'येथे कूपनलिका भरुन मिळते!' हे काहीतरी नवीन आहे.आणि हे करत असतात.राहुल बाकरे
बोअरवेल घेतली तेव्हा खूप पाणी होते. पण आता कोरडी ठाक पडली आहे.पाणी गेले कुठे?
आता पाऊसपाण्याचे दिवस सोडले,तर या कूपनलिकेला पाणी मिळणारच नाही का? कूपनलिकेचे पाणी आटले असले तरी धीर सोडू नका राहुल बाकरे यांना संपर्क करा. ते बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी करून बोअरवेलला पुन्हा पाणीपुरवठा होऊ लागेल हे पाहतील.
हो बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी.
जमिनीच्या पोटात खनिज तेलाचे साठे तंत्रज्ञानाने शोधण्याचे तंत्र मागच्या शतकात विकसित झाले.त्यातून जगातील अर्थकारण, राजकारण,जीवनमान बदलत गेले.उपग्रहांचा वापर,काँप्युटर,तसेच इतर विकसित होणाऱ्या विज्ञानाबरोबरच तेल शोधण्याचे तंत्र अधिक अधिक प्रगत होत गेले. त्याचे कुतूहल आपल्याला सतत वाटत राहिले आणि अजूनही वाटते आहे.पण विसावे शतक तेलाचे होते, एकविसावे शतक पाण्याचे आहे. जे जे तेलाबाबत घडलं तेच या शतकात पाण्याबाबत घडतंय न् अजूनही घडणार आहे.
तेलाच्या संशोधनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान पाण्यासाठी जसेच्या तसे वापरले जात नसले तरी तितक्याच उच्च तांत्रिकतेने जमिनीतील पाणी कुठे,किती,कसे उपलब्ध आहे व त्याचा वापर कसा करून घेता येईल याची शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध मांडणी करणाऱ्या ते पाणी प्रत्यक्षात तुमच्या बोअरवेलमध्ये भरून देण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या ज्याला ते बोअरवेलची 'अँजिओप्लास्टी' असे म्हणतात अशा राहुल बाकरे यांच्या पाणीविषयक काम आणि कर्तृत्वाची, त्यांच्या अनुभवाची व त्यांनी विकसित केलेल्या तंत्राची ही गोष्ट..!
गोष्टच पण ती साधी सरळ नाही. ती आहे चढउतारांनी भरलेली.
राहुलजींचा प्रवास तसा भारीच आहे,एका मोठ्या डोंगरावर चढून जायचे परत अचानक त्यावरून खाली उतरायचे आणि दुसरा डोंगर चढायला लागायचे,असे पाच-सहा डोंगर चढून उतरण्याचा त्यांचा प्रवास आता भूजलाच्या उपलब्धतेसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वाटेवर वेगाने सुरू आहे. खूप सकारात्मक व अनेक अर्थांनी बदल देणारी भूजलाच्या नियोजनाबाबत व उपलब्धतेबाबत मोठे बदल घडवणारी ही वाटचाल सुरू आहे.
राहुल बाकरे ज्ञान प्रबोधिनीत शालेय शिक्षण घेउन पुण्याच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (मेकॅनिकल) झाले. त्यानंतर लगेच अमेरिकेतील एमआयटी या तंत्रशिक्षणासाठी जगातून सर्वाधिक पसंती असलेल्या विद्यापीठातून ऑटोमोबाईल विषयात एम.एस.पूर्ण केले. त्यावेळी त्यांचा विषय ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित होता.हा पहिला डोंगर पूर्ण चढून झाल्यावर त्यांनी तो पूर्ण उतरुन त्यांचा मोर्चा जगात त्यावेळी प्रत्येक बुद्धिमान युवकांचे आकर्षण असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे वळवला.आता त्याचा अभ्यास करून त्यात वाटचाल करायचे ठरले,तसे केलेही.मग त्यावर आधारित संगणकावर ऑनलाईन खेळांचे प्रस्थ त्या काळात बरेच वाढत होते,व त्या ऑनलाईन खेळांसाठी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीत ते काम करू लागले.कंपनीचा कारभार मोठाच होता. वर्षाला सहाशे कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीत राहुल बाकरे त्या कंपनीच्या बिलिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते,परत एक दिवस हाही डोंगर उतरायचं मनात आलं. हे सगळं भौतिक चंगळवादी जीवन,नुसते पैसे पैसे अशा विषयांच्या चर्चांनी राहुलजींचे तिथून मन उडाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या त्यांना अस्वस्थ करत होत्या.ज्ञान प्रबोधिनी संस्कार आठवू लागले.मनाला टोचू लागले, माझे ज्ञान सामान्य माणसासाठी हवे.माझे जीवन समाजासाठी हवे,माझ्या मातीतल्या माणसांसाठी हवे,ही भावना प्रबळ होऊ लागली.त्यामुळे हा ही डोंगर उतरायचा असा मनाचा निर्णय झाला. लगेच अमलातही आणला गेला.
समाजाचे काम करायचे म्हणजे गळ्यात शबनम, पायात स्लीपर आणि वाढलेल्या दाढी घेऊन समाजवाद आणि समाजकारणाचा तुणं तुणं वाजवत विरक्तीच्या आणि त्यागाच्या गप्पा करत आणि शेवटी अपयशाने सरकार व भांडवलदारांच्या माथ्यावर खापर फोडत व्याख्याने देणार्या समाजसेवकांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवूण चालायचे नव्हते.
अर्ध्यमची काम करण्याची साधारण पद्धत अशी होती की विविध ठिकाणाहून आलेल्या पाणी संदर्भातल्या कामांच्या मागणीच्या ठिकाणांना भेट देऊन तेथील लोकांना ही भेटणे.प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देणे.सध्या ते लोक यावर कसा मार्ग काढत आहेत हे पाहणे.येथील पारंपरिक काही जलसंवर्धनाच्या व जलशुद्धीकरण त्यांच्या म्हणून काही पद्धती आहेत का हे पाहणे.अशी माहिती काढल्यावर पारंपरिक तंत्राला काही गोष्टींची भर घालून त्यांचे बळकटीकरण करायचे की नवीन तंत्रज्ञानावर आधारित पर्याय निवडायचे हा निर्णय करायचा.त्यातून त्या लोकांना या समस्या त्यांची कारणे व त्यांची पर्यायी उत्तरे याबाबत प्रशिक्षण देत त्यांच्यातच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करायची हा पुढचा टप्पा.उदाहरणार्थ आमचे पाणी खूप जड आहे आणि लोक सारखे सारखे आजारी पडतात आम्हाला आर.ओ.प्लांट पाहिजे अशी मागणी आली तर लगेच आर.ओ. प्लांट देणे हे त्यावर उत्तर नाही. कारण दुर्गम भागात आर.ओ. प्लांटसाठी कायम वीज उपलब्ध असते का? त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणी जवळपास उपलब्ध होईल का? किंवा स्थानिक लोकांना याबाबत काहीतरी माहिती आहे का? हे जाणणे महत्वाचे. अन्यथा लाखो रुपयांचे मशीन घेऊन त्याची देखभाल न झाल्यावर ते वर्षा-दोन वर्षात बंद पडते.ते तसेच नादुरुस्त राहून गंजून जाते. लोक परत तेच जड पाणी पीत राहतात. पैसेही वाया गेलेले अन् समस्याही संपली नाही अशी खूप उदाहरणे खूप विषयांबाबत आहे. भारतीय समाजाचा हा दोष किंवा मर्यादा आहे. हा सार्वत्रिक अनुभव आहे.याला म्हणूनच पर्याय आधी स्थानिक पारंपरिक ज्ञानाचा,व तो शोधण्याचा प्रयत्न राहुलजींचा असायचा.मग अशावेळी मटका गाळणी,विविध झाडांच्या बियांचा वापर,किंवा अशाच निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.पण म्हणजे हे शक्य नसेल तर आर.ओ.प्लांट पण दिला, नाही असे नाही.पाणी जिरविण्याचे,जमिनीतील पाणी वाढवण्यासाठीचे विविध उपाय,बंधारे बांधणे, बोअर मारणे या आणि अशा विविध समस्यांवरच्या विविध उत्तरांचा ही अवलंब करण्यात आला.
विशेष काम झाले ते अर्सेनिक युक्त व फ्लोराइड युक्त पिण्याचे पाणी ज्या विभागात आहे त्या भागात!! अर्सेनिक युक्त व फ्लोराइड लोकांचे जीवनच उद्धस्त करतात.गंगेच्या खोऱ्यात ही समस्या खूप आहे. इथे पूर्वी पिण्याचे पाणी विहिरीतून व आडातून घेतले जायचे. त्यावेळी ही समस्या कमी होती कारण विहिरींची खोली फार नसायची. त्या खडकाच्या वरच्या थरात थोडेफार अर्सेनिक असते ते पाण्यात विरघळून विहिरीच्या पाण्यात वरच्या भागात यायचे.त्याचा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन ऑक्सिडेशन प्रक्रिया घडून त्याचा गाळ विहिरीत खाली बसायचा. विहिरीचे पाणी भरताना बादलीला झटका देत वरच्या भागाचे पाणी बाजूला करून खालचे पाणी भरले की त्यात आर्सेनिक जवळजवळ नसायचे. (ज्यांनी पूर्वी पाणी विहीरीतून शेंदलेय त्यांना याचा अनुभव नक्कीच असेल अशा प्रकारे पाणी भरण्याचा,हो मी दररोज पहाटे ५ वाजता या पध्दतीने आडातून पाणी काढतो.) पण पाण्याची मागणी वाढत गेली.बोअरवेलची संख्या त्याचबरोबर खोलीही वाढत गेली तशी ही समस्या वाढत गेली.खोलवरच्या खडकातील बॅक्टेरीया अर्सेनिकच्या खनिजाचे विघटन करतात.ते बोरवेलमधील पाण्यात मिसळते. हे पाणी प्यायले की अर्सेनिकची बाधा होते.तसेच जनावरे व गाई हे पाणी पितात,त्यामुळे त्यांच्या दुधात आर्सेनिक असते.इतकेच काय त्यांच्या शरिरातही अर्सेनिक जाते,ते शेणात उतरते. त्याच्या गोवऱ्या जाळण्याने स्वयंपाकघरातील धुरातून आर्सेनिक फुफ्फुसात जाते.बोअरवेलचे पाणी शेतीला दिलेले असते काही वेळा भाताच्या ओंब्या लोंबत असतात त्या पाण्यात भिजत राहतात तेव्हा ही रसायने तांदळात शोषली जातात व भातातून आर्सेनिक पोटात,म्हणजे आर्सेनिक वगळून पाणी शुद्ध करून प्यायले तरी इतर अनेक माध्यमातून ते शरीरात जातेच.
अर्सेनिकमुळे तोंडाचा,आतड्याचा,फुप्फुसाचा, गुदद्वाराचा, किडनीचा कर्करोग होऊ शकतो. खूप गंभीर प्रकरण आहे हे आणि भारतातल्या बारा राज्यात याचा प्रभाव आहे.पण कोणत्याही सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.काही प्रमाणात स्थानिक उपाय व काही प्रमाणात तंत्रज्ञान वापरून ऊर्ध्वम फाउंडेशनने राहुल बाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले.पण समस्येचा घेरा मोठा आहे. एक दोन व्यक्ती,संस्था यांना खूप मर्यादा येतात. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य समजलेल्या व त्यावर उपाय झाले पाहिजेत यासाठी हे माहीत असलेल्या लोकांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून राहुल यांनी एक दबाव गट तयार केला आहे.अनेक तंत्रज्ञ व तत्सम बुद्धीवादी लोकांना एकत्र केलं त्यासाठी,असाच विषय फ्लुराईडचा ! याचे प्रमाण पाण्यात जास्त झाले की हाडे वेडीवाकडी होतात,स्नायू कमकुवत होतात,जबडा वेडावाकडा होतो, रक्तवाहिन्या कडक होतात.भयंकर समस्या ! महाराष्ट्रातील सतरा-अठरा जिल्ह्यात आणि भारतातील नऊ दहा राज्यांत ही समस्या आहे. त्यावर दोन-तीन चांगले उपाय अवलंबले गेले. पारंपारिक उपायांबरोबरच किंवा नैसर्गिक संसाधने वापरण्या बरोबरच नवीन तंत्रज्ञान ही अवलंबले जात होते.शेवग्याच्या बियांची भुकटी, नारळाची राख व इतर तत्सम वनस्पतीजन्य पदार्थाच्या राखेतून पाणी गाळून घेतले की त्याचे प्रमाण कमी होते.
कर्नाटकात काही ठिकाणी वेगळा प्रयोग केला गेला यावर उपाय म्हणून घराजवळ टाक्या बांधून पावसाच्या पाणी साठवून त्या पाण्याचा वापर करणे तसेच घरावरील व शेतातील पावसाचे पाणी एकत्र करून ते भुजलात मिसळून व त्यातून फ्लोराईडचे पाण्यातले प्रमाण कमी करणे उपाय केले तसेच नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन फ्लोराईडमोठ्या प्रमाणात असलेले खडक शोधून काढून तिथे बोरवेल घेण्यास मनाई करण्यात आली. तसेच जिथे फ्लोराइड युक्त खडक नाहीत अशा जागा निवडून,जिथे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरवता येते तिथे पाणी जिरवण्याची व्यवस्था वाढवली. (याला खडक शास्त्रात व पाणी व्यवस्थापन शास्त्रात रिचार्जिंग झोन असे म्हणतात. ग्राउंड वॉटर रिचार्ज करते म्हणून रिचार्ज झोन!)
देशातील काही ठिकाणी या समस्येवर उपाय म्हणून ॲक्टिव्हेटेड ॲल्युमिनियम पद्धतीचा वापर केला गेला तर काही ठिकाणी मातीत चांदीचे नॅनो पार्टिकल टाकून त्याचे मटका फिल्टर्स बनवणे व त्या मार्गाने पाण्यात पाण्यातील फ्लुराइडचे प्रमाण कमी केले. हे आणि असे अनेक उपाय राहुल यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करून ठेवले आहे.त्यामुळे पुढे अनेकांना या पर्यायांचा बिनधोक वापर करता येईल.
या कामाबरोबरच जलनिस्सारण व आरोग्य विषयावरही राहुलजींचे अर्ध्यमच्या माध्यमातून काम चालू होते.अनेक शौचालये बांधली दुर्गम अतिदुर्गम न शहरी भागात,पण त्याहीपेक्षा दोन महत्त्वाची दिशादर्शक कामे या विषयात राहुलजींनी केली.एक म्हणजे ड्राय टॉयलेटची मोठ्या प्रमाणात यशस्वी उभारणी आणि दुसरं म्हणजे मानवी मूत्राचा शेतीत उपयोग.ही दोन्ही कामे पाणी व जलनिस्सारण विषयात काम करणाऱ्यांसाठी दिशादर्शक कामे आहेत.
आपल्याकडे २००५ साली त्सुनामी नंतर तामिळनाडूमध्ये पर्यावरणस्नेही सार्वजनिक शौचालय बांधले गेले.त्याच प्रकारचे ही शौचालये भारतात अनेक ठिकाणी अर्ध्यमने उभारली. मानवी मल,मूत्र व पाणी यांना वेगळं करण्यासाठी टॉयलेटच्या भांड्याला तीन वेगवेगळी छिद्र पाडली जातात. मूत्र व पाणी एकत्र आल्यास जिवाणूंची वाढ होते,मिथेन वायू तयार होऊन दुर्गंधी येते. त्यामुळे दुर्गंध नाहिसा केला व त्यात पाणी जाऊ दिले नाही तर याचा युरीया तयार होतो. हा युरीया महिनाभर टाकीत साठवून ठेवला जातो.मल दुसऱ्या टाकीत साठवलं जातं. सहा महिन्यात याचं उत्तम कंपोस्ट तयार होतं,त्याला आपल्याकडे सोनखत म्हणतात. या सगळ्या अशा प्रकारच्या शौचालयाला ड्राय टॉयलेट्स म्हणतात.
'निसर्गाने प्राण्यांचे मल व मूत्रविसर्जन वेगळे राहवे ही रचना केलेली आहे,पण इथेही आपण निसर्गाच्या विरोधात जातो शक्य तिथे ड्राय टॉयलेट्स करायलाच हवेत कारण 'एक थेंब मैला हजार लिटर पाणी प्रदूषित करतो असे राहुलजी ठामपणे सांगतात त्यांच्यातील हा ठामपणे मला जीवनात ताठ उभा राहायल सांगून गेला.
भूजलाच्या सध्या परिस्थिती बाबत काही थोडंस .... आजमितीला भारतभर ज्ञात असलेल्या साडेचार कोटी बोअरवेलमधून पाणी उपसले जाते.१३० कोटी जनतेपैकी ८० टक्के जनतेच्या गरजा भूजलातून भागवल्या जात आहेत. त्यामुळे बेसुमार उपसा सुरू आहे.
सत्तरच्या दशकातील जमिनीखाली विस तीस फुटांवर मिळणारे पाणी आता दोनशे फुटापर्यंत ही मिळत नाही.देशभर खोल बोरवेल्स मारण्याची स्पर्धा सुरु आहे.महाराष्ट्रात विशेषता मराठवाड्यात पाचशे,हजार अगदी-बाराशे फुटांपर्यंत खोल जात आहेत पाणी मिळवण्यासाठी,पंजाब,हरियाणा या पाच नद्यांच्या प्रदेशातही भूजल संपत चालले आहे. तिथे भाताचेही पीक ते लोक भूजलावर घेत आहेत.पाण्याचा किती हा अपव्यय,शास्त्रज्ञांनी कार्बन कालमापन पद्धतीवर आधारित भूजलाची वय सांगण्याची पद्धत विकसित केली आहे. दोनशे फुटांवर मिळणारे पाणी दोनशे वर्ष जुने असते.त्याला जमिनीपासून खाली मुरत मुरत दोनशे फुटांवर जाण्यासाठी दोनशे वर्ष लागले आहेत. तसेच ८०० फुटावरचे पाणी आठशे वर्षांपूर्वीचे आणि बाराशे फुटावरचे पाणी बाराशे वर्षांपूर्वीचे आहे. पण आपण त्याचा उपसा काही महिन्यातच करून टाकतो.उद्या हे संपणार आहे. किंबहुना आकडेवारी सांगते आहे,की निव्वळ महाराष्ट्रात द्रवर्षी चाळीस हजारापेक्षा अधिक बोरवेल आटल्यामुळे निकामी होत आहेत...
खरेतर लोकांना जागे करण्यासाठी दोन महत्वाच्या विषयावर जनजागरण करणे खूप महत्त्वाचे आहे.आभासी पाणी (Water foot print) व पाण्याची उत्पादकता (Productivity of Water),भारताचा पाणी वापर हा शेतीत सर्वात जास्त म्हणजे पावसापासून मिळणाऱ्या पाण्याच्या ८५ ते ९० टक्के पाणी शेतीला वापरले जाते. पण पाण्याच्या उत्पादकतेत आपण प्रचंड मागासलेले आहोत. युरोपातला शेतकरी एक हेक्टर जमिनीतून साडेतीन लाख रुपये कमावतो तर आपला शेतकरी हेक्टरी फक्त नऊ हजार रुपये कमावतो. ही आकडेवारी २०१५ ची आहे.
... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.