रात्र झाली होती. घोड्यावर स्वार होऊन एक प्रवासी समुद्राकडे निघाला होता.रस्त्याच्या कडेला एक खानावळ लागली. स्वार थांबला. घोड्यावरून उतरला. एका झाडाच्या बुंध्याला त्याने घोडा बांधला आणि खानावळीत प्रवेश केला.'समुद्र सफरीवर जाणाऱ्या सर्वांच्याच अंतकरणात माणसांवर विश्वास असतो. रात्रीच्या प्रहरांवर विश्वास असतो.'
मध्यरात्र झाली. सगळे जण गाढ झोपेत होते. एक चोर आला आणि त्यानं त्या प्रवासाचा घोडा पळवून नेला.
सकाळ झाली प्रवासी जागा झाला. त्याला दिसून आलं की आपला घोडा नाहीसा झाला आहे. त्याला फार वाईट वाटलं ' कोणातरी माणसाच्या मनात घोडा चोरावा असं येतं याचा त्याला मोठा खेद झाला. 'खानावळीत निवासाला असलेले एकामागून एक त्याच्या भोवती जमले आणि बोलू लागले
पहिला सहनिवासी म्हणाला " तबेल्या बाहेरच घोडा बांधलास हे मूर्खपणाच नाही काय ? "
दुसरा म्हणाला," घोड्याला पायबंद घातला नाहीस हे त्याहून मूर्खपणाच आहे."
तिसरा बोलला," समुद्रापर्यंत येण्यासाठी घोडा वापरावा हे खरंतर खुळेपणाचं आहे."
चौथा म्हणाला," खुशालचंद सुस्त माणसांना पायी चालायचं जीवावर येतं. अशी माणसं घोडी विकत घेतात."
सर्वांच सर्व ऐकूण प्रवाशाला फार अचंबा वाटला. तो म्हणाला," मित्रहो, माझा घोडा चोरीला गेला यात माझा अपराध कोणता ते सांगायला तुमच्यात अहमहमिका लागली आहे. पण काय आश्चर्य ! ज्यानं माझा घोडा चोरला त्याच्यावर कसलाही ठपका तुम्ही ठेवत नाही."
' द प्रॉफेट ' खलील जिब्रान यांच्या पुस्तकातून