मांडली आहे. जाता जाता एक जीवन सत्य आवर्जून सांगितलेले आहे.
पण ... मी काय म्हणतो'
चण सुखांसाठी असा आईचा कोणी सौदा करतो का ?
असो ! तुलाही आता स्ट्रेट फॉरवर्ड राहायलाच पाहिजे.
सिझर जीवनाशी बांधलेली घटना या काव्यामध्ये एका घटनेचे दोन पैलू पाहायला मिळतात. घटना एकच पण एकाने पैसा बघितला तर एकीने देव..! खूपच प्रभावशाली.
डोळे भरून वर पाहुनी, तुझे पावसा उपकार मानी..! यामध्ये हिरवं भान शेतकरी,पाऊस,बीज,याचं रसभरीत वर्णन आहे.
बळीराजा खरंच राजा आहे हे मनोमन पटत.
हायकू...
यामध्ये यमुना नदी, तिच्या डोळ्यात रात्री
नीजे कौमुदी...!
माय सावित्री,तुझ्यामुळे शिकते,सन्मानाने स्त्री..! यामध्ये शिवबाराजा,त्यांचे स्वराज्य सुखी प्रजा, स्त्री सन्मान व शिक्षणाचे महत्त्व मनस्वीपणाने पटवून दिले आहे.
दामू आजो..
झाडपाल्याचे औषध त्याचं महत्त्व,निसर्गाचे मानवावरील उपकार, त्यांची असणारी श्रद्धा व विश्वास एक बाजू दुसरी पोट फाटले मुतखडा सांगून पैशांसाठी..! हे सध्याचे धडधडीत सत्य खूपच विचार करायला लावणारे आहे.
भिंती आणि बाया सारख्याच, घराला सांभाळणाऱ्या, सावरणाऱ्या, दोघींच्या जबाबदाऱ्या,भूमिका एकच भिंतीचा आडोसा नि बाईचा आसरा..! संसार करत असताना भिंती आणि बाया यांचा सन्मान,आनंदी सुखी जीवन राहण्यासाठी कुजबुजू नये,एकमेकींच्या कानामध्ये,पेटवू नये गैरसमजांचा वणवा घराघरात हा सल्ला कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
पायी निघाली भूक घरी
शहरातून घेऊन गर्दी काही
चालून चालून थकले पाय
रस्ता अजूनही संपत नाही.
भूक या कवितेमध्ये पाठीवर उद्याची स्वप्ने बांधून डोक्यावर घेतला डोक्यावर संसार तिने,तुडवत तुडवत वाट निघाली,आजुबाजुस नुसते जंगल सुने ! भुकेलाही संसार असतो. हे वाचून मी अचंबित झालो.
पापणकाठी माझ्यासाठी हे नाविन्यपूर्ण आहे.
मोठा कोणताही गुरू असू दे आई शिवाय नाही.आईची महती सांगणारी ही सर्वश्रेष्ठ कविता
आपल्या शरीरातील हार्मोन्स हे जसे आपल्या पूर्वजांकडून आपल्यामध्ये अभिव्यक्त होतात. तशाच परंपरा ही आपल्यामध्ये सामावून जातात. बाबा झाड लावत असता. त्यांना विचारण्यात आलं कशाला आणखी एक आंब्याचं झाड लावता. आधीच इथं फिरायला जागा नाही. या प्रश्नाला दिलेले उत्तर
" तुमच्यासाठी ही सावली " रोवून ठेवली आहे. या उत्तराने मला नवीन जाणीव झाली की सावली रोवून ठेवता येते.
संकटात माणूस कामाला येतो,धर्म नाही ते सूर्यप्रकाशा इतके सत्य दंगल या कवितेमध्ये विचार करायला लावणारे आहे.
पावसाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. पावसाचा मुक्काम वाढला तर शेतकऱ्यांची होणारी घालमेल, कर्जाचा दिसणारा डोंगर, त्यांना सतावणारी विवंचना जा रे जा बा पावसा ही कविता वाचली की डोळ्याच्या कडा ओल्या होतात.
असते एखादे घर,घराचं वर्णन संकटातही कणखरपणे, पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे घर मोडुन पडलं तरी पुन्हा उठून बसणार,येणाऱ्या संकटात ही निरागस हासणार, क्षणभर तुटूनही ही,कणखर असणार,असतं एखादं घर..!
वाळवीची जबाबदारी यामध्ये पुस्तके त्यांचं महत्त्व,रद्दी, याबरोबर वाळवीला समजलेलं विचाराचं सामर्थ्य, हे विचार आपल्याला कधी समजणार याचा मी विचार करत आहे.
बाप ... तरीही त्याच्या नजरेने पन्नास उन्हाळे,
धीर देऊन विचारत होते, बाप आहे मी !
काय झाले मला नाही सांगणार ? हे काव्य म्हणजे बापासाठी सर्व काही.
ग्रामीण भागात झपाट्याने नामशेष गोठा आता रडत आहे. एकटा पडल्यामुळे,आपली संवेदना,संस्कृती खालावली आहे. याची आठवण गोठा करून देतो.
नदी आयुष्य सुंदर हिरवे करून जाते,तिचे नि माझे जन्मो जन्मीचे नाते ! नदीचे हे वर्णन वाचत असताना. मला आवडलेली माझी जिवाभावाची " नदीष्ट " कादंबरी मला जगण्याची गुपित सांगून गेली. रात्री-अपरात्री नदीच्या पात्रामध्ये बिनधास्तपणे उतरणारे आमचे मित्रवर्य या कादंबरीचे निर्माते आदरणीय मनोज बोरगावकर यांची आठवण झाली.
प्रकाश व वायरमन यांचं नातं आपल्यासाठी खूप अनमोल आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला नेहमी प्रकाशात राहण्यासाठी प्रयत्न करणारे आपले वायरमन याचा आपण कधी विचार करत नाही. या ठिकाणी आपण अविचाराने जात आणतो. हे काम करत असताना एखाद्या वायरमनचा मृत्यू झाल्यास आपण कधीही विचारत नाही. कि तो कोणत्या जातीचा होता. या व्यक्तीबद्दल मनात आदरभाव प्रकट झाला.
जीवन जगत असताना,ते सावरत असताना, नजरचुकीने शिल्लक राहतो मी खड्यासारखा दोष यामध्ये आयुष्याशी साधलेला संवाद बरच काय सांगून गेला.
पाऊस गरीबाची मस्करी, हळदीचा लेप,शिवभक्तांनो,सह्याद्री,का खटाकतोय पाऊस,वारांगना,शेतकरी राजा,कास्तकार बाप,जबाबदारी,लगोरी,माय बाप, बाईपणाचे लॉकडाऊन,भयान स्वप्न,कविता,मन,विश्व,आठवण,मला झाड व्हायचंय, अशा एकाहून एक सरस कविता आहेत.
या कविता म्हणजे जीवन जगत असताना.प्रेमाच्या सावल्या आहेत.
पुस्तक
पुस्तक असते
सर्वश्रेष्ठ उत्तम गुरु
स्थितप्रज्ञ वाटसरू !
पुस्तक असते
कृष्ण सुदामासारखा
सुखदुःखातला सखा !
पुस्तक असते
आयुष्याचा आरसा
अनुभवांचा ठसा !
पुस्तक असते
एक सुंदर प्रवास
साहित्याचा श्वास !
पुस्तक असते
विचारांची शृंखला,
संस्काराचा दाखला !
सर्वांगीण व परिपूर्ण असा हा काव्यसंग्रह स्वतःमधील स्व आहे. हा वाचल्यानंतर आपण आपल्या जवळ येतो. ही सर्व समजलेल्या जीवनाची नोंदणीच धन्यवाद संतोष ए.शेळके मनापासून मनापर्यंत आभारी आहे.
जाता जाता
'.... संध्याकाळी खाल्लेली आमटी दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाल्ल्यानंतर त्या आमटीची चव बदलते. आमटी तीच असते खाणारी व्यक्ती ही तीच असते. मग चवीमध्ये नाविन्यता कशी ? आमटी मध्ये आणि खाणार्या व्यक्तीमध्ये एक पांढराशुभ्र काळोख असतो.' ( म्हणजेच एक संपूर्ण रात्र असते.)
विजय कृष्णात गायकवाड