साधा नायक,साधी नायिका,
साधा दिग्दर्शक,साधे बोल,साधा गायक
पण हृदयाला स्पर्श करणारी सगळीच गोष्ट..!
या युट्युबवरील गाण्याखालील 'जिवंत' प्रतिक्रिया..
हे गाणं ऐकता ऐकताच लहानाचा मोठा झालो आपण जन्माला येण्याअगोदर पासूनच घर उभे राहिलेले आहे. तसा घराचा इतिहास हा फार फार जुना आहे तो आपल्याला खूपच मागे घेऊन जातो,ज्या वेळेला माणूस शिकार करून भटके जीवन जगत होता त्याकाळी वरती मोकळं निरभ्र,विस्तारित आभाळ व खाली सर्वांना सामावून घेऊन प्रेमाचा आधार देणारी जमीन हेच घर होते.अवघे विश्वचि माझे घर ही त्यावेळेला घराची व्याख्या होती. जीवन भटके असल्या कारणाने एका ठिकाणी स्थिर शांत राहण्यासाठी घराची आवश्यकता कधी भासली नाही, किंवा तशी कल्पना केली गेली नाही आणि माणूसही उत्क्रांतीच्या टप्प्यावरती होता. काही काळानंतर शिकारी,भटके जीवन थांबल्यानंतर शेतीचा शोध लागला,आणि माणूस एका ठिकाणी स्थिर राहायला लागला.
पण शेती करत असताना माणसाला जंगलाच्या जवळ जावं लागलं.आणि जंगलाच्या जवळ गेल्या कारणाने सर्वप्रथम त्याला एक विचार सुचला.( तो पर्यंत माणूस विचार करु लागला होता.व जबाबदारीची जाणीव ही झाली होती.) कुठेतरी आपल्याला निवारा असावा.इतर जंगली जनावरांकडून जीवाला धोका होऊ नये म्हणून सर्वप्रथम त्याने घर तयार केले. ते तयार करताना निसर्ग तत्परतेने धावून आला.( तोच निसर्ग आजही धावून येतो.) आणि झाडाफुलाने बनलेलं एक सुंदर घर तयार झालं.आणि त्यामध्ये तो राहू लागला. हे घर तयार करत असताना प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने त्याचे निर्माण होत होते.म्हणजेच ते घर मानवी उत्कंठ भावनेने तयार होत होते.अखेर ते 'आत्मा' असलेले घर तयार झाले. त्यानंतर मग माणूस विचाराने प्रगल्भ झाला आणि अनुभवातून शिकत शिकत त्याने त्या राहत्या घरातही बदल केले.आज घर, प्रसाद,बंगला,वन बीएचके,
(यामध्ये परमेश्वराचे मंदिर म्हणजे घर सुद्धा येते.) असा या घरांच्या साधेपणातून सुरु झालेला प्रवास अँन्टीकपिस म्हणजेच 'वास्तू' पर्यंत आलेला आहे.
जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव फॉसिल्समधून रेखला जातो. तर खनिजं, बांधकाम साहित्य, पायाचे दगड यांसोबत,दगडांमधून दिसणारं पुराजीवशास्त्रही सापडलं.त्या शास्त्राची दशलक्ष आणि अब्ज वर्षांची मापं ओळखीची,सवयीची झाली आणि माणसांचे व्यवहार 'आखूड' वाटायला लागले.
माणसांचा इतिहास महिने-वर्षं, दशकं शतकं एवढ्यांत - संपतो. भूशास्त्रात मात्र लक्ष,कोटी आणि अब्ज वर्षांची मापं वापरली जातात. आपण काही तरी थोर आहोत असा गर्व करायला इथे जागाच नाही!तर नम्रता या गुणाचीही जरा उजळणी करा!
जीवसृष्टीतल्या बदलांचे साक्षीदार दगड-धोंडे नंदा खरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वैचारिक,वैज्ञानिक माहिती माणुस म्हणून विचार करायला भाग पाडते.
आश्चर्यकारक अचंबीत करणाऱ्या काही गंमतीशीर व अभ्यासपूर्ण पक्षांच्या घरट्याबद्दच्या नोंदी 'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पाॅडकास्ट मधून मानवी संवेदनशीलतेतून 'जाणीवेतून जाणून' घेतल्या.
गरुडाचं घरटं हे डेरेदार झाडांवर असतं.ते जवळजवळ बैलगाडीच्याचाका इतकं असतं.आणि दरवर्षी त्यामध्ये काटक्यांची भरही पडतचं असते.कारण जुन्या काटक्या वाळून खाली पडतात.हे घरटं भरभक्कम व मजबूत असतं.कितीही आपत्ती,वादळ पाऊस आला तरी ते गरुडासारखचं मजबूत रहातं.त्या घरट्याला काहीही फरक पडत नाही.याठिकाणी रसिक,सौदर्यदृष्टी लाभलेल्या गरुडाचं नोंद आश्चर्याचा धक्का देवून जाते.
नर गरुड हा दररोज न चुकता फुलांनी भरलेली ढहाळी ती नाही मिळाली तरी रसरसीत पानांची ढहाळी त्या घरट्यात आणून टाकत असतो.जसा माणुस गजरा आणतो.घरात फुलदाणी आणतो.अशाच प्रकारची ही भावना असते.आणि जोपर्यंत मादी अंड्यावर बसलेली असते तोपर्यंतच दररोज गरुड न चुकता हे करत असतो.ही रसिकता पाहुन मीच विचार केला कि कधीतरीच गजरा घेतो.तो ही 'घरातून' सांगितल्यानंतरच ..!
ही घरटीही विणीच्या हंगामात वाढलेल्या नवीन येणाऱ्या 'पाहूण्यासाठी'अंड्याचे,जन्मलेल्या पिल्यांच्या संरक्षणाठी सुरक्षित ठिकाण म्हणून बांधली जातात.
काही गमंतीशीर पक्षी ही मधमाश्यांच्या पोळ्याजवळ त्यातील माशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.असे'सुरक्षित अंतर' ठेवून हे घरटं बांधलं जातं.(यामुळे त्यांना खाणारे पक्षी 'पोळ्याच्या भीतीने' त्याच्यांजवळ जात नाहीत.हा दुरदृष्टी विचार त्यामागे असतो.)
काही पक्षी हे गांधीलमाशीच्या घराजवळ आपलं घरटं बांधतात. कारण या गांधील माशा चावल्या तर भरपुर आग होते.कारण त्यांचे विष हे जहरीले असते त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणीही जात नाही.काही ठिकाणी समुद्राच्या काठावर अनेक पक्षी मिळून एकत्रित घरटी बांधतात.हजारोंच्या संख्येने झाडावर एका ठिकाणी स्वसंरक्षणासाठी ती घरटी बांधलेली असतात. कोणीही शिकारी आला तर इतक्या मोठ्या समूहापुढे तो काहीही करू शकत नाही.ही सर्वजन एकाचवेळी हल्ला करु शकतात.
बरेच पक्षी हे वड आणि पिंपळ या झाडांवरती आपली घरटी बांधतात कारण ही झाडे वादळ वाऱ्यातही मजबूतपणे उभी असतात. व या वडाच्या झाडावर जी फळ लागतात ती फळे या पक्षांना आवडतात म्हणून या झाडांची ती मोठ्याप्रमाणात निवड करतात.
मेक्सिकोच्या चिमण्यांच्या घरट्यामध्ये अलीकडे सिगारेटची थोटकं आढळली आहेत.काही जणांना असं वाटलं की त्या सिगारेटच्या मागे असणारा जो मऊ मऊ कापूस आहे त्याचा वापर ती घरटं मऊ राहण्यासाठी करत असावीत.पण तंबाखु सोबत अर्धवट जळालेल्या सिगारेटची ही थोटकं होती. त्यामुळे त्याचा आणखी जास्त गंभीरपणे अभ्यास केला असता. एक गंमतीचा असा निष्कर्ष निघाला की ही अर्धवट तंबाखू सोबत असणारी थोटकं घरट्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्या उग्र वासामुळे मुंग्या कीटक यापासून त्यांचे संरक्षण व्हायचं. या उग्र वासामुळे त्यांच्या घरट्याकडे कोणीही फिरकत नाही. त्यामुळे त्यांची पिल्ले आणि त्यांची घरटं ही सुरक्षित राहतात. (हे ज्ञान त्यांनी कुठून घेतलं हे अजूनही समजलेलं नाही.हे २१ व्या शतकाला शोभेल असं उदाहरण आहे.)
असा हा घरट्यांचा इतिहास समजून घेऊन आपण आपल्या घराकडे परत येऊ.
मी लहान असताना जवळजवळ सगळी घरं एकसारखीच असायची.साध्या मातीने ती तयार केलेली वरती साधी कौलं व बाजूनी मातीच्या भिंती हे घर बांधण्यासाठी निसर्गातीलच घटकांचा आपण वापर केलेला असायचा. त्यामुळे त्या घरामध्ये नैसर्गिक निसर्गही माणसासोबंत रहायचा. त्या घरात राहणारी माणसं ही साधी सरळ,निकोप प्रेमळ सगळ्यांवरती मोकळ्या मनाने प्रेम करणारी होती. त्या घरातील स्त्रिया घराची काळजी मनापासून घेत असायच्या वेळच्यावेळी देखभाल केली जायची. व दर वर्षी पावसाला सुरुवात होण्याअगोदर या घराचा जिर्णोद्धार केला जायचा.या सर्वगोष्टी श्रद्धेने केल्या जायच्या.माणसांचा मूळचा स्वभाव प्रेमळ असल्याकारणाने ते घरावर व सर्वांच्या वरती प्रेम करायचेत. घर हे फक्त भिंतींने तयार होत नसतं, तर घर हे घरातील माणसाच्या स्वभावाने तयार होत असतं प्रत्येक घराला त्याचा विशिष्ट असा आत्मा असतो.
दररोज सकाळी पहाटे उठून महिला त्या घरामध्ये दळप कांडप करायच्या जात्यावरती गाणी गायली जात.हे काम करत असताना हातांचा,हातातील काकणांचा लयबध्द आवाज होत असायचा.या आवाजाणेच घरातील सर्वांना उत्साही 'जाग' यायची असं हे जीवनच संगीतमय करुन टाकणार 'मनस्वीघर' सर्वांनाच हवहवसं वाटायचं.जे केलं जायचं ते सर्वांसाठी असायचं त्यामुळे त्या घरांना एक विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला असायचा. फार पूर्वी करमणुकीची साधने नसल्याकारणाने संध्याकाळी 'शुभंकरोती कल्याणम्' झाल्यानंतर सुसंगत,सुसंस्कृत,
सुसंवाद व्हायचा.यामध्ये सामाजिक,
आर्थिक,नैसर्गिक,कौटुंबिक,सर्व विषयातील अनुभवाची देवाणघेवाण व्हायची.व घरातील 'जाणत्या' व्यक्तीच्या आज्ञेच पालन काटेकोरपणे केलं जायचं.या सर्व सुसंवादामध्ये 'घर' ही मुकपणे आपला सहभाग नोंदवायचे.
घरातील लोकांची संख्या जरी वाढली तरी हा एकोपा अखंडच होता. हळूहळू औद्योगिक क्रांती होत गेली व शहरांनी 'गावाला' बोलवून घेतले. मग वैयक्तिक विचार बाळसे धरू लागले. स्वतंत्र राहणे ही आता गरज बनू लागले आणि भावनिक पातळीवरती असणारी माणुसकी 'कोरडी' होत गेली. घराघरात मतभेद ज्येष्ठ जाणत्या लोकांना अडगळीचे ठिकाण प्राप्त झालं.कारण प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा होता. हे सर्व बघत असताना घराचं काळीज मात्र तीळ तीळ तुटत होतं.पूर्वीच्या काळी घराचा आवाज सर्वांना जाणवत होता कारण ते सगळे संवेदनशील मानसिक पातळीवरील नातं होतं.आता तो आवाज येत नव्हता कारण विचारांमध्ये झालेला अमुलाग्र बदल,घर जाग्यावरचं स्तब्ध होतं.आतील माणसं मात्र बदलत होती.
आणि माणसाचं जीवन धावपळीच झालं आणि त्यांनी ते स्वीकारलं. साध्या घरात राहणारा माणूस आज वन बीएचके मध्ये स्वतःच्या मनासारखं घर तयार करून त्यामध्ये राहू लागला.पण तो खरोखरच आनंदी आहे का? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.(आनंदी रहाणं सोप आहे.पण साधं सरळ रहाणं फार अवघड आहे) धावायचं कितपत आणि कोणासाठी याला काही मर्यादा नाही. पूर्वीसारखी घराकडे जाण्यासाठीची ओढ आता आहे का? कारण आता घरात जाऊनही कामं केली जातात कुटुंबामध्ये सुसंवाद होत नाही फक्त कामापुरते बोलणं होतं.
घरातील ज्येष्ठ जाणती लोकं आता अँटिक पीस झालेले आहेत. घर हे आता दाखवण्याची वास्तू झालेली आहे. सर्व सुख सोयी पायाशी लोळण घेत असूनही माणूस प्रेमाविना कोरडा ठणठणीत राहिलेला आहे.(याला अपवाद असतील त्यांना सलाम)
नवीन घर बांधणे आता स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे कारण दिवसभर राबल्यानंतर पोटाला चार घास मिळतात. अशी सत्य परिस्थिती असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन घर कसं बांधायचं याचा विचारच करून माझ्या अंगावर काटे उभे राहतात.अजूनही काही जणांसाठी घर बांधणे म्हणजे एक मोठा न सुटलेला प्रश्न आहे. लहानपणापासून मी हे ऐकत आलेलो आहे.की 'घर बघावे बांधून,लग्न करावे बघून व विहीर बघावी बांधून' त्या वेळेला मला याचा फारसा अर्थ कळत नसायचा पण ज्या वेळेला मी स्वतःच्या घराचा विचार केला त्या वेळेला माझी झोप उडाली होती,त्यामुळे आमच्यासाठी घर म्हणजे स्वप्नातीलच आहे.आता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे हल्ली स्वप्नातील घर हे स्वप्न सुद्धा कोणाला पडत नाही.
(या ठिकाणी एका गोष्टीचे आठवण झाली जी व्हाट्सअप वरती वाचलेली होती.)
एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे १०० वर्ष जुने लिचीचे झाड होते.
त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.
काही काळानंतर घराचे नुतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि ३० वर्षांपासून हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.
काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे.मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.
घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मुल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले. त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले - दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?
ते मोठ्या सहजतेने म्हणाले, मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..
मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.
घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, "जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का?"
मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की, "कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.
मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, "या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही."
त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले - का?*
मास्टर काओ - "जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील - ते ठिकाण,ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय
पवित्र-आनंददायी-फलदायी असेल".
"आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.
जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.
आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा "वास्तू" सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.
सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' (अनुवाद - करुणा गोखले,पद्मगंधा प्रकाशन) हे पुस्तक स्त्रीवादाचे बायबल समजले जाते.या ग्रथांतील 'घराबद्दल' नोंद
कुटुंब ही स्वतःत बंदिस्त अशी संस्था नसून एक सामाजिक संस्था आहे, म्हणूनच घरसुद्धा कुटुंबात राहणाऱ्या माणसांसाठी केवळ छप्पर नसते. ते त्या कुटुंबाच्या सामाजिक स्थानाचे प्रतीक असते. कुटुंबाची सांपत्तिक स्थिती, सांस्कृतिक व शैक्षणिक पातळी, कुटुंबातील व्यक्तींची अभिरुची,हे सर्व घराद्वारे व्यक्त होत असते.कुटुंबाचे समाजातील स्थान घर कसे ठेवले जाते यावर ठरते.
जाता जाता..
द प्रॉफेट,खलील जिब्रान पुस्तकात देवदूत प्रकरणामध्ये अल् मुस्तफा सांगतो.
तुमचं घर नौकेच्या नांगरासारखं न होता शिडासारखं असलं पाहिजे. तुमचं घर जखमेवरल्या चमकत्या खपलीसारखं नसावं : डोळ्यांचं रक्षण करणाऱ्या पापणीसारखं ते असावं.
दारांतून ये-जा करताना तुम्हाला पंख मिटावे लागू नयेत. छताला आदळेल म्हणून तुम्हाला मस्तक नमवावं लागू नये. भिंतींना तडे जाऊन त्या कोसळतील या भयान तुमचा श्वासोच्छ्वास कोंडू नये.
विजय कृष्णात गायकवाड